Saturday, 22 May 2021

करोना : चौफूशे : Terrace Garden

      करोना,  काही तरी करा ना !



         दिवस मोजून थकलो, कित्येक महिने उलटले, दोन हजार वीस साल उलटून एकविस मधील पाच महिनेही सरले पण काळ, करोनाच्या  'साथीने'  स्तब्ध उभा आहे. अनेकांना आर्थिक, मानसिक दृष्ट्या रक्तबंबाळ करून सोडणारा  असा हा कालखंड !

कॉलेज जीवनापासूनच व्यायामाचे वेड थोडंफार का होईना होतंच, काळासोबत त्याचं महत्व आणि औचित्य प्रकर्षाने जाणवू लागले. शिवाय  अनिल कपूर, मिलींद सोमण इ चिरतरूण व्यक्तींकडे पाहून जोश वाढतोच !  या ठाणबंध कालावधीत अनेकविध प्रकारचे व्यायाम, आहारावरील निर्बंध पाळून शरीर आणि मन आणखी सुदृढ करण्याचा कसोशीने प्रयत्न सूरू ठेवला आहे.  याच काळात आणखी एका 'दिल के करिब' असणाऱ्या विषयाने उचल खाल्ली, तो विषय म्हणजे परसबागेत फळं, फुलं, भाजी लागवड.
                                       

       माणूस आणि झाड !

मुळचा कोकणातील असल्याने शहरामधील चौरस फुटातील शेती / बाग  (चौफूशे ) तशी लवकर पचनी पडणारी नव्हतीच. दोन हजार तेरा साली पुण्यात स्थायिक झाल्यापासून सहा सात वर्ष द्विधा मनःस्थितीमुळे वाया गेली. कोळथरेला रहात असताना गावातील कै. शरद दादा जोशी च्या आग्रहामुळे श्री निळू दामले यांचे 'माणूस आणि झाड'  पुस्तक नुसतं चाळलं होतं. ज्यावेळी चौरस फूटातील शेती / बाग (चौफूशे)  करण्याचे मनात आले तेव्हा तेच पुस्तक व्यवस्थित वाचले आणि मी प्रभावित झालो.  शहरात ज्यांना चौफूशे करायची आहे त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे

         चौफूशे

         गच्चीत  चौफूशे करून फळं, भाज्या, फुलं पिकवायची म्हणजे त्याची पूर्वतयारी अत्यावश्यकच. बागेला शक्यतो आपल्या आवरातील पालापाचोळा, काडी कचरा, घरातील ओला कचरा हेच वापरायचे असे ठरविले होते,  थोडक्यात बिनामाती शेती ! आमच्या बंधूंचे मित्र श्री सुनिल भिडे, आमची एक मैत्रिण कीर्ती यांनी आपल्या गच्चीत फुलविलेले नंदनवन पहायला मिळाल्याने चांगली प्रेरणा मिळाली.

                                               

      फुकट ते पौष्टिक !

पर्सनल गुगल पुन्हा कामी आले,  मित्र शेखर फाटक कडून वाफ्याखाली घालण्यासाठी  उत्तम दर्जाचे प्लास्टिक, मैत्रिण गौरी भावे हिच्या कडून आवश्यक असणारे मजबूत टिकावू ड्रम्स,  सर्व चकट फू उपलब्ध झाले,  फुकट ते पौष्टिकच !  सदाबहार मित्र विवेकच्या संपर्कातून हॉलो ब्लॉक्स आणले, सर्व साधनसामग्री गोळा झाल्यावर कार्यवाही सुरू केली.  श्री दामलेंनी सूचविल्या प्रमाणे ड्रम्समधे उसाचे पाचड, पालापाचोळा आणि हरित द्रव्य  कुजून तयार झालेला मसाला घालून ड्रम्स तयार केले.

                                              

गच्चीत उद्योग करणार हे कळल्यापासून बायकोने फुलझाडं लावण्याचा घोषा सुरु केला होता तिच्या समाधानासाठी झेंडू लावला ! मला खरतंर भाजी पिकविण्यातच स्वारस्य होते. काकडी, दुधी, खरबूज, भोपळा या वेलवर्गीय भाज्या, दोन प्रकारचे अळूं, पालक, टोमॅटो, पुदिना, गवती चहा असे इतर प्रकार लावून श्रीगणेशा केला आहे.

                                                         
भाजी पिकवून थांबता येत नाही त्याचं काहीतरी व्यंजनही बनवावं लागते. गृहलक्ष्मीने दुधीहलवा, पाणीपुरी, अळूवडी आणि इतर काहीबाही बनविलं,  आज आस्मादिकांनी पालकाची कोशिंबीर बनवून स्वतःच ताव मारला. आता ध्यास लागलाय भोपळ्याच्या गरमागरम घारग्यांचा ! 
                                                         
माझ्यावर  देवाची कृपा सतत राहिली आहे त्यामुळे चौफूशे मधेही यश येईल याची खात्री वाटते.

विशेष उल्लेखनीय : प्रत्यक्ष कामाला सुरवात केल्यावर आनंदराव पाळंदे यांनी त्यांच्या गच्चीतील झाडोरा दाखवून उपयुक्त सूचना केल्या. या विषयावर एक ब्लॉग लिहिण्याची सूचना वजा आदेश श्री अतुल सुळे यांनी दिला.

दोघांचे आभार !
                                                 






चला वाचूया .....Let's start reading.

सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom

पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे  लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...