Sunday, 17 November 2019

                                                         चढाई लिंगाण्याची






कॉलेजमध्ये असताना मित्रमंडळी बरोबर सावंतवाडी आसपास जंगल भ्रमणासाठी जायचो . त्यावेळी , २५ वर्षापूर्वी – ट्रेकिंग ई. गोष्टी आत्ता इतक्या  व्हायरल नव्हत्या . आमचे एक प्रोफेसर श्री.कोलवणकर वय अंदाजे ५०-५२ आणि दुसरे एक मित्र वजा शिक्षक श्री. गुप्ता सर यांचे बरोबरीने बऱ्यापैकी फिरणे व्हायचे कॉलेज जीवन पूर्ण केल्यावर त्यामध्ये विनाकारणच अचानक खंड पडला .

मागील वर्षी पुण्यात रहायला आल्यावर जुनी ' कंडू ' जागी झाली आणि चांगले दोस्त मिळाल्यामुळे पदभ्रमण पुन्हा सुरु झाले .





 




श्री.मनोज बेडेकर यांचेकडून पुणे वेंचरर ग्रुप बाबत ऐकले होते . टाटा मोटर्स मधील समविचारी मंडळी ही संस्था चालवतात .श्री. प्रभू सर आणि सोबती  हे काम नेटाने करून  सर्वसामान्य नागरिकांसाठी गिर्यारोहणाचा कोर्स ते घेतात . वर्षातून दोन वेळा सभासदांखेरीज लोकांना त्यांच्या मोहिमेत सहभागी होता येते , श्री. बेडेकरांच्या ओळखीमुळे या २६ जानेवारीच्या “ लिंगाणा “ मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळाली.

२५ तारखेला सायंकाळी अल्का टोकिज चौकात एकत्र जमून प्रवास सुरु झाला . मी , ओंकार , श्री. बेडेकर आणि त्यांचे दोन मुलगे असे आम्ही एकमेकाना ओळखणारे होतो ईतर सर्व नेहमीचे एकमेकांच्या परिचित होते. दोन बसेस मिळून आम्ही ६०-६५ जण होतो. सिह्गड रोड , खानापूर मार्गे निघालो , वाटेतील घाटीने गाडी, ड्रायव्हर दोहोंची परिक्षा घेतली. वाटेत कादवे घाटीत  चहापानासाठी थांबलो. काळोख होता होता सिंगापूरला (भारतातीलच) पोहोचलो .












सर्व जण जमल्यावर प्रभूसरानी शिर गणती घेतली , आवश्यक सूचना केल्या आणि मोहीम उद्या सकाळी ठीक ६ वाजता सुरु होईल असे सांगितले. ज्यांच्याकडे डबे नव्हते त्यांच्यासाठी जेवणाची सोय होती. मुलींकरिता शेजारील शाळेतील एक खोली होती , बाकी आम्ही उघड्यावरच झोपलो. सर आणि त्यांचे सादातत्पर सैनिकांची लगबग बराच वेळ सुरु होती. पहिल्याच भेटीत सरांचा मिलिटरी बाणा लक्षात आला होता त्यामुळे सर्व जण सकाळी वेळेत तयार झाले .

मोहीम सुरु करण्यापूर्वी १०-१० जणांचे गट करून पुन्हा शिर गणती झाली सूचना मिळाल्या,आणि त्या तंतोतंत पाळण्याची ताकीदही. सगळ्यांच्या कमरेला घट्ट दोरी बांधण्यात आली आणि आमची चाल सुरु झाली . अजून काळोखच होता ७-८ जणांनंतर १ स्वयंसेवक नेमला होता.सर्व जण झपाझप चालण्याचा प्रयत्न करत होते , स्वयंसेवक एकसारखे ओरडत होते ‘ ग्याप पडू देऊ नका ‘ अर्थात कोणी रस्ता चुकण्याची भीती. थोड्यावेळाने दिसू लागले. कठीण अशा नाळेतून उतरून लिंगाणा पायथा गाठला. कमर पट्ट्याची तपासणी झाली ,माझा पट्टा सैल होता(त्यांच्या मते) तो एव्हढा आवळला की तो सोडवे पर्यंत मला काही खाताच येऊ नये, अर्थात त्याचे महत्व नंतर कळलेच पट्ट्याला हुक अडकवण्यात आला.

चढाई सुरु झाली आमची ५ जणांची फाटाफूट झाली . चढाईचे वर्णन मला करता येणार नाही ,ते ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवले त्यांनाच कळेल. कोळी (स्पायडर), घोरपड, खेकडा, पाल ई. तमाम प्राण्यांचे कसब आत्मसात करून चढाई सुरु ठेवली. ठराविक अंतरावर स्वयंसेवक आपले काम चोख बजावत होते. कमरेच्या हुकाची दोरी बदलणे ,चढाईला मदत करणे , हात-पाय नक्की कोठे रोवणे गरजेचे आहे त्याच्या सूचना देणे- कधी प्रेमाने तर कधी जोरात असे अविरत काम आणि प्रभू सरांचा धाक यामुळे आम्ही सर्व सुखरूप पोचलो.वाटेत ओंकारच्या पोटात गोळा आल्याने त्याला असह्य वेदना होत होत्या, शिखर गाठल्यावर बहुदा तो सर्व विसरला. ९.३० झाले होते त्यामुळे वर जास्त वेळ थांबता येणार नव्हते, कारण चढाई सोपी ठरावी इतकी उतरण कठीण असते.

जिना उतरताना आपण समोर पहात उतरतो परंतु सुळका किंवा शिखर उतरताना सतत कड्याकडेच तोंड आणि दरीकडे पाठ करून उतरावे लागते. दोन पायांमधून खाली पहात पाय टाकावे लागतात त्यामुळे सतत खोल दरीचे दर्शन होत रहाते. उतरताना बेडेकर पुढे गेले होते , माझ्याबरोबर त्यांचे मुलगे होते ओंकार मागे होता. अर्धी उतरण झाल्यावर पुरणपोळी , संत्र असे खायला मिळाले तसेच यथेच्छ पाणी देखील पिता आले. कड्यामध्येच एक गुहा खोदलेली आहे – जुना तुरुंग होता असे समजतात , तेथेच खाणे पिणे झाले. मजल दरमजल करीत खाली पोचलो बेडेकर तेथे होतेच. अतिशय तीव्र उतार आणि निसरडी वाट असल्याने पायाखालचे लहान मोठे दगड सतत घरंगळत जोराने खाली येतात त्यातील एकाचा प्रसाद बेडेकाराना मिळाला होता आणि त्यांच्या डोक्यातून भाळाभळा रक्तस्त्राव झाला होता. काल सरांनी प्रत्येकाच्या डोक्यात टोपी हवी असे का सांगितले होते ते अत्ता लक्षात आले सूचनांचे पालन का करायचे तेही कळले.













जी नाळ सकाळी आम्ही मोठ्या जोशात उतरून गेलो होतो ती चढताना आमचा जीव मेटाकुटीस आला. मधेच माझ्या पोटात गोळा आला पण तो सहन करूनच नाळ पार केली. नंतर पुन्हा पाणी आणि अल्पोपहाराची सोय होती त्याचा लाभ घेतला. थोड्यावेळाने बेडेकर, ओंकार आले , वाटेत ओंकारला प्रचंड त्रास झाला होता त्याच्या दोन्ही पायात गोळे आल्याने त्याला नीटसे उभेदेखील रहाता येत नव्हते तरीही त्याने निग्रहाने नाळ पार केली.
आता वस्तीचे ठिकाणा पर्यंतचा रस्ता जवळपास सपाटीचा होता तेथे न चुकता घेऊन जाण्याचे काम छोटा डॉनने (शिवप्रसाद लाहोटी ) केले.







संध्याकाळी पावभाजी, पुलाव, गुलाबजाम असा बेत होता अशावेळी अन्नाची चव न्यारीच लागते. लगेचच निघून ९.३० ला पुणे गाठले. पुणे वेंचरर , प्रभू सर त्यांचे सोबती यांचेमुळे एक अविस्मरणीय अनुभव घेता आला ,लिंगाणा चढाईचे सर्व श्रेय त्यांनाच, सर्व टीमला शतशः धन्यवाद.



4 comments:

  1. Racy narration of a thrilling adventure, congratulations to you and Omkar for passing this endurance test!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद,
      तुमच्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेने उत्साह वाढतो.

      Delete
  2. वाचकांनाही असा अनुभव घ्यावासा वाटेल असे उत्तम लिखाण...वाचताना खूप छान वाटलं. असेच साहसी अनुभव घेत रहा व लिहीत रहा....

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद गुरुजी,
      थोरामोठ्यांचे आशीर्वादाने नक्की प्रयत्न करेन.

      Delete

चला वाचूया .....Let's start reading.

सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom

पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे  लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...