Thursday, 3 June 2021
Saturday, 22 May 2021
करोना : चौफूशे : Terrace Garden
करोना, काही तरी करा ना !
दिवस मोजून थकलो, कित्येक महिने उलटले, दोन हजार वीस साल उलटून एकविस मधील पाच महिनेही सरले पण काळ, करोनाच्या 'साथीने' स्तब्ध उभा आहे. अनेकांना आर्थिक, मानसिक दृष्ट्या रक्तबंबाळ करून सोडणारा असा हा कालखंड !
कॉलेज जीवनापासूनच व्यायामाचे वेड थोडंफार का होईना होतंच, काळासोबत त्याचं महत्व आणि औचित्य प्रकर्षाने जाणवू लागले. शिवाय अनिल कपूर, मिलींद सोमण इ चिरतरूण व्यक्तींकडे पाहून जोश वाढतोच ! या ठाणबंध कालावधीत अनेकविध प्रकारचे व्यायाम, आहारावरील निर्बंध पाळून शरीर आणि मन आणखी सुदृढ करण्याचा कसोशीने प्रयत्न सूरू ठेवला आहे. याच काळात आणखी एका 'दिल के करिब' असणाऱ्या विषयाने उचल खाल्ली, तो विषय म्हणजे परसबागेत फळं, फुलं, भाजी लागवड.

माणूस आणि झाड !
मुळचा कोकणातील असल्याने शहरामधील चौरस फुटातील शेती / बाग (चौफूशे ) तशी लवकर पचनी पडणारी नव्हतीच. दोन हजार तेरा साली पुण्यात स्थायिक झाल्यापासून सहा सात वर्ष द्विधा मनःस्थितीमुळे वाया गेली. कोळथरेला रहात असताना गावातील कै. शरद दादा जोशी च्या आग्रहामुळे श्री निळू दामले यांचे 'माणूस आणि झाड' पुस्तक नुसतं चाळलं होतं. ज्यावेळी चौरस फूटातील शेती / बाग (चौफूशे) करण्याचे मनात आले तेव्हा तेच पुस्तक व्यवस्थित वाचले आणि मी प्रभावित झालो. शहरात ज्यांना चौफूशे करायची आहे त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे
चौफूशे
गच्चीत चौफूशे करून फळं, भाज्या, फुलं पिकवायची म्हणजे त्याची पूर्वतयारी अत्यावश्यकच. बागेला शक्यतो आपल्या आवरातील पालापाचोळा, काडी कचरा, घरातील ओला कचरा हेच वापरायचे असे ठरविले होते, थोडक्यात बिनामाती शेती ! आमच्या बंधूंचे मित्र श्री सुनिल भिडे, आमची एक मैत्रिण कीर्ती यांनी आपल्या गच्चीत फुलविलेले नंदनवन पहायला मिळाल्याने चांगली प्रेरणा मिळाली.

फुकट ते पौष्टिक !
पर्सनल गुगल पुन्हा कामी आले, मित्र शेखर फाटक कडून वाफ्याखाली घालण्यासाठी उत्तम दर्जाचे प्लास्टिक, मैत्रिण गौरी भावे हिच्या कडून आवश्यक असणारे मजबूत टिकावू ड्रम्स, सर्व चकट फू उपलब्ध झाले, फुकट ते पौष्टिकच ! सदाबहार मित्र विवेकच्या संपर्कातून हॉलो ब्लॉक्स आणले, सर्व साधनसामग्री गोळा झाल्यावर कार्यवाही सुरू केली. श्री दामलेंनी सूचविल्या प्रमाणे ड्रम्समधे उसाचे पाचड, पालापाचोळा आणि हरित द्रव्य कुजून तयार झालेला मसाला घालून ड्रम्स तयार केले.

गच्चीत उद्योग करणार हे कळल्यापासून बायकोने फुलझाडं लावण्याचा घोषा सुरु केला होता तिच्या समाधानासाठी झेंडू लावला ! मला खरतंर भाजी पिकविण्यातच स्वारस्य होते. काकडी, दुधी, खरबूज, भोपळा या वेलवर्गीय भाज्या, दोन प्रकारचे अळूं, पालक, टोमॅटो, पुदिना, गवती चहा असे इतर प्रकार लावून श्रीगणेशा केला आहे.

भाजी पिकवून थांबता येत नाही त्याचं काहीतरी व्यंजनही बनवावं लागते. गृहलक्ष्मीने दुधीहलवा, पाणीपुरी, अळूवडी आणि इतर काहीबाही बनविलं, आज आस्मादिकांनी पालकाची कोशिंबीर बनवून स्वतःच ताव मारला. आता ध्यास लागलाय भोपळ्याच्या गरमागरम घारग्यांचा !

माझ्यावर देवाची कृपा सतत राहिली आहे त्यामुळे चौफूशे मधेही यश येईल याची खात्री वाटते.
विशेष उल्लेखनीय : प्रत्यक्ष कामाला सुरवात केल्यावर आनंदराव पाळंदे यांनी त्यांच्या गच्चीतील झाडोरा दाखवून उपयुक्त सूचना केल्या. या विषयावर एक ब्लॉग लिहिण्याची सूचना वजा आदेश श्री अतुल सुळे यांनी दिला.
Saturday, 3 April 2021
पुणे वाई पांचगणी भिलार वाई Solo Cycling
पुण्याहून मध्यकोकणात उतरण्यासाठी मुळशी मधून जाणारा रस्ता गेले तीन वर्ष गाडी चालविण्याच्या परिस्थीतीत नाही. गेल्या काही महिन्यांत त्यात खूपच सुधारणा झाली आहे हे खरं आहे. मुद्दा हा की आम्हाला नेहमीच वाई महाबळेश्वर या काहीशा लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागे. मुळात महाबळेश्वर किंबहूना थंड हवेच्या ठिकाणांवर असणारे माझे प्रेम, या सततच्या प्रवासामुळे आणखी दृढ होत गेलं. त्यातही पसरणी घाट, आणि पांचगणी ते महाबळेश्वर हा परिसर कायमच मोहीत करतो. या भागातून जाताना शरीर गाडीत असलं तरी मन मात्र कायम सायकलच्या सीटवर बसूनच प्रवास करत असे.
एकला चलो रे
पुण्यात माझे समविचारी मित्रमंडळ असल्याने सायकल प्रवासात नेहमी सोबतीला कोणीतरी असावे असे वाटत असते, गंतव्य ठिकाणापेक्षा प्रवासातील आनंद अधिक महत्वाचा. याही वेळी अनेक जणांशी प्रवासाबाबत विचारविनिमय केला पण शेवटी एकट्यानेच बाहेर पडावे लागले.
दोन तीन दिवसांचाच प्रवास आणि तोही सुपरिचीत भागात त्यामुळे फार मोठी तयारी करणेची गरज भासली नाही. असे असले तरी सफर विनाविघ्न पार पाडण्यासाठी किमान आवश्यक तयारी केली. उन्हाळ्याचा फोफाटा लक्षात घेवून सोबत भरपूर पाणी घेतलं शिवाय पाण्यात बरेच खजूर आणि मीठही घातले प्रवासात त्याचा फायदा झालाच.
कॉमन सेन्स इज नॉट कॉमन
शनिवार वीस मार्चला सकाळी सहा वाजता घर सोडलं, हवा अल्हाददायक होती. नवीन कात्रज बोगद्याचा घाट रस्ता नेहमीचा चाकाखालचा असल्याने विनातक्रार बोगदा पार केला. चहाचा मोह टाळून सायकलिंग सुरू ठेवलं. वसुंधरा गुळ प्रक्रिया उद्योगाचा फलक पाहिल्यावर सायकलची चाकं तिकडे वळलीच. गरमागरम ताजा गुळ दिसल्यावर त्याचा आस्वाद न घेणं म्हणजे गुळाचा घोर अपमानच ! घरच्यासाठी एक लिटर काकवी घेवून मार्गस्थ झालो. पारंपारिक कलाकौशल्य आधुनिकीकरणाच्या रेट्यात चिरडली जाताना पाहून आत्यंतिक दुःख होते पण हायवे शेजारी शेतकरी बाई शेण गोवऱ्या थापतांना पाहून मन प्रसन्न झाले.शिरवळ गावा आधी राजस्थानी पुरोहित धाब्यावर आलुपराठ्यावर ताव मारून पुढे निघालो. 
आश्चर्य म्हणजे शिरवळच्या आसपास हायवेला चक्क सर्विस रोड आहे. मी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्विस रोडने जाणं पसंत केलं, मात्र कुठे कुठे या रस्त्याविषयी शंका निर्माण होते. अशाच संभ्रमावस्थेत असताना मी एका मोटारसायकलवीराला हा रस्ता मुख्य हायवेला जावून मिळेल ना असे विचारले. तरूण सहजतेने म्हणाला 'सर्वच सर्विस रोड हायवेला जावून मिळतात' दुनियेला कॉमन सेन्सच्या गोष्टी शिकविणाऱ्यालाच गुरू भेटला,
'कॉमन सेन्स इज खरंच नॉट कॉमन' म्हणायची वेळ माझ्यावरच आली. सायकल चालवतानाच आमचं अच्छा टाटा बायबाय झालं ! तो एमायडिसी मधे शिरला. मी एखाद दोन किमी पुढे गेलो असता तोच तरुण माझा माग काढत आला. माझ्या सायकल प्रवासामुळे त्याचे औत्सुक्य जागृत झाले होते, तरूण इस्लामपूरचा सिव्हिल इंजीनियर होता. माझी फेसबूक, इन्स्टा वरील माहिती त्याला हवी होती म्हणून त्याने मला परत गाठले. एकल सायकलसफरीचा प्रभाव किती आहे हे पुन्हा एकदा जाणवलं 
वाई मुक्काम
भर उन्हातून खंडाळा घाट पार करताना थोडी दमछाक जाणवली. विशेष करून माल वाहतूक करणाऱ्या एखाद्या महाकाय वाहनामुळे जेव्हा वहातूककोंडी होते त्यावेळी धूर, इंजिन्सची उष्णता, रस्त्याच्या बाजुचे तापलेले कडे आणि भरीला आपल्या सायकलची मुंगीची गती या सर्वांमुळे घुसमटल्या सारखे वाटते. एकदा घाटमाथा गाठल्यावर सुरुर फाटा, वाई रस्ता केव्हा येतो हे कळत देखील नाही.
वाईच्या दिशेने वळल्यावर लगेचच श्री घाटगे यांचे सदगुरू हँडिक्राफ्ट ( 9881592777)नावाचे दुकान आहे येथे मातीपासून बनविलेली विविध प्रकारची भांडी आणि इतर कलात्मक वस्तू वाजवी दरात मिळतात. या ठिकाणाची माहिती मला शर्वरी मेहेंदळेने दिली होती, अर्थात पर्सनल गुगल कामी आलं. सायकलवर वाहून नेता येईल एव्हढीच माफक खरेदी करून पुढे निघालो. वाई पर्यंतचा रस्ता सायकलिंगसाठी पर्वणी आहे अर्थात सुट्टीच्या दिवशी भरमसाठ रहदारीमुळे तो तितकासा आनंददायी वाटत नाही.
वाई मधे करंदीकर कुटुंबीय आपल्या वडिलोपार्जित पुरातन वाड्यामधे घरगुती पद्धतीने रहाणेची सोय करतात हे माहिती होतं एकदा मी जावूनही आलो होतो परंतू रहाण्याचा योग आज जुळून आला. साधी, स्वच्छ रहाण्याची सोय आणि चविष्ट घरगुती जेवण तेही दोन अडिचशे वर्ष जुन्या वास्तूमधे, आणखी काय हवं ? सायंकाळी नरोत्तम नाना फडणवीस यांच्या मेणवली येथील वाड्यात नतमस्तक होण्याची संधी सोडणं शक्यच नव्हतं. वाडा आणि परिसर दोन्ही छानच आहे, वाडयाची देखभालही केली जाते हे पाहून आनंद झाला. रात्री घाटावर कृष्णाईची आरती अनुभवली, घरगुती सुग्रास भोजनाचा आस्वाद घेवून झोपी गेलो.
पुस्तकांचे गाव भिलार
या मोहिमेतील माझ्या मनातील मुख्य आकर्षण पाचगणी-महाबळेश्वर या रस्त्यावरील सायकलिंग हे होतं, नियोजन देखील त्याच अनुषंगाने केलं होतं.
पहाटे साडेपाचलाच वाड्यातून बाहेर पडलो हवा खूपच अल्हाददायक आणि थंड होती त्यामुळे उत्साह द्विगुणीत झाला होता. नाक्यावर वाई स्पेशल चहा ढोसला आणि घाट चढण्यास सुरवात केली. थंड हवामान, स्वच्छ सुंदर हवा, मर्यादित वहातुक यांमुळे बारा किमीची चढाई सहजच पार केली. घाट रस्त्याच्या चढाईची तीव्रता देखील कमी असल्याने त्याचाही फायदा झाला. वाटेत वेगवेगळी झाडं, धायटी, रानजाई सारखी रानफुलं, झाडांमधून डोकावणारा उगवता भास्कर यांची विलोभनीय छबी मोबाईलमधे टिपली. घाटमाथ्यावर 'यारों की याद में' दोन कप गरमागरम कॉफीचा आस्वाद घेतला आणि मार्गक्रमण सुरू ठेवले.
आमची सौ पुण्यामधे नियमीतपणाने सेंद्रीय फळं, भाज्या खरेदी करत असते. तिच्याच संपर्कातील भिलार येथील एक शेतकरी उमेश भिलारे ( 7385666021) यांचेशी संपर्क करुन त्यांचे शेत गाठले. निर्विष शेती करणे ही खरोखरीच एक कसरत असते, अनेक दृश्य अदृश्य आव्हानांना सामोरे जात हे व्रत पाळावे लागते. माझ्या दृष्टीने असे शेतकरीच खरे सेलिब्रिटी आहेत, त्याच भावनेने उमेशसह स्ट्रॉबेरी पिकासोबत सेल्फी काढला, त्यांच्या दृढनिश्चयाचे कौतुक करून निरोप घेतला. परत फिरल्यावर मुख्य भिलार गावातून येताना पुस्तकाचे गाव प्रकल्याच्या मुख्य कार्यालयाला भेट देण्याचा मोह टाळणे शक्यच नव्हते. दालनाला भेट दिल्यावर, शासनाने मनात आणले तर प्रशासन एखादा चांगला प्रकल्प कार्यान्वयीत करू शकते, याची खात्री पटली. 
मी प्रवासाचा आनंद लुटत असताना घड्याळ आपले काम चोख बजावत होते त्यामुळे मला आटपतं घ्यावं लागलं आणि महाबळेश्वर रस्त्याचा मोह टाळून वाईचा रस्ता निवडावा लागला. अर्थात पांचगणी वाई सायकल प्रवास म्हणजे घसरगुंडीवरून घरंगळत खाली येण्यासारखेच आहे. दोन वाजता वाई मुक्कामी आल्यावर आंघोळ करून मी नेहमी ज्याचा आळस करतो ते स्ट्रेचिंगचे धडे गिरवले आणि थोडावेळ विश्रांती घेतली.
मित्र असावा ऐसा
पुण्यात आल्यापासुन मित्रमंडळ वाढतंच आहे, त्यातही सायकलप्रेमी दोस्त जरा अधिकच. असाच एक सदाउत्साही मित्र म्हणजे विनय तिनईकर ! आमच्या मंडळात तो वयाने लहान आणि लाघवी स्वभावाचा असल्याने आम्ही त्याला गुडबॉय म्हणतो. शनिवारी सुरुर फाट्यावर वळल्यावर मी विनयला फोन करुन माहिती दिली आणि रवीवारच्या प्रवासाची कल्पना दिली. क्षणाचाही विलंब न करता 'सर मी उद्या तुम्हाला घ्यायला वाईला येतो तुम्ही एसटी बसने येवू नका' असे फर्मान काढले. त्याच्या निःसंदिग्ध आग्रहामुळे माझे बोलणेच खुंटले. लगेचच आखणी झाली आणि रवीवारी चार वाजता वाई स्टँडसमोर भेटण्याचे ठरले.
रवीवारी नियोजित वेळेत विनय हजर झाला पण आमचा अतिउत्साह नडला, होंडा सिटीची डिकी मोठ्ठी असुनही चाकं काढलेली माझी सायकल त्यात मावली नाही. सायकलचे हँडल सोडवून नाईलाजाने सायकल पुढच्या आणि मागच्या सीट्स च्या मधे उभी केली, चाकं, पिशव्या, खरेदी सामान डिकीत ढकलले. विनयचे दोन मुलगे आणि मी, मागच्या सीटवर घुसलो आणि परतीचा प्रवास सुरु केला. सायबाच्या थाटात वातानुकुलीत गाडीतून डुलक्या काढत घर कधी गाठले ते कळले देखील नाही.
संपूर्ण प्रवासात एकूण सतरा वेळा पैसे अदा करणेची गरज भासली, त्यातील फक्त दोन व्यवहार नकदीने केले उर्वरीत पंधरा व्यवहार डिजिटल अर्थात कॅशलेस पध्दतीने केले. भीम ऑप कार्यान्वयीत झाल्या दिवसापासून मी प्रयत्नपूर्वक डिजिटल पेमेंटचा आग्रह धरतो, आणि इतरांनाही प्रोत्साहित करतो.
लैस विथ कॅश ते लेस कॅश !
आणखी एक एकल आनंदयात्रा सुफल संपूर्ण झाली.
रामराम
Sunday, 13 September 2020
मास्कचे महात्म्य
मास्कबाबत बोलू काही !
पुणे... स्वत:ची अस्मिता, स्वत:चा विचार करण्याची क्षमता असण्याचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांचं शहर... सहाजिकच कोणीतरी सांगितलं म्हणून सहजपणे ऐकणाऱ्यांपैकी आम्ही नाही...मग तो मास्क असो की हेल्मेट !
सध्या मास्कबाबत हा लेखनप्रपंच
मुळात मास्क का वापरायचा? याचं सर्वात कॉमन उत्तर म्हणजे पोलिसाला ५०० रुपये दंड ऊगाच द्यावा लागू नये म्हणून... असं येईल... खरी गल्लत येथेच होत आहे...
आपणा सर्वांना माहीत आहे की मास्क वापरायचं खरं काम शल्यविशारदांचं... ते का बरं मास्क वापरतात ? तर १९०२ साली फिलाडेल्फिया येथे एक शस्त्रकर्म चालू असताना काही वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की सर्जन लोक बोलत असताना त्यांच्या थुंकीचे सूक्ष्म कण ऑपरेशनच्या जखमेत पडत आहेत... यावर आणखी संशोधन होऊन तथ्य आढळल्यावर मास्क वापरण्याची पद्धत पडली...
आपल्याही बोलण्या, खोकण्या, शिंकण्यामधून उडणाऱ्या थुंकीच्या कणांमधून व्हायरसचा संसर्ग पसरण्याची शक्यता असते.... ते कण पसरू नयेत, तिथेच शोषले जावेत म्हणून मास्क. म्हणजे मास्कचं मुख्य काम आपल्यामुळे इतरांना संसर्ग होऊ नये हे असून दुसऱ्यामुळे आपल्याला संसर्ग होऊ नये हे उपकथानक आहे (ते ही महत्त्वाचं आहेच)... हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे
आता प्रश्न येईल की, मला तर काहीच होत नाहीये, मग मी का मास्क वापरू ?
मला त्रास होत नाही म्हणजे मला इन्फेक्शनच नाही असं काही जरूरी नाही... इन्फेक्शन असूनही लक्षणमुक्त असणाऱ्या रुग्णांचंच प्रमाण प्रचंड आहे, हे वेळोवेळी होणाऱ्या सीरोसर्व्हेमधून समोर येत आहे... खरं तर हा नवीन आजार असल्याने त्याबद्दल निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही, संशोधनातून मिळणाऱ्या निरीक्षणांमधून गाईडलाईन्स बनत आहेत.. त्या कधीकधी बदलत असलेल्या दिसल्या तरी, सध्या त्या काटेकोरपणे पाळणं हेच आपलं कर्तव्य आहे... लक्षणमुक्त रुग्णांकडून व्हायरसचा प्रसार होतो की नाही याबद्दल अजूनही नक्की माहीत नसलं तरी, होत असावा असं मानण्यासही जागा आहे... त्यामुळे खबरदारी म्हणून मास्क वापरणं श्रेयस्कर...
आपल्याला जर समजलं की उद्या नळाला कदाचित् पाणी न येण्याची शक्यता आहे... मग अशा वेळी आपण काय करतो ? खबरदारी म्हणून पाणी भरून ठेवतोच ना? तसंच इथेही करायचं आहे... मास्क वापरायचा आहे...
आणखी एक प्रश्न असतो की, खुल्या हवेत, विशेषतः व्यायाम करताना मास्क वापरायचा की नाही ? तर अशावेळी सुद्धा मास्क आपल्या तोंडावर तरी असायलाच हवा... आजूबाजूला ६ फूट अंतरापर्यंत कोणी नसेल तर नाकावर नाही ठेवला तर चालेल... समोरून कोण येत असेल तर नाकावर चढवावा नंतर पुन्हा खाली करून तोंडावर ठेवावा...
दोन माणसांपैकी एकाने मास्क वापरला तर इन्फेक्शनचा धोका ५० टक्क्यांनी कमी होईल... दोघांनीही वापरला तर ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात धोका कमी होईल...
आपले पोलिस बांधव केले ५-६ महिने प्रचंड तणावात काम करत आहेत... हजारो बांधव केवळ आपल्यासाठी कर्तव्य बजावत असताना आजारी पडले आहेत, काही शहीदही झाले आहेत. आपण मास्क घातला आहे की नाही हे बघत बसणं हे खरं तर त्यांचं काम नाही, पण आपल्या बालिशपणामुळे आपण त्यांचा भार विनाकारण वाढवत आहोत, त्यांचा संसर्गाचा धोकाही वाढवत आहोत आणि वर दंड घेतला म्हणून त्या़ना नावेही ठेवत आहोत... हे दुर्दैवी आहे...
सध्या कोरोनाची परिस्थिती भीषण होत चालली आहे, बेड मिळणं अवघड झालंय, मिळाला तर ऑक्सिजन मिळणं अवघड... व्हेंटिलेटर तर त्याहून दुष्प्राप्य. त्यात कहर म्हणजे हा आजार घरात एकट्यालाच होत नाही, अनेका़ना होतो... एकदा रुग्ण रुग्णालयात गेला की त्याची प्रत्यक्ष भेटून विचारपूस करणं शक्य नाही, त्याला घरचं जेवण बिवण पण नाही... रुग्णालयात जे देतील ते खायचं असा सगळा मामला आहे. एकाच घरातले ४ जण वेगवेगळ्या रुग्णालयात आणि उरलेले १-२ लोक घरात... अशी परिस्थिती अनेक ठिकाणी उद्भवलेली आहे.
त्यामुळे आतातरी आपल्या हौशीमौजीला जरा मुरड घालू या, अत्यावश्यक तेवढ्याच गोष्टी करू या... बाहेर जबाबदारीने वागू या... मास्क व सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन करू या.
कोरोनाचं संकट कधीतरी संपेलच... पण कोरोनानंतरचं जग सहकुटुंब बघायची इच्छा असेल तर सध्या थोडे परिपक्वतेने वागूया.
कोणता मास्क वापरावा याबद्दल पुन्हा कधीतरी !
डॉ. रणजीत निंबाळकर, ०८०८७८७३११५
डॉ निंबाळकर पुणेस्थित एक प्रथितयश आयुर्वेद चिकित्सक आहेत.
Monday, 19 March 2018
Self Publication रामराम !
ही ऋणमुक्तीसाठीची पोस्ट नाहीये, पण सगळ्यांचे आभार मानणे अस्थानी नक्कीच नाही. पोस्ट मधे कोणाचाही नामोल्लेख मी करत नाहीये, तरी एका व्यक्तीचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटतो ती व्यक्ती म्हणजे 'गोरख टेम्पोवाले'
दोन मोहिमांमध्ये ते आमच्या सायकल वाहून नेण्यासाठी सोबत आले होते. त्यानी कार्यक्रमास यावे असे मला वाटत होते. ते आले आणि पुस्तक विकत घेऊन माझी सही घेऊन गेले.
त्यांना सलाम !
काच्या अनावरणानिमित्त योजलेले स्नेहमीलन आनंदोत्सव बनून गेले. गेले अनेक दिवस (मी सोडून) सर्वांनी अथक प्रयत्न केले होते त्याचे चीज झाले.
Monday, 12 February 2018
Tuesday, 24 October 2017
तर सायकलला राम-राम ! Horse Riding
चला वाचूया .....Let's start reading.
सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom
पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...
-
गुंतवणूक गुरु वॉरेन बफे ३० ऑगस्ट रोजी ९५ वर्ष पूर्ण करत आहेत . जगातील एक अग्रगण्य श्रीमंत व्यक्ती म्हणून आपण सर्व जण त्यांना ओळख...
-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इथे या ठिकाणी ! सात आठ महिने घरी बसल्याने त्यामधेच आनंद शोधायला शिकलो पण माणसाचा मूळ स्वभाव जात नाही. बरेच दिवस ...
-
पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...





















