Monday, 17 September 2018



नर्मदे हर !                                            
     

दिनांक  २६ डिसेंबर २००९ रोजी ठरल्याप्रमाणे दादर स्टेशनवर भेटून (मी, श्री. जोग, पराग) कलकत्ता मेल ने प्रवास सुरु केला. नर्मदा परिक्रमेविषयी उत्सुकता ताणली गेली होती. रेल्वेचे तिकीट जबलपूर पर्यंत होते, परंतू चालणं कोठून सुरु करावे ते ठरले नव्हते, कारण मी आणि पराग फक्त चार दिवसांची पदयात्रा करुन  जबलपूरहून परत फिरणार होतो.  श्री. जोग पूर्ण एक महिना पदभ्रमण करुन अमरकंटक’’ च्या पुढे जाऊन विश्रांती घेणार होते. प्रवासात चर्चेअंती असे ठरले की, करेली स्टेशनला उतरुन बरमान मधून ब्रम्हांडघाटापासून पदभ्रमणाची सुरुवात करुया, कारण ब्रम्हांडघाट हा विशेष पवित्र घाट समजला जातो.
      श्री. जोग (माझे सासरे) यांचे सहवासात सतत चोवीस तास राहणेस मी कसा तयार झालो याचे आश्‍चर्य माझे पत्नीला सतत वाटत होते, पण नर्मदा कृपा !
      क ते दिड वर्षापूर्वी श्री. जनार्दन कुंटे यांचे नर्मदा परिक्रमेवरील पुस्तक माझे वाचनात आले होते. (आमचे शेजारील पंचनदी गावातील सुहास वैद्य यांनी हे पुस्तक मला दिले होते ) श्री. कुंटे यांना आलेले विविध दिव्य अनुभव, त्यांची लिखाणाची शैली, यामुळे माझे कुतुहल जागृत झाले होते आणि मी मनात ठरवले होते आयुष्यात एकदा तरी आपण परिक्रमेचा अनुभव घ्यायचाच. तेथील वातावरण, सामाजिक जीवन आणि लिखाणातील वास्तवता यांची अनुभूती घेता येईल हाही हेतू होताच. मुंबई गेलो असता श्री. जोगांकडील श्री. लिमये यांचे पुस्तक वाचनात आले आणि मनाची तयारी पक्की झाली. योगायोगाने श्री. जोगांनी त्यांची परिक्रमा करणेची इच्छा बोलून दाखविली. मी त्यांना सहजच म्हणालो, तुम्ही जाणार असाल तेव्हा मला सांगा, मी चार पाच दिवस तुमचे बरोबर येईन.
      काही दिवसांनी श्री. जोगांचा फोन आला, आपले बुकींग झाले आहे. मला एकदम धक्काच बसला मनात म्हटले आता सुटका नाही. त्यांनी योजलेले दिवस मला असुलभ होते परंतु मी परतीचे बुकींग करणेचे अटीवर होकार दिला आणि प्रवास सुरु झाला. भ्रमंतीची मला आवड असलेने मी खुष होतो. माझी एक सॅक (शाळेचे दप्तर) परागची सॅक, जोगांची भलीमोठी सॅक आणि पिशवी. माझे सोबत गावाहून आणलेली काठी होती, जिचे मुळे ( मी काळा गॉगल लावलेला असल्याने) एस.टी.बस कंडक्टरने तिकिटातील सवलती करीता माझ्याकडे आंधळा/अपंग असल्याचा दाखला मागितला होता.
      बॅगांमधील सामानांचे वर्णन ही आवश्यक आहे. माझ्या पत्नीने आपल्या प्रिय पिताजिंकरीता दोन प्रकारचे पौष्टिक लाडू एवढे बनवून दिले होते की, मी तिला म्हणालो आम्हाला जबलपूरला  भारत केसरीमध्ये भाग घेणेस पाठवित आहेस का? जोगांच्या सामानात स्लिपर(पायात बूट होतेच),रात्री घालावयाचा सेट,आंघोळी नंतरचा सेट,थर्मलवेअर, स्वेटर,चादर,सतरंजी  जसे काही  ज्येष्ठ नागरीक युरोप फिरायला निघालेले आहेत. घरुन निघताना हे सर्व अनावश्यक आहे याची मला कल्पना होतीच. शिवाय यातील काही सामान माझ्याच खांद्यावर येणार याची भिती देखील होती. तरीही मी काहीही न बोलता दादर गाठून प्रवास सुरु केला.
       
    
 
मेरा नंबर कब आएगा ?
         
           
 नियतवेळेत करेलीला उतरुन बरमान ला जाण्याच्या सोयीविषयी चौकशी केली. एका सद्गृहस्थाने पुढील चौराहाचा निर्देश करुन वाट दाखविली. थोडी फार भूक लागली होती म्हणून पोहयांचा (एम.पी. स्पेशल) आस्वाद घेवून पुढे इप्सित चौकात पोहोचलो. थोडाफार पाऊस सुरु झाला होता. शेजारीच एक सज्जन (घारे डोळे आणि गोरे गोमटे) उभे होते. जोगांनी अंदाज बांधून नाव विचारले उत्तर दामले’. पुढील सागर जिल्हयातील शेतकरी कुटूंब होते, त्यांचे जवळ आमचा इरादा बोलून दाखविला. जोगांकडे पाहून त्यांच्या चेहर्‍यावर आश्‍चर्य(जोगांचे वय, वजन लक्षात घेता) दिसले. बराच वेळाने एक बस आली परंतु तिची परिस्थीती फेविकॉलच्या जाहिरातीमधील बससारखी होती. मनात म्हटले- मेरा नंबर कब आयेगा? पा़ऊस सुरुच होता त्यामुळे पायाखालची माती हळूहळू गोंदाचे रुप धारण करु  लागली होती. इतक्यात थोडया अंतरावर एक सुमो दिसली. गाडीचे आजुबाजूची लगबग पाहून मला शंका आली म्हणून मी धावतच गेलो. अंदाज बरोबर ठरला. ते फ्लाईट  बरमानचे होते. मी मनात म्हटले मागे आम्ही दोघे बसून सामान ठेवू जोग पुढे आरामात बसतील, इतक्यात पुढे ६-७ जण घुसले. त्यामुळे मागे आम्ही तिघे पायाशी भली मोठी स्टेपनी, आमचे सामान (यादीची पुनरुक्ती नको) कसे मावलो मलाच कळले नाही. तेवढयात आणखी एक गृहस्थ, पुढे बसलेल्यांचा जोडिदार दार उघडून स्वतःला आत कोंबण्याचा प्रयत्न करु लागला आणि आमचा क्षीण विरोध डावलून जोगांचा चेंदा करुन दार लावता झाला. गाडी सुरु झाली जोगांची आरेाळी गेला पाय गेलाआम्ही तिघे सोडून इतर कोणालाही त्याचा अर्थ कळणेची शक्यता नव्हती. मी घाबरलो कारण जोगांच्या एका पायाचे ऑपरेशन झालेले होते. मनात म्हटले बहुधा बॅक टू पॅवेलियन  परंतू रस्त्याच्या कृपेने धक्के बसून बसून आम्ही सगळे सामावले गेलो आणि जोगांचा पायही स्थिरावला. थोडयाच वेळात बरमान गावाबाहेरील तिठयावर आमचे विमान थांबले. आम्ही उतरलो पाऊस मात्र सुरुच होता. माती चिकटून पादत्राणांचे वजन दहा पट झाले होते.
     

भटा भरता
    
बरमानला एक डाक बंगला (गेस्ट हाऊस) असल्याचे समजले. तसेच एक लॉजही असल्याचे कळले म्हणून आधी तिकडे गेलो. खाजगी लॉजची परिस्थिती गंभीर होती म्हणून मोर्चा गेस्ट हाऊस कडे वळविला. गेस्ट हाऊसच्या खोल्या राजेशाही परंतू नळाला पाणी नव्हते, आणि टॉयलेट मधे मोठी  छकुली’ हा स्थानिक शब्द बोली भाषेत  पाल होती. संध्याकाळी गावात फेरफटका मारण्यास गेलो. ब्रम्हांड घाटावर आंघोळ केली. दुकानात शुध्द खव्याची मिठाई खाल्ली (८० रु. किलो). दुकानातील व्यक्तीकडून  तेथील सरपंच श्री. मनमोहन साहू यांचा फोन नं. मिळाला. त्यांचेकडून परिक्रमा करत असल्याचा दाखल घ्यावयाचा होता. ते परगावी असल्याने उद्या सकाळी भेटण्याचे ठरले. गेस्ट हाऊसकडे जाताना हॉटेल शुभम शुध्द शाकाहारी भोजनालय बोर्ड पाहिला होता. राईट प्लेट रु. २५/-, पाच रोटया (एक रोटी = दोन-तीन चपात्या) मोठ वाडगं भरुन सब्जी, डाळ, पापड, राईस हॉटेलचे रुपडे अस्वच्छ होते परंतू जेवण अतिशय रुचकर. संध्याकाळी लॉजवर परत येताना एका टपरीवर चहासाठी थांबलो, तेथे  काही माणसे शेकोटी पेटवून पत्ते खेळत होती. त्यांच्या बरोबर चहा घेतला, गप्पांच्या ओघात बरमानच्या भटा भरताची महती कळली. भटा म्हणजे वांगे. वांगे एक दोन नव्हे चक्क पाच किलोचे एक वांगं ! लगेच जमलेल्या मंडळींनी भटा भरताचा बेत दुसर्‍या दिवशी आमचेसाठी ठरविला, नर्मदा तटावरील सक्तीच्या आदरातिथ्याचा पहिला अनुभव. रात्री लवकर झोपी गेलो आणि उद्या पदभ्रमण सुरु करण्याचे ठरविले. सकाळी ८.३०वा. सरपंच महोदयांकडून परिक्रमेचा दाखला घेतला. परत गेस्ट हाऊसवर येताना टपरीवर लगबग दिसली, त्यांना आम्ही निघतोय असे सांगितल्यावर ते गडबडले, कारण त्यांनी  भटा भरता पार्टीची जय्यत तयारी सुरु केली होती. त्यांची कशीबशी समजूत काढून मैय्याच्या किनार्‍यावर चालायला सुरुवात केली.

कितने मूर्ती
हो ?   थोडे अंतर चालल्यावर किनार्‍यापासून थोडे दुरुन धरमपुरी, बिकुंवर अशी गांवे पार करुन कुडी गावात दुपारी पोहोचलो, तेथून थोडे पुढे जावून पुन्हा किनार्‍यावर आलो. आमच्या दृष्टीने बरेच चालणे झाले होते, भूक लागली होती. किनार्‍यावर एक साधुबाबा स्वतःच्या जेवणाची तयारी करत होते. आम्हालाही त्यांनी आमंत्रित केले. अनोळखी व्यक्तीकडून आतिथ्यांची सवय नसल्याने आम्ही नाकार दिला.  इतक्यात एक गरीब (आर्थिक दृष्टया) शेतकर्‍याजवळ सहजच जेवणाची चौकशी केली. त्याचे गांव कुडी होते. आम्ही ते पार करून पुढे आलो होतो, त्यामुळे परिकम्मावासींची सेवा करण्यात असमर्थ असल्याने तो एकदम शरमला. तरीपण किती मूर्तीआहात? असे आदराने विचाराले, म्हणाला जंगलात मुलीचे झोपडे आहे. तिथे काही व्यवस्था होईल का ते पहातो. काय खाणार? विचारल्यावर त्यांना त्रास नको म्हणून मी पटकन डाळ भात म्हणालो. शेतकरी गेला आणि पंधरा वीस मिनिटांनी धापा टाकीत परत आला. ‘‘साब डाल भात नही है’’ रोटी चलेगा क्या? हरभर्‍याची भाजी करण्यास सांगतो असे म्हणाला. मी खुष झालो, ताजी हरभर्‍याची उसळ मिळणार. आम्हाला विचारून तो दिसेनासा झाला. मनात विचार आला, घरी आलेला पाहुणा कमीत कमी त्रास देऊन घरातून लवकरात लवकर कसा जाईल   हे पाहणारे आम्ही कोठे आणि परिस्थिती नसताना  अनोळखी माणसांची सेवा करण्याची ही वृत्ती कोठे. जवळजवळ पाऊण तास होऊन गेला, आम्ही बैचेन, मनात नाना विचार, बहुधा नुसत्या गोष्टी सांगून निघून गेला असावा असेही मनात येऊन गेले. आमची बैचेनी पाहून साधुबाबांची पून्हा ऑफर ‘‘माझ्यातील शेअर करा’’. एक तासाने मुलीला सोबत घेवून शेतकरी हजर. दहा बारा रोटया, सब्जी; (हरभर्‍याची म्हणजे हरभर्‍याच्या छोटया रोपांची होती.) आम्ही यथेच्छ खाल्ली. शेतकर्‍याला धन्यवाद द्यायला लागल्यावर तोच आमच्या पाया पडला. पैसे घेईना, सोबत दोन लहान मुले आली होती. त्यांच्या खिशात जबरदस्तीने खाऊकरिता पैसे कोंबले. शेतकर्‍याचे म्हणणे सर्व मैय्या देतेय म्हणून सेवा केलीच पाहिजे. पराकोटीचे आतिथ्य, नर्मदे हर! बाबाजींकडून भाजलेली एक बाटी घेतली आणि नमस्कार करून पुढे निघालो. मग धुवॉधार (छोटी) नंतर मुक्कामाचे ठिकाण गुरसी.

    
केसराम विश्वकर्मा
     
गुरसी धर्मशाळेची माहिती मिळाल्यानंतर तिकडे जायचे ठरविले. धर्मशाळा म्हणजे तीन बाजूंनी भिंती वर पत्रे एक बाजू पूर्ण उघडी. आम्ही पोहचण्यापूर्वीच तेथे पंचवीस-तीस परिक्रमावासी त ठोकून होते. आम्हाला प्रश्‍न पडला  जागा कशी मिळणार ?  धर्मशाळे ची व्यवस्था पाहणारे बाबा शेजारीच झोपडयात राहत होते. त्यांच्याकडे वशीला मारला तिथेच सामान ठेवून जेवणाची सोय पाहण्यास सुरूवात केली. प्रथेनुसार परिक्रमावासींना सदाव्र दिले जाते त्यांनी ते शिजवून खायचे असते. आम्ही तिघेही संजीव कपूरअसल्याने आम्हाला ते शक्यच नव्हते. काळोख झाला होता म्हणून धावत धावत गावातील एकमेव किराणा दुकानापाशी गेलो. त्यांचेकडे  जेवणाची चौकशी केली त्यांनी तयारीही दाखविली परंतू जोग काहीतरी हालचाल करतील याची खात्री असल्याने मी त्यांना पाच मिनिटात येवून सोगतो असे महटले. जोगांनी पटवापटवी केलीच होती. दुकानदारास मी नकार कवून आलो. आम्हाला जेवण करुन द्यायला तयार झालेले गृहस्थ म्हणजे केसराम विश्‍वकर्मा (सुतार). काळोख असल्याने त्यांचा चेहराही नीटसा पाहता आला नाही. रात्री त्यांचे घरी घेवून गेले डाळ रोटी, भाजी, भात, पापड सर्व गरमागरम आणि अतिशय रूचकर जेवण आदराने  ग्रह करून आम्हाला वाढले आणि सकाळी नाश्त्याचे आमंत्रणही देवून टाकले. परत झोपडीत आलो, थंडी बरीच होती. झोप शांत लागली नाही. धर्मशाळेतून तान्ह्या  मुलाचा रडण्याचा आवाजही रात्री येत होता. उजाण्यापूर्वी प्रातःविधी आटोपून बसलो होतो. तेवढयात हातात तीन वाफाळणारे ग्लास घेवून एक गृहस्थ समोर उभे राहिले, आपके लिएपाहिले तर गरमागरम कोरा चहा. हे कालचेच अन्नदाता होते. मी चहा सोडून दहा वर्षे झाली होती. परंतू त्यांनी पुढे केलेला कोरा चहा मी नाकारू शकलो नाही आणि मैय्याचा प्रसाद समजून प्राशन केला. मन तृप्त झाले. थोडयावेळाने फक्कड नाश्ता केला आणि मोबदल्याची चौकशी केली असता आम्हीच तुम्हाला दक्षिणा द्यायला पाहिजे असे उत्तर मिळाले. धर्मशाळेत जो ताफा होता त्यामध्ये खरेच एक तान्हे मुल आणि दोन तीन लहान मुले होती सर्व परिक्रमेला निघालेली.
  
    छडी
     
सकाळी चालायला सुरूवात केली सोबत सामान होतेच शिवाय दत्तक घेतलेली जोगांची पिशवीही. आज केरपाणी गाठायचे होते. तेथे आश्रम आहे, अशी माहिती मिळालेली होती. संपूर्ण वाटभर चहूबाजूने नजर जाईल तोपर्यंत शेती, विशेष करून तूर. वाटेत गोखला गांव लागले. मजल दरमजल करीत रामपूरा गांव पार करून गावाच्या सिमेवरील एका आसर्‍यात विश्रांतीसाठी थांबलो. दुपार झाली होती जोग खूप थकले होते. इतक्यात एक गृहस्थ आले नेहमीप्रमाणे जेवणाची चौकशी केली. आम्ही परिक्रमा करीत आहोत हे समजल्यावर आदरातिथ्य सुरू. घर गावाच्या सुरूवातीला होते म्हणून ते म्हणाले घरी चला. जोग चालायला तयार नव्हते. ते गृहस्थ (वय अंदाजे ७५) जोगांची सॅक घेण्याचा प्रयत्न  करीत होते जोगांना ते मान्य नव्हते. शेवटी ते म्हणाले तुम्ही इथेच थांबा मी जेवण बनवून इकडे घेवून येतो. गृहस्थ दहा पंधरा मिनिटांनी कांबळ घेऊन पुन्हा हजर. तुम्हाला आराम करण्यासाठी आणली आहे. कांब दिल्यावर जोग त्यावर पहुडले. शेजारीच जेवण करून गेलेल्या परिक्रमावासिंच्या चुल्यात निखारे दिसले पलीकडे तुरीचे शेत होते  शेतातील तुरीच्या शेंगा काढून आणल्या आणि भाजल्या. मी आणि पराग ने गरमागरम खालल्या. हा आनंद अवर्णनीय असा असतो फक्त तो घेण्याची आपली मानसिक तयारी हवी. जोगांना डोळा लागला होता  उठल्यावर  त्यांनाही शेंगा  दिल्या ते खूष झाले. त्या गृहस्थांचा आमची सेवा करण्याचा उत्साह बघून आम्ही खजिल झालो होतो. जोगांनाही थोडी तरतरी आली होती. म्हणून सामान उचलून त्यांचे घर गाठले. खूप गप्पा झाल्या. गप्पांच्या ओघात लक्षात आले श्री. तेलवरेंच्या पुस्तकामध्ये ज्या सदगृहस्थांचे वर्णन आलेले आहे ते हेच आहेत. जेवणात पूरी, रस्सा, डाळ, लोणचे, भात असा अतिशय सुंदर बेत होता. आग्रह करुन जेवण वाढले आणि वर आम्हाला नमस्कार केला. श्री.तेलवरे यांचे पुस्तकातील त्यांचा उल्लेख  असलेला भाग त्यांना दाखविला आणि पुस्तक तुम्हाला पाठवितो, असे सांगितले. (नंतर ते पाठवले.) परिक्रमेमधील अविभाज्य सामग्री  म्हणजे छडी ! अर्थात काठी.  त्या काकांनी स्वत:कडील एक छानशी काठी मला दिली. मी कोळथरेहून आणलेली काठी त्यांना दिली. (त्यांनी दिलेली छडी मी घरात भिंतीवर लटकविली आहे.) त्यांचा निरोप घेवून कोरपाणीच्या दिशेने निघालो.
  
   
आपके पीछे दौडके आऊंगा    केरपाणीचा मार्कंडेय संन्यासाश्रम परिसर खूप मोठा, गावापासून थोडा लांब आहे.  सकाळ-संध्याकाळ गावकर्‍यांची वरदळ तेथे असते. आम्ही गेलो तेव्हा आश्रमाचे मुख्य  स्वामी तेथेच मुक्कामाला होते, त्यांचे इतरही मठ आहेत. सायंकाळी त्यांचे प्रवचन सुरु होते थोडावेळ सत्संगाचा लाभ आम्हीही घेतला.  आम्ही जरा आधुनिक भासत असल्याने आमच्या करीता एक वेगळी खोली(अडगळीची) स्वच्छ करुन झोपण्याची सोय करुन दिली. आम्ही तेथे स्थिरावतोय एवढ्यात आम्हाला कुडीला भेटलेले बाबाजी हजर झाले आणि कोणतीही विचारपूस न करता आम्हाला दिलेल्या खोलीत त्यांनी संसार मांडला आणि आम्हाला आग्रह करु लागले, येथे प्रवचन सप्ताह सुरु आहे तुम्हीही थांबा. जसे काही त्या मठाचे तेच मालक असावेत. संकोच, भिड यांचा लवलेशही नाही. अनोळखी माणसाच्या घरात तिसर्‍याच व्यक्तिला आपण आग्रहाने थांबवित आहोत असा कोणताही भाव त्या बाबांच्या चेहर्‍यावर आम्हाला दिसला नाही, केवढी निरागसता ! रात्री उत्तम गरमागरम जेवण करुन झोपी गेलो पहाटे लवकर जाग आली. आश्रमातील विद्यार्थ्यांचे आधीच नित्यकर्म सुरु झाले होते. थोडा वेळ स्वामींचे विचार ऐकले आणि निघालो. आश्रम उंच डोंगरावर असल्याने गावात खाली उतरुन आलो. गावातील एकमेव टपरीवजा हॉटेल बंद होते, म्हणून दुकानात काही शेवचिवडा मिळतो का पाहून मी घेवून येतो असे म्हटले. जोग तिथेच थांबतो(भरवस्तीत) असे म्हणाले, मी म्हटले असे दुस्साहस करु नका, लोक खायला घालण्यासाठी मागे लागतील तुम्ही मैय्याचे बाजूने  चालत रहा. मी खरेदी करुन तुम्हाला गाठतो. जोगांना रहावले नाही आणि मैय्याच्या किनार्‍यावर  त्यांनी सॅक खाली ठेवल्या. मी धावत धावत त्यांना गाठले तेव्हा त्यांची एका व्यक्ति बरोबर बातचीत चालली होती. माणूस नुकताच आंघोळ करुन टॉवेलवरच तेथील मंदिरात दर्शनासाठी आलेला होता आणि तो जोगांना नाश्ता करण्याचा आग्रह करीत होता. त्याचा तो आग्रह मोडण्याच्या युद्धात मीही उतरलो. मी आणलेला खाऊ त्यांना  दाखविला, अनेक सबबी सांगितल्या पण ते ऐकण्याच्या मन:स्थितीतच नव्हते. शेवटी आम्ही बॅगा खांद्यावर मारल्या आणि विनंती करुन म्हणालो, आम्ही निघतो आमच्यासाठी काहीही आणू नका. हे ऐकल्यावर समोरुन उत्तर आप जाईये मैं आपके पिछे दौडकर आऊंगाकाय म्हणावे या अतिथ्याला? बोलल्याप्रमाणे री धावत धावत जाऊन लगेचच पोहे आणि शिरा घेवून आले  आम्हाला खायला लावले आणि आमची रवानगी केली. ही व्यक्ति म्हणजे हरिओम अग्रवाल.
    
 
सद्शील साहूबाबा
   
केरपाणी पासून पिठोरा पर्यंतचा संपूर्ण रस्ता मैय्याच्या किनार्‍यावरुन. जवळ जवळ चार पाच तास किनार्‍यावरुन चालणे झाले. बारुरेवा, मुर्गाखेडा, जोंधखेडा अशी गांवे वाटेत लागली. मग तूरीचे शेतातून दोन तीन किमी चालल्यावर डोंगरवाडी गाव लागले. मेन हायवे पासून गाव जवळच असल्याने थोडे सुधारलेले दिसले. एक स्लॅबचे घर दिसले अंगणात एक गृहिणी होती. जोग राहण्याच्या सोयीची चौकशी करण्यासाठी निघाले. मी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला कारण घर समृद्ध दिसत होते आणि  समृद्धी, सौजन्य, सद्भाव हे एकत्र नांदत नाहीत असा अनुभव होता. झाले तसेच माताजींनी जोगांना मार्गी लावले. पुढे एक छोटे दुकान दिसले, तेथे चौकशी केल्यावर साहूबाबांची माहिती कळली. साहू बाबांचे घर (झोपडी) शोधून काढले. अंगणात खाटल्यावर एक स्त्री (हिंदी सिनेमातील ठकुरायन सारखी) पहुडली होती. सामान्यपणे अनोळखी पुरुष समोर आल्यावर त्या भागातील स्त्रिया बावरतात, गोंधळतात पण त्यांनी झोपूनच आमची उलट तपासणी केली आणि मग आम्हाला आसरा मिळाला. अर्थात त्या शेजारीण बाई होत्या. साहूंच्या घरात एक वृद्धा वय अंदाजे ७५-८० रहात होत्या. बहुधा साहूंची बहिण असावी. साहू तिर्थयात्रेला गेले होते आणि जाताना बजावले होते परिक्रमावासियांची सेवा करा. थोड्याच वेळात तेथे मंडळी जमली. प्रतापसिंग पटेल, राहूल अग्रवाल इ. मी दोन/तीन  दिवसां घरी फोनवरुन बोलू शकलो नव्हतो हे कळाल्यावर माझा ताबा राहूल अग्रवालने घेतला आणि शेजारील कोणा एका धनिकाच्या गच्चीवर घेवून गेला (घरमालकाला विचारण्याची पद्धत नाही) तिथे माझा आणि त्याचा मोबाईल यातील सिमची अदलाबदल करुन बरेच प्रयत्न करुन पण यश आले नाही. शेवटी एका पि.सी.ओ. वर घेवून गेला, तेथूनही फोन लागला नाही. मग आणखी एक ठिकाणी घेवून गेला जेथून त्याच्या सेलवरुन मी घरी बोललो आणि आनंदित झालो. महाराज फोनचे पैसे घेण्यास तयार नव्हते. अनोळखी माणसाकरीता वेळ आणि पैसा खर्चकरणारी मंडळी - मैय्याची कृपा ! प्रतापसिंग पटेल यांनी जे पायांनी धू होते आमच्या गादीची व्यवस्था केली. बळेबळे गादीवाल्याला २०/- रु. दिले. परिक्रमावासियांसाठी साहूजींनी ठेवलेल्या घोंगड्या आम्हाला आजींनी दिल्या. झोपायची उत्तम व्यवस्था झाली. आजींनी अर्ध्या पाऊण तासात आमच्या साठी डाळ, रोटी, चावल इ. सर्व जेवण तयार केले. आमचा इतकुसा आहार पाहून त्यांना आश्‍चर्य वाटले. जेवायला आमच्याबरोबर शेजारचा एक कुत्राही होता तो नेहमीचाच पाहुणा, रोटी मिळाल्यावर तो नाहीसाही झाला. जेवण झाल्यावर गप्पा झाल्या छान झोप लागली. सकाळी उठल्यावर आजींनी आग्रहाने चहा पाजला तो घेवून आजींचा निरोप घेतला. निघताना मी सोबत आणलेली चादर तिथेच ठेवून आलो, अन्य परिक्रमावासींना उपयोगी पडावी हा हेतू.
      आता मैयाला सोडून नेहमीच्या जगात प्रवेश करावयाचा होता. प्रेम, जिव्हाळा, श्रद्धा, आपुलकी, आदर, सन्मान या सर्वांची परिसिमा गेले चार दिवस आम्ही अनुभवली होती. मन तिथेच होते, शरीर बसमध्ये. बेलखेडा, नटवारा, शहपूरा, चौराहा, धुवॉंधार करुन जबलपूर गाठले. रेल्वेच्या अतिथीगृहाचे बुकींग करुन बाजारपेठेत गेलो. सदर बाजारात इंडियन कॉफी हाऊसमध्ये जेवलो बरेच दिवसांनी बाजारु जेवण घेतले. खाणं आणि वातावरण दोन्ही उत्तम होते. गुजरात स्वीट्स मध्ये खाद्यपदार्थ घेतले.
      गरीब रथाचे तिकीट काढलेले होते. गरीब रथ नावानेच गरीब होता, व्यवस्था उत्तम होती. सहप्रवाशी श्री.सुरेंद्र राव जे स्वत: एक उत्तम चित्रकार आहेत त्यांनी आमचा विषय ऐकल्यावर त्यांचे गुरु श्री.अमृतलालजी वेगड (ज्यांचे हिंदीतून परिक्रमेवर पुस्तक आहे.) यांचा फोन नंबर दिला आणि जबलपूरला  जोगांना त्यांना भेटणेस सांगा, असा सल्ला  दिला. मी तो आमलात आणला, पुढील अनुभव श्री.जोगांनी घेतला. आम्ही (मी आणि पराग) मुंबईत दुसर्‍या दिवशी सकाळी ११.३० चे दरम्यान पोहोचलो.  मी लगेचच मुंबई सेंट्रलला येवून दापोली गाडी पकडली आणि नंतर त्वरीत कोळथरे गाठले.
नर्मदा मैय्या
च्या सानिध्यात ४-५ दिवस राहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, कोणतीही ऐहिकसुखं पदरी नसतानाही माणूस आनंदी आणि  समाधानी जीवन जगू शकतो.


 
 स्थानिक बोलीभाषेतील काही शब्द मी टिपून ठेवले होते.
लडी             = पायर्‍या, भटा किंवा भटई   = वांगं       अरहर,राहर,तुअर   = तूर,       कंडा             = गोवरी,  इतई             = येथे,
उतई
             = तेथे,  तनिक            = जवळ,  धुवॉंधार           = धबधबा



Sunday, 15 July 2018

Bhor Mandhardevi Wai Solo Biking








Man is a social animal

माणूस हा समाजप्रीय प्राणी आहे, या उक्तीचा वापर मी माझी भीती लपविण्यासाठी करत आलो आहे. गेली ४/५  वर्ष मी बरेच सायकलिंग केले आहे पण कायम सोबत कोणीतरी असतेच. एकल (solo) सायकलिंगची वेगळीच मजा असते, असं नियमीत एकल सायकलिंग करणारे मित्र सांगतात. मी कधीच त्या भानगडीत पडलो नाही कारण मनात आकारणच एक अनामिक भीती असते. यातून बाहेर पडणे गरजेचेच होते.
'आगोम' हा आमचा औषधी व्यवसाय माझ्या वडिलांनी सुरु केला. सुरवाती पासूनच औषधांचे ग्राहक हे फक्त ग्राहक न रहाता आगोमच्या बृहत् परिवाराचे सभासद आहेत असे आम्ही मानत आलो आहोत. गेली ४०/५० वर्षं निष्ठा आणि प्रेमाने आमची औषधे वापरणारी अनेक कुटुंब आहेत. त्यांच्या सदिच्छांच्या जोरावर आगोमची अविरत वाटचाल सुरु आहे. असेच एक कुटुंब सौ म्हसवडे मावशी यांचे, भोरमध्ये स्थायिक झालेले. अनेक दिवस त्यांना भेटायला सायकलने जाण्याचे घाटत होते पण सोबतीला नक्की कोण येणार हे ठरत नसल्याने ते पुढे-पुढे ढकलले जात होते.
 

You are never alone !   
२४ जून २०१८ रविवार म्हणून थोडा उशिरा ५.३० ला उठलो आणि वातावरण पाहून सहजपणे सायकल बाहेर काढण्याची तीव्र इच्छा झाली. रडारवर भोर होतेच, पटापट आटोपून ६.३० ला घराबाहेर पडलो. नेहमीची तयारी केली होतीच शिवाय पावसाळी तयारी आणि परत येताना बसने यायचे हे नक्की असल्याने सायकल बांधण्यासाठी ऑक्टोपस (रबराची फुलीच्या आकाराची दोरी), दोरीचे तुकडेही सोबत घेतले. सिंहगड रोडवरून मुंबई- बेंगलुरू महामार्गावर वळल्या पासून नवीन कात्रजबोगदा संपेपर्यंत फार तीव्र नाही पण चढणच आहे . चढणीची तीव्रता पाहून सुरवातीलाच योग्य तो गियर घेऊन सायकल दामटणे आम्ही पसंत करतो. थोडं अंतर गेल्यावर एक अनोळखी सायकलस्वार दिसला, सवयी प्रमाणे संवाद साधला. राजेश कदम एका खासगी बांधकाम व्यवसायिकाकडे काम करतो. अनेक वेळा कामावर जाण्यासाठी देखील तो सायकल वापरतो हे ऐकून मला त्याचे कौतुक वाटले. निघताना त्याने नक्की कुठे जायचे ठरविले नव्हते. त्याचा एक मित्र तुषार शहा त्याला नसरापूर नाक्यावर भेटणार होता नंतर ते दिशा ठरविणार होते. आम्ही तेथेच चहा साठी थांबण्याचा निर्णय घेतला. नाक्यावर पोचलो तिथे काही मुलांची लगबग सुरु होती, त्यांच्या पाठीवर 'टोकरं' होतं. 'टोकरं' म्हणजे मासे पकडण्यासाठी ग्रामीण भागात वापरले जाणारे एक साधन आहे. कोकणात काही ठिकाणी याला 'कोयीन' म्हणतात. बांबूच्या बारीक सऱ्या काढून ढोबळमानाने ढोलकीच्या आकारात ते बनविले जाते. त्याची एक बाजू बंद असते तर दुसऱ्या बाजूने शान्क्वाकार नळकांडी सारखा आकार आत घुसलेला असतो, यातून मासे आत शिरू शकतात. जोराने वहाणाऱ्या छोट्या प्रवाहात ते ठेवले जाते, मासे आत शिरून आतमध्ये अडकतात. पावसाळी ग्रामजीवनाचे आजचे पहिले दर्शन झाले.
PC श्री.
पराग साळस्कर 


चिमणी वृक्ष      
मी भोरला जातोय हे नक्की असल्याने त्या दोघांनी माझ्या सोबत भोर रोडवरील, कट्यार फेम 'नेकलेस स्पॉट' पर्यंत येण्याचा निर्णय घेतला. आम्ही लगेचच निघालो, भोर रस्त्यावर वळल्यावरील निसर्ग फारच विलोभनीय होता. संपूर्ण आसमंत हिरव्या रंगाने नटला होता. सकाळी निघाल्या पासूनच ढगाळ हवा, मधेच अगदी अल्प असा भूर-भूर पाउस म्हणजे सायकल चालविण्यासाठी सुवर्णसंधीच. थोडं पुढे गेल्यावर दोन-तीन मंडळी रस्त्या शेजारी पावसाळी 'टाकळी' ही भाजी खुडताना दिसली. मंडळी मुंबईकर असल्याने पावसाळी भाजी स्वतःच्या हाताने खुडताना त्यांचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता. नेकलेस स्पॉट खरंच सुंदर आहे, नीरा नदीने जमीनेला घातलेला वेढा पाहण्यासारखा आहे. पण मला तेथेच जवळ असणारा एक गमतीदार वृक्ष फार आवडतो. ६०-७० फुट उंच अशा कारखान्याच्या चिमणीच्या मुखात एक मस्त डेरेदार वृक्ष वाढला आहे. जणू काही सतत धूर ओकून तापून दमलेल्या चिमणीला आपल्या सम्भाराने तो वृक्ष थंडावा देत आहे. दोघे सोबती ठरल्याप्रमाणे तेथून परत फिरले. माझा खराखुरा एकट्याचा प्रवास सुरु झाला. वाटेत सुरु असणारी नांगरणी, लावणी ई. शेतीची कामे पाहून मन प्रसन्न झाले, हल्ली अभावानेच श्रम-श्रद्धा पहाणेस मिळते.


ORS घेतलं का ?
 भोर गाव सुरु होण्यापूर्वी डावीकडे आमचे आवडीचे नाष्ट्याचे ठिकाण म्हणजे छोटेखानी टपरीवजा हॉटेल सागर. सायकल बाहेर उभीकरून आत शिरल्यावर माझे नेहमीप्रमाणेच प्रेमाने स्वागत झाले. एकटेच फिरताय काळजी घ्या, सोबत ORS घेतलंय का ? असे मुलाने विचारल्यावर मला आश्चर्य मिश्रित आनंद झाला. नुसते एव्हढे विचारूनच तो थांबला नाही तर त्याने अर्धे लिंबू, दोन चमचे साखर आणि मीठ असं मला माझ्या पाण्याच्या बाटलीमधे टाकायला लावले आणि तो शांत झाला. वाटेत मी मांढरदेवीचा बोर्ड पाहिल्या पासून माझ्या डोक्यात ते घोळत होते. त्याला कारण म्हणजे दोन वर्षापूर्वी आम्ही पुणे-भोर-पोलादपूर-महाबळेश्वर असे सायकलिंग केले होते त्यावेळी विवेकच्या मनात खाली वाईला उतरून मांढरदेवी मार्गे भोर गाठण्याचे होते. मी माझा इरादा बोलून दाखविल्यावर त्यांना आणखीच काळजी वाटली आणि खूप चढण आहे, तेरा किलोमीटरचा घाटरस्ता एकाकी आहे असा इशारा वजा माहितीही दिली. आज सकाळी निघाल्यापासूनच मी तोंडावर ताबा ठेवण्याचे ठरविले होते त्यामुळे मिसळीचा आस्वाद न घेताच फक्त 'चायबारी' करून पुढे निघालो.    
भोर गावात शिरल्यावर मावशींना फोन केल्यावर त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला, मी मुद्दामहून पूर्वकल्पना दिली नव्हती. माझे जोरदार आगत-स्वागत झाले, चहापान, सर्व कुटुंबा सोबत गप्पागोष्टी झाल्यावर मी लगेच ११/११.३० च्या दरम्याने निघालो.



कुत्र्यांचा कहर
शिवाजी चौकातून मांढरदेवी रस्त्याला लागलो, वाटेत चौकशी केली असता कळले घाटात खाण्याची कोणतीही सोय नाहीये. तेरा किलोमीटरचा घाट म्हणजे सायकलने किमान दोन तास तरी लागणार हे लक्षात घेऊन वाटेतील टपरीवर चहा बिस्कुट हाणले आणि घाट रस्ता धरला. संपूर्ण रस्ता डामरी असला तरी ओबड-धोबड आहे, शिवाय बरेच ठिकाणी उभा चढ आहे. पावसाळी हवा, हिरवाईने नटलेले डोंगर, थंड हवा यामुळे मी जोशात होतो. घाट रस्ता निर्जन आहे परंतु रविवार असल्याने वहानांची सतत ये-जा सुरु होती आणि तीच माझ्या पथ्यावर पडली. त्या घाटात सायकल चालविणारा मी एकटाच असल्याने अनेक जण माझ्याकडे कौतुकाने बघत होते. अर्धाअधिक घाट चढून गेल्यावर अचानक ७/८ कुत्र्यांनी मला घेरले आणि भो-भो करीत पाठी लागले. क्षणभर मला काही कळेच ना एक तर उभा चढ आणि त्यात या कुत्र्यांचा कहर. नशिबाने  सतत येजा करणाऱ्या वाहानांमुळे त्यांना अडथळा होत होता त्यामुळे ४-५ मिनिटात त्यांचा जोर ओसरला आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. अखंडित सायकल चालवून मी घाट माथा गाठला पोटात कावळे ओरडू लागले होते. नाक्यावरील हॉटेलमधे गरमागरम भाकरी आणि पोटभर चहा असा विशेष मेनू योजला आणि तृप्त झालो.  
पुढे ७-८ किलोमीटरचा आनंददायी उतार उतरून ३ च्या सुमारास वाई बसस्थानक गाठले. समोर स्वारगेट-पुणे फलक लागलेली एक बस माझी वाट पहात उभीच होती. चालकाशी बोलून लगबगीने एकट्यानेच सायकल बसच्या टपावर चढविण्याची कसरत करून बांधून टाकली. वाई गाठल्यावर मला एक मिनिटाचीही उसंत मिळाली नव्हती त्यामुळे गाडीत बसल्यावर एकामागोमाग एक असे दोन्ही पायात गोळे आले.
स्वारगेटला पुन्हा 'आपला हाथ जगन्नाथ' स्वतःच सायकल खाली काढली मात्र यावेळी चालकाने जमिनीवर उतरवून घेण्यास मदत केली. लगेच सायकलवर टांग मारून घर गाठले.
पावसाळी ढगाळ वातावरण, थंड हवा, गार वारा आणि हिरवाईने नटलेले डोंगर पण भिजवून शरीर आंबवणारा पाउस मात्र नाही म्हणजे फूल टू मज्जा ...


Monday, 19 March 2018

Self Publication रामराम !

प्रसववेदना पश्चात नवनिर्मितीचा आनंद !
रामराम
काल माझ्या 'रामराम' पुस्तकाच्या अनावरणानिमित्त योजलेले स्नेहमीलन आनंदोत्सव बनून गेले.गेले अनेक दिवस (मी सोडून) सर्वांनी अथक प्रयत्न केले होते त्याचे चीज झाले.
ही ऋणमुक्तीसाठीची पोस्ट नाहीये, पण सगळ्यांचे आभार मानणे अस्थानी नक्कीच नाही. पोस्ट मधे कोणाचाही नामोल्लेख मी करत नाहीये, तरी एका व्यक्तीचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटतो ती व्यक्ती म्हणजे 'गोरख टेम्पोवाले'
दोन मोहिमांमध्ये ते आमच्या सायकल वाहून नेण्यासाठी सोबत आले होते. त्यानी कार्यक्रमास यावे असे मला वाटत होते. ते आले आणि पुस्तक विकत घेऊन माझी सही घेऊन गेले.
त्यांना सलाम !





काच्या  अनावरणानिमित्त योजलेले स्नेहमीलन आनंदोत्सव बनून गेले. गेले अनेक दिवस (मी सोडून) सर्वांनी अथक प्रयत्न केले होते त्याचे चीज झाले.
त्यांना सलाम !

Monday, 5 February 2018

Parenting Baby Monkey







काका केलटा आला !


आमच्या प्राणी प्रेमाची महती गावात पसरली होतीच शिवाय आमचे मोठे बंधू (दीपक आणि माधव) सामाजिक कामात सहभागी होत असल्याने तालुक्यातही ती पसरली होती.
मी एकदा कामानिमित्त मुंबईला गेलो असताना अनोळखी माणसाचा फोन आला. मी अमुकतमुक दापोलीहुन बोलतोय आमच्या अंगणात एक हुप्प्याचे (वानराचे) अतिशय लहान पिल्लू दिसतंय मी काय करू ? पिल्लू खूपच लहान आहे. बोलण्यावरून पिल्लू  काही दिवसांचे असेल हेही कळले. मुंबईत असल्याने मला मर्यादा होत्या म्हणून त्याला दुध पाजण्याच्या सूचना दिल्या आणि मी ३-४ दिवसांनी येणार आहे तेव्हा पाहू असेही सांगितले. मी घरी पोहोचण्यापूर्वीच पिल्लू कोलथरेला आमच्या संगोपनालायात भरती झाले होते. पुठ्याच्या खोक्यात कापडाची छोटी मउ गादी बनवून त्यात त्यांनी पिल्लू ठेवले होते.
पूर्वीचे अनुभव जमेस धरून आम्ही एक बारीक जाळीचा १फुट x१फुट रुंदी आणि साधारण तीन साडेतीन फुट लांब असा मजबूत पिंजरा बनविला होता. रात्री फिरणारी उनाड कुत्री, मांजर या पासून संरक्षण व्हावे हा हेतू. तरीही रात्री पिंजरा उंचावर टांगून ठेवेत असू. नवीन पाहुणा हजर झाला की त्याचे बारसे लगेच केले जायचे. सर्वानुमते आम्ही त्याचे नाव 'राहुल' ठेवले. छोट्या बाळाच्या दुधाच्या बाटलीने दुध पाजून राहुलला सांभाळणे आमच्या साठी एव्हढे आव्हानात्मक  नव्हते. मुली, पुतण्या, आमचे कर्मचारी हिरीरीने हे काम करत असत. बघता बघता तो मोठा होऊ लागला. पिंजऱ्या बाहेर काढल्यावर टूण- टूण उड्या मारत फिरत असे. त्याच्या जीवाच्या मानाने शेपूट फारच लांब होते. शेपूट हवेत उलट्या 'J' सारखे उभे करून तो उड्या मारी  तो नजारा बघण्यासारखा असे.








माझ्या सौ ना आमच्या अशा सगळ्या उद्योगांचा तिटकारा असे पण राहुलला मात्र थेट घरात प्रवेश होता. राहुलला घरात सोडल्यावर तो सोफा, डायनिंग टेबल आणि खुर्च्या यांवर यथेच्च उड्या मारत असे आणि बायको चक्क कौतुकाने त्याचे चाळे पहात असे. माझ्या मुली राहुलचे खूप लाड करत. त्यावरून त्यांच्यात चढाओढ चाले. अगदी सुरवातीला तर बाटलीने दुध पिता-पिता राहुल  मुलींचे बोट घट्ट पकडून मांडीत झोपायचा. मग राजूची डुलकी पूर्ण होई पर्यंत आपला पुतळा. त्याच्या नाजूक तळहातांचा मउ मुलायम स्पर्श ही एक अनुभवण्याचीच गोष्ट आहे. मुलींची एक तक्रार कायम असे 'बाबा आम्ही त्याचे एव्हढे लाड करतो पण तुम्ही दिसलात की तो तुमच्याच मागे येतो'. मलाही याचे कोडे कधी उलगडले नाही. हे फक्त राहुलच्याच बाबतीत होते असे नाही तर राजू, जिमी, लालू, जॉर्ज, मनुक चिंटू, सर्वच प्राणीमात्राबाबत हे घडे.



( PC: Shailendra Datar)


       राहुलच्या मर्कटलीला अनावर होऊ लागल्यावर आम्ही त्याला रानात सोडले. त्याचे लाड थांबले असले तरी मुक्त जीवनाचा आनंद आता तो घेऊ शकणार होता.
या वानर प्रजाती बाबत एक विशेष गोष्ट अशी जाणवली आम्ही ज्याला हुप्प्या किंवा वानर म्हणतो तो पाण्याला घाबरतो, मात्र केलटं अजिबात घाबरत नाही.
काही वर्षांपूर्वी आमचेकडे पाहुणा म्हणून असेच एक केलटं (राजू) आलं होत. दोन एक वर्ष आम्ही त्याला सांभाळले. पावसाळ्यात भरणारे एक छोटे तळे (मढी) आमच्या गावात आहे. पोहताना  कधी-कधी माझ्यासोबत मी  राजूला  घेऊन जात असे राजू त्या तळ्यात यथेच्च डुबक्या मारत असे.
राजू खूप हुशार आणि चालाख होता. काही खायला हवे असले किंवा लाड करून घ्यायचे असले तर  खिडकी मधून सौ गौरीला दिसेल अशा बेतानं विशिष्ट आवाज आणि हातवारे करत असे. समोर आलेली व्यक्ती घाबरली आहे अथवा नाही हे तो आलेल्या व्यक्तीच्या नजरेवरून ओळखत असे. समोरचा घाबरला आहे हे कळल की तो आक्रमक होत असे. आमचे गाव समुद्रकिनारी असल्याने पर्यटकांचा सतत राबता असतो. गावात आल्यावर 'आगोम' ला भेट ठरलेली असे. आमच्या कडील पशु-पक्षी हे पर्यटकांकरिता  एक आकर्षणाचा विषय असे. चेहऱ्यावर विविध हावभाव, हातवारे, उलट-सुलट माकड उड्या मारून राजू त्यांचे मनोरंजन करी आणि स्वतः राजूही आलेल्या पर्यटकांसोबत मर्कटलीला करून मजा लुटत असे.
एकदा एक पर्यटक (विदेशी ) मुलगी हातात मोदक घेऊन राजूच्या जवळ गेली. कोकणात मोदक म्हणजे उकडीचाच; जसें कन्याशाळा म्हटले की ती मुलींचीच तसें असो.  राजूने लगेच झडप घातली दोघांची झटापट झाली आणि मुलीला किरकोळ जखम झाली. घरचीच औषधे असल्याने आम्ही त्वरित  उपचार केले. आम्ही  राजूला रानात सोडण्याचा निर्णय घेतला. एक दिवस  त्याला ४-५ किमी लांब अंतरावर सोडून मी घरी आलो. थोड्या वेळाने गावातील एक मुलगा घरी ओरडत आला 'काका केलटा रस्त्याने परत येतोय'. राजूला  उनाड कुत्री मारतील या धास्तीने मी जाऊन त्याला घेऊन आलो. नंतर परत एकदा लांब खाडी पलीकडे त्याला सोडून राजू प्रकरणावर कायमचा पडदा टाकला.
    


चला वाचूया .....Let's start reading.

सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom

पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे  लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...