गुंतवणूक गुरु वॉरेन बफे ३० ऑगस्ट रोजी ९५ वर्ष पूर्ण करत आहेत . जगातील एक अग्रगण्य श्रीमंत व्यक्ती म्हणून आपण सर्व जण त्यांना ओळखतो . त्यांची मालमता १४५ बिलियन डॉलर्स इतकी असल्याचे मानले जाते . हे जरी खरं असलं तरी या ओमाहाच्याअसामान्य संताची खरी ओळख ते जगत आलेल्या सामान्य आयुष्यात दडली आहे . आपल्या आयुष्याची सुरुवात अतिशय सर्वसामान्य परिस्थितीतून करून जे अब्जाधीश होतात ते बरेच वेळा आपली मूळ वृत्ती प्रकृती विसरून विलासी जीवन जगताना दिसतात . त्यासाठी अमर्याद खर्च करण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत किंबहूना ही नवीन सवय जीवनाचा अविभाज्य भाग बनून जाते . इथेच बफेंचे वेगळेपण उठून दिसते , बफेंनी आजही आपली मध्यमवर्गीय मुल्य सोडलेली नाहीत उलट अधिक घट्टपणे धरली आहेत . हे असं जगणं त्यांनी सहजतेने अंगीकारले आहे त्याचा गवगवा करण्याच्या भानगडीत ते कधीच पडले नाहीत . त्यांचं म्हणणं असं आहे की संपत्ती निर्माण करताना आपली जीवनमुल्य सोडावी लागत नाहीत . बफेंनी आपल्या आयुष्यात अशी कोणती मध्यमवर्गीय जीवनमुल्यं सातत्याने पाळली असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे .
प्रमुख जीवनमुल्यांचा उल्लेख करावा लागेल ,
१ वर्षानुवर्षे त्याच घरात रहाणे
बफेंचे घर हे त्यांच्या साध्या रहाणीमानाचे उत्तम द्योतक आहे १९५६ साली खरेदी केलेल्या एका मध्यम आकाराच्या घरात ते आजही राहतात . आज त्या घराची किंमत अनेक पटींनी वाढली आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही , ती ही एक बऱ्यापैकी गुंतवणुकच !
सामान्यपणे आर्थिकस्तर जसा वाढत जाईल तसतसे रहाण्याचे ठिकाण आणि पर्यायाने शेजारपाजार बदलत जातात , बफे गेली अनेक दशके त्याच भागात राहत आहेत . घर बदल्याचे मुख्य कारण असते प्रतिष्ठा आणि प्रतिमा ! बफेंनी आपल्या कृतीतून यातील फोलपणा जगाला दाखवून दिला .
२ खाण्यापिण्याच्या साध्या सवयी
जगभरातील कोणत्याही प्रकारचे महागडे अन्नपदार्थ मोठ्यात मोठ्या नामांकित हॉटेल मधून मागवून खाणे त्यांना सहज शक्य आहे . त्या ऐवजी मॅकडोनाल्ड सारख्या रोडसाईड हॉटेल मधील अत्यंत साधा ब्रेकफास्ट ते पसंद करतात . आहारावर होणाऱ्या खर्चावर सुद्धा त्यांनी स्वतःला निर्बंध घालुन घेतलेले आहेत जे मार्केटच्या चढ उतारावंर आधारित आहेत ही गोष्ट देखील अचंबित करणारी आहे . त्यांचं म्हणणं जेवणातील समाधान आणि तुम्ही खर्च केलेली रक्कम याचा परस्पर संबंध नाही. ते म्हणतात परवडणारे रूचकर जेवण घेणे हे बंधन नसून शहाणपण आहे, वाचलेले पैसे तुम्ही अन्य चांगल्या पद्धतीने गुंतवू शकता .
३ गाडीची उपयुक्तता
बफेंचा गाडी या विषयाकडे पहाण्याचा दृष्टीकोन त्यांचे व्यक्तिमत्व दाखवून देते . गाडी असो वा घर बफेंनी दोन्ही गोष्टींना कधीच प्रतिष्ठेचे प्रतिक मानले नाही . वापरलेली , अपघातग्रस्त लिलावात निघालेली पण उत्तमदर्जाची गाडी अल्प किमतीत खरेदी करून उरलेली वरकड रक्कम लगेच चांगल्या ठिकाणी गुंतविण्याची त्यांची सवय भल्याभल्यांना अंगिकारता आलेली नाही . उगाच विनाकारण गाडी फिरविण्याचा शौकही त्यांनी कधी केला नाही किंवा बाजारात अधिक देखणी सोयी सुविधानी युक्त नवीन गाडी आली म्हणून विकत घेतली नाही . त्यांची मुलगी म्हणते आम्ही , ही गाडी वापरणे आता अडचणीचे वाटते असा तगादा जोवर लावत नाही तो पर्यंत गाडी बदलली जातच नाही . नवनवीन गाडयांसाठी कर्ज काढून त्याचे हप्ते फेडत बसणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या डोळ्यात हे अंजन आहे .
४ कूपन्स आणि सेलचा शोध
श्रीमंती आल्यावर मी जर कूपन्स वापरू लागलो तर लोक काय म्हणतील हा विचार त्यांना कधी शिवलाच नाही . बिल गेट्स त्यांच्या सोबत हाँगकाँग मधे घडलेला किस्सा सांगतात . बफें सोबत मॅकडोनाल्ड मधे खाणं झाल्यावर बिल देताना बफेंनी खिशातून कुपन्स काढून पैसे वाचवले ! आणि गेट्सना चार शब्द सुनावले . काटकसरीचा खरा अर्थ तुम्ही किती रक्कम वाचवली हा नसून खर्च करताना स्वतःला शिस्त लावणे हा आहे हेच यातून स्पष्ट होते . थोडक्यात तुम्ही श्रीमंत झालात म्हणून हवा तसा पैसा उडवणे योग्य नाही याची जाणीव सतत ठेवली पाहिजे .
५ मनःपूत मनोरंजन
वफेंचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा जीवन तत्वज्ञान आपण समजून घेतले पाहिजे . साध्या , सोप्या परवडणाऱ्या गोष्टींमधे आनंद आणि समाधान शोधण्याची सहज वृत्ती त्यांना महान बनवते . मनोरंजनासाठी जोपासले जाणारे छंदही साधे आणि परवडणारे असावेत असे ते म्हणतात आणि तसंच वागतात . एखाद्या छंदावर अथवा मनोरंजनावर तुम्ही किती रक्कम खर्च करता हे महत्वाचे नसून त्यातून तुम्हाला आनंद किती मिळतो हे अत्यंत महत्वाचे आहे . त्यांचं तर असं म्हणणं असं आहे की मी जे काम करतो ते मला इतकं प्रिय आहे की वेगळ्या विरंगुळ्याची गरजच मला भासत नाही .
इथेही मिथ्या प्रतिष्ठेच्या मागे लागून अनाठायी खर्च करू नका ते पैसे वाचवा आणि योग्यरीतीने गुंतवा असे ते सांगतात
६ क्रेडिट कार्डचे मायाजाल
बफेंचं म्हणणं असं आहे क्रेडिट कार्ड चं भूत आणि अर्थात त्यावर भरलं जाणारं व्याज एकदा तुमच्या डोक्यावर बसलं की ते उतरवणे शक्य नाही . बर्फाचा गोळा बर्फावरून घरंगळत गेल्यावर जसा त्याचा आकार वाढतच जातो तसाच कर्जाचा डोंगरही वाढत जातो . बफे सर्व तरुण पिढीला आवाहन करतात की क्रेडिट कार्ड चा वापर ही सवय बनवू नका अत्यावश्यक असेल तेव्हाच त्याचा वापर करा .
७ जुगार आणि लॉटरी
बफेंनी लॉटरी ला एक सुंदर शब्द वापरला आहे ते लॉटरीला मॅथटॅक्स म्हणतात . त्यांचं म्हणणं गणित कच्चं आणि तर्कशुन्य विचार असणारी मंडळी लॉटरी अथवा जुगाराच्या आहारी जातात . ते म्हणतात जीवनातील श्रम , सातत्य आणि आर्थिकशिस्त ही अत्यंत महत्त्वाची जीवनमुल्य विसरून आभासी लाभाकडे मन आकृष्ट झाले की माणूस या मधे अडकतो . माणसाला आंधळी आशा असते कधीतरी मला घबाड - जॅकपॉट लागेल आणि मी श्रीमंत होईन पण तसं कधीच घडत नाही . श्रीमंत होण्यासाठी आर्थिकशिस्त, निरंतरप्रयत्न आणि सातत्य अत्यावश्यक आहे . म्हणून ते म्हणतात जिथे फळ मिळण्याची शक्यता अत्यल्प आहे अशी गोष्ट करूच नका
८ गुंतवणूकभान
ज्याच्या जोरावर बफेंनी मोजदाद करता येणार नाही इतकी संपत्ती निर्माण केली ते म्हणजे गुंतवणूकभान !
याबातीत त्यांचा सर्वाधिक लोकप्रिय विचार म्हणजे
यशस्वी गुंतवणूकीचे नियम दोनच
१ कधीही पैसे गमावू नका
२ कधीही पहिला नियम विसरु नका
त्यांचा प्रत्येक विचार यशस्वी गुंतवणुकीची किल्ली आहे पण वरील एक विचार अंमलात आणला तरी पुरेसा आहे .
ते नेहमी सांगतात गुंतवणूक ही साधी सोपी असली पाहिजे. मुळात आपण कंपनीचा शेअर खरेदी करतो म्हणजे त्या कंपनीत आपण भागीदार होत असतो हे समजून घ्या . म्हणून जो व्यवसाय आपल्याला समजत नाही त्यात गुंतवणूक करू नका . त्यांचं म्हणणं धोका त्याच वेळी आहे ज्यावेळी आपण न कळणाऱ्या गोष्टीत वावड्यांवर विश्वास ठेवून पैसा गुंतवतो . झटपट श्रीमंत अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही , ते परत परत सांगतात फक्त आर्थिकशिस्त , सातत्य आणि आपल्या निर्णयावर दृढविश्वास ही जीवनमुल्यच संपत्ती निर्माण करू शकतात .
वरील सर्व विवेचनावरून ३ गोष्टी ठळकपणे समोर येतात
१ स्वतःच्या गरजा ओळखा , छानछोकी मधे गुंतू नका
२ ज्या गोष्टी तुम्हाला कळत नाहीत त्यात पैसे गुंतवू नका
३ प्रथम बचत मग खर्च हा नियम पाळा
गुंतवणूक गुरु किंबहूना आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींसाठी देवासमान असणाऱ्या वॉरेन बफे यांना विनम्र प्रणाम
जीवेत शरद: शतम् |
डॉ रामदास श्रीकृष्ण महाजन ,
मुळ गाव कोळथरे , आगोम या कौटुंबिक व्यवसायात कार्यरत
सध्या वास्तव्य पुणे , पुणे शहरात वहातुकीचे साधन म्हणून सायकलचा वापर . रामराम मंडळी नावाची श्राव्यसंवाद मालिका चालवितात .
९४२२५३५७३३
ramdas_mahajan@rediffmail.com
सकाळ मनी ऑगस्ट २०२५
वाहवा!
डॉ रामदास महाजन यांनाही लेखक बनवले. छान.
कोकणातील पिढीजात औषध उद्योजक असून पुण्यात कायम हाफ पॅन्टीत सायकलवरून फिरून उद्योग सांभाळणे. आनंद शोध घेणारे भटके यांना पाॅडकास्टच्या माध्यमातून प्रसिद्ध करणारे असे हे रामदास . संपन्नता असूनही शांत संयमित जीवन आवडणारे यांनी वाॅरन बफेंवर लेख लिहिणे ही उचित गोष्ट
आनंद पाळंदे