Sunday, 15 July 2018

Bhor Mandhardevi Wai Solo Biking








Man is a social animal

माणूस हा समाजप्रीय प्राणी आहे, या उक्तीचा वापर मी माझी भीती लपविण्यासाठी करत आलो आहे. गेली ४/५  वर्ष मी बरेच सायकलिंग केले आहे पण कायम सोबत कोणीतरी असतेच. एकल (solo) सायकलिंगची वेगळीच मजा असते, असं नियमीत एकल सायकलिंग करणारे मित्र सांगतात. मी कधीच त्या भानगडीत पडलो नाही कारण मनात आकारणच एक अनामिक भीती असते. यातून बाहेर पडणे गरजेचेच होते.
'आगोम' हा आमचा औषधी व्यवसाय माझ्या वडिलांनी सुरु केला. सुरवाती पासूनच औषधांचे ग्राहक हे फक्त ग्राहक न रहाता आगोमच्या बृहत् परिवाराचे सभासद आहेत असे आम्ही मानत आलो आहोत. गेली ४०/५० वर्षं निष्ठा आणि प्रेमाने आमची औषधे वापरणारी अनेक कुटुंब आहेत. त्यांच्या सदिच्छांच्या जोरावर आगोमची अविरत वाटचाल सुरु आहे. असेच एक कुटुंब सौ म्हसवडे मावशी यांचे, भोरमध्ये स्थायिक झालेले. अनेक दिवस त्यांना भेटायला सायकलने जाण्याचे घाटत होते पण सोबतीला नक्की कोण येणार हे ठरत नसल्याने ते पुढे-पुढे ढकलले जात होते.
 

You are never alone !   
२४ जून २०१८ रविवार म्हणून थोडा उशिरा ५.३० ला उठलो आणि वातावरण पाहून सहजपणे सायकल बाहेर काढण्याची तीव्र इच्छा झाली. रडारवर भोर होतेच, पटापट आटोपून ६.३० ला घराबाहेर पडलो. नेहमीची तयारी केली होतीच शिवाय पावसाळी तयारी आणि परत येताना बसने यायचे हे नक्की असल्याने सायकल बांधण्यासाठी ऑक्टोपस (रबराची फुलीच्या आकाराची दोरी), दोरीचे तुकडेही सोबत घेतले. सिंहगड रोडवरून मुंबई- बेंगलुरू महामार्गावर वळल्या पासून नवीन कात्रजबोगदा संपेपर्यंत फार तीव्र नाही पण चढणच आहे . चढणीची तीव्रता पाहून सुरवातीलाच योग्य तो गियर घेऊन सायकल दामटणे आम्ही पसंत करतो. थोडं अंतर गेल्यावर एक अनोळखी सायकलस्वार दिसला, सवयी प्रमाणे संवाद साधला. राजेश कदम एका खासगी बांधकाम व्यवसायिकाकडे काम करतो. अनेक वेळा कामावर जाण्यासाठी देखील तो सायकल वापरतो हे ऐकून मला त्याचे कौतुक वाटले. निघताना त्याने नक्की कुठे जायचे ठरविले नव्हते. त्याचा एक मित्र तुषार शहा त्याला नसरापूर नाक्यावर भेटणार होता नंतर ते दिशा ठरविणार होते. आम्ही तेथेच चहा साठी थांबण्याचा निर्णय घेतला. नाक्यावर पोचलो तिथे काही मुलांची लगबग सुरु होती, त्यांच्या पाठीवर 'टोकरं' होतं. 'टोकरं' म्हणजे मासे पकडण्यासाठी ग्रामीण भागात वापरले जाणारे एक साधन आहे. कोकणात काही ठिकाणी याला 'कोयीन' म्हणतात. बांबूच्या बारीक सऱ्या काढून ढोबळमानाने ढोलकीच्या आकारात ते बनविले जाते. त्याची एक बाजू बंद असते तर दुसऱ्या बाजूने शान्क्वाकार नळकांडी सारखा आकार आत घुसलेला असतो, यातून मासे आत शिरू शकतात. जोराने वहाणाऱ्या छोट्या प्रवाहात ते ठेवले जाते, मासे आत शिरून आतमध्ये अडकतात. पावसाळी ग्रामजीवनाचे आजचे पहिले दर्शन झाले.
PC श्री.
पराग साळस्कर 


चिमणी वृक्ष      
मी भोरला जातोय हे नक्की असल्याने त्या दोघांनी माझ्या सोबत भोर रोडवरील, कट्यार फेम 'नेकलेस स्पॉट' पर्यंत येण्याचा निर्णय घेतला. आम्ही लगेचच निघालो, भोर रस्त्यावर वळल्यावरील निसर्ग फारच विलोभनीय होता. संपूर्ण आसमंत हिरव्या रंगाने नटला होता. सकाळी निघाल्या पासूनच ढगाळ हवा, मधेच अगदी अल्प असा भूर-भूर पाउस म्हणजे सायकल चालविण्यासाठी सुवर्णसंधीच. थोडं पुढे गेल्यावर दोन-तीन मंडळी रस्त्या शेजारी पावसाळी 'टाकळी' ही भाजी खुडताना दिसली. मंडळी मुंबईकर असल्याने पावसाळी भाजी स्वतःच्या हाताने खुडताना त्यांचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता. नेकलेस स्पॉट खरंच सुंदर आहे, नीरा नदीने जमीनेला घातलेला वेढा पाहण्यासारखा आहे. पण मला तेथेच जवळ असणारा एक गमतीदार वृक्ष फार आवडतो. ६०-७० फुट उंच अशा कारखान्याच्या चिमणीच्या मुखात एक मस्त डेरेदार वृक्ष वाढला आहे. जणू काही सतत धूर ओकून तापून दमलेल्या चिमणीला आपल्या सम्भाराने तो वृक्ष थंडावा देत आहे. दोघे सोबती ठरल्याप्रमाणे तेथून परत फिरले. माझा खराखुरा एकट्याचा प्रवास सुरु झाला. वाटेत सुरु असणारी नांगरणी, लावणी ई. शेतीची कामे पाहून मन प्रसन्न झाले, हल्ली अभावानेच श्रम-श्रद्धा पहाणेस मिळते.


ORS घेतलं का ?
 भोर गाव सुरु होण्यापूर्वी डावीकडे आमचे आवडीचे नाष्ट्याचे ठिकाण म्हणजे छोटेखानी टपरीवजा हॉटेल सागर. सायकल बाहेर उभीकरून आत शिरल्यावर माझे नेहमीप्रमाणेच प्रेमाने स्वागत झाले. एकटेच फिरताय काळजी घ्या, सोबत ORS घेतलंय का ? असे मुलाने विचारल्यावर मला आश्चर्य मिश्रित आनंद झाला. नुसते एव्हढे विचारूनच तो थांबला नाही तर त्याने अर्धे लिंबू, दोन चमचे साखर आणि मीठ असं मला माझ्या पाण्याच्या बाटलीमधे टाकायला लावले आणि तो शांत झाला. वाटेत मी मांढरदेवीचा बोर्ड पाहिल्या पासून माझ्या डोक्यात ते घोळत होते. त्याला कारण म्हणजे दोन वर्षापूर्वी आम्ही पुणे-भोर-पोलादपूर-महाबळेश्वर असे सायकलिंग केले होते त्यावेळी विवेकच्या मनात खाली वाईला उतरून मांढरदेवी मार्गे भोर गाठण्याचे होते. मी माझा इरादा बोलून दाखविल्यावर त्यांना आणखीच काळजी वाटली आणि खूप चढण आहे, तेरा किलोमीटरचा घाटरस्ता एकाकी आहे असा इशारा वजा माहितीही दिली. आज सकाळी निघाल्यापासूनच मी तोंडावर ताबा ठेवण्याचे ठरविले होते त्यामुळे मिसळीचा आस्वाद न घेताच फक्त 'चायबारी' करून पुढे निघालो.    
भोर गावात शिरल्यावर मावशींना फोन केल्यावर त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला, मी मुद्दामहून पूर्वकल्पना दिली नव्हती. माझे जोरदार आगत-स्वागत झाले, चहापान, सर्व कुटुंबा सोबत गप्पागोष्टी झाल्यावर मी लगेच ११/११.३० च्या दरम्याने निघालो.



कुत्र्यांचा कहर
शिवाजी चौकातून मांढरदेवी रस्त्याला लागलो, वाटेत चौकशी केली असता कळले घाटात खाण्याची कोणतीही सोय नाहीये. तेरा किलोमीटरचा घाट म्हणजे सायकलने किमान दोन तास तरी लागणार हे लक्षात घेऊन वाटेतील टपरीवर चहा बिस्कुट हाणले आणि घाट रस्ता धरला. संपूर्ण रस्ता डामरी असला तरी ओबड-धोबड आहे, शिवाय बरेच ठिकाणी उभा चढ आहे. पावसाळी हवा, हिरवाईने नटलेले डोंगर, थंड हवा यामुळे मी जोशात होतो. घाट रस्ता निर्जन आहे परंतु रविवार असल्याने वहानांची सतत ये-जा सुरु होती आणि तीच माझ्या पथ्यावर पडली. त्या घाटात सायकल चालविणारा मी एकटाच असल्याने अनेक जण माझ्याकडे कौतुकाने बघत होते. अर्धाअधिक घाट चढून गेल्यावर अचानक ७/८ कुत्र्यांनी मला घेरले आणि भो-भो करीत पाठी लागले. क्षणभर मला काही कळेच ना एक तर उभा चढ आणि त्यात या कुत्र्यांचा कहर. नशिबाने  सतत येजा करणाऱ्या वाहानांमुळे त्यांना अडथळा होत होता त्यामुळे ४-५ मिनिटात त्यांचा जोर ओसरला आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. अखंडित सायकल चालवून मी घाट माथा गाठला पोटात कावळे ओरडू लागले होते. नाक्यावरील हॉटेलमधे गरमागरम भाकरी आणि पोटभर चहा असा विशेष मेनू योजला आणि तृप्त झालो.  
पुढे ७-८ किलोमीटरचा आनंददायी उतार उतरून ३ च्या सुमारास वाई बसस्थानक गाठले. समोर स्वारगेट-पुणे फलक लागलेली एक बस माझी वाट पहात उभीच होती. चालकाशी बोलून लगबगीने एकट्यानेच सायकल बसच्या टपावर चढविण्याची कसरत करून बांधून टाकली. वाई गाठल्यावर मला एक मिनिटाचीही उसंत मिळाली नव्हती त्यामुळे गाडीत बसल्यावर एकामागोमाग एक असे दोन्ही पायात गोळे आले.
स्वारगेटला पुन्हा 'आपला हाथ जगन्नाथ' स्वतःच सायकल खाली काढली मात्र यावेळी चालकाने जमिनीवर उतरवून घेण्यास मदत केली. लगेच सायकलवर टांग मारून घर गाठले.
पावसाळी ढगाळ वातावरण, थंड हवा, गार वारा आणि हिरवाईने नटलेले डोंगर पण भिजवून शरीर आंबवणारा पाउस मात्र नाही म्हणजे फूल टू मज्जा ...


19 comments:

  1. खुपच सुंदर रामदास, गेल्या वर्षी केदार व निरंजन सोबत मांढरदेवी घाट मार्गे महाबलेश्वर केले होते. एकट्याने करणे खूपच आव्हानात्मक, मनापासून सलाम...
    रामराम

    ReplyDelete
  2. वा! फारच सुरेख! आता कोळथरे देवरुख चक्कर व्हायला हरकत नाही....

    ReplyDelete
  3. सुंदर लेखन डोळ्यासमोर चित्र उभे राहते

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद शिरीष, लिखाणाचा प्रयत्न सुरु आहे.

      Delete
  4. खूप छान
    तुझ्या सोबत सायकलिंग करायला खूप आवडेल त्यानिमित्त अनुभव प्रत्यक्ष ऐकता येतील.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सोमनाथ, मी लिहितो एव्हढंच, तुलाही विविध अनुभव येत असतीलच.

      Delete
  5. खूप छान,चला आता मोठ्या सोलो सफरी होऊ शकतील.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद,
      प्रयत्न करेन.

      Delete
  6. खूप छान ...
    पुढच्या पुस्तकाच्या वाटेवर = शुभेच्छा

    ReplyDelete
  7. Replies
    1. धन्यवाद,
      पहिलीच वेळ होती म्हणून कौतुक अघिक.

      Delete
  8. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  9. वर्णन करायची हातोटी खूप छान आहे. अगदी चित्र डोळ्यासमोर उभे राहते! एकट्याने सायकल चालविण्यात कुठला विशेष आनंद आहे? म्हणजे आपल्या मनात आले ते ताबडतोब प्रत्यक्षात करायचे स्वातंत्र्य मिळते तसेच आपल्या गतीनुसार पुढे जाता येत किंवा वाटले तर परत फिरता येत - हे फायदे तर नक्की समजतात. पण धोकेही खूप आहेत, नाही का?

    ReplyDelete
  10. धन्यवाद,
    एकल सायकलिंगमधे धोके आहेत हे नक्कीच पण तुम्हाला मिळणारे विचार-आचार स्वातंत्र्य यांचेशी तुलना केल्यास ते नगण्य ठरतील. मला स्वतःला समविचारी निवडक सोबाती सोबत असणे आवडते.

    ReplyDelete
  11. chalat rahaa firat rahaa aamhaalaa varnan sangat rahaa.anek shubhechha aani dhanyavad . neeraj

    ReplyDelete
  12. RamRam,
    Thank you very much Neeraj.

    ReplyDelete

चला वाचूया .....Let's start reading.

सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom

पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे  लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...