Wednesday, 8 April 2020




विठ्ठला, कोणती मी सायकल घेवू हाती  ?

दोन हजार पाच  साली मी पहिली उच्चतंत्रज्ञान असलेली महागडी सायकल खरेदी केली. त्यावेळी मी कोळथरे, दापोली येथे रहात असे त्यामुळे श्री समिंदर सिंग यांचे सल्यानुसार Trek 36OO  ही सायकल मी पुण्यात येवून खरेदी केली. त्यावेळी अशा उच्चदर्जाच्या सायकल्स पुण्यात मोजक्या ३-४ ठिकाणीच उपलब्ध होत्या.गेल्या पाच  सहा वर्षात  अशा सायकलचे लोण बऱ्यापैकी पसरले आहे पुण्यात तर जणु वणवाच पेटला आहे, एका अर्थाने हे सुचिन्हच !  बरेच वेळा लहरीच्या हिंदोळ्यावर आरूढ होउन भावनेच्या भरात सायकल खरेदी केली जाते परिणामी तिचा उपयोग पार्किंगची शोभा वाढविणे एव्हढाच मर्यादित रहातो. सायकल खरेदीचा निर्णय पूर्ण विचारांती घ्यावा असे म्हणावेसे वाटते.

गुरु आज्ञा
आम्ही ज्यांचे स्वयंघोषित शिष्य आहोत ते गुरुवर्य श्री आनंद पाळंदे यांच्या सूचने नुसार हे लिखाण करत आहे. ढोबळमनाने आपण सायकलचे तीन प्रकारात वर्गीकरण करू शकतो

MTB            - जाड रुंद टायर्स
२ हायब्रिड     - मध्यम जाड टायर्स (दैनंदिन वापरास योग्य)
३ रोड बाईक   - पातळ अरुंद टायर्स

खोलात शिरून याचे अनेक प्रकार उपप्रकार  सांगता येतील पण ते अत्ता समयोचित नाही. सर्वसामान्य सायकलवीरांना हे वर्गीकरण पुरेसं आहे.
MTB  -  नावाप्रमाणे मौंटन टेरेन बाईक, ही सतत कच्चा, दगडधोंडयांचा रस्ता अथवा डोंगर वाटांवर     चालविण्यासाठी बनविलेली असते. वजनाला जड अति मजबुत बांधणी.
हायब्रिड -  हिला मध्यम आकाराचे टायर्स असतात, चांगल्या रस्त्यांवर आणि हौशी कलाकारांसाठी     थोड्याफार कच्चा रस्त्यांसाठी देखील वापरता येते.
रोड बाईक -   खास करून स्पीडने लांबपल्याच्या सायकलिंगसाठी उपयुक्त. टायर्स अरूंद, वजनाला   हलकी अशी बांधणी.
मी स्वतः MTB  सायकल वापरतो पण शहरी, निमशहरी अगदी गावखेड्यांमधे सुध्दा हायब्रिड सायकल उत्तम. अगदी कायमच डोंगर रस्त्यावर चालवायची असेल तर MTB सायकल निवडावी. रोड बाईक फक्त स्पर्धात्मक सायकलवीरांनी घ्यावी असे माझे स्पष्ट मत आहे.

साईज
सायकलचा प्रकार निवडणे जितके महत्वाचे तितकेच किंबहुना त्याहूनही अधिक महत्वाचे आहे साईज, अर्थात सायकलचा फ्रेमसाईज. सर्वसामान्य निकष असा, सायकलची सीट आणि हँडल यांचेमधे सायकलच्या दोन्ही बाजुस पाय टाकून उभे रहावे, सायकलची मधली दांडी आणि आपली जांघ अर्थात दोन्ही मांङ्यांचा सांधा यामधे आपली दोन बोटे आरामात शिरतील एव्हढं अंतर राहील असे पहावे. हा सायकलफ्रेम  साईझ योग्य असे समजावे.
आपल्याला विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध असल्यास जरूर घ्यावे.

राईड लाईट
 माझे सायकलिंग मधील पहिले गुरूज्यांचा मी सुरवातीला उल्लेख केलाच आहे ते श्री समिंदर सिंग यांनी मला एक कानमंत्र दिला आहे 'Always ride light on Bike'.या वाक्याचा अर्थ Travel-Light  असा घेतला जातो. पण खरे तर  याचा अर्थ असा आहे, सायकलचा गियररेशो असा ठेवा ज्याने तुमचे पाय, पेडल, पेडल अेक्सल, चेन, चेन व्हील्स, गियर असेंब्ली या कशावरच जादाचा ताण येणार नाही. बरेच जणांचा असा समज असतो की हायर गियर अर्थात जास्त जोर लागणारा गियर वापरल्यास सायकल चालवताना जास्त व्यायाम होईल. हे अत्यंत चुकीचे आहे यामुळे व्यायाम अधिक होईल अथवा नाही हे माहिती नाही परंतु शरीर आणि सायकल यांची झीज व हानी दोन्ही अधिक होईल.
लाईट राईड करण्यासाठी, पेडलच्या ठिकाणी असणाऱ्या तिन व्हील्स पैकी मधल्या व्हीलवर चेन येईल आणि मागील चाकाजवळील सात व्हील असतील तर दुसरं किंवा तिसरं छोटे व्हील आणि नउ किंवा दहा व्हील्स असतील तर तिसरं किंवा चवथे छोटे व्हीलवर चेन येईल अशा रीतीने गियररेशो ठेवावा. गेली सहा-सात वर्ष दैनंदिन कामाकरिता वहातुकीचे साधन म्हणून पुणे शहरात मी सायकलनेच फिरतो. एक दोन अपवाद वगळता मला कोठेही हा गियररेशो बदलावा लागत नाही. उगाच चाळा लागल्या सारखा गियर बदलणे अपेक्षित नाही. गियर शिफ्टिंग यंत्रणा सुरळीत रहावी यासाठी अधुनमधुन मागचे आणि पुढचे गियर शिफ्ट करून जरूर पहावेत.

सीटच्या उंची बाबत पुन्हा कधीतरी
, वरील माहितीच्या आधारे दैनंदिन वापरासाठी मनसोक्त सायकलचा वापर करा आणि तंदुरुस्त रहा.
सायकल चालवा
निसर्ग वाचवा
आरोग्य मिळवा !

अस्वीकृती
: मी सायकलतज्ज्ञ नाही, गेली सहा-सात वर्ष पुण्यामधे अनेक दिग्गज आणि तज्ज्ञ सायकलप्रेमीं सोबतच्या विचारांच्या देवाणघेवाणीतून हे विचार मांडले आहेत.



4 comments:

  1. गोळा केलेली माहिती न देता अनुभवाने मिळवलेले ज्ञान लोकांसमोर मांडले आहे. भरपूर फीरा आणि ते ही प्रवास वर्णन साद्यंत लिहा.

    डॉ नीरज देशमुख, तळा, माणगाव

    ReplyDelete
  2. व्वा, रामदास. सुंदर सुटसुटीत सोप्या शब्दात पण सायकल ह्या यंत्रासंबंधी महत्वाची माहिती, ती कशी चालवावी म्हणजे जास्त कष्ट होणार नाहीत पण योग्य व्यायाम होईल अश्या मुद्द्यांवर उद्बोधक मिमांसा केली आहेस. ह्यापुढे ते वाहन वापरताना लक्षात ठेवीन. धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. रामराम,
      मनापासून धन्यवाद !
      प्रतिक्रिया देण्यास खूप उशीर केला, क्षमस्व.

      Delete

चला वाचूया .....Let's start reading.

सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom

पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे  लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...