करोना, काही तरी करा ना !
दिवस मोजून थकलो, कित्येक महिने उलटले, दोन हजार वीस साल उलटून एकविस मधील पाच महिनेही सरले पण काळ, करोनाच्या 'साथीने' स्तब्ध उभा आहे. अनेकांना आर्थिक, मानसिक दृष्ट्या रक्तबंबाळ करून सोडणारा असा हा कालखंड !
कॉलेज जीवनापासूनच व्यायामाचे वेड थोडंफार का होईना होतंच, काळासोबत त्याचं महत्व आणि औचित्य प्रकर्षाने जाणवू लागले. शिवाय अनिल कपूर, मिलींद सोमण इ चिरतरूण व्यक्तींकडे पाहून जोश वाढतोच ! या ठाणबंध कालावधीत अनेकविध प्रकारचे व्यायाम, आहारावरील निर्बंध पाळून शरीर आणि मन आणखी सुदृढ करण्याचा कसोशीने प्रयत्न सूरू ठेवला आहे. याच काळात आणखी एका 'दिल के करिब' असणाऱ्या विषयाने उचल खाल्ली, तो विषय म्हणजे परसबागेत फळं, फुलं, भाजी लागवड.

माणूस आणि झाड !
मुळचा कोकणातील असल्याने शहरामधील चौरस फुटातील शेती / बाग (चौफूशे ) तशी लवकर पचनी पडणारी नव्हतीच. दोन हजार तेरा साली पुण्यात स्थायिक झाल्यापासून सहा सात वर्ष द्विधा मनःस्थितीमुळे वाया गेली. कोळथरेला रहात असताना गावातील कै. शरद दादा जोशी च्या आग्रहामुळे श्री निळू दामले यांचे 'माणूस आणि झाड' पुस्तक नुसतं चाळलं होतं. ज्यावेळी चौरस फूटातील शेती / बाग (चौफूशे) करण्याचे मनात आले तेव्हा तेच पुस्तक व्यवस्थित वाचले आणि मी प्रभावित झालो. शहरात ज्यांना चौफूशे करायची आहे त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे
चौफूशे
गच्चीत चौफूशे करून फळं, भाज्या, फुलं पिकवायची म्हणजे त्याची पूर्वतयारी अत्यावश्यकच. बागेला शक्यतो आपल्या आवरातील पालापाचोळा, काडी कचरा, घरातील ओला कचरा हेच वापरायचे असे ठरविले होते, थोडक्यात बिनामाती शेती ! आमच्या बंधूंचे मित्र श्री सुनिल भिडे, आमची एक मैत्रिण कीर्ती यांनी आपल्या गच्चीत फुलविलेले नंदनवन पहायला मिळाल्याने चांगली प्रेरणा मिळाली.

फुकट ते पौष्टिक !
पर्सनल गुगल पुन्हा कामी आले, मित्र शेखर फाटक कडून वाफ्याखाली घालण्यासाठी उत्तम दर्जाचे प्लास्टिक, मैत्रिण गौरी भावे हिच्या कडून आवश्यक असणारे मजबूत टिकावू ड्रम्स, सर्व चकट फू उपलब्ध झाले, फुकट ते पौष्टिकच ! सदाबहार मित्र विवेकच्या संपर्कातून हॉलो ब्लॉक्स आणले, सर्व साधनसामग्री गोळा झाल्यावर कार्यवाही सुरू केली. श्री दामलेंनी सूचविल्या प्रमाणे ड्रम्समधे उसाचे पाचड, पालापाचोळा आणि हरित द्रव्य कुजून तयार झालेला मसाला घालून ड्रम्स तयार केले.

गच्चीत उद्योग करणार हे कळल्यापासून बायकोने फुलझाडं लावण्याचा घोषा सुरु केला होता तिच्या समाधानासाठी झेंडू लावला ! मला खरतंर भाजी पिकविण्यातच स्वारस्य होते. काकडी, दुधी, खरबूज, भोपळा या वेलवर्गीय भाज्या, दोन प्रकारचे अळूं, पालक, टोमॅटो, पुदिना, गवती चहा असे इतर प्रकार लावून श्रीगणेशा केला आहे.

भाजी पिकवून थांबता येत नाही त्याचं काहीतरी व्यंजनही बनवावं लागते. गृहलक्ष्मीने दुधीहलवा, पाणीपुरी, अळूवडी आणि इतर काहीबाही बनविलं, आज आस्मादिकांनी पालकाची कोशिंबीर बनवून स्वतःच ताव मारला. आता ध्यास लागलाय भोपळ्याच्या गरमागरम घारग्यांचा !

माझ्यावर देवाची कृपा सतत राहिली आहे त्यामुळे चौफूशे मधेही यश येईल याची खात्री वाटते.
विशेष उल्लेखनीय : प्रत्यक्ष कामाला सुरवात केल्यावर आनंदराव पाळंदे यांनी त्यांच्या गच्चीतील झाडोरा दाखवून उपयुक्त सूचना केल्या. या विषयावर एक ब्लॉग लिहिण्याची सूचना वजा आदेश श्री अतुल सुळे यांनी दिला.






ब्लॉग वाचला... थोडक्यात आणि छान लिहला आहे...तुझ्या चिकाटी ला सलाम... पण मला एक प्रश्न पडला एवढ छान कोकण सोडून पुण्यात का स्थायिक झाला ?... मी मधे माझ्या मुलाला म्हणालो पुण्यातून आता कोठेतरी शांत कोकणात जावं... त्याने सरळ नाही सांगितले...
ReplyDeleteत्रिजयंत केसकर
रामराम,
Deleteधन्यवाद !
उपस्थित केलेला मुद्दा सुसंगत आहे, पण कोळथरेमधे वास्तव्यास राहिलो असतो तर आपल्या सारख्यांच्या स्नेहास मुकलो असतो.
सुरेख! अखेर मुहूर्त सापडला म्हणायचा ! फारच छान !
ReplyDeleteशेखर फाटक
रामराम,
Deleteधन्यवाद !
मुहूर्त सापडून बरेच दिवस झालेत, शब्दबध्द अत्ता केले.
स्तुत्य उपक्रम आहे.
ReplyDeleteओघवती शैली, अतिशय सुंदर छायाचित्रे आणि निसर्ग निर्मिती छानच !
कोहळा, भोपळा अप्रतिम !
अभिनंदन��
अतुल सुळे
रामराम,
Deleteधन्यवाद, आपल्या प्रेरणेमुळेच लिखाण केले आहे.
रामदास महाजन एक अवलिया बनले हे चौफुशे वरून कळते कल्पना तशी जुनी, पण टीवी, मोबाईल सारखी रुचलेली नाही, तसेच रुजवली नाही तर, गच्चीवर बाग फोफावणार कशी ! कारण , माणसाला सजीव सृष्टी पेक्षा निर्जीव सृष्टीत अधिक रस असतो. जिव्हाळ्याच्या लग्न विषयातही नवरा, बायकोच्या जीवन अपेक्षा बाजुलाच, भाव खातो बस्ता.
ReplyDeleteपण, रामदासांनी गच्चीवरील बाग मनात रूजविली आणि नंतर प्रत्यक्षात आणली की. फोटो मुळे सजलेली दिसत आहेच. महाजनांचा पथ अनेकांनी अनुसरावा. मी दरवर्षी 'हिवाळा आला' अशी घंटा वाजवतो पण पालापाचोळा रस्त्यावरच.
आनंद पाळंदे
राम,
ReplyDeleteतुम्ही आणि नवा उपक्रम, हे आता समीकरणचं झाले आहे ! "चौफूशे" उपक्रम अतिशय उत्तम! नवे प्रयोग करण्याचा स्वभाव आणि तो प्रयोग यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहणे, ही वृत्ती वृद्धिंगत होवो!
कोकणातील माणूस निसर्गाच्या कुशीतच सुखावणार ! हा वसा आमच्यासारख्यांना दिलात तर आभारी राहू ! तुमची बाग बहरत राहो ! खूप खूप शुभेच्छा !!
लिखाण नेहमीप्रमाणे उत्तम ! आपल्या स्वभावानुसार मुद्देसूद ! शिक्षण घेण्यासाठी उत्सुक आहे, मी !
वेळोवेळी आपले उपक्रम माझ्यापर्यंत पोहोचोवता, यासाठी अनेक धन्यवाद !
स्नेहल साठे