काका केलटा आला !
आमच्या प्राणी प्रेमाची महती गावात पसरली होतीच शिवाय आमचे मोठे बंधू (दीपक आणि माधव) सामाजिक कामात सहभागी होत असल्याने तालुक्यातही ती पसरली होती.
मी एकदा कामानिमित्त मुंबईला गेलो असताना अनोळखी माणसाचा फोन आला. मी अमुकतमुक दापोलीहुन बोलतोय आमच्या अंगणात एक हुप्प्याचे (वानराचे) अतिशय लहान पिल्लू दिसतंय मी काय करू ? पिल्लू खूपच लहान आहे. बोलण्यावरून पिल्लू काही दिवसांचे असेल हेही कळले. मुंबईत असल्याने मला मर्यादा होत्या म्हणून त्याला दुध पाजण्याच्या सूचना दिल्या आणि मी ३-४ दिवसांनी येणार आहे तेव्हा पाहू असेही सांगितले. मी घरी पोहोचण्यापूर्वीच पिल्लू कोलथरेला आमच्या संगोपनालायात भरती झाले होते. पुठ्याच्या खोक्यात कापडाची छोटी मउ गादी बनवून त्यात त्यांनी पिल्लू ठेवले होते.
पूर्वीचे अनुभव जमेस धरून आम्ही एक बारीक जाळीचा १फुट x१फुट रुंदी आणि साधारण तीन साडेतीन फुट लांब असा मजबूत पिंजरा बनविला होता. रात्री फिरणारी उनाड कुत्री, मांजर या पासून संरक्षण व्हावे हा हेतू. तरीही रात्री पिंजरा उंचावर टांगून ठेवेत असू. नवीन पाहुणा हजर झाला की त्याचे बारसे लगेच केले जायचे. सर्वानुमते आम्ही त्याचे नाव 'राहुल' ठेवले. छोट्या बाळाच्या दुधाच्या बाटलीने दुध पाजून राहुलला सांभाळणे आमच्या साठी एव्हढे आव्हानात्मक नव्हते. मुली, पुतण्या, आमचे कर्मचारी हिरीरीने हे काम करत असत. बघता बघता तो मोठा होऊ लागला. पिंजऱ्या बाहेर काढल्यावर टूण- टूण उड्या मारत फिरत असे. त्याच्या जीवाच्या मानाने शेपूट फारच लांब होते. शेपूट हवेत उलट्या 'J' सारखे उभे करून तो उड्या मारी तो नजारा बघण्यासारखा असे.

माझ्या सौ ना आमच्या अशा सगळ्या उद्योगांचा तिटकारा असे पण राहुलला मात्र थेट घरात प्रवेश होता. राहुलला घरात सोडल्यावर तो सोफा, डायनिंग टेबल आणि खुर्च्या यांवर यथेच्च उड्या मारत असे आणि बायको चक्क कौतुकाने त्याचे चाळे पहात असे. माझ्या मुली राहुलचे खूप लाड करत. त्यावरून त्यांच्यात चढाओढ चाले. अगदी सुरवातीला तर बाटलीने दुध पिता-पिता राहुल मुलींचे बोट घट्ट पकडून मांडीत झोपायचा. मग राजूची डुलकी पूर्ण होई पर्यंत आपला पुतळा. त्याच्या नाजूक तळहातांचा मउ मुलायम स्पर्श ही एक अनुभवण्याचीच गोष्ट आहे. मुलींची एक तक्रार कायम असे 'बाबा आम्ही त्याचे एव्हढे लाड करतो पण तुम्ही दिसलात की तो तुमच्याच मागे येतो'. मलाही याचे कोडे कधी उलगडले नाही. हे फक्त राहुलच्याच बाबतीत होते असे नाही तर राजू, जिमी, लालू, जॉर्ज, मनुक चिंटू, सर्वच प्राणीमात्राबाबत हे घडे.

( PC: Shailendra Datar)
राहुलच्या मर्कटलीला अनावर होऊ लागल्यावर आम्ही त्याला रानात सोडले. त्याचे लाड थांबले असले तरी मुक्त जीवनाचा आनंद आता तो घेऊ शकणार होता.
या वानर प्रजाती बाबत एक विशेष गोष्ट अशी जाणवली आम्ही ज्याला हुप्प्या किंवा वानर म्हणतो तो पाण्याला घाबरतो, मात्र केलटं अजिबात घाबरत नाही.
काही वर्षांपूर्वी आमचेकडे पाहुणा म्हणून असेच एक केलटं (राजू) आलं होत. दोन एक वर्ष आम्ही त्याला सांभाळले. पावसाळ्यात भरणारे एक छोटे तळे (मढी) आमच्या गावात आहे. पोहताना कधी-कधी माझ्यासोबत मी राजूला घेऊन जात असे राजू त्या तळ्यात यथेच्च डुबक्या मारत असे.
राजू खूप हुशार आणि चालाख होता. काही खायला हवे असले किंवा लाड करून घ्यायचे असले तर खिडकी मधून सौ गौरीला दिसेल अशा बेतानं विशिष्ट आवाज आणि हातवारे करत असे. समोर आलेली व्यक्ती घाबरली आहे अथवा नाही हे तो आलेल्या व्यक्तीच्या नजरेवरून ओळखत असे. समोरचा घाबरला आहे हे कळल की तो आक्रमक होत असे. आमचे गाव समुद्रकिनारी असल्याने पर्यटकांचा सतत राबता असतो. गावात आल्यावर 'आगोम' ला भेट ठरलेली असे. आमच्या कडील पशु-पक्षी हे पर्यटकांकरिता एक आकर्षणाचा विषय असे. चेहऱ्यावर विविध हावभाव, हातवारे, उलट-सुलट माकड उड्या मारून राजू त्यांचे मनोरंजन करी आणि स्वतः राजूही आलेल्या पर्यटकांसोबत मर्कटलीला करून मजा लुटत असे.
एकदा एक पर्यटक (विदेशी ) मुलगी हातात मोदक घेऊन राजूच्या जवळ गेली. कोकणात मोदक म्हणजे उकडीचाच; जसें कन्याशाळा म्हटले की ती मुलींचीच तसें असो. राजूने लगेच झडप घातली दोघांची झटापट झाली आणि मुलीला किरकोळ जखम झाली. घरचीच औषधे असल्याने आम्ही त्वरित उपचार केले. आम्ही राजूला रानात सोडण्याचा निर्णय घेतला. एक दिवस त्याला ४-५ किमी लांब अंतरावर सोडून मी घरी आलो. थोड्या वेळाने गावातील एक मुलगा घरी ओरडत आला 'काका केलटा रस्त्याने परत येतोय'. राजूला उनाड कुत्री मारतील या धास्तीने मी जाऊन त्याला घेऊन आलो. नंतर परत एकदा लांब खाडी पलीकडे त्याला सोडून राजू प्रकरणावर कायमचा पडदा टाकला.

रंजक, नेहमीप्रमाणे जुन्या आठवणी ताज्या....
ReplyDeleteमस्त !
ReplyDeleteमस्तच लिखाण
ReplyDeleteVery entertaining episodes!
ReplyDeleteफारच छान! असेच लिहीत रहा.
ReplyDelete