Monday, 5 February 2018

Parenting Baby Monkey







काका केलटा आला !


आमच्या प्राणी प्रेमाची महती गावात पसरली होतीच शिवाय आमचे मोठे बंधू (दीपक आणि माधव) सामाजिक कामात सहभागी होत असल्याने तालुक्यातही ती पसरली होती.
मी एकदा कामानिमित्त मुंबईला गेलो असताना अनोळखी माणसाचा फोन आला. मी अमुकतमुक दापोलीहुन बोलतोय आमच्या अंगणात एक हुप्प्याचे (वानराचे) अतिशय लहान पिल्लू दिसतंय मी काय करू ? पिल्लू खूपच लहान आहे. बोलण्यावरून पिल्लू  काही दिवसांचे असेल हेही कळले. मुंबईत असल्याने मला मर्यादा होत्या म्हणून त्याला दुध पाजण्याच्या सूचना दिल्या आणि मी ३-४ दिवसांनी येणार आहे तेव्हा पाहू असेही सांगितले. मी घरी पोहोचण्यापूर्वीच पिल्लू कोलथरेला आमच्या संगोपनालायात भरती झाले होते. पुठ्याच्या खोक्यात कापडाची छोटी मउ गादी बनवून त्यात त्यांनी पिल्लू ठेवले होते.
पूर्वीचे अनुभव जमेस धरून आम्ही एक बारीक जाळीचा १फुट x१फुट रुंदी आणि साधारण तीन साडेतीन फुट लांब असा मजबूत पिंजरा बनविला होता. रात्री फिरणारी उनाड कुत्री, मांजर या पासून संरक्षण व्हावे हा हेतू. तरीही रात्री पिंजरा उंचावर टांगून ठेवेत असू. नवीन पाहुणा हजर झाला की त्याचे बारसे लगेच केले जायचे. सर्वानुमते आम्ही त्याचे नाव 'राहुल' ठेवले. छोट्या बाळाच्या दुधाच्या बाटलीने दुध पाजून राहुलला सांभाळणे आमच्या साठी एव्हढे आव्हानात्मक  नव्हते. मुली, पुतण्या, आमचे कर्मचारी हिरीरीने हे काम करत असत. बघता बघता तो मोठा होऊ लागला. पिंजऱ्या बाहेर काढल्यावर टूण- टूण उड्या मारत फिरत असे. त्याच्या जीवाच्या मानाने शेपूट फारच लांब होते. शेपूट हवेत उलट्या 'J' सारखे उभे करून तो उड्या मारी  तो नजारा बघण्यासारखा असे.








माझ्या सौ ना आमच्या अशा सगळ्या उद्योगांचा तिटकारा असे पण राहुलला मात्र थेट घरात प्रवेश होता. राहुलला घरात सोडल्यावर तो सोफा, डायनिंग टेबल आणि खुर्च्या यांवर यथेच्च उड्या मारत असे आणि बायको चक्क कौतुकाने त्याचे चाळे पहात असे. माझ्या मुली राहुलचे खूप लाड करत. त्यावरून त्यांच्यात चढाओढ चाले. अगदी सुरवातीला तर बाटलीने दुध पिता-पिता राहुल  मुलींचे बोट घट्ट पकडून मांडीत झोपायचा. मग राजूची डुलकी पूर्ण होई पर्यंत आपला पुतळा. त्याच्या नाजूक तळहातांचा मउ मुलायम स्पर्श ही एक अनुभवण्याचीच गोष्ट आहे. मुलींची एक तक्रार कायम असे 'बाबा आम्ही त्याचे एव्हढे लाड करतो पण तुम्ही दिसलात की तो तुमच्याच मागे येतो'. मलाही याचे कोडे कधी उलगडले नाही. हे फक्त राहुलच्याच बाबतीत होते असे नाही तर राजू, जिमी, लालू, जॉर्ज, मनुक चिंटू, सर्वच प्राणीमात्राबाबत हे घडे.



( PC: Shailendra Datar)


       राहुलच्या मर्कटलीला अनावर होऊ लागल्यावर आम्ही त्याला रानात सोडले. त्याचे लाड थांबले असले तरी मुक्त जीवनाचा आनंद आता तो घेऊ शकणार होता.
या वानर प्रजाती बाबत एक विशेष गोष्ट अशी जाणवली आम्ही ज्याला हुप्प्या किंवा वानर म्हणतो तो पाण्याला घाबरतो, मात्र केलटं अजिबात घाबरत नाही.
काही वर्षांपूर्वी आमचेकडे पाहुणा म्हणून असेच एक केलटं (राजू) आलं होत. दोन एक वर्ष आम्ही त्याला सांभाळले. पावसाळ्यात भरणारे एक छोटे तळे (मढी) आमच्या गावात आहे. पोहताना  कधी-कधी माझ्यासोबत मी  राजूला  घेऊन जात असे राजू त्या तळ्यात यथेच्च डुबक्या मारत असे.
राजू खूप हुशार आणि चालाख होता. काही खायला हवे असले किंवा लाड करून घ्यायचे असले तर  खिडकी मधून सौ गौरीला दिसेल अशा बेतानं विशिष्ट आवाज आणि हातवारे करत असे. समोर आलेली व्यक्ती घाबरली आहे अथवा नाही हे तो आलेल्या व्यक्तीच्या नजरेवरून ओळखत असे. समोरचा घाबरला आहे हे कळल की तो आक्रमक होत असे. आमचे गाव समुद्रकिनारी असल्याने पर्यटकांचा सतत राबता असतो. गावात आल्यावर 'आगोम' ला भेट ठरलेली असे. आमच्या कडील पशु-पक्षी हे पर्यटकांकरिता  एक आकर्षणाचा विषय असे. चेहऱ्यावर विविध हावभाव, हातवारे, उलट-सुलट माकड उड्या मारून राजू त्यांचे मनोरंजन करी आणि स्वतः राजूही आलेल्या पर्यटकांसोबत मर्कटलीला करून मजा लुटत असे.
एकदा एक पर्यटक (विदेशी ) मुलगी हातात मोदक घेऊन राजूच्या जवळ गेली. कोकणात मोदक म्हणजे उकडीचाच; जसें कन्याशाळा म्हटले की ती मुलींचीच तसें असो.  राजूने लगेच झडप घातली दोघांची झटापट झाली आणि मुलीला किरकोळ जखम झाली. घरचीच औषधे असल्याने आम्ही त्वरित  उपचार केले. आम्ही  राजूला रानात सोडण्याचा निर्णय घेतला. एक दिवस  त्याला ४-५ किमी लांब अंतरावर सोडून मी घरी आलो. थोड्या वेळाने गावातील एक मुलगा घरी ओरडत आला 'काका केलटा रस्त्याने परत येतोय'. राजूला  उनाड कुत्री मारतील या धास्तीने मी जाऊन त्याला घेऊन आलो. नंतर परत एकदा लांब खाडी पलीकडे त्याला सोडून राजू प्रकरणावर कायमचा पडदा टाकला.
    


Thursday, 4 January 2018

Fish Eagle Rescue And Parenting












ए घुबड्या !
एक दिवस रामुदादाचा गिम्हवणेहून (दापोली) फोन आला, रामदास माझ्या अंगणात पक्षाची दोन पिल्ल पडली आहेत त्यांना  कावळे त्रास देत आहेत त्यांच्या जीवाला धोका आहे तू काहीतरी कर. मी पिल्लू म्हणतोय कारण त्यांना उडता येत नाहीये पण ते छोट्या कोंबडी एव्हढे आहेत.
रामुदादा म्हणजे माझा आतेभाऊ. आम्ही त्याला अरेतुरे करतो कारण नात्याने तो आमचा भाऊ लागतो पण जवळ-जवळ वडिलांच्या वयाचा. वयाने ज्येष्ठ पण उत्साही. माझे वडील ७ भावंडांमधे सर्वात लहान त्यामुळे वडीलांची भाचे मंडळी त्यांच्याच वयाची. परिणामी आम्ही लहान वयातच आजी आजोबा. तर रामुदादाच्या आज्ञेवरून पिल्ल आमच्या ‘संगोपनालयात’ भरती झाली. आम्ही घार म्हणतो तिची पिल्ल होती.
पक्षाच्या पिल्लांना लहानाचे मोठे करण्याचा मला फार अनुभव नव्हता पण जबाबदारी टाळूही शकत नव्हतो. वानर, मुंगुस, खारुताई, साळींदर ई दुध पिणाऱ्या पिल्लांना आम्ही लहानाचे मोठे केलेले आहे. पक्षाच्या पिल्लाला एकतर चोचीत भरवावे लागते आणि खायला काय द्यायचे हा आणखी एक प्रश्न असतोच. शिवाय घार हा शिकारी पक्षी असल्याने त्याची चोच आकड्याप्रमाणे असल्याने काम आणखी कठीण.
    












 घराशेजारील गोशाळेला खेटून आम्ही एक कायम स्वरूपी संगोपनालय बांधले आहे. साधारण ८ x ८ फुट लांब-रुंद त्याला ४ फुटापर्यंत दगडी भिंत आणि वर लोखंडी जाळी असे स्वरूप. नवीन पाहुणा आला की त्याला हक्काचे घर तयारच असते. पाहुणा फार छोटा असल्यास त्याच्या आकाराचे छोटे पिंजरे आहेत त्यात ठेवून पिंजरा या घरात ठेवतो जेणेकरून शत्रूपासून विशेषकरून रात्री  संरक्षण व्हावे.
पाहुण्याचे हक्काचे खाणे म्हणजे घट्ट भिजवलेली कणिक. कणकेची छोटी-छोटी भेंडोळी करून ती थोड्या-थोड्यावेळाने भरवत रहावे लागते. घरचा व्यवसाय आणि शेती असल्याने मदत करणारे हौशी सहाय्यक घरचेच. मुली, पुतणे सर्व हिरीरीने सहभागी होतच असतात. आमच्या अथक प्रयत्नांनंतरही एका पिल्लाला आम्ही वाचवू शकलो नाही. दुसरं पिल्लू थोडं जाणते झाल्यावर त्याला लहान-लहान मासे खाऊ घालायचो. थोडे दिवसांनी ‘लालू’- अरे हो त्याचे नाव आम्ही लालू ठेवले होते, का ते विचारू नका, मोठे मासे चिरफाड करून खात असे. खाताना एक चि-चि असा आवाज करे. लाडात आला किंवा भूक लागली की पायाजवळ येऊन नखाने अथवा चोचीने खाजवत आवाज करायचा.
आमचे कोळथरे गाव समुद्रकिनारी असल्याने गावाची एक विशिष्ट रचना आहे. गावातून जाणारा एक मुख्य रस्ता आणि दुतर्फा एकमेकाला खेटून असणारी घरं. गावातील प्रत्येक समाजाचा एक ‘खास’असा व्यवसाय असतो. कोळी बांधव ज्यांना आम्ही खारवी म्हणतो ते अर्थातच मासेमारीचा व्यवसाय करतात. कोळी भगिनी रोज ठराविक वेळेला सर्व गावात फिरून मच्छी विकतात. डोक्यावर बांबू पासून बनविलेली टोपली, टोपली खाली पूर्वी विरी ( सुपारीच्या पानाची एक बाजू) असे आता ताट असते, टोपलीवर एक लाकडी पातळ फळी आणि हातात एक छडी(काठी),असा सरंजाम असतो. काठीचा वापर टोपलीवर झुंजा मारणारे कावळे आणि पाठी फिरणारी गावातील मांजरे यांना हाकलण्यासाठी. आम्ही दारावरून जाणाऱ्या मावशीना बामणाला उपासाचे मासे द्या म्हटले की त्या लगेच बचक मारून मासे देऊन घाईघाईने निघून जात, त्यांना आमचे कडून मोबदला घ्यायचा नसे. आम्ही घरातील कुत्रा, मांजर यांना ते देत असू.













लालू पुरेसा मोठा झाला होता म्हणून आम्ही त्याला मुक्त केले. पहिले काही दिवस घराशेजारीच तो आकाशात  घिरट्या घालायचा आणि मी हाक मारली की लगेच खाली येऊन खाऊ खाऊन लाड करून घ्यायचा. त्याच्या बसण्याच्या जागाही ठरलेल्या असत. घरासमोर एक छोटी इमारत आहे. इमारतीच्या भिंती मधून बडोदाचे (आम्ही त्याला भाल म्हणतो) टोक बाहेर आले आहे त्यावर लालू बसत असे. एक दिवस मावशी मच्छी घेऊन रस्त्यावरून निघाली होती, लालूची स्वारी त्या बडोदावर बसलेली होती. नेहमी प्रमाणे पाठी लागणाऱ्या मांजरांना हाकलण्याकडे तिचे लक्ष होते. लालूने अचानक तिच्या टोपलीवर झडप घातली क्षणभर मावशीला काहीच कळले नाही एकदम एव्हढा मोठा पक्षी कुठून आला असा प्रश्न तिला पडला असावा. ती बावरली आणि काठी फिरवत जोराने ओरडली ‘ए घुबड्या’. नक्की तिला काय म्हणायचे होते कोण जाणे  ती तिची प्रतिक्षिप्त क्रिया होती. आम्ही मात्र लालू त्या जागेवर येऊन बसला की ओरडायचो ए घुबड्या.
काही दिवसांनंतर लालू दिसे नाहीसा झाला.  तिचे भाऊबंध  आकाशात किवा माडावर(नारळाचे झाड) बसलेले  दिसले  की मला कायम वाटायचे हा लालू असला तर मला बघून खाली येईल. पण तसे  कधी घडले नाही.
या सर्व अनुभवातून एक जाणवले पक्षाना देखील माणसाचा लळा लागतो आणि ते हाकेला सादही देतात.      

Tuesday, 24 October 2017

तर सायकलला राम-राम ! Horse Riding





घोडा हा प्राणी असा आहे तुम्ही त्याच्या सहवासात आलात की कधी प्रेमात पडता हे कळतच नाही. कोळथरेला रहात असताना माझ्या घोडसावारीच्या प्रेमाने पुन्हा एकदा उचल खाल्ली. दापोलीत १-२ 'घोडाप्रेमी' आहेत हे मला माहिती होते. मी लगेच विनय दादाला (माझा सर्वात मोठा भाऊ) फोन लावला. तालुक्यातील अस्सल मंडळी त्याच्या संपर्कात असतात. त्याने मला लगेचच दापोली-जालगाव मधील  घोडामालक श्री. कोळथरकर यांचा नंबर दिला. ते एक 'खानदानी' घोडा शौकीन आहेत.

माझे वडील(मामा महाजन) रोज नित्यनेमाने दिड-दोन तास आमच्या जागाजमिनीत फिरत असत. डोंगरदऱ्यांत, रानात फिरताना त्यांच्या सोबत कायम एक बगलथैली, कोयती आणि एक आकडी-डेलकी (काठीला एका टोकाला आकडा आणि दुसऱ्या टोकाला इंग्रजी 'V' सारखा आकार) असे. त्यांचे एक नेहमीचे वाक्य असे "जो कुंपण राखतो तोच जमीनजुमला राखतो" म्हणून रोज या साजोसामानासह भ्रमंती. हा दिनक्रम माझ्या स्मरणाप्रमाणे वयाच्या सत्तरी पर्यंत सुरु होता. रानावनातील ही रोजची भटकंती पाहून कोणीतरी मामांना घोडा घेण्याचे सुचविले, त्यांना देखील ही कल्पना पटली. एकदा मनात आल्यावर ती गोष्ट करायचीच असा मामांचा खाक्या. परिणामी आमचे कडे आधी 'यशवंत' आणि नंतर 'लक्ष्मी' नावाची घोडी होती. यशवंत/यश्या हा स्थानिक ओळखीने मिळाला होता. लक्ष्मीला आणण्यासाठी बाबा (मोठा भाऊ उदय) आणि त्याचा मित्र सुहास असे अलिबाग जवळ गेले होते. त्यांना यायला ४-५ दिवस लागले होते असे आठवते. उन्हात चालून त्यांच्या त्वचेचा रंग बदलला होता. यश्या थोडा थकलेला होता लक्ष्मी मात्र तरुण आणि धष्टपुष्ट होती. 'भाकरी का करपली घोडा का अडला?' या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतला आहे. दोन-तिन दिवस घोड्याला रपेट केली नाही की लगेच तो फेरफटका मारण्यास विरोध करतो. इतकेच काय आपण दोन दिवस त्याला एकाच वाटेने नेले तर तिसऱ्या दिवशी नवीन वाटेने त्याला घेऊन जाणे म्हणजे कर्मकठीण. 

माझ्या मोठ्या बहिणीची (गांधाताई) मुले लहान असताना मे महिन्यात महिनाभर आजोळी कोळथरेला रहायला येत असत. माझ्या स्मरणाप्रमाणे मामांनी लग्नात तशी अटच घातली होती. मामा रोज शुभुला (भाची) घोडीवर बसवुन गावात फेरफटका मारायला पाठवत त्यावेळी सोबत एक सांभाळणाराही असे. गावातून फिरत असताना मामांचे चाहते कोणी घरातून कोणी दारी येऊन कौतुकाने पहात असत. सर्व कार्यक्रम म्हणजे एक सोहोळाच होऊन जाई.


मामांनी सांभाळलेले दोन्ही घोडे स्थानिक होते. मी दापोलीला कोळथरकरांकडे घोडसावारी शिकायला जायचो तो 'शेरू' रेसच्या घोड्यासारखा उमदा, उंच, तगडा आणि पांढराशुभ्र होता. मी सकाळी ६ वाजता घरून निघून दापोलीत तासभर सराव करून ९ च्या आत घरी हजर होत असे. १५ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मी कोळथरकरांना वाकून नमस्कार केल्यावर  त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.  शेरू आणि माझी चांगली गट्टी जमली होती मालकही मला म्हणत डॉ शेरुचे तुमच्यावर खास प्रेम आहे. पहिले ५-६ दिवस शिकण्यात गेले नंतर मात्र शेरू घामाने भिजे पर्यंत आमची रपेट चालत असे. घोड्यावर स्वार झाल्यावर आपल्या अंगात एक वेगळीच उर्मी निर्माण होते, जणूकाही 'अश्वशक्ती' आपल्या शरीरात संक्रमित झाली आहे. एक प्रकारची झिंग, मग त्याची चटक लागते. 

एप्रिल-मे मधे कधीतरी शेरूच्या पायाला मोठी जखम झाली. उपचारांत मदतीसाठी मी आठवड्यातून एखादा दापोलीत जात असे. पुढे कोळथरकर म्हणाले तुम्ही शेरूला पावसाळ्यात तुमच्याकडे घेऊन जा इथे थोडी अडचण होईल. माझ्यासाठी ती संधीच होती. मी अण्णा (मोठे बंधू- माधव) जवळ बोलून आमच्या गोशाळे (गोठा) शेजारी शेरुसाठी जागा तयार करून घेतली. एक दिवस संध्याकाळी ट्रक मधून शेरुची स्वारी आमच्या अंगणात दाखल झाली. शेरूचा आकार, चाल, उमदेपणा, पांढरा रंग हे पाहून आई आणि पत्नीचे डोळे चमकले, दोघीही खुश झाल्या. शेरू २-३ महिने आमचे कडे होता. जखमेची सुश्रुषा, खरारा, रपेट ई मी रोजच करत असे शिवाय  शेरू रात्री अपरात्री चक्कर आल्यासारखे होऊन कोसळत असे त्यामुळे रात्रभर मला सतर्क राहावे लागे. त्याला उठवून उभे करणे खूप जिकरीचे होई त्यामुळे माझ्या काळजीने बायकोही मदतीस येत असे. या सर्व उपद्व्यापाचा परिणाम माझ्या तब्बेतीवर होऊन माझे वजन ४-५ किलोने कमी झाले. शेवटी आई आणि सौ गौरीने 'फतवा' काढून शेरुची रवानगी करण्याचे आदेश दिले. कोळथरकर शेरूला नेण्यास आले, शेरुची तब्बेत पाहून एकदम खुश झाले. मी माझी अडचण सांगून दिलगिरी व्यक्त केली तेव्हा म्हणाले " डॉक्टर घोडा ८ दिवस नीट सांभाळणे कठीण आहे तुमचे कौतुक करायला हवे."  शेरू आमच्या आवारातून बाहेर पडण्यास नाखुश होता कोळथरकरांनाही ते जाणवले.

काही दिवसांनी मी शेरूला भेटण्यास गेलो होतो, शेरू चरायला गेला होता आणि ५-७ फुट उंच वाढलेल्या गवतात तो दिसतही नव्हता. कोळथरकरांनी दोन-तिन हाका मारूनही शेरू आला नाही. ते म्हणाले डॉक्टर तुम्ही हाक मारा तो नक्की येईल आणि तसेच झाले,  घंटेचा घण-घण आवाज करत शेरू समोर हजर झाला. मी आनंदून गेलो.
मी घोड्यावर मनापासून प्रेम करतो. जैसलमेरला सायकलिंगसाठी गेलो असताना शेतात घोडा दिसल्यावर त्यावर स्वार होण्याचा मोह मी टाळू शकलो नव्हतो.


पुण्यात घोडा पाळणे शक्य झाल्यास मी सायकलला राम-राम करेन. 
                      


Friday, 29 September 2017

डोळे लागले ! Forest Night Life


पुण्यात रहाणेस आल्याने दापोली मधील मित्रांची भेट क्वचितच होते. दापोलीला गेलो असताना मित्राने; मी दापोली पर्यंत २० किमी सायकल चालवत जावून त्याला दिलेल्या  'मेजवानी' ची आठवण काढली. थोड्या गप्पा रंगल्या आणि मला जुन्या घटना आठवल्या. 

पूर्वी शहरांत अमुक एका क्लब अथवा जिमखान्याचे मेंबर्स बाबत जसे कौतुक, कुतूहल, औत्सुक्य असे तसे काहीसे शिकारीला जाणाऱ्या मंडळी बाबत गाव-खेड्यात असते.  यांची टोपणनावेही खास असतात आमच्याकडे एक जोडी होती, टारझन आणि डाबरमन. मी शाकाहारी असल्याने खरतर या जमातीत आगन्तुकच. मिळालेल्या ‘मेजवानीचा’ आस्वाद घेण्याची माझी ऐपत नाही.



जंगलातून रात्री फिरण्याची एक वेगळीच मजा असते. चारी दिशांना पसरलेला मिट्ट अंधार असल्याने अंदाज बांधण्यासाठी पायवाटेवरील खाणाखुणा दिसत नाहीत. दिवसा ज्या पायवाटांवरून आपण फिरलेलो असतो तेच जंगल रात्री भयंकर गूढ, अनाकलनीय आणि भीतीदायक वाटते. पंचक्रोशीमधे  जखमी डुकराने हल्ला करून गंभीर इजा झालेली एखादीतरी व्यक्ती असते, त्यामुळे अशा अदृश्य शक्तीची भीती मनात असतेच, किर्र अंधारात ती आणखी गहन होते. शिकारी साठी फिरताना मोठ्या प्रकाशाची विजेरीही वापरू शकत नाही. मोठ्या प्रकाशझोताची एक बॅटरी सोबत असते पण ती फक्त सावजाचा शोध घेण्यासाठी. पुढे चालणाऱ्याच्या हातातील बॅटरीचा उजेड त्याच्या पायाखाली पडत असतो उरलेले भिडू त्याच्या मागोमाग अंदाजाने मुंग्यांसारखी रांग करून चालतात. खांद्यावरील अवजड बंदुकीचे ओझे आणि आपला तोल सांभाळत चालणे म्हणजे परीक्षाच. वाटेत काटे-कुटे, खाच-खळगे, दगड-धोंडे, विविध वेली यांना चुकवत, पायांचा कमीतकमी आवाज करत समोरच्या व्यक्तीच्या चालीने मार्गक्रमण करणे म्हणजे तारेवरची कसरतच. बर पायात हंटर किंवा ट्रेकिंग शूज नाहीतच, बहुदा स्लीपर- सॅंडल म्हणजे चैन  आणि फुल पँन्ट कापून केलेली अर्धी चड्डी हा गणवेश. बंदुकधारी (बरकनदाराचा) वेश पण खास. मुंबईकर, मित्र किंवा पाहुणा याने दिलेला कोट अथवा जाकेट, त्याला २-४ खिसे वेगवेगळ्या ताकतीची काडतुसे ठेवण्यास गरजेचे. दोन प्रकारची नियमित मिळणारी काडतुसे आणि एक हायब्रिड म्हणजे भरलेले काडतूस . भरलेले म्हणजे ३ काडतुसांतील मालमसाला काढून दोनात भरायचा आणि शे दीडशे छोट्या गोळ्या काढून १५-२० मोठ्या गोळ्या भरायच्या. प्रत्येक काडतूस कधी आणि कोणासाठी वापरायचे यांचे ठोकताळे ठरलेले असतात. रात्री चालताना कान उघडे ठेवून सतर्क राहून बारीकसारीक आवाज टिपावे लागतात. सळसळ, फरफर, फ्रूक, ख्याक अशा विविध आणि विचित्र आवाजांचे सतत विश्लेषण करावे लागते. यात रात्री नेहमी चकवा देणारा प्राणी म्हणजे उंदीर. उंदीर सुक्या पानावरून धावत गेल्यास त्या भयाण शांततेत मोठे सावज गेल्याचा भास होतो.


सामान्यपणे रानडुक्कर, जंगली ससा, साळींदर, भेकर (हरीण वर्गातील प्राणी) हे हिटलिस्ट वर असतात. ससा, भेकर, साळींदर यांच्या ठावठिकाण्याचा अंदाज बांधता येतो. रानडुक्कर म्हणजे धूमकेतूच, कधी कोठून उगवेल याचा नेम नाही. चालता चालता कोणाचातरी कान एखादा आवाज टिपतो. लगेच श्शू s s s .....अशा सांकेतिक भाषेत संदेश पसरतो. सर्वजण स्तब्ध उभे राहून कानात जीव ओतून आपापल्या परीने आवाजाचा वेध घेतात. काळोखातच हातवारे, खाणाखुणा करून सावजाचा अंदाज घेऊन बॅटरी टाकण्याची सूचना मिळते. बॅटरी टाकणे म्हणजे सावजाच्या दिशेने प्रकाशझोत टाकणे. बॅटरी धरणारा लगेच इप्सित दिशेने प्रकाशझोत टाकतो, बहुतेक वेळा तिथे कोणी नसतेच. मग आजूबाजूला, झाडाझुडपात, बांधावर शोध सुरु होतो, अचानक कोणाचातरी डोळा लागतो ; डोळा लागतो म्हणजे प्रकाशझोतात सावजाचा डोळा चमकतो. क्षणभर पुन्हा सगळे शांत, वातावरण एकदम तंग.. ९० टक्के वेळा तो कापूरकवडा असतो आणि क्षणात तो भुर्रकन उडूनही  जातो. १५-२० मिनिटांच्या या तंग, तणावपूर्ण खेळाचा अंत अशा फुसक्या बाराने होतो. या डोळे लागण्यावरूनच सावजाचा अंदाज बांधून पुढील सर्व निर्णय घ्यावे लागतात. त्याच मुळे विजेरीवाला हा चलाख, सतर्क आणि अनुभवी असावा लागतो.

तासावर तास, दिवसामागून दिवस हा लपाछपीचा खेळ सुरु असतो. शिकार फार क्वचितच मिळते पण त्या थराराची नशा चढते आणि दारुडे जसे रोज आपल्या पंढरीची वारी करतात तसेच काहीसे शिकारीला जाणाऱ्यांचे होते. जणू व्यसनच, एकदा लागलं की सुटका नाही.   
Ramdas Mahajan !

Sunday, 17 September 2017

गरुडझेप White Bellied Sea Eagle









गरुडझेप
समुद्रकिनारी खेडेगावात रहात असल्याने समुद्र आणि एकूणच निसर्गाशी जवळचा संबंध येतो. निसर्गप्रेम आणि धडपडा स्वभाव यामुळे चिपळूणचे श्री. भाऊ काटदरे यांचेशी संपर्क आला, ते ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ संस्था चालवितात. समुद्री कासवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे काम संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ते करतात. आम्ही हे काम सुरु केले तेव्हा ते ‘इन’ किंवा ‘कूल’ समजले जात नव्हते. अता प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट केला जातो त्यामुळे तळमळीने काम करू इच्छिणारी मंडळी कामात सहभागी होण्यास बिचकतात.  असो तो आत्ताचा विषय नाही. कासव प्रत्यक्ष अंडी घालताना पहायला मिळणे दुर्मिळच असते. ७/८ वर्ष काम करताना मी दोन वेळाच ते पाहू शकलो. कासव स्वतः वाळूत खड्डा खणून त्यात अंडी घालते आणि समुद्रात निघून जाते. 
कोळथरे येथील कामाची जबाबदारी मी घेतली होती म्हणून रोज पहाटे किनाऱ्यावर फेरफटका मारत असे. थंडीच्या दिवसात सकाळी  ६.०० – ६.३०  पर्यंत समुद्रावर अंधारच असतो. असाच एके दिवशी समुद्रावर गेलो असताना १०/१२ कुत्री रिंगण करून फिरताना पाहिली. लांबून काही समजेना, जवळ गेलो तर एक भला मोठा पक्षी पंख पसरून मधे उभा होता. त्याचा पंख विस्तार जवळपास सहा फूट असावा (आम्ही नंतर तो मोजलाच). कुत्रे बहुदा त्याचा अवतार पाहून बावरले असावेत, मी जवळ गेल्यावर सर्व पळून गेले. पक्षाचा अवतार पाहून त्याला पकडण्याचा माझाही धीर होईना, कसा तरी पकडून घरी आणला. घरी आणल्यावर पाहिले तर कोणतीही विशेष जखम दिसली नाही.  दरम्यान पाहुण्यासाठी तात्पुरता पिंजरा उभा केला आणि आगोमच्या औषधांचे उपचारही सुरु केले. या कामात माझ्या मुली, पुतण्या हिरीरीने सहभागी होतात.
चिपळूणला  भाऊ काटदरेना फोन करून वृतांत सांगितला, ते म्हणाले हा समुद्र गरुड ( White
Bellied Sea Eagle)  आहे आणि झाडाच्या फांदीवर जोरात आपटल्याने त्याला  मानसिक धक्का बसला आहे त्यातून बाहेर येण्यास एक दिवस तरी जाईल.
आम्ही त्याला मासे खाऊ घालण्याचा प्रयत्न करत होतो पण तो काहीही खात नव्हता. त्याचे डौलदार शरीर, पोटाचा नितळ पांढरा रंग आणि राजेशाही रुबाब पाहून आम्ही त्याच्या प्रेमातच पडलो. दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला मुक्त केले पण बागेतील घट्ट पोफळी (सुपारीची झाडे) मधून त्याला भरारी घेता आली नाही आणि शेजारील बागेत खाली कोसळला.  पडल्यावर त्याने पायात धरलेलं पोफळीचे पान   (झावूळ) आम्हाला कोयत्याने कापून काढावे  लागले, त्याची पकड इतकी घट्ट होती. शेवटी त्याला समुद्रावर नेऊन सोडल्यावर त्याने ‘गरुडझेप’ घेतली आणि क्षणात दिसेनाहीसा झाला.
खेड्यात रहाण्याचे अनेक फायदे, त्यातील हा एक. आणखी किस्से परत कधीतरी.
 
   
राम राम !

चला वाचूया .....Let's start reading.

सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom

पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे  लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...