Sunday, 17 November 2019

                                                         चढाई लिंगाण्याची






कॉलेजमध्ये असताना मित्रमंडळी बरोबर सावंतवाडी आसपास जंगल भ्रमणासाठी जायचो . त्यावेळी , २५ वर्षापूर्वी – ट्रेकिंग ई. गोष्टी आत्ता इतक्या  व्हायरल नव्हत्या . आमचे एक प्रोफेसर श्री.कोलवणकर वय अंदाजे ५०-५२ आणि दुसरे एक मित्र वजा शिक्षक श्री. गुप्ता सर यांचे बरोबरीने बऱ्यापैकी फिरणे व्हायचे कॉलेज जीवन पूर्ण केल्यावर त्यामध्ये विनाकारणच अचानक खंड पडला .

मागील वर्षी पुण्यात रहायला आल्यावर जुनी ' कंडू ' जागी झाली आणि चांगले दोस्त मिळाल्यामुळे पदभ्रमण पुन्हा सुरु झाले .





 




श्री.मनोज बेडेकर यांचेकडून पुणे वेंचरर ग्रुप बाबत ऐकले होते . टाटा मोटर्स मधील समविचारी मंडळी ही संस्था चालवतात .श्री. प्रभू सर आणि सोबती  हे काम नेटाने करून  सर्वसामान्य नागरिकांसाठी गिर्यारोहणाचा कोर्स ते घेतात . वर्षातून दोन वेळा सभासदांखेरीज लोकांना त्यांच्या मोहिमेत सहभागी होता येते , श्री. बेडेकरांच्या ओळखीमुळे या २६ जानेवारीच्या “ लिंगाणा “ मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळाली.

२५ तारखेला सायंकाळी अल्का टोकिज चौकात एकत्र जमून प्रवास सुरु झाला . मी , ओंकार , श्री. बेडेकर आणि त्यांचे दोन मुलगे असे आम्ही एकमेकाना ओळखणारे होतो ईतर सर्व नेहमीचे एकमेकांच्या परिचित होते. दोन बसेस मिळून आम्ही ६०-६५ जण होतो. सिह्गड रोड , खानापूर मार्गे निघालो , वाटेतील घाटीने गाडी, ड्रायव्हर दोहोंची परिक्षा घेतली. वाटेत कादवे घाटीत  चहापानासाठी थांबलो. काळोख होता होता सिंगापूरला (भारतातीलच) पोहोचलो .












सर्व जण जमल्यावर प्रभूसरानी शिर गणती घेतली , आवश्यक सूचना केल्या आणि मोहीम उद्या सकाळी ठीक ६ वाजता सुरु होईल असे सांगितले. ज्यांच्याकडे डबे नव्हते त्यांच्यासाठी जेवणाची सोय होती. मुलींकरिता शेजारील शाळेतील एक खोली होती , बाकी आम्ही उघड्यावरच झोपलो. सर आणि त्यांचे सादातत्पर सैनिकांची लगबग बराच वेळ सुरु होती. पहिल्याच भेटीत सरांचा मिलिटरी बाणा लक्षात आला होता त्यामुळे सर्व जण सकाळी वेळेत तयार झाले .

मोहीम सुरु करण्यापूर्वी १०-१० जणांचे गट करून पुन्हा शिर गणती झाली सूचना मिळाल्या,आणि त्या तंतोतंत पाळण्याची ताकीदही. सगळ्यांच्या कमरेला घट्ट दोरी बांधण्यात आली आणि आमची चाल सुरु झाली . अजून काळोखच होता ७-८ जणांनंतर १ स्वयंसेवक नेमला होता.सर्व जण झपाझप चालण्याचा प्रयत्न करत होते , स्वयंसेवक एकसारखे ओरडत होते ‘ ग्याप पडू देऊ नका ‘ अर्थात कोणी रस्ता चुकण्याची भीती. थोड्यावेळाने दिसू लागले. कठीण अशा नाळेतून उतरून लिंगाणा पायथा गाठला. कमर पट्ट्याची तपासणी झाली ,माझा पट्टा सैल होता(त्यांच्या मते) तो एव्हढा आवळला की तो सोडवे पर्यंत मला काही खाताच येऊ नये, अर्थात त्याचे महत्व नंतर कळलेच पट्ट्याला हुक अडकवण्यात आला.

चढाई सुरु झाली आमची ५ जणांची फाटाफूट झाली . चढाईचे वर्णन मला करता येणार नाही ,ते ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवले त्यांनाच कळेल. कोळी (स्पायडर), घोरपड, खेकडा, पाल ई. तमाम प्राण्यांचे कसब आत्मसात करून चढाई सुरु ठेवली. ठराविक अंतरावर स्वयंसेवक आपले काम चोख बजावत होते. कमरेच्या हुकाची दोरी बदलणे ,चढाईला मदत करणे , हात-पाय नक्की कोठे रोवणे गरजेचे आहे त्याच्या सूचना देणे- कधी प्रेमाने तर कधी जोरात असे अविरत काम आणि प्रभू सरांचा धाक यामुळे आम्ही सर्व सुखरूप पोचलो.वाटेत ओंकारच्या पोटात गोळा आल्याने त्याला असह्य वेदना होत होत्या, शिखर गाठल्यावर बहुदा तो सर्व विसरला. ९.३० झाले होते त्यामुळे वर जास्त वेळ थांबता येणार नव्हते, कारण चढाई सोपी ठरावी इतकी उतरण कठीण असते.

जिना उतरताना आपण समोर पहात उतरतो परंतु सुळका किंवा शिखर उतरताना सतत कड्याकडेच तोंड आणि दरीकडे पाठ करून उतरावे लागते. दोन पायांमधून खाली पहात पाय टाकावे लागतात त्यामुळे सतत खोल दरीचे दर्शन होत रहाते. उतरताना बेडेकर पुढे गेले होते , माझ्याबरोबर त्यांचे मुलगे होते ओंकार मागे होता. अर्धी उतरण झाल्यावर पुरणपोळी , संत्र असे खायला मिळाले तसेच यथेच्छ पाणी देखील पिता आले. कड्यामध्येच एक गुहा खोदलेली आहे – जुना तुरुंग होता असे समजतात , तेथेच खाणे पिणे झाले. मजल दरमजल करीत खाली पोचलो बेडेकर तेथे होतेच. अतिशय तीव्र उतार आणि निसरडी वाट असल्याने पायाखालचे लहान मोठे दगड सतत घरंगळत जोराने खाली येतात त्यातील एकाचा प्रसाद बेडेकाराना मिळाला होता आणि त्यांच्या डोक्यातून भाळाभळा रक्तस्त्राव झाला होता. काल सरांनी प्रत्येकाच्या डोक्यात टोपी हवी असे का सांगितले होते ते अत्ता लक्षात आले सूचनांचे पालन का करायचे तेही कळले.













जी नाळ सकाळी आम्ही मोठ्या जोशात उतरून गेलो होतो ती चढताना आमचा जीव मेटाकुटीस आला. मधेच माझ्या पोटात गोळा आला पण तो सहन करूनच नाळ पार केली. नंतर पुन्हा पाणी आणि अल्पोपहाराची सोय होती त्याचा लाभ घेतला. थोड्यावेळाने बेडेकर, ओंकार आले , वाटेत ओंकारला प्रचंड त्रास झाला होता त्याच्या दोन्ही पायात गोळे आल्याने त्याला नीटसे उभेदेखील रहाता येत नव्हते तरीही त्याने निग्रहाने नाळ पार केली.
आता वस्तीचे ठिकाणा पर्यंतचा रस्ता जवळपास सपाटीचा होता तेथे न चुकता घेऊन जाण्याचे काम छोटा डॉनने (शिवप्रसाद लाहोटी ) केले.







संध्याकाळी पावभाजी, पुलाव, गुलाबजाम असा बेत होता अशावेळी अन्नाची चव न्यारीच लागते. लगेचच निघून ९.३० ला पुणे गाठले. पुणे वेंचरर , प्रभू सर त्यांचे सोबती यांचेमुळे एक अविस्मरणीय अनुभव घेता आला ,लिंगाणा चढाईचे सर्व श्रेय त्यांनाच, सर्व टीमला शतशः धन्यवाद.



Sunday, 22 September 2019






देखभाल का दुरुस्ती
?


सायकल जनसामान्यांच्या जीवनाची अविभाज्य घटक आहे. परंपरेने  सायकलचा वापर दळणवळण अथवा वहातुकीचे साधन म्हणून केला  जातो. मुंबईचे डबेवाले असोत वा पुण्यातून एकेकाळी औद्योगिक वसाहतीकडे जाणारा  कामगारांचा तांडा असो सायकलला पर्याय नव्हता. अजूनही काही ठिकाणी सायकल विकत घेण्यासाठी पैशांची साठवण केली जाते
, इतके सायकलचे महत्व आहे.


काळ बदलला औचित्य हरविले

दैनंदिन वापरासाठी अत्यंत किफायतशीर, पर्यावरणस्नेही, आरोग्यदायी आणि परकीय चलन वाचविणारे वाहन म्हणुन आधुनिक काळात खरतर सायकल लोकप्रीय होणे अपेक्षित होते. कालौघात उपयुक्ततेची जागा प्रतिष्ठेने घेतली आणि पुण्यासारख्या शहरात तर सायकल प्रतिष्ठाप्रतिक (स्टेटस सिंबॉल) बनली. परिणामी सायकल सामान्य राहिली नाही.
कोणत्याही यंत्राचे सुचलन होण्यासाठी त्याची योग्य देखभाल आणि आवश्यकतेनुसार दुरूस्ती गरजेचे असते. सायकलचे बाबतही हे सत्य आहे. बरेच वेळा देखभाल आणि दुरुस्तीमधे आपण गफलत करतो. सायकलची नियमीत देखभाल आपण स्वतः घरच्या घरी करू शकतो याकरिता महिन्याकाठी फक्त दोन तास खर्च करण्याची तयारी हवी. केवळ देखभालीपोटी  ८००, १०००, १५०० रुपये खर्च करण्याची गरज नाहीये. सायकलवर सर्रास असा खर्च केल्यामुळे सायकल महागडी बनत चालली आहे. वापरामुळे होणारी झीज आणि मोडतोड याच्या दुरुस्तीकरिता उत्तमातील उत्तम आस्थापनाची सशुल्क सेवा जरूर घ्यावी.

जनसामान्यांच्या आवाक्यात सायकल वापर रहावा यासाठी सायकल-देखभाल किफायतशीर राखणे  हे  सजग सायकलवीरांचे कर्तव्य आहे.




#MyBy
Maintain Your Bike Yourself

माहिती अथवा मदत यासाठी जरूर संपर्क करा.


https://anandshodh.wordpress.com/category/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%ab%e0%a4%b0%e0%a5%80/

Monday, 19 August 2019

सज्जनगड सायकलस्वारी


सायकलस्वारी सज्जनगडची







      जून २०१३ मध्ये मी पुण्याला राहण्यास आलो. पुण्याला येण्याआधी अंदाजे ५-६ वर्षे पूर्वीपासून सायकलिंग चा छंद लागला होता. त्याला कारणीभूत आहेत एक सरदारजी, श्री. समिंदर सिंग सालुजा जे दिल्लीचे  रहिवासी आहेत. श्री. समिंदरजी पुणे गोवा सायकलिंग प्रवासा दरम्यान कोळथरेंला आले होते. मी माझ्याकडील गाडी, सायकल या विषयी विविध कात्रणे त्यांना दाखविली आमच्या खूप गप्पाही झाल्या. जाताना म्हणाले डाक्टरसाब आप क्यु नही सायकलिंग करते ? मी अडचणींचा पाढा वाचला तरी त्यांनी आग्रह सोडला नाही शेवटी त्यांच्याच सल्ल्यानुसार मी पहिली सायकल (ट्रेक ३६००) पुण्यात खरेदी केली. सायकल कोळथरेंच्या पंचक्रोशीमध्ये यथेच्छ चालविली. आमचे गाव समुद्रकिनार्‍यावर असल्याने कोठेही जायचे झाले की प्रथम पूर्ण डोंगर चढावा लागे शिवाय रस्त्याची अवस्थाही दयनीय होती. या कारणांमुळे ती सायक विकण्याचा निर्णय मी घेतला.
 
घर में आप सौतन ला रहे हो
      ज्यावेळी मी सायकल खरेदी करण्याचे ठरविले तेव्हाच मला सरदारजींनी बजावले होते घर में आप सौतन ला रहे हो| ‘‘तुम्ही घरात सवत विकत आणत आहात’’ याचा प्रत्यय सायकल विकल्यावर मला आला. फार दिवस मी सायकल शिवाय राहू शकलो नाही आणि परत एक सायकल (ट्रेक ४३००) विकत घेतली. पहिली सायकल घेतली त्या वेळेस पुण्यातही अशा सायकल्सचे स्तोममाजलेले नव्हते. या वेळी मात्र पुण्याभर अशा सायकल्स (विविध नाममुद्रा ) चा सुळसुळाट झाला होता. समिंदर सिंग यांच्या प्रेरणेतूनच मी सायकलशी जोडला गेलो.
      कालांतराने पुण्याला येताना अर्थातच सोबत सायकलही  आणली. सुदैवाने मला श्री. राजेंद्र दीक्षित यांचा सारखा सच्चा निसर्ग प्रेमीसायकलस्वार मित्र लाभला. त्यांच्या बरोबरीने आणि प्रेरणेने पुणे शहरात कामासाठी चांगल्यापैकी सायकल सवारी सुरु   होती. पुण्यात कामानिमित्त फिरण्यासाठी मी गाडी वापरतच नाही कायम सायकलनेच फिरतो. सायकलला मागील बाजूस ‘सायकल चालवा निसर्ग वाचवा’ असा बोर्ड लावला आहे. सिग्नलपाशी  उभा असताना बरीच मुले ‘काका भारी एकदम’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देतात. एकदा असाच उभा होतो शेजारी एक पोलीसकाका होते त्यांनी विचारले सायकल चालवा हे कळले पण निसर्ग वाचवा ही काय भानगड ? एव्हढ्या गर्दीत त्यांना समजावणे माझ्या कुवती बाहेर होते. आमच्या शेजारील (लाडघर) गावचे श्री बेडेकर ७-८ वर्षापूर्वी पुण्यात स्थायिक झाले आहेत त्यांची योगायोगाने भेट झाली आणि गप्पांच्या ओघात त्यांचे सायकलप्रेमही लक्षात आले. ते रोज  व्यायामासाठी २०-२२ किमी सायकल सवारी करतात. त्यांच्या आग्रहाखातर एकदा सिंहगडावर सायकल स्वारीचा अयशस्वी प्रयत्न केला. मी ३/४ सिंहगड सर करुन माघार घेतली. काही दिवसांपूर्वी श्री. बेडेकरांची पुनः भेट झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या सज्जनगड वारीची माहिती दिली. गेले - वर्षे ते दसर्‍याच्या दिवशी पुणे ते सज्जनगड सायकल ने जातात कोण सोबत आले तर ठिक अन्यथा एकटेच.
      १३५ ते १४० किमी सायकलिंग एका दिवसात प्रथमच  करायचे म्हणजे खूप प्रॅक्टिस हवी. मी पुण्यातल्या पुण्यात सायकल फिरवतो पण एवढया लांब पल्याचा अनुभव नव्हता म्हणून ३-४ दिवस रोज २०-२५ किमी सासयकलिंगचा सराव केला.
      तिन ऑक्टोबरला पहाटे .०० वाजता सिंहगड रोड वर संतोष हॉल जवळ एकत्र येऊन दोघांनी प्रवास सुरु केला. कात्रज बायपासच्या बोगदयामध्ये थोडे गुदमरल्यासारखे वाटू लागले कारण आधी घाट चढून दमलो होतो आणि बोगद्यात वायुविजन नव्हते, पण विशेष त्रास झाला नाही. उतार उतरुन शिरवळ जवळ चहा घेऊन लगेचच निघालो. श्री. बेडेकरांच्या सल्ल्याप्रमाणे सायकलिंग करण्याचे ठरले होते, त्यांच्या म्हणण्यानुसार १० वाजेपर्यंत जास्तीत जास्त मजल मारु नंतर ऊन झाल्यावर त्रास होईल म्हणून विश्रांती घेतली नाही.
      नाष्टयाला खंडाळा गाठायचे ठरविले होते त्याप्रमाणे तो गाठला पण मला थकवा जाणवु लागला होता मजल दर मजल करत खंडाळयाला पोचलो पोहे खाल्ले आणि मस्त चहा प्यायलो. मला तरतरी आली, बेडेकर फ्रेशच होते.
शुगर, बी.पी. इ. त्रास होऊ शकतो    

घाट चढायला सुरुवात केल्यावर माझे पाय दुखु लागले मी अधुन मधून ट्रकचा आधार घेत घेत घाट चढलो. बेडेकर मात्र जोशात पुर्ण घाट चढले. शिवाय ज्या ट्रकचा आधार मी घेतला होता त्याला एकदा ओव्हरटेक करुन पुढे गेले. घाट माथ्यावर रानातून काढून आणलेली ताजी सिताफळे विकत मुले बसली होती त्यांचा आस्वाद घेतला, अर्थात अशावेळी गोडी फार अधीक जाणवतेच.१०-१५ मिनिटे विश्रांती घेऊन पुनः निघालो, सातार्‍याच्या आधी १५-२० कि.मी. अंतरावर एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलो (चाह मी एकटाच घेणार होतो) टपरीवर एक ट्रकवाले गृहस्थ भेटले ते अहमदाबादहून बेंगलोरला चालले होते. आमचा इरादा ऐकून ते थक्क झाले आणि सद्भावनेपोटी आम्हाला सल्ला दिला, आता दुपार झाली आहे 3 वाजेपर्यंत आराम करा मग निघा. उन्हातून शुगर, बी.पी. इ. त्रास होऊ शकतो, कोणतेही नातं अथवा ओळख नसताना त्यांनी व्यक्त केलेल्या भावानांची कमालच वाटली.
      खरतर मी फार थकलो होतो पण ते दाखवणे मला योग्य वाटत नव्हते कारण त्याचा परिणाम श्री. बेडेकरांवर होऊ शकला असता. त्यांचा निग्रह आणि स्टॅमिना पाहून मी थक्क झालो. मी कसा तरी सातार्‍यामधील हॉटेल पर्यंत पोहोचलो. जेवताना बेडेकरांनी विचारले सज्जनगडापर्यंतयेणार ना? मी म्हणालो  आधी खाउया आणि मग ठरवू. प्रत्यक्षात मी मनाशी ठरविले होते सातारा शहर पार करुन आडोसा पाहून थांबायचे. खाणे झाल्यावर पोवई नाका, शनिवार पेठ इ. भागातून सातारा पार करत बोगद्यातून बाहेर पडलो. मी लगेचच माझा इरादा  जाहीर केला. बेडेकरांनी थोडयाच अंतरावरील निवारा (वडाच्या झाडाखाली बंद टपरी) सुचवला, मी तेथे थांबलो. श्री. बेडेकर पुढे सज्जनगड सर करण्यास निघून गेले.
      थोडया वेळाने पाऊस सुरु झाला त्यामुळे त्या आसर्‍यासाठी एक गृहस्थ तेथे आले. त्यांचे वय अंदाजे ३० ते ३२ असावे. रंग, रुप, अंगकाठी, देहबोली पाहून मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही. थोडयावेळाने तेच बोलू लागले. मी सायकल स्वारीची माहिती दिल्यावर काळजीच्या स्वरात त्यांनीही सद्भावना व्यक्त केल्या. बोलता बोलता म्हणाले आम्ही वडारलोक गोरगरीब कष्ट करुन कसे तरी जगतो म्हणून मुलांना शिकविण्याचा प्रयत्न करतोय.समाजात आम्ही दुर्लक्षित आहोत. आमच्या आयाबहिणींचे छेडखानीचे प्रकार झाले तरी न्याय मिळत नाही. हे ऐकून मला दुःख झाले. पुढे म्हणाले १५ ऑगस्टच्या भाषणात मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक आईबापाने आपल्या मुलग्याकडेलक्ष दिले तर ही वेळ येणार नाही. मी हे ऐकून खरच दिग्मुढ झालो. आपण ज्यांना अशिक्षित, मागास समजतो त्यांचे विचार किती प्रगल्भ असू शकतात, हे प्रत्यक्ष अनुभवले. मा. मोंदीचा प्रभाव किती तळागाळा पर्यंत पडतो आहे हेही जाणवले.
      बरोबर दोन तासानी  श्री. बेडेकर आले. सकाळी जसे होते तसे फ्रेश !  एक मिनिटही आराम न करता लगेचच निघु म्हणाले. दरम्यानच्या काळात आगोम तेलाने मॉलिश केल्याने मी ही ताजातवाना झालो होतो.
      बेडेकरांच्या सूचनेवरुन मी लाटकरांच्या दुकानात पेढे घेण्यास गेलो. परत येऊन पहातो तर श्री. बेडेकरांजवळ एक मोटरसायकलस्वार (रॉंगसाईडला) येऊन काही तरी बोलत होता. मला त्याने विचारले काही खाल्ले का नाही? मी चेष्टेने म्हटले छे छे आम्ही सातारकरांकडचे काही खात नाहीत्याचमुड मधे तोही लगेच म्हणाला भटजी दिसताय! समाजात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा भाव अजूनही दृढमूल असल्याने  त्याने ही प्रतिक्रिया दिली असावी. आम्हाला शुभेच्छा देऊन लगेच निघूनही  गेला. नंतर मला बेडेकर म्हणाले मी जेव्हा दुकानात गेलो होतो तेव्हा त्या व्यक्तीने जबरदस्तीने एक मिनरल वॉटर ची बाटली बेडेकरांना आणून दिली होती. अशी समयसूचकता फार क्वचित पहायला मिळते. एकाच दिवसातला चांगुलपणाचा हा तिसरा धक्कामी अनुभवला. सातारा स्टँड गाठून स्वतःच  सायकली बस वर चढवून पुणे गाठले आणि ७.३० ला संध्याकाळी घरी सुखरुप पोचलो. लांब पल्याची ही पहिलीच सायकल फेरी होती. भविष्यात आणखी किती आणि कशा सायकल सफारी होतात ते पाहू.
सायकलस्वारी ठळक गोष्टी:
एकूण प्रवास (माझा)     ११० कि.मी.
वेळ                  सकाळी ५.१५ ते १२.१५
प्रत्यक्ष सायकलींग        तास
सरासरी वेग           १८.३ कि.मी. ताशी
कमाल वेग            ४८ कि.मी. ताशी



चला वाचूया .....Let's start reading.

सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom

पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे  लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...