Showing posts with label Coastal Konkan. Show all posts
Showing posts with label Coastal Konkan. Show all posts

Wednesday, 1 April 2020

कोकण किनारपट्टी - चढउतारांचा लपंडाव


कोकण किनारपट्टीवरील सायकल सफर

 
चढ- उतारांचा लपंडाव





दोन हजार चौदा/ पंधरा साली आम्ही मनाली लेह खार्दुंग ला(मलेखा) ही सायकलसफर(सास) केली. तेव्हाच आमचा WA ग्रूप बनविला होता, त्यामधे सतत सायकलप्रेमींची भर पडत असते. आमच्या मलेखाच्या चमुतील एक ज्येष्ठ आणि उत्साही व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश पाटील. पाटलांचा माझ्यावर विशेष स्नेह. मलेखा नंतर एखादी लाँग टूर करण्याची कल्पना त्यांच्या मनात अनेक दिवस होती पण काही ना काही कारणाने ती प्रत्यक्षात उतरत नव्हती. नाही म्हणायला पुणे-पंढरपूर ही दोन दिवसांची छोटेखानी सायकलसफर आम्ही एकत्र केली होती. त्यावेळी मी, पाटील, केदार गोगटे आणि ओंकार महाजन असे एकत्र होतो.
यावर्षी काहीही करून लांब पल्ल्याची सास करायचीच असा चंगच जणु पाटलांनी बांधला होता. नियोजनाच्या सुलभतेसाठी नेमकेच वीर असावेत असा प्राथमिक विचार होता. आमचे लाडके शिलेदार अविनाश गोसावी, आनंद तुळपुळे, विनय तिनईकर असे एकत्र येउन एक दोन चाय पे चर्चा रंगल्या आणि अलिबाग गोवा हा मार्ग निश्चित झाला. सर्वानुमते २१  ते २९ ऑक्टोबर या तारखा ठरल्या. माझ्या स्वभावा प्रमाणे या सास विषयी मित्रांकडे पचकलो ! परिणामी मुंबईचा विवेक पेठे आणि पुण्यातील प्रफुल्ल साठे  यांची भर पडली, नंतर पाटीलांचे मित्र राजेंद्र इनामदारही जोडले गेले. माणुस ठरवितो आणि देव त्यावर बोळा फिरवितो अशा आशयाची म्हण प्रचलित आहे. तसेच झाले, व्यवसायिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या यांच्या चक्रात जबाबदारीच्या रेट्याने इतर सर्व  शिलेदार गळले, फक्त मी, विवेक आणि प्रफुल्ल असे तिघेच उरलो.
कोकणकिनारपट्टी तशी परिचित असल्याने आणि काही मित्रांनी ही सास पूर्वी केलेली असल्याने मार्गाविषयी फार चिकित्सा करण्याची गरज भासली नाही, साधारण मुक्कामाच्या जागा ठरविल्या.
जयसलमेर डेझर्ट बायकिंगच्या वेळी माझी आणि विवेक पेठेची ओळख झाली. काही समान आवडींमुळे मैत्री जमली,  तो आमचा ग्रूपलीडर असल्याने मी त्याला कॅप्टन हे टोपण नाव ठेवले. माझ्या सायकल सफरीच्या कथा ऐकुन त्यालाही सोबत सास करावी असे वाटे, अनायासे ही संधी मिळाली.
२०१३ साली एकदा मुंबई- पुणे प्रवासा दरम्यान  महामंडळाच्या बसमधे प्रफुल्ल माझा सहप्रवासी होता. प्रवासात गप्पा झाल्या आणि माझे 'कलागुण' त्याला उमगले आणि आवडलेही. प्रफूल्ल पुण्यातच व्यवसाय करत असल्याने आमच्या वरचेवर भेटी होत असतात. माझे सततचे सायकलवरून फिरणे त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. कोकण सासची माहिती दिल्यावर लगेचच त्याने तयारी सुरू केली. विवेकने स्वनिर्भर ( सेल्फ सपोर्टेड)  सायकल सफर यापूर्वी कधीच केली नव्हती, प्रफुल्ल पहिल्यांदाच सायकलवर घराबाहेर पडत होता. मिन्स आय वॉज द बॉस, अर्थात वासरात लंगडी गाय ! तयारी संदर्भात सर्व सूचनांची देवाणघेवाण करून सामानाची जमवाजमव केली.
महाराष्ट्रात निवडणूक जाहीर झाल्याने आम्ही २३ ला मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून सास सुरू करण्याचे ठरविले. मी आणि प्रफुल्ल पुण्याहून आणि विवेक मुंबईहून निघून नागावला भेटण्याचे ठरले.










श्रीगणेशा
मतदान करून घाईघाईने स्वारगेट गाठले कारण कॅरियर असणारी बस सकाळी साडे आठ वाजता आहे याची चौकशी मी आधीच केली  होती. सायकली टपावर टाकल्या आणि प्रवास सुरु केला, वाटेत थोडाथोडा पाउस लागला त्यावरून पुढे काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज आला. अलिबाग बस आगारात हमाल नसल्याने स्वतःच सायकली उतरविल्या, सायकल्स सोबत शेल्फी मारला, सायकलवर धोपट्या लादल्या आणि भोजनच्या शोधात निघालो. शक्यतो शुद्ध शाकाहारी भोजन व्यवस्था पहाण्याचा आग्रह असल्याने थोडा वेळ लागला. प्रफुल्लच्या सायकलचे किरकोळ काम करून नागावचे दिशेने कुच केली. विवेक नागावला आधीच पोहोचला होता. अलिबाग नागाव रस्ता छान आहे शिवाय नुकताच पाउस पडल्याने हवा देखील अल्हाददायक झाली होती. पंधरा सोळा किमी अंतर केव्हाच पार करून नागाव गाठले.

पाहिला मुक्काम
आमच्या गावची एक माहेरवाशीण नागावमधे रहाते, त्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावर पर्यटकांसाठी खोल्या बांधल्या आहेत. छोटेखानी पण स्वच्छ सुंदर सोय आहे. श्री चंदु रिसबुड ( 9689936132, 9850485194) आणि पत्नी दोघे मिळून वैष्णवी कॉटेज चालवितात आणि आपुलकीने आणि अदबीने रहाणे जेवणेची सोय करतात.

विवेक आणि प्रफुल्ल प्रथमच भेटत असल्याने ओळख परेड झाली गप्पा झाल्या.  सुंदर, रुचकर गरमागरम जेवण झाले आत्मा तृप्त झाला.  पावसाची रिपरिप पुन्हा सुरू झाली त्यामुळे उद्याच्या प्रवासा विषयी विचार करत झोपी गेलो.




नागाव- दिवेआगर

सकाळी लवकर उठलो, भुरभुर पाउस पडत होताच, गरमागरम चहा पिवुन सायकलवर टांग मारली. हवा अतिशय अल्हाददायक होती, सायकलिंगचा पहिलाच दिवस होता त्यामुळे तिघेही जोशात होतो. विशेष करून प्रफुल्ल फारच जोशात, त्याच्या मागे कॅप्टन आणि मी शेवटी माझ्या लयीत सायकल चालवीत होतो. चेउल, कोरलाई अशी गावे पार करून पुढे निघालो. सन्मा. श्री  दादा धर्माधिकारी यांच्या अनुयायांनी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावुन त्यांची देखभालही ते करतात, मला हे खुपच आश्वासक वाटले. वाटेत मला गिअर शिफ्टिंग मधे थोडा अडथळा जाणवत होता.



मुरूडमधे सायकल मेकॅनिकची शोधाशोध केली, एका मुकबधीर असणाऱ्या कारागीराने सायकल ठिक केली आणि मोबदलाही घेतला नाही.  शहरांपासून दूर गेल्यावर असे अनुभव नेहमीच येतात. आमचे कडील  मुठभर ड्रायफ्रूट  त्यांना देवून कृतज्ञता व्यक्त केली. उजव्या बाजुस असणाऱ्या अथांग समुद्राच्या साक्षीने सायकल मारणे एव्हाना आमच्या पचनी पडले होते. पण आता डोळ्यासमोर दिसणारे दृश्य अवर्णनीय ! तिनशे साडेतिनशे वर्ष अजिंक्य राहिलेला जंजिरा किल्ला  दृष्टीस पडला. छत्रपती शिवरायांची आठवण होणे स्वाभाविकच होते, शरीर मोहरले आणि आम्हाला पुन्हा स्फूरण चढले. किल्ल्याचे फोटो, आमचे फोटो काढून राजपूरी गाठली. तर (लॉंच) सुटण्याची वेळ दीड तासानंतर होती. गोटी सोडा, शहाळे यांचा आस्वाद घेत वेळ मजेत गेला.
सायकल लाँचमधे चढविणे म्हणजे कसरतच, त्यात आमच्या सायकलींच्या कॅरियरवर भरभक्कम धोपट्या. म्हणजे आधीच मर्कट त्यात मद्य प्याला अशी अवस्था. खाडी पार करून दिघीला पोचलो आणि नंतर दिवेआगर. वाटेत अनेक छोटे मोठे चढउतार लागले, सीमेंट रस्त्याचे काम सुरू होते त्याचा थोडा त्रास झाला पण एकुणात ७० किमी प्रवास छान झाला. दिवेआगर गाव तसे मोठे आणि लांबलचक आहे. गावाची मांडणी खास कोकण किनारपट्टी वरील गावांसारखीच आहे. दिवेआगरची सुपारी-रोठा खूप पसिद्ध आहे, गाव समृद्ध वाटले.
कॅप्टनचे नातेवाईक श्री अमोद वाड (9552974592) यांचेकडे राहिलो, त्यांनी पर्यटकांसाठी खोल्या बांधल्या आहेत. खोल्या प्रशस्त, राजेशाही आहेत, उत्तम सोयी मुळे सर्वजण सुखावलो. रात्री उकडीचे मोदकासह आग्रहयुक्त रसभरीत कोकणी जेवण जेवलो आणि निद्राधीन झालो.











दिवेआगर केळशी
काल सायकलिंगचा पहिलाच दिवस होता, तिघेही ताजेतवाने होतो त्यामुळे जोशात अंतर कापले होते. पहाटे उठलो, पावसाची भुरभुर सुरूच होती, गरमागरम चहा घेतला आणि निघालो. कॅरियरवर लादलेल्या थैल्या सांभाळून सायकल हाकणे थोडे  कसबाचे असते. विशेषकरून चढउतार, वळणंवाकणं, अरूंद आणि खराब रस्ता असेल तर ते आणखी जिकरीचे होते, तरीही प्रफुल्ल आणि कॅप्टनमधे एक प्रेमळ चुरस सुरु होती मी सावकाश दमाने सर्वात मागे संथपणे चालवत होतो. थोडं अंतर गेल्यावर कॅप्टनच्या पेडलची गुंडी सैल झाली, आमच्याकडे हत्यारे अवजारे होती पण नेमका त्या आकाराचा पाना नव्हता. नशीबाने पुढे उतार आणि मग थोडा सपाट रस्ता होता. श्रीवर्धनला आम्ही सकाळी लवकरच पोचलो होतो पण एक सायकल दुकान उघडले होते, त्याच्याकडे लगेचच काम झाले. आम्ही पोट पूजा केली आणि मार्गस्थ झालो. पावसाची रिपरिप सुरूच होती, सोबत रेन जाकेट होते पण ते घातले नाही, अति शहाणपणा दुसरे काय ? परिणामी चिंब भिजलो, त्यात माझा अंगरखा सुती असल्याने त्याचा ओलेपणा बराचवेळ टिकून रहात होता. मजल दरमजल करत बागमांडला जेटी गाठून खाडी पार केली. जेटी पार केल्यावर आमची खरी परीक्षा सुरु झाली, अतिशय खराब रस्ता, समोर उंच उभा डोंगर दुपारची वेळ सगळच जमुन आलेलं. नवानगर मार्गे केळशी गाव गाठले,
सायकलिंग फक्त ६२ किमी झाले पण चांगलीच दमछाक झाली.









MYBY
केळशीमधे प्रफुल्लचे एक परिचित श्री परांजपे यांच्या घरी रहाण्याचे ठरले होते त्याप्रमाणे त्यांच्याकडे गेलो. गेल्या गेल्या गरमागरम चहाने स्वागत झाले. त्यांचे बंधु परगावी रहात असल्याने बंधुंचे घर रिकामे होते त्याच घरात आमची सोय करून दिली. आज दिवसभर पाउस आणि अधुनमधुन खराब रस्ता यामुळे सायकली चिखलाने माखल्या होत्या. स्वतः आंघोळ करण्यापूर्वी सायकलसेवा गरजेची होती.  मी माझ्या MYBY अर्थात मेंटेन युवर बाईक युवरसेल्फ या उपक्रमाचे प्रात्यक्षिक साठे- पेठें कडून करून घेतले. हल्लीच्या आधुनिक सायकल्स खरंच मेंटेनंस फ्री आहेत. नियमीत थोडीफार देखभाल केली की सायकल विनाविघ्न सेवा देते. नियमीत देखभालीमधे चेन आणि चेन ज्या दोन छोट्या चक्रांवरून फिरते ती चक्र, डिझेलने स्वच्छ करणे, रिम आणि ब्रेक पॅड सुक्या फडक्याने पुसणे ही  मुख्य दोन कामे करावी लागतात.  दोघांनीही उत्साहात सायकलसेवा केली, थोडा धोबीघाट उरकला आणि छान पैकी आंघोळी केल्या.

हाताशी वेळ होता म्हणुन गप्पा मारत गाव उंडारायला निघालो. स्थानिक रंगीत मंचुरियन, चा, भजी, मिठाई ई चा आस्वाद घेतला. काळोख पडताना पुन्हा परांजप्यांचे घर गाठले. घरातील मंडळींबरोबर थोड्या गप्पा मारल्या आणि मोर्चा भोजनाकडे वळविला. आमच्या सोबत घरातील आजोबाही जेवायला बसले होते. श्री परांजपेंनी गावातुन आणलेला गरमागरम वडापाव त्यांच्या पानात वाढला आम्हाला आश्चर्य वाटले. नंतर कळले रात्रीच्या जेवणात त्यांना हा प्रसाद रोजच लागतो, धन्य ते आजोबा !



केळशी ते कोळथरे
सकाळी लवकर निघालो, पावसाची भुरभुर सुरुच होती, आडे, मुर्डी गाव पार करून आंजर्ले खाडीपाशी आलो. खाडीवर भलामोठा पुल बांधला आहे, पुल म्हणजे गुरांचा मुक्त गोठाच जणु ! शेकडो गाई गुरं, म्हशी त्यावर पहुडली होती, डांबरीकरण कुठे दिसतच नव्हते सर्व भाग गोमयाने भरलेला. गुरांच्या  गर्दीतुन वाट काढणे म्हणजे पुण्यात तुळशीबागेतुन सायकल चालविण्या सारखे, असो. खाडी मधे खारफुटीचे जंगल आहे, एकुण परिसर नयनरम्य आहे. आम्ही सूर्योदयाच्या आसपास तेथे होतो त्यामुळे निसर्गाचे सौंदर्य आणखी खुलले होते. फोटो तो बनता है भिडू असे मनात म्हणुन विविध कोनांमधुन फोटू मारले. हल्लीचे मोबाईल मधुन कॅमेराच्या तोडीचे फोटो काढता येतात शिवाय मोबाईल हाताळायलाही सुलभ. प्रवासात साठे-पेठे प्रेमळ स्पर्धा सुरुच होती, मी बापडा शेवटी असे, फक्त चढ आला की कॅप्टनला माझी आठवण येई माझी सोबत त्याला आश्वासक वाटे.
आंजर्लेच्या खाडी नंतर मुख्य रस्ता डोंगरावरून जातो ज्याला हर्णे बायपास म्हणतात, सायकल वाल्यांना तो योग्य नाही. पुलावरून थोडं पुढे आल्यावर उजवीकडे एक रस्ता जातो त्या रस्त्याने  पाजपंढरी गाव पार करत हर्णैचा सुवर्णदुर्ग उजवीकडे ठेवुन आपण गावात शिरतो.
मुळ कोळथरेचे असणारे श्री प्रकाश झगडे यांचे हॉटेलमधे नाश्टा करणेसाठी गेलो. छोटेखानी स्वच्छ सुंदर हॉटेल, चविष्ट गरमागरम खाणं और क्या चाहिये ? हर्णैमधे शिरल्यावर कॅप्टनला त्याच्या जुन्या मित्राची आठवण झाली. आम्ही गोरेगावला रहायचो, संघाच्या शाखेत खेळायचो इ माहिती त्याने पुरविल्यावर मी जोशी कुटुंबाची साद्यंत माहिती सांगीतली त्याला थोडा धक्काच बसला. जोशी आणि आमच्या कुटुंबाचे फार जुने स्नेहसंबध आहेत. हॉटेल मालकांनी लगेचच निरोप धाडला आणि मिलिंदशेट त्वरेने हजर झाले. जुन्या स्मृती दोघांनी जागविल्या, पुनः चायबारी करून आम्ही मार्गस्थ झालो.











पाउस सुरुच होता, मला थोडी कणकण जाणवत होती पण आज कोळथरेला स्वतःच्या घरी जायचे असल्याने मी निश्चिंत होतो. हर्णैहून कोळथरेला दोनतिन मार्गाने जाता येते, समुद्रमार्गे म्हटले तरी बरेच लोक सालदूर, आसुद पुल, गिम्हवणे, दापोली,  बुरोंडी असे जाणे पसंत करतात. आम्ही  सालदूर गावानंतर उजवीकडे वळून छोट्या रस्त्याने मुरूड गाठले. दूर्गादेवीचे बाहेरूनच दर्शन घेवुन अमेय मुद्रणालयाचे श्री जोशी यांच्या आंगण्यात सायकल घुसविल्या. हेल्मेट, गॉगल, रेनजाकेट असा जामानिमा आणि कोणतीही पूर्व सूचना नाही त्यामुळे कोणीही आम्हाला ओळखु शकले नाही. जोशी यांचे अंगणात प्रवेश केल्यापासुनच दिवाळीचा माहौल जाणवत होता, घरात चकल्यांची तळणी सुरू होती. खेडेगावात प्रत्येक सणासुदीचा माहोल तयार होतो अर्थात निसर्गही त्यामधे हातभार लावतो. या जोशी कुटुंबाचे आणि आमचे व्यवसायिक आणि घरगुती असे दुहेरी संबंध आहेत. अपारकष्ट आणि सचोटी या दोन तत्वांवर आज तिसरी पिढी व्यवसात उतरली आहे. गरमगरम चकल्या, चिवडा, लाडू असा फराळ आणि वर घरच्या दुधाचा गरम कडक चहा और क्या भगवान से मिलोगे ? अशी अवस्था.

मुरुडगावातून कर्दे गावाकडे जाणारा रस्ता स्वप्नवत ! लाल जांभ्या दगडी पेव्हमेंटचा अरूंद रस्ता, दोन्ही बाजुला झाडांचे कुंपण, त्यामागे रांगेत घरे, घरासमोर आंगण आणि मागे बाग असं वाटत होतं हा रस्ता संपूच नये. लगेचच पुन्हा डांबरीरोड सुरू झाला आणि आमचे स्वप्न भंगले. कर्दे गावाच्या किनाऱ्याचे आसपास अनेक लहान मोठी हॉटेल्स झाली आहेत तरीही परिसर स्वच्छ, सुंदर नेत्रसुखद आहे. कर्दे- लाडघर रस्त्यावर काही फसवे फाटे फुटले आहेत त्याची काळजी घ्यावे लागते. रस्ता अक्षरशः डोंगराच्या कुशीतुन समुद्राच्या साक्षीने वळणे घेत जाणारा आहे. काही ठिकाणी थोडा उतार आणि समोर एकदम उभा चढ दत्त म्हणुन पुढे उभा रहातो, योग्यवेळी गिअर बदलला नाही तर सायकलवरून उतरणे भाग पडते. आम्ही लाडघरमधील मुख्यवस्ती लागण्यापूर्वी उजवीकडे वळून शेतातील पायवाट, कधी बांधांवरून सायकली दौडल्या आणि दापोली बुरोंडी  रस्त्यावरील वडाचास्टॉप या ठिकाणी मुख्य रस्त्याला लागलो. बुरोंडी गावानंतर पुन्हा एक डोंगर पार करावा लागतो, डोंगर माथ्यावर पुण्यातील श्री गानु यांनी श्री परशुरामांचा भव्य देखणा पुतळा उभा करून पर्यटकांसाठी एक आकर्षणच निर्माण केलंय. श्री परशुरामांचे आशीर्वाद घेतले थोडी मौजमजा केली आणि कोळथरेच्या दिशेने निघालो.



कोळथरेला आमच्या घरी जाणे ऐवजी थेट गावातील हंगामी पाण्याचा डोह, ज्याला आम्ही मढी म्हणतो तिकडे सायकली नेल्या. निळशार, स्वच्छ, नितळ पाणी पाहून दोघेही अवाक झाले. सुर, उडी, गोलांटी उडी, उंच कड्यावरुन हनुमान उडी असे विविध बालिश चाळे करत मनसोक्त डुंबलो. ताप अंगदुखी जाणवत असल्याने घरी जावून मी अंगाला आमचे कफना तेल जिरविले, सर्वांनी छान कोरडे कपडे घालुन बंधुराजांबरोबर गप्पाष्टक सुरू केले.
मोठे बंधु श्री माधव महाजन हौस म्हणुन विविध फळांची वाईन बनवितात आणि आल्यागेल्या चोखंदळ सुहृदांना खिलवितात. साठे- पेठेंची चैनच झाली, बारा तेरा प्रकारच्या वाईन थोडी-थोडी करून टाकी भरे पर्यंत रिचविली, भोजनपूर्व चांगली तयारी झाली होती. आमच्या शेजारील कोझरेकर वहिनीना खास कोकणी मेनु बनविणेस सांगितला होता, घावन-घाटलं, नारळाची चटणी आणि वरणभात विथ लिंबु आणि साजुक तुंप ! तिघांनी विशेष करून वाईनवीरांनी जेवणावर आडवा हात मारला.
सततचा पाउस, किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या वादळाच्या बातम्या, अनिमीत झालेली सार्वजनिक वहातुक व्यवस्था,   माझे अनारोग्य यामुळे आम्ही द्विधा मनस्थितीमधे अडकलो. शेवटी चर्चेअंती निर्णय केला उद्या गुहागर गाठूया आणि मग निर्णय घेवू. कोळथरे गुहागर अंतर फार नसल्याने सकाळी नाष्टा करून निघुया असे ठरवून झोपी गेलो.
अलिबागहून निघाल्या पासुन अनेक ठिकाणी आपल्या उजव्या बाजुला सतत स्वच्छ सुंदर अथांग समुद्र, अधुनमधुन डाव्या उजव्या बाजुस सुरुचे वन,  गाव असल्यास डावीकडे टुमदार घरे नाहीतर डोंगर आणि एकुणच शांत रमणीय परिसर असे वातावरण अनुभवण्यास मिळते. दहा विस किमीचे लांब घाटरस्ते कुठेच लागत नाहीत, मात्र एका मागे एक अकस्मात येणारे चढउतार यांनी जीव मेटाकुटीस येतो. नंतर नंतर उतार दिसल्यावर होणाऱ्या आनंदा ऐवजी मनात धडकी भरते ती समोर उभ्या ठाकणाऱ्या टेकाडाची. असा हा चढउतारांचा लपंडाव खेळत कोकण किनारपट्टीवरील सायकल सफर आव्हानात्मक पण तरीही आनंददायक आहे.








कोळथरे गुहागर
सकाळी उठलो पाउस सुरूच होता, मला ताप आल्याचे जाणवत होते तरीही सायकली सजवल्या आणि नाष्टा करून  आरूढ झालो. दाभोळला जेट्टी मधुन खाडी पार करुन रानवी गाठली, बहूचर्चित एन्रॉन प्रकल्प याच गावात आहे. कंपनीच्या मुख्यव्दारासमोरील छोटेखानी हॉटेलमधे गरम लिंबु सरबत पियालो आणि कुच केले. रानवी गाव डोंगरमाथ्यावर आहे आणि गुहागर समुद्रसपाटीला आहे, शिवाय रस्ताही सुंदर आहे त्यामुळे शेवटचे काही किमी अंतर आनंदात पार केले. दुर्गादेवीच्या भक्तनिवासात छान सोय आहे तिथे धोपट्या टाकल्या  आणि थेट एसटी स्टँड गाठला. माझे शरीर मला रात्रीच्या प्रवासासाठी अनुकुल वाटले नाही कारण अंगात ताप होता आणि अंग दुखत होते. पेठे-साठेंची रात्रीच्या आणि माझे दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीचे आरक्षण केले पोटपूजा करून परत भक्तनिवास गाठले. तिघांनी निवांत गप्पा मारल्या चार दिवसाच्या एकत्रित सायकलिंगचा आढावा घेतला, गुहागर पुढील गोव्या पर्यंतचा टप्पा भविष्यात नक्की करण्याचे ठरविले, अर्थात प्रत्यक्षात केव्हा घडेल कोण जाणे.

स्वान्त: सुखाय
सफरीवर निघण्या पूर्वी खर्चाचा एकुण अंदाज, दैनंदिन खर्च त्याचे नियोजन या विषयी कॅप्टन जवळ चर्चा झाली होती. आम्ही अशा उपक्रमामधे सर्व शिलेदारांकडून एक ठराविक रक्कम घेवून एकाकडे जमा करतो, तो खजिनदार, होणारा प्रत्येक खर्च त्यानेच करायचा. गंगाजळी संपत आली की पुन्हा रक्कम जमा करायची, हिशोब ठेवणे सोप्पे. कॅप्टनला कल्पना आवडली, म्हणाला आपण सुरवातीला पाच-पाच हजार काढू, मी मनात म्हटले बडे लोग बडी बाते ! अगदी तस्सच झालं. बसल्या-बसल्या आम्ही हिशोब मांडला, जाण्यायेण्याच्या प्रवासखर्चासह प्रत्येकी चार हजार पेक्षाही कमी खर्च झाला.  एव्हढ्या कमी खर्चात ट्रिप होउ शकते यावर कॅप्टनचा विश्वासच बसेना पण तेच सत्य होते. आपले भटकणे स्वान्तस्सुखाय असेल, लाईक्स, हॅशटॅग आणि कॉमेंट्स साठी नसेल तर खिशाला फार कात्री न लावता आनंद लुटता येतो.



गाडी क्रमांक सत्ताविस सतरा...


राज्य परिवहन बस थांब्यावर अशी घोषणा ऐकली की प्रवासाची उर्मी येते. मला ती उद्घोषणा रेकॉर्ड करायची होती मी तशी विनंती त्या अधिकाऱ्यास केली त्याने माझा मान ठेवुन पुन्हा एकदा आपल्या खास ठसक्यात उद्घोषणा केली माझे काम झाले. कॅप्टन जवळपास वीस वर्षांनी महामंडळाच्या बसने प्रवास करत होता. डेपोत हमाल नसल्याने त्याचाही अनुभव कॅप्टनला मिळाला. माझ्या सोबत रिलायंस कंपनीचा एक उच्च अधिकारी चक्क बसच्या टपावर चढला, मी चटकन त्याचा फोटो काढून घरी चांगलं स्वागत व्हावे या सद् हेतुने  नंतर त्याच्या बायकोला पाठवून दिला. प्रफुल्लची सायकल पुणे गाडीवर चढवली, दोघांना रवाना करून मी भक्तनिवास  गाठले. अंगात थोडा ताप होता, अंग दुखत होते पुन्हा एकदा कफना तेलाने मालिश केले आणि झोपलो.

धक्कादायक अनुभव
रात्रभर पाउस कोसळलतच होता, पहाटे उठलो तेव्हाही पाउस पडत होता. मनाचा हिय्या करून सायकल दामटली आणि स्टँड गाठला, पुरता भिजलो. अनेक भांबावलेले प्रवासी पाहिले, कारणही तसंच होतं बसेसच्या नियोजित फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या कारण डेपोतील डिझेल संपलय- वादळ इफेक्ट ! मी धावत अधिकारी व्यक्तीकडे जावून चौकशी केली, त्यांनी मला आश्वस्त केलं लांब पल्याची गाडी सोडू फक्त थोडा उशीर होईल, मी निश्चिंत झालो. अता सायकल बसच्या टपावर चढविण्याचे शिवधनुष्य मला एकट्याला उचलावयाचे होते, जे आज मला शक्यच नव्हते, मी पुन्हा अधिकाऱ्यास भेटलो त्यांनी व वाहकाने भर पावसात माझी मदत केली. प्रवास सुरू झाला पाउसही थांबला चक्क कडक उन पडले मला तरतरी आली. मला आता स्वारगेटचे वेध लागले, स्वारगेटला जेमतेम प्रवासी उतरेपर्यंत बस एका ठिकाणी उभी असते मी त्याचाच विचार करत होतो. बस थांबल्या क्षणी लगबगीने टपावर चढलो आणि वाहकाच्या मदतीने चपळाईने सायकल उतरविली. खाली येवुन पहातो तर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. सायकलचे हॅंडल नव्वद अंशात फिरून चाकाला समांतर झालेले, एका टायरचा घासुन कपचा उडालेला. माझ्या मनात एकदम प्रकाश पडला, वाटेत कुठेतरी गाडी वेगात असताना झाडाच्या फांदीवर सायकलचे हँडल जोरात आदळल्याने हा प्रकार घडला असावा. नशिबाने मी मजबुत दोरीने सायकल घट्ट बांधली होती अन्यथा माझी सायकल वाटेत कुठेतरी फेकली जावून बेवारस पडली असती. माझी सायकल मला पुन्हा दिसली नसती या कल्पनेने मला गहिवरून आले. मला मित्र विवेक मराठेची आठवण झाली, त्याचा नेहमी अट्टाहास असतो 'सदा सुसज्ज आणि सतर्क'.  मी या गोष्टीचा एव्हढा धसका घेतला मनात ठरविले पुन्हा कधीही बसच्या टपावरून सायकल न्यायची नाही.
स्वारगेटच्या शेजारी एक फक्कड चहाची टपरी आहे तिथे एकट्यानेच चायबारी केली अणि या छोटेखानी पण संस्मरणीय सायकलसफरीची सांगता केली.

Tuesday, 24 October 2017

तर सायकलला राम-राम ! Horse Riding





घोडा हा प्राणी असा आहे तुम्ही त्याच्या सहवासात आलात की कधी प्रेमात पडता हे कळतच नाही. कोळथरेला रहात असताना माझ्या घोडसावारीच्या प्रेमाने पुन्हा एकदा उचल खाल्ली. दापोलीत १-२ 'घोडाप्रेमी' आहेत हे मला माहिती होते. मी लगेच विनय दादाला (माझा सर्वात मोठा भाऊ) फोन लावला. तालुक्यातील अस्सल मंडळी त्याच्या संपर्कात असतात. त्याने मला लगेचच दापोली-जालगाव मधील  घोडामालक श्री. कोळथरकर यांचा नंबर दिला. ते एक 'खानदानी' घोडा शौकीन आहेत.

माझे वडील(मामा महाजन) रोज नित्यनेमाने दिड-दोन तास आमच्या जागाजमिनीत फिरत असत. डोंगरदऱ्यांत, रानात फिरताना त्यांच्या सोबत कायम एक बगलथैली, कोयती आणि एक आकडी-डेलकी (काठीला एका टोकाला आकडा आणि दुसऱ्या टोकाला इंग्रजी 'V' सारखा आकार) असे. त्यांचे एक नेहमीचे वाक्य असे "जो कुंपण राखतो तोच जमीनजुमला राखतो" म्हणून रोज या साजोसामानासह भ्रमंती. हा दिनक्रम माझ्या स्मरणाप्रमाणे वयाच्या सत्तरी पर्यंत सुरु होता. रानावनातील ही रोजची भटकंती पाहून कोणीतरी मामांना घोडा घेण्याचे सुचविले, त्यांना देखील ही कल्पना पटली. एकदा मनात आल्यावर ती गोष्ट करायचीच असा मामांचा खाक्या. परिणामी आमचे कडे आधी 'यशवंत' आणि नंतर 'लक्ष्मी' नावाची घोडी होती. यशवंत/यश्या हा स्थानिक ओळखीने मिळाला होता. लक्ष्मीला आणण्यासाठी बाबा (मोठा भाऊ उदय) आणि त्याचा मित्र सुहास असे अलिबाग जवळ गेले होते. त्यांना यायला ४-५ दिवस लागले होते असे आठवते. उन्हात चालून त्यांच्या त्वचेचा रंग बदलला होता. यश्या थोडा थकलेला होता लक्ष्मी मात्र तरुण आणि धष्टपुष्ट होती. 'भाकरी का करपली घोडा का अडला?' या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतला आहे. दोन-तिन दिवस घोड्याला रपेट केली नाही की लगेच तो फेरफटका मारण्यास विरोध करतो. इतकेच काय आपण दोन दिवस त्याला एकाच वाटेने नेले तर तिसऱ्या दिवशी नवीन वाटेने त्याला घेऊन जाणे म्हणजे कर्मकठीण. 

माझ्या मोठ्या बहिणीची (गांधाताई) मुले लहान असताना मे महिन्यात महिनाभर आजोळी कोळथरेला रहायला येत असत. माझ्या स्मरणाप्रमाणे मामांनी लग्नात तशी अटच घातली होती. मामा रोज शुभुला (भाची) घोडीवर बसवुन गावात फेरफटका मारायला पाठवत त्यावेळी सोबत एक सांभाळणाराही असे. गावातून फिरत असताना मामांचे चाहते कोणी घरातून कोणी दारी येऊन कौतुकाने पहात असत. सर्व कार्यक्रम म्हणजे एक सोहोळाच होऊन जाई.


मामांनी सांभाळलेले दोन्ही घोडे स्थानिक होते. मी दापोलीला कोळथरकरांकडे घोडसावारी शिकायला जायचो तो 'शेरू' रेसच्या घोड्यासारखा उमदा, उंच, तगडा आणि पांढराशुभ्र होता. मी सकाळी ६ वाजता घरून निघून दापोलीत तासभर सराव करून ९ च्या आत घरी हजर होत असे. १५ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मी कोळथरकरांना वाकून नमस्कार केल्यावर  त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.  शेरू आणि माझी चांगली गट्टी जमली होती मालकही मला म्हणत डॉ शेरुचे तुमच्यावर खास प्रेम आहे. पहिले ५-६ दिवस शिकण्यात गेले नंतर मात्र शेरू घामाने भिजे पर्यंत आमची रपेट चालत असे. घोड्यावर स्वार झाल्यावर आपल्या अंगात एक वेगळीच उर्मी निर्माण होते, जणूकाही 'अश्वशक्ती' आपल्या शरीरात संक्रमित झाली आहे. एक प्रकारची झिंग, मग त्याची चटक लागते. 

एप्रिल-मे मधे कधीतरी शेरूच्या पायाला मोठी जखम झाली. उपचारांत मदतीसाठी मी आठवड्यातून एखादा दापोलीत जात असे. पुढे कोळथरकर म्हणाले तुम्ही शेरूला पावसाळ्यात तुमच्याकडे घेऊन जा इथे थोडी अडचण होईल. माझ्यासाठी ती संधीच होती. मी अण्णा (मोठे बंधू- माधव) जवळ बोलून आमच्या गोशाळे (गोठा) शेजारी शेरुसाठी जागा तयार करून घेतली. एक दिवस संध्याकाळी ट्रक मधून शेरुची स्वारी आमच्या अंगणात दाखल झाली. शेरूचा आकार, चाल, उमदेपणा, पांढरा रंग हे पाहून आई आणि पत्नीचे डोळे चमकले, दोघीही खुश झाल्या. शेरू २-३ महिने आमचे कडे होता. जखमेची सुश्रुषा, खरारा, रपेट ई मी रोजच करत असे शिवाय  शेरू रात्री अपरात्री चक्कर आल्यासारखे होऊन कोसळत असे त्यामुळे रात्रभर मला सतर्क राहावे लागे. त्याला उठवून उभे करणे खूप जिकरीचे होई त्यामुळे माझ्या काळजीने बायकोही मदतीस येत असे. या सर्व उपद्व्यापाचा परिणाम माझ्या तब्बेतीवर होऊन माझे वजन ४-५ किलोने कमी झाले. शेवटी आई आणि सौ गौरीने 'फतवा' काढून शेरुची रवानगी करण्याचे आदेश दिले. कोळथरकर शेरूला नेण्यास आले, शेरुची तब्बेत पाहून एकदम खुश झाले. मी माझी अडचण सांगून दिलगिरी व्यक्त केली तेव्हा म्हणाले " डॉक्टर घोडा ८ दिवस नीट सांभाळणे कठीण आहे तुमचे कौतुक करायला हवे."  शेरू आमच्या आवारातून बाहेर पडण्यास नाखुश होता कोळथरकरांनाही ते जाणवले.

काही दिवसांनी मी शेरूला भेटण्यास गेलो होतो, शेरू चरायला गेला होता आणि ५-७ फुट उंच वाढलेल्या गवतात तो दिसतही नव्हता. कोळथरकरांनी दोन-तिन हाका मारूनही शेरू आला नाही. ते म्हणाले डॉक्टर तुम्ही हाक मारा तो नक्की येईल आणि तसेच झाले,  घंटेचा घण-घण आवाज करत शेरू समोर हजर झाला. मी आनंदून गेलो.
मी घोड्यावर मनापासून प्रेम करतो. जैसलमेरला सायकलिंगसाठी गेलो असताना शेतात घोडा दिसल्यावर त्यावर स्वार होण्याचा मोह मी टाळू शकलो नव्हतो.


पुण्यात घोडा पाळणे शक्य झाल्यास मी सायकलला राम-राम करेन. 
                      


Friday, 29 September 2017

डोळे लागले ! Forest Night Life


पुण्यात रहाणेस आल्याने दापोली मधील मित्रांची भेट क्वचितच होते. दापोलीला गेलो असताना मित्राने; मी दापोली पर्यंत २० किमी सायकल चालवत जावून त्याला दिलेल्या  'मेजवानी' ची आठवण काढली. थोड्या गप्पा रंगल्या आणि मला जुन्या घटना आठवल्या. 

पूर्वी शहरांत अमुक एका क्लब अथवा जिमखान्याचे मेंबर्स बाबत जसे कौतुक, कुतूहल, औत्सुक्य असे तसे काहीसे शिकारीला जाणाऱ्या मंडळी बाबत गाव-खेड्यात असते.  यांची टोपणनावेही खास असतात आमच्याकडे एक जोडी होती, टारझन आणि डाबरमन. मी शाकाहारी असल्याने खरतर या जमातीत आगन्तुकच. मिळालेल्या ‘मेजवानीचा’ आस्वाद घेण्याची माझी ऐपत नाही.



जंगलातून रात्री फिरण्याची एक वेगळीच मजा असते. चारी दिशांना पसरलेला मिट्ट अंधार असल्याने अंदाज बांधण्यासाठी पायवाटेवरील खाणाखुणा दिसत नाहीत. दिवसा ज्या पायवाटांवरून आपण फिरलेलो असतो तेच जंगल रात्री भयंकर गूढ, अनाकलनीय आणि भीतीदायक वाटते. पंचक्रोशीमधे  जखमी डुकराने हल्ला करून गंभीर इजा झालेली एखादीतरी व्यक्ती असते, त्यामुळे अशा अदृश्य शक्तीची भीती मनात असतेच, किर्र अंधारात ती आणखी गहन होते. शिकारी साठी फिरताना मोठ्या प्रकाशाची विजेरीही वापरू शकत नाही. मोठ्या प्रकाशझोताची एक बॅटरी सोबत असते पण ती फक्त सावजाचा शोध घेण्यासाठी. पुढे चालणाऱ्याच्या हातातील बॅटरीचा उजेड त्याच्या पायाखाली पडत असतो उरलेले भिडू त्याच्या मागोमाग अंदाजाने मुंग्यांसारखी रांग करून चालतात. खांद्यावरील अवजड बंदुकीचे ओझे आणि आपला तोल सांभाळत चालणे म्हणजे परीक्षाच. वाटेत काटे-कुटे, खाच-खळगे, दगड-धोंडे, विविध वेली यांना चुकवत, पायांचा कमीतकमी आवाज करत समोरच्या व्यक्तीच्या चालीने मार्गक्रमण करणे म्हणजे तारेवरची कसरतच. बर पायात हंटर किंवा ट्रेकिंग शूज नाहीतच, बहुदा स्लीपर- सॅंडल म्हणजे चैन  आणि फुल पँन्ट कापून केलेली अर्धी चड्डी हा गणवेश. बंदुकधारी (बरकनदाराचा) वेश पण खास. मुंबईकर, मित्र किंवा पाहुणा याने दिलेला कोट अथवा जाकेट, त्याला २-४ खिसे वेगवेगळ्या ताकतीची काडतुसे ठेवण्यास गरजेचे. दोन प्रकारची नियमित मिळणारी काडतुसे आणि एक हायब्रिड म्हणजे भरलेले काडतूस . भरलेले म्हणजे ३ काडतुसांतील मालमसाला काढून दोनात भरायचा आणि शे दीडशे छोट्या गोळ्या काढून १५-२० मोठ्या गोळ्या भरायच्या. प्रत्येक काडतूस कधी आणि कोणासाठी वापरायचे यांचे ठोकताळे ठरलेले असतात. रात्री चालताना कान उघडे ठेवून सतर्क राहून बारीकसारीक आवाज टिपावे लागतात. सळसळ, फरफर, फ्रूक, ख्याक अशा विविध आणि विचित्र आवाजांचे सतत विश्लेषण करावे लागते. यात रात्री नेहमी चकवा देणारा प्राणी म्हणजे उंदीर. उंदीर सुक्या पानावरून धावत गेल्यास त्या भयाण शांततेत मोठे सावज गेल्याचा भास होतो.


सामान्यपणे रानडुक्कर, जंगली ससा, साळींदर, भेकर (हरीण वर्गातील प्राणी) हे हिटलिस्ट वर असतात. ससा, भेकर, साळींदर यांच्या ठावठिकाण्याचा अंदाज बांधता येतो. रानडुक्कर म्हणजे धूमकेतूच, कधी कोठून उगवेल याचा नेम नाही. चालता चालता कोणाचातरी कान एखादा आवाज टिपतो. लगेच श्शू s s s .....अशा सांकेतिक भाषेत संदेश पसरतो. सर्वजण स्तब्ध उभे राहून कानात जीव ओतून आपापल्या परीने आवाजाचा वेध घेतात. काळोखातच हातवारे, खाणाखुणा करून सावजाचा अंदाज घेऊन बॅटरी टाकण्याची सूचना मिळते. बॅटरी टाकणे म्हणजे सावजाच्या दिशेने प्रकाशझोत टाकणे. बॅटरी धरणारा लगेच इप्सित दिशेने प्रकाशझोत टाकतो, बहुतेक वेळा तिथे कोणी नसतेच. मग आजूबाजूला, झाडाझुडपात, बांधावर शोध सुरु होतो, अचानक कोणाचातरी डोळा लागतो ; डोळा लागतो म्हणजे प्रकाशझोतात सावजाचा डोळा चमकतो. क्षणभर पुन्हा सगळे शांत, वातावरण एकदम तंग.. ९० टक्के वेळा तो कापूरकवडा असतो आणि क्षणात तो भुर्रकन उडूनही  जातो. १५-२० मिनिटांच्या या तंग, तणावपूर्ण खेळाचा अंत अशा फुसक्या बाराने होतो. या डोळे लागण्यावरूनच सावजाचा अंदाज बांधून पुढील सर्व निर्णय घ्यावे लागतात. त्याच मुळे विजेरीवाला हा चलाख, सतर्क आणि अनुभवी असावा लागतो.

तासावर तास, दिवसामागून दिवस हा लपाछपीचा खेळ सुरु असतो. शिकार फार क्वचितच मिळते पण त्या थराराची नशा चढते आणि दारुडे जसे रोज आपल्या पंढरीची वारी करतात तसेच काहीसे शिकारीला जाणाऱ्यांचे होते. जणू व्यसनच, एकदा लागलं की सुटका नाही.   
Ramdas Mahajan !

Sunday, 17 September 2017

गरुडझेप White Bellied Sea Eagle









गरुडझेप
समुद्रकिनारी खेडेगावात रहात असल्याने समुद्र आणि एकूणच निसर्गाशी जवळचा संबंध येतो. निसर्गप्रेम आणि धडपडा स्वभाव यामुळे चिपळूणचे श्री. भाऊ काटदरे यांचेशी संपर्क आला, ते ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ संस्था चालवितात. समुद्री कासवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे काम संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ते करतात. आम्ही हे काम सुरु केले तेव्हा ते ‘इन’ किंवा ‘कूल’ समजले जात नव्हते. अता प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट केला जातो त्यामुळे तळमळीने काम करू इच्छिणारी मंडळी कामात सहभागी होण्यास बिचकतात.  असो तो आत्ताचा विषय नाही. कासव प्रत्यक्ष अंडी घालताना पहायला मिळणे दुर्मिळच असते. ७/८ वर्ष काम करताना मी दोन वेळाच ते पाहू शकलो. कासव स्वतः वाळूत खड्डा खणून त्यात अंडी घालते आणि समुद्रात निघून जाते. 
कोळथरे येथील कामाची जबाबदारी मी घेतली होती म्हणून रोज पहाटे किनाऱ्यावर फेरफटका मारत असे. थंडीच्या दिवसात सकाळी  ६.०० – ६.३०  पर्यंत समुद्रावर अंधारच असतो. असाच एके दिवशी समुद्रावर गेलो असताना १०/१२ कुत्री रिंगण करून फिरताना पाहिली. लांबून काही समजेना, जवळ गेलो तर एक भला मोठा पक्षी पंख पसरून मधे उभा होता. त्याचा पंख विस्तार जवळपास सहा फूट असावा (आम्ही नंतर तो मोजलाच). कुत्रे बहुदा त्याचा अवतार पाहून बावरले असावेत, मी जवळ गेल्यावर सर्व पळून गेले. पक्षाचा अवतार पाहून त्याला पकडण्याचा माझाही धीर होईना, कसा तरी पकडून घरी आणला. घरी आणल्यावर पाहिले तर कोणतीही विशेष जखम दिसली नाही.  दरम्यान पाहुण्यासाठी तात्पुरता पिंजरा उभा केला आणि आगोमच्या औषधांचे उपचारही सुरु केले. या कामात माझ्या मुली, पुतण्या हिरीरीने सहभागी होतात.
चिपळूणला  भाऊ काटदरेना फोन करून वृतांत सांगितला, ते म्हणाले हा समुद्र गरुड ( White
Bellied Sea Eagle)  आहे आणि झाडाच्या फांदीवर जोरात आपटल्याने त्याला  मानसिक धक्का बसला आहे त्यातून बाहेर येण्यास एक दिवस तरी जाईल.
आम्ही त्याला मासे खाऊ घालण्याचा प्रयत्न करत होतो पण तो काहीही खात नव्हता. त्याचे डौलदार शरीर, पोटाचा नितळ पांढरा रंग आणि राजेशाही रुबाब पाहून आम्ही त्याच्या प्रेमातच पडलो. दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला मुक्त केले पण बागेतील घट्ट पोफळी (सुपारीची झाडे) मधून त्याला भरारी घेता आली नाही आणि शेजारील बागेत खाली कोसळला.  पडल्यावर त्याने पायात धरलेलं पोफळीचे पान   (झावूळ) आम्हाला कोयत्याने कापून काढावे  लागले, त्याची पकड इतकी घट्ट होती. शेवटी त्याला समुद्रावर नेऊन सोडल्यावर त्याने ‘गरुडझेप’ घेतली आणि क्षणात दिसेनाहीसा झाला.
खेड्यात रहाण्याचे अनेक फायदे, त्यातील हा एक. आणखी किस्से परत कधीतरी.
 
   
राम राम !

चला वाचूया .....Let's start reading.

सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom

पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे  लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...