'कॅली'ची सावकाश, हळू आणि खरी भटकंती
आनंद पाळंदे (सौर माघ शके १९४५ फेब्रुवारी २०२४ )

कॅली म्हणजे आपले कॅलिफोर्निया. आपले म्हणजे आपलेच, कारण तिथे तमाम मराठी बांधव भगिनी एकवटला आहे. इथे कोकणचे कॅली बनवू ही घोषणा केव्हाच विरुन गेली आहे. पण आहे तसे कोकणच चांगले आहे की ! कशाला ते तसे करावे. हे पटेल, पण शीर्षक दिले आहे तसे बघितले तर!

अशाच भटकंतीचा पुढे 'आनंद म्हणे--
सफर सुरु केली टाटांच्या 'लहानुतून (नॅनो) आणि शेवटही. सुकाणू हाती होते, आगोम औषधालयाचे संचालक आणि 'रामराम मंडळी ' म्हणत थोर-लहान अतरंगी व्यक्तींचे मनोगत सादर करणारे श्री. रामदास महाजन यांच्या हाती. लहानुमुळे ओझोनला खड्डा पडणार होता याचे परिमार्जन म्हणून काही पायपीट तर काही लाल परीचा प्रवास करावा असे ठरले. पायपीट करण्यासाठी छोटा डोंगर शोधून काढला . कोकणातील खेड्यातील घरात काही मुक्काम आणि भुकेची व्यवस्था होणार याची खात्री करुन बाहेर पडलो आणि डोंगर वने, पाणीवठे या निसर्गनवलांसोबत ३-४ अतरंगी माणसेही अनपेक्षित भेटली. असे हे पुढील आनंद म्हणे !
ताम्हिनी घाटात डोंगरवाडीनंतर देवकुंड दरीशी न थांबता थेट हॉटेल शैलेशला कांदा पोहेची न्याहारी केली. सुट्टीनिमित्त घाटातून सुसाट धावणाऱ्या गाड्यांची सकाळ अजून झाली नव्हती त्यामुळे शांत स्वच्छ हवेत माणगाव गाठले आणि एकदम चित्र पालटले. गर्दीची वर्दळ, महामार्गीय कामांचा धूरमिश्रित गोंगाट यामुळे लोणेरे कधी येते असे झाले. इथे महामार्ग सोडला आणि आंबर्ले गावाकडे चौचाकी दामटली.

आंबर्ले गाव सपाटीवर . समोरील उंच टेकडीवर भगवा झेंडा दिसत होता. दुरुन सोपा भासणारा तो दुर्ग तीव्र चढाचा दुर्गम निघाला. पायथ्याला गवताचे पातेही नसलेली भूमी आणि त्यावर छोटी घरे पाहूनच घशाला कोरड पडली. पाण्याची टाकी हाच काहीसा दिलासा. किरकोळ चौकशी झाल्यावर समाजिक वास्तव समोर आले . समोरच मंदिराचे शिखर डोकावणारे पन्हळघर गाव मराठ्यांचे, बाकीची वस्ती आदिवासी आणि ती झोपडी बुद्धवस्ती अशी माहिती आम्ही न विचारताच एका युवकाने सांगितली. आमची जात पडताळणी केली नाही हे नशीबच.

पन्हळघर गड चढल्यावर दुर्ग रायगडाने दर्शन दिले, मन थरारले. जय हो म्हणून खाली उतरलो . कसरत करीतच उतरावे लागले . लहानूत बसल्यावरच पाय पोळणे थांबले. माणगाव -निजामपूरच्या दरीत पुष्कळ झाडोरा असताना या भागात वैशाख वणवा माघ महिन्यात कसा हे कोडे प्रशासनाला पडत नसावे का ? डोंगरभाउ वार्ताहर मनोज कापडे याने लगेच त्याचे उत्तरही दिले. प्रशासकीय खात्यांमध्ये शिळोप्याच्या गप्पां मध्येही अशा चर्चा होत नाहीत , असे त्याचे म्हणणे पडले. पण अशाही परिस्थितीत मानवप्राणी जगत आला आहे.
यातीलच एक अतरंगी कुटुंब उभारे वाडीच्या तिठ्यावर भेटले.
त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी आम्ही गाडीतून उतरलो; रश्मी आणि दिशा वारखंडकर या हरित साधक स्त्रियांशी आमचे सूर जुळले. त्यांचे काम बाजूस ठेऊन, त्या जवळच असलेल्या त्यांच्या घरी घेऊन गेल्या . घर चंद्रमौळी कौलारू, झाडांच्या कुंपणाआड लपलेले. यजमान श्रीनिवास हे आर्किटेक्ट, लॅपटापवरील बैठक संपवून तेही गप्पांमध्ये सामील झाले . हे मुंबईकर दांपत्य , दिशा या मुलीसह निसर्गस्नेही जगण्याच्या विचाराने इथे रहात आहेत. कुडावळे ता. दापोली येथील श्री. दिलिप कुलकर्णी हे पर्यावरण कृतीसेनेचे सेनापती आहेत. त्यांची प्रेरणा आणि साधक बाधक विचार करुन ही मंडळी इकडे आली. जास्तीत जास्त बांबूचा वापर करून घर बांधले. उर्जेची उधळपट्टी करणारी एसी , फ्रिज , मिक्सर सारखी अनेक साधने इथे दिसत नाहीत. रानपक्षांच्या शिळांचा आवाज, गाईचा सहवास याचा आस्वाद घेत ही मंडळी राहतात. कन्या दिशा तिचे आवडीच्या विषयात अभ्यास करुन आनंदाने राहते यातच सारे काही आले . त्यांच्या अन्नाचा अर्धा वाटा आम्ही चवीने स्वीकारला आणि लहानु पुढे धावली.
यातीलच एक अतरंगी कुटुंब उभारे वाडीच्या तिठ्यावर भेटले.

दासगावच्या दौलतगडावरून सावित्री आणि काळ नदीचा संगम पाहून महामार्ग महाडपाशी सोडला . महामार्ग द्रुतगती आणि सरळ असल्यामुळे इकडे तिकडे बघायची संधीच देत नाही. डोंगरकुशीत पळस , पांगारे या दिवसात रंगांची उधळण करीत उभे असतात. सावित्री खाडीच्या निळ्याभोर पाण्यावरील बगळे शुभ्र रेघ ओढताना सुंदर दिसतात पण , मी-तू करण्याच्या स्पर्धेत महामार्गावरील गाड्या धावताना सर्व सृष्टीचे वैभव स्पष्ट नाकारतच असतात . लाटवणच्या घाटरस्त्यावर मात्र भर दुपारी जंगल सृष्टी जागी होती. ऐन, साग हडकलेले पण आंबा, फणशीचे अनेक मोहरतेले वृक्ष बघत वेळ कसा गेला ते कळलेच नाही . दहागाव भराडीच्या आसपास सांजावले आणि स्वर्गच अवतरला ! सारं कसं शांत होत असताना विप्र गोशाळेच्या गुरुजींचे जांभ्या दगडातील घर डोकावले . इतके दिवसभर पळूनही इवलिशी लहानु शेवटच्या मातीच्या चढावर कुरकुरली नाही. आम्ही अशाच मोहमयी जागेसाठी आसुसलेले प्रवासी होतो.
'या, पाळंदेच ना!' मी विवेक कुंभोजकर' अशा स्वागतात अगदी सहज साधेपणा होता. आमचा परिचय फोन आणि दुधाची पिशवी इतकाच होता, त्यामुळे स्वागत आनंदी करणारे. २ गाई पाळून आरंभ आणि आता २०० -२५० गाई सांभाळणारे हेच ते कुंभोजकर.

पुण्यात इन्फोटेक कंपनीची भरभराट झाल्यावर मुळातील निसर्गस्नेह साद घालू लागला. देशी गाई-जर्सी गाई यांचे विज्ञान समजून घेतल्यावर त्यांनी 'विप्र गोशाळा' स्थापन केली . सध्या रुजलेल्या कृत्रिम रेतन पद्धतीही त्यांनी नाकारल्या. पुणे मुंबईत, हे नैसर्गिक गोपालनातून निर्माण झालेलेच दूध विकले जाते. मी अनेक वर्षे हे दूध पिण्यासाठी वापरतोय. वयाच्या पंचेचाळीशीनंतर त्यांना मौंटेनियरिंगने झपाटले आणि त्यांनी गिरिप्रेमी संस्थेचा डिप्लोमा कोर्स केला , यावर्षी एखादे शिखर माऊंटेनियरिंग करण्यासाठी ते प्रयत्नात आहेत.

चविष्ट भोजन देऊन त्यांनी आम्हा यात्रींना तृप्त केले हे सांगायला नको. घराडीपासून केशरनाथ विष्णू मंदिर फक्त ५ किमी.आंजर्ले रस्ता उत्तम डांबरी आहे. झुंजुमुंजू होताच आम्ही पायपीट सुरु केली. केशरनाथ प्रसिद्ध पावलेले स्थळ दिसत नाही आणि रस्त्यावर वाहनच काय, माणूसही नाही. परिसर डोंगराळ आणि झाडझाडोरा पुष्कळ यामुळे दिशा कळत नाही . गुगल नकाशाचे थोडे सहाय्य मिळाले आणि ठळक पाटी यामुळे अखेर कार्य सिद्धीस गेले. मंदिर साधेसेच, वातावरणास शोभेसे . दोन पऱ्ह्यांच्या संगमावरआहे. तेथील शांतता आणि गाभाऱ्यातील श्री विष्णू मूर्ती अवर्णनीय ! आमच्या बँकेतील श्री दिलिप याच्या आवाजात ध्वनिमुद्रित सहस्त्रनाम उच्चारण ऐकताना आम्ही मंत्रमुग्ध झालो. घराडीतील श्री विष्णू मूर्ती १२ व्या शतकातील शिलाहारकालीन आहे . दापोली तालुक्यातील सडवे या गावी अशीच विष्णु मूर्ती असुन तेथील शिलालेखात शिलाहरकालीन मूर्ती असल्याचा उल्लेख आहे .

केशरनाथच्या समोर पुण्याचे प्रभाकर जोशी यांचे शेत घर आहे. कुंभोजकरांच्या जीप सेवेमुळे यांचीही भेट झाली. जोशी आजोबांचे व्यक्तीमत्व गप्पांतून उलगडले तसे आम्ही थक्कच झालो. ३० वर्षापूर्वी १०० एकर झाडोरा असलेली डोंगराळ जमीन घेतली तिथे काजू, आंबा, नारळ अशी बागशेती उभी केली. भोसरी येथील प्रभाकर इंजिनियरिंग ही कंपनी त्यांनीच नावारुपास आणली. प्रभाकर जोशी यांना साहित्य, नाटक यामध्ये रस आहे. ते प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनचे सभासद होते. या क्षेत्रातील माडगुळकर बंधू गदिमा, व्यंकटेश याखेरीज भालबा केळकर, वासुदेव पाळंदे हया बंगल्यावर रहायला येत असत. त्यांनी दोन सिनेमांची निर्मितीही केली आहे. यांचे आजचे वय ९०, या वयातही हातात काठी न घेता काजू वाळवण कामावर देखरेख करतात आहे की नाही अतरंगी व्यक्ती आणि आमची भेटही ! त्यांच्या वानप्रस्थाश्रमास वंदन करून आम्ही पालगडाकडे निघालो .

पालगड हे साने गुरुजींचे जन्मगाव गावाच्या पूर्वेला पालगड आणि शेजारचा जोड दुर्ग रामगड आहे. पूर्वी ४०० मीटर चढाई शिवाय पर्यायच नव्हता. मात्र आता किल्लेमाची पर्यंत उत्तम सडक आहे. लहानुचे मालक व चालक रामदास यांनी तो तीव्र घाटाचा मार्ग लीलया पार केला. कडक ऊन्हात, माचीतून माथ्यापर्यंतचा चढ मनोजच्या साथीने पार केला आणि तिथे मात्र थंड हवेच्या झुळुकेने छान स्वागत केले. रामगडावर मात्र वाट सापडली नाही . पुण्याचे दुर्ग अभ्यासक डॉ सचीन जोशी यांनी रामगडाचा शोध गतवर्षीच लावला. दुर्गवीरांची संस्था तिथेही संवर्धन कार्य करीत आहे. पायवाटही काही दिवसात होईल .
खेडच्या विनायक वैद्य याचे वारंवार फोन येत होते. सुग्रास भोजन भिक्षांदेही होण्याआधी आम्ही तिथे पोहोचलो. लहानूची कमाल असल्याने बोळांमधून सुळकन सूर घेत थेट दारातच पोहोचलो. भोजनोत्तर अंमळ डोळा लागल्याने त्यांनी आमची चहापान देऊन बोळवण केली. निवृत्तीनंतर खेड तालुक्यातील सर्व डोंगराळ रस्ते सायकलवर त्यांनी पार केले, या भागात सायकलस्वारीचा छंद प्रसार केल्यानंतर दापोलीत सायकल संमेलन भरवले हे त्यांचे अधिक अतरंगीपण !

तळे या खेडेगावी आम्ही पुढील मुक्काम केला. इथे कर्नल स्वानंद दामले हे आई, कीर्ती मनोहर दामले सोबत राहतात. वडिलोपार्जित घराचा ढाचा कायम ठेवून, आधुनिक साधने वापरुन शेतीही करत आहेत. निसर्ग स्नेही भवताल राखून आदर्श शेतघर निर्माण केले आहे.
आनंद म्हणे .... अतरंगी कोकणची शेवटची भेट सांगून लांबलेले लेखन आटोपते घेतो. कोकणचा कॅलिफोर्निया होईल तेव्हा होईल, पण तांबडया कौलारू घरांचे हिरवे कोकणमात्र नाहीसे होत चालले आहे. चकाकत्या स्टाईली लावलेल्या दुमजली तीन मजली घरांची बांधकामे झाली आहेत, होत आहेत. तिठ्या तिठ्यावर होटेले रुम मिळतील सह उभी आहेत. राजकीय फलकांची मांदिआळी, साधी देऊळेवाडी जाऊन भव्य देऊळ उभारण्याची स्पर्धा चालू आहे. होम स्टेच्या नावाखाली चकचकीत निवास व्यवस्था व कचरापट्टी वाढली आहे.

या परिस्थितीत कापरे गावी एक खरे 'होम स्टे' आहे. किती दिवस तग धरेल माहिती नाही. कारण भातशेती आणि गुरे, गाई अल्प झाली आहेत. मातीची जमीन सारवायला शेण मिळणे अवघड झाले आहे. अशा होम स्टेत रहातो माझा मुलगा, चिरंजीव हृषिकेश . प्राप्तेषु षोडशे वर्षे झाला नाही तेवढा त्रिदश वयात समंजस मित्र झाला आहे. कमीत कमी संसाधने वापरुन, शेतावर मजुरीचाही आनंद घेत आहे. लॅपटॉप, मोबाईलचा वापर फक्त लेखक म्हणून, सीमा राखून करीत आहे. कापरे गावत 'हा बामणाचा पोर' इथे काय करतोय? असे प्रश्नचिन्ह होते. परंतू मराठा, कुणबी आणि बौद्ध वस्तीतही हृषिकेश सारखा सुविद्य, साखरेसारखा विरघळून गेला आहे हेच त्याचे अतरंगीपण मनाला भावणारे आहे. सावित्री नदीतील डिप्को सफर, कोळथरे येथील काळोखी गुडुप शांतता याबद्दत पुन्हा कधीतरी.
मनोज कापडे, रामदास महाजन आणि त्यांची लहानु यांच्याशिवाय आनंद म्हणे शक्य नव्हते !
समाप्त






