Friday, 22 December 2023

केरळ फाईल्स : लॉटरी बेकरी बनानाज बंगलोज ! Kerala Files

केरळ फाईल्स
लॉटरी बेकरी बनानाज बंगलोज !




रामराम


अयोध्या , प्रयागराज , काशी आणि गया अशी तीर्थयात्रा करण्याचा मनसुबा सौ गौरीने जाहीर केला होता . 'मंदिर वही बनायेंगे पण तारिख नही बताएंगे ' अशा अवस्थेत तीर्थयात्रा अडकली होती . अर्थात त्यामुळे माझी बेचैनी वाढत होती कारण हा दौरा नक्की ठरल्या शिवाय मी माझी मोहिम आखणे शक्य नव्हते . दोन तिन वेळा विषय छेडला आणि शेवटी यश आलेच आपण पुढील वर्षी तीर्थयात्रा करूया , हुश्श !

आजकाल सायकल घेऊन रेल्वेने प्रवास करताना पहिला निकष ठरलेला आहे . रेल्वे पुण्याहून सुटणारी आणि ज्या ठिकाणी जाण्याचे मनात आहे तेथे संपणारी हवी , यामधे तडजोड नाही . दक्षिण भारतात फिरणं नेहमीच आवडतं , खाण्यापिण्याची चंगळ , स्वच्छसुंदर परिसर , उत्तम रस्ते आणि एकुणात शांत संयत वातावरण . सायकल गुरूमित्र अरुणकाका अभ्यंकरांकडून कर्नाटक केरळ मधील घाटरस्त्यांच्या सायकल भ्रमंती मधील बऱ्याच स्टोऱ्या नेहमी कानी पडत असतात . म्हटलं हम भी आगसे खेलेंगे ! कुठला तरी दमदार घाट निवडायचा . पटकन डोळ्या समोर मुन्नार आले म्हणून एर्नाकुलम रडारवर आले .

ज्या दिवशी तीर्थयात्रा पुढे ढकलण्याची वार्ता कानी पडली त्याच दिवशी संध्याकाळी गुपचुप पुणे एर्नाकुलम पुणे: १० डिसेंबर १९ डिसेंबर अशी रेल्वे तिकीटे आरक्षित केली . बगळा जसा संधीची वाट पहात कितीही वेळ स्तब्ध उभा रहातो तव्दत मीही वेळ घालवत होतो . देव शूरवीरांच्या पाठीशी नेहमीच उभा रहातो यावर माझा दृढविश्वास आहे त्याची प्रचिती आलीच , योग्य संधी चालून आली आणि मी इरादा जाहीर करून टाकला . मोहिमेची तयारी आजकाल बाये हात का खेल झाल्ये , अति आत्मविश्वास नाही पण त्याचं दडपण नक्कीच नाही वाटंत . खरंतर मोहिमेकरिता आणि विशेष करून एकल आणि आत्मनिर्भर Solo Self supported, तीही लांबलचक घाटाची; सराव अत्यावश्यक आहे . दुर्देवाने, गांभीर्याने सराव करणं मला जमंत नाही याही वेळी तसंच झालं .




प्रवास कुठून कसा करावा याची आखणी देखील मी केली नव्हती
, मित्र मंडळ जरा जास्तच चौकशी करायला लागल्यावर शोधाशोध सुरू केली. भाचा आदित्य म्हणाला आद्य शंकराचार्यांचं जन्मस्थळ कालडी तिकडे जवळच आहे , मग काही पुरातन मंदिर शोधली , नकाशावर कोडनाडचं हत्ती केंद्र दिसलं असं करत करत साधारण आखणी पूर्ण केली .

प्रवास सुरु

सायकल सामानाच्या डब्यात भरताना जातीने लक्ष देणे गरजेचे असते . सामानवाहका सोबत जावून डब्यातील मांडणीत वरच्या कप्प्यात सायकल ठेवून घेतली , सगळं सुविहीत झालं कारण आधी वंगण ओतलं होतं , त्याचा मोबाईल नंबरही घेतला होता . त्याचा पुढे फायदा झाला कारण ही गाडी पुणे पनवेल जाउन मग कोकण रेल्वे ट्रॅक वरून जाते . परिणामी गाडीचे तोंड आणि शेपूट उलटे होते , माझे दिशांचे अगाध ज्ञान जमेस असल्याने मी उतरण्यापूर्वी भांबावून गेलो शेवटी त्या मॅनला फोन करून सायकल नेमकी कोणत्या दिशेला आहे ते जाणून घेतले . रेल्वेला इंजिनच्या टोकाला एक आणि गार्ड एंडला एक असे दोन सामानाचे डबे असतात . पुणे एर्नाकुलम तिकीट थ्री टियर स्लिपरचे मिळाले होते . माझ्या कप्प्यामधे अस्सल सातारकर आणि हाडाचे निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांची , ३ ज्येष्ठ नागरिक जोडपी होती . गाडीत शिरल्या पासूनच त्यांनी सर्व आसमंत दणाणून सोडला , मी आनंद लुटत होतो . बरं सोबत एव्हढं सामान होतं की बस्स रे बस ! विविध आकार प्रकारच्या ट्रॉली बॅग्ज , बगल थैल्या , प्लास्टिक पिशव्या , काचकी-बोचकी सगळा संसारच सोबत . काळोख झाल्यावर आपापल्या शिदोऱ्या उघडून जेवणाचा बेत त्यांनी आखला,  साग्रसंगित शिधा काढून जेवण करून सर्व आडवारले . मला त्यावेळी खाण्यात रस नसल्याने फारसे लक्ष दिले नाही किंबहूना दुर्लक्षच केले . मनात विचार केला उद्या आपल्याला भाकरी-बेसन, चटण्या, लाडू खाण्याचा योग येणार . झालं तसंच , दुसऱ्या दिवशी आपापसातल्या स्टोऱ्या सांगून संपल्यावर हळूहळू त्यांचा मोर्चा माझ्याकडे वळला . मी शक्य तितका साधेपणाचा बुरखा पांघरून माहिती पुरविली पण माझा एकुण अवतार पाहून ते प्रभावित झाले असावेत , माझं काम झालं ! दुपार झाल्यावर ऑफर आलीच , घ्या की राव थोडं दोन घास , मी कस्स कस्स करत हळूच भोजन स्वीकारलं . म्हटलं बामणाला जेवू घालण्याच्या पुण्यापासून असं सज्जनांना वंचित ठेवणं बरं नाही . काही कारणाने गाडी २ तास उशिराने धावत होती त्यामुळे रात्री नउच्या सुमारास गाडी एर्नाकुलमला पोचली. रेल्वे पार्सल ऑफीसमधे झाशीत फरिदा भेटली होती इकडे ज्युलि भेटली त्यामुळे काम सुकर झाले , १९ तारखेला परत भेटीचा शब्द घेवून सायकलवर टांग मारली .

रेल्वेत सामान नोंदताना आणि सोडवताना
सोबत तिकीट आणि आधार यांची छायाप्रत अनिवार्य आहे हे लक्षात ठेवावे , लागेलच असं नाही पण काही वेळा त्याशिवाय काम होत नाही आणि ऐन वेळी चिडचिड होते .



श्रीगणेशा

केरळ म्हटलं की आपला समज असतो हा ख्रिश्चन बहूल भाग आहे वस्तुतः ५०% च्या आसपास हिंदू लोकसंख्या आहे . पुरानन , जुनी /नवी हजारो सुंदर मंदिरं आहेत. अलुवा येथील असेच एक प्रसिद्ध शिवमंदिर पहाण्यासाठी गेलो , तेथे उत्तरक्रिया करण्याची स्थानिक विशिष्ट प्रद्धत पहाण्यास मिळाली . शेजारीच विघ्नेश्वरा कॉफी हाउस एक जोडपं चालविते , शुद्ध शाकाहारी आणि घरगुती मजेशीर वातावरण असल्याने नाष्टा मजेत झाला . मुख्य रस्त्यावर चांगलं स्थापत्य असलेला एक चर्चही पहायला मिळाला . हळुहळू कलाडीच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले , मुळात दमट हवा त्यात सध्या तुरळक पाउस पडत असल्याने घामाघुम झालो . वाटेत फळफळावळ विकत घेतली आणि पाणी पिण्याचा सपाटा सुरु ठेवला .
श्री आद्य शंकराचार्य यांच्या जन्मस्थळाला गेल्यावर मनोमन आनंद झाला . 'जगातील सर्वात पवित्र ठिकाण ' अशा आशयाचा फलक वाचून अभिमान वाटला . परिसरात अंजिरासारखी फळं आणि घनदाट अशी मोठ्ठी पानं असणारा वृक्ष पहायला मिळाला , स्थानिक भाषेत त्याला अत्तिफयम म्हणतात ती सोलून खातातही . वाटेत एका गावात मुरली केन्स नावाच्या छोटेखानी कारखान्याला भेट दिली , तेथील कारागिरांचे कुशलतापूर्ण सफाईदार काम पाहून बेहद्द खुश झालो . भाषेचा अडसर असल्याने माझ्या भावना चांगल्या पद्धतीने व्यक्त करता आल्या नाहीत . पुढे पेरंबवूर जवळ पुरातन मंदिर असा फलक वाचून मुख्य रस्ता सोडला, मंदिर बंद होतं पण परिसर एखाद्या संरक्षित जंगलाला लाजवेल असा होता तो मनात साठवून कुरूपमपड्डि गाठले . मुख्य नाक्यावर असलेले प्रवासी आश्रयस्थान आचुज दुरिस्ट होम गाठून सायकलधोपट्या खोलीत टाकून कलिल भगवति मंदिर पहाण्यास गेलो .







मंदिर एका बऱ्यापैकी उंच टेकडीवर आहे . मंदिर इसपूर्व असल्याचे मानले जाते तसेच त्यावर थोडा जैन धर्माचा प्रभावही जाणवतो . मंदिर छोटेखानी आहे पण त्याचे छप्पर म्हणजे एक महाकाय शिळा आहे ती पाहून धडकी भरते . टेकडीच्या पायथ्याशी अव्हलॉज उंडा : तांदळाचा लाडू खाल्ला आणि विश्रमालय गाठले .

आज सकाळी निघाल्या पासून काही गोष्टी प्रकर्षाने जाणवत होत्या . मनात भरणारा उत्तम दर्जाचा सुळसुळित रस्ता . पूर्ण रस्ता भर एका बाजूला एक अशी प्रायव्हेट वावरं हायती आणि त्यामंदी मोठाले महाल सदृश इमले , परिणामी रस्त्याच्या कडेला लघुशंका आटपण्या इतकीही रिकामी जागा मिळाली नाही , ना इन्साफी . पहाल तिकडे दुकान , सायकल , हातगाडी , स्कुटर या सर्वांचा वापर लॉटरी तिकीट विकाण्यासाठी केला जातो . जागो जागी बेकरीज , त्यामधेच चहा - कॉफीची सोय , काही तर २४ तास चालणाऱ्या . सर्वांवर राज करणारी केळी ! कोण , कधी आणि कशी खातं कल्पना नाही पण तांदूळा खालोखाल विकला जाणारा खाद्यपदार्थ म्हणजे केळीचं !

पहिल्याच दिवशी झालेलं केरळ दर्शन म्हणजे लॉटरी , बेकरी , बनानाज आणि बंगलोज !








प्युअर व्हेज अंडी


कॉलेज जीवनात कधीतरी यारीदोस्तीत सामिष आहार घेतला आहे नंतरही क्वचित अंड खायचो पण गेली अनेक वर्षे शुद्धशाकाहारी अन्नपदार्थ खातो . वर उल्लेख केल्याप्रमाणे बेकरीचं प्रस्थ खूपच आहे , तिथेच चहा /चाया कॉफी सोबत स्नॅक्स मिळतात त्यात शिजवलेल्या अंड्याचा समावेश असतो . काही शाकाहारी लिहिलेल्या उपहारगृहातही सर्रास अंडं  वापरलं जातं . डोसा अथवा अप्पम अंड्याचा थर देवून तयार केला जातो . असा सर्व माहौल असल्याने सकाळी शुद्ध शाकाहारी उपाहारगृहाच्या शोधात बाहेर पडलो . डोक्यात हत्ति केंद्र पहाण्याचे घोळत होतेच पण नक्की होत नव्हतं. मुख्य रस्त्या पासून १५ -१६ किमी आत जाउन यायचे म्हणजे पूर्ण सकाळ त्यातच खर्ची पडणार . व्दिधा मनःस्थितीतच उडुपि आनंद भवन मधे शिरलो . खास केरळी बाज , कौंटरवर तबकात दोन प्रकारची गंधं , भस्म आणि आसमंतात उदबत्ती / धुपाचा मंद दरवळ . डोसा , चाया चा आस्वाद घेत असताना मालकांशी मोडक्या तोडक्या भाषेत संवाद साधला . त्यांनी हत्ति केंद्राला जा, गो गो असे आग्रहपूर्वक सांगीतले . त्यांचा आदेश मानून सायकलधोपट्या त्यांच्या गळ्यात मारून कोडनाड रस्ता धरला .






केरळात एकुणच सरकारी उपक्रम सुव्यवस्थित रितीने चालविले जात असावेत असे जाणवत होते . हे केंद्रही त्याला अपवाद नव्हते . खूप छान नैसार्गिक पद्धतीने जंगल राखले आहे , विविध प्रकारच्या बांबुची लागवडही केली आहे . विशेष उलेखनीय म्हणजे रक्तचंदनाची लागवड आणि संवर्धन . एलिफंट पार्क म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी सांबर, हरणं यांचंही संगोपन केले जाते .
जंगली हत्तींचे संरक्षण आणि बहुदा प्रजननाचे कामही येथे चालते . जंगली हत्तिचा चित्कार ४०-५० फुटावरून अनुभवण्याची संधी मिळाली , एक खास अनुभव पदरी जमा झाला . येथील जंगल खूप समृद्ध वाटले , जमिनीवर विविध प्रकारचे कृमी , कीटक , बुरशी , अळंबी तसेच पक्षी यांसह चांगली जैव विविधता असल्याचे जाणवले .



परतत असताना एका टपरीवर मांडलेल्या लाकडी खेळणी वजा कोड्यांनी लक्ष वेधून घेतले . थांबून तेथील बाईंशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी यजमानांना बोलविले . ६५ वर्षीय चंद्रन विश्वकर्मा (Chandran Carpenter Kaprykadu Kodnad 9846518865 ) उत्साही आणि कुशल कारागीर आहेत . हाताच्या कौशल्याने बनविलेली कोडी , खेळणी आणि इतर आकर्षक वस्तू माहिती देत देत दाखविल्या . स्वतःचे घरातील मंदिर : देवघर दाखविले काही जुन्या वस्तू दाखविल्या त्या पाहून मार्गस्थ झालो . सायकल धोपट्या ताब्यात घेण्यासठी हॉटेल गाठलं तर तिथे मिल्स रेडी चा बोर्ड ! अस्सल केरळी व्यंजनांसह केळीच्या पानावर भाताची रास पाहूनच मन तृप्त झाले . जड पोटाने सायकल दामटली वाटेत अशाच एका बेकरीत स्वीट परोट्टा नामक कुरकुरित पदार्थ ,चाया हाणला . नेरिआमंगलम येण्या पूर्वी सायकलचे पुढील चाक पंक्चर झाले सायकल बाजुला घेवून झटपट ट्यूब बदलून गाव गाठून पंक्चर काढून घेतला आणि झोपलो .

अति समिप ....




नेरिमंगलम घाटाच्या पायथ्याशी असून तिथून मुन्नार ६० किमी अंतरावर आहे . काल पुन्हा एकदा थैलीत फळफळावळ भरली होती ती आज कामाला येणार होती . घाट सुरु झाल्यापासून घनदाट जंगल सुरु होते . जंगली हत्तीं पासून सावधान असा फलक सुरवातीलाच लावला आहे . नशीबाने माझ्यावर ती वेळ आली नाही . पहिले ८-१० कि.मी नुसतं जंगलच लागले साधी चहाची टपरी देखील नव्हती पण मी सतत खूप पाणी पीत होतो वाटेत झऱ्यांमधून पुन्हा बाटली भरून घेत होतो. सोबत असलेले खजूरही मधून मधून तोंडात टाकले . नंतर एका टपरीवर चहा नाष्ट्याला थांबलो ,वातावरण घरगुती होतं . ३-४ वर्षाचं पोर दिगंबर अवस्थेत घिरट्या घालत होतं हल्ली अशी दृश्य दुर्मिळच . त्याच्या आज्जीने गरमा गरम अप्पम आणि हरभरा उसळ बनवून दिली खाउन तृप्त झालो . दिगंबर अवताराचा एक फोटू काढला आणि पुन्हा निघालो . वाटेत दोन धबधबे लागले ते पाहून , पाणी , संत्रं यांचा मारा सुरु ठेवत आगेकूच करत होतो . सतत सायकल मारत ४०-४५ किमी चा घाट चढून आलो होतो . ३ साडेतीन वाजताच्या दरम्याने पाहिले तर अजून १५ किमी घाट शिल्लक होता . मला आणखी किमान २ अडिच तास तरी सायकलिंग करावे लागले असते . मी थकलो होतो आणि शिवाय संध्याकाळ होण्या पूर्वी मुन्नार गाठून हॉटेल शोधणं गरजेचे होते . विचाराअंती मिळेल तेवढी गाडीची मदत घ्यायचे ठरवले एका टेंपोवाल्याला माझी दया आली असावी त्याने मला मुन्नार पूर्वी ८ किमी सेकंड माईल पॉईंट जवळ सोडले . पुन्हा एकदा मनाचा हिय्या करून पेडलिंग सुरु केले आता घटिका समीप आली होती . मजल दर मजल करत मुन्नार गाठले एक आखुडशिंगी बहुदुधी असे हॉटेल निवडले धोपट्या उतरविल्या आणि हुश्श केलं . पण क्षणिकच, कारण सूर्यास्त पहाण्यासाठी पुन्हा ४-६ पर्वत्या ; पुणेकरांसाठी पर्वती हे एकक आहे , चढून जायचं होतं , सायकल वर स्वार होऊन नयनरम्य दृश्य पाहून आलो .





सलाम टाटा


पूर्ण एक दिवस मुन्नार मधे भटकण्याकरिता होता म्हणून हॉटेलवाल्या कडून माहिती घेतली . त्याने नेहमी टूरिस्ट जातात असे ३-४ मार्ग सुचविले . खरंतर मला पर्यटकांनी झिजवून गुळगुळित केलेल्या मार्गावर जायचे नव्हते तरी पण कोईंबतूरच्या दिशेने जाण्याचे ठरवून निघालो . मुख्य चौक पार केल्यावर विचार बदलून एका गावाकडची दिशा पकडली . सुरवातीलाच नकद १२ रु प्रत्येकी खर्चून मोठ्ठाले मेदुवडा आणि बोंडू खाल्ले वर डबल चाय मारली . रस्ता चढणीचाच होता , दुतर्फा चहाचे मळे , स्वच्छ हवा यामुळे अल्हाददायक वाटत होता . वाटेत एका देवळाची रंगरंगोटी सुरु होती म्हणून डोकावलो , कामगार म्हणाले ख्रिसमस फेस्टिवलसाठी सजवत आहोत मी न राहवून मंदिर कसले विचारले तर पार्वती गॉड असे उत्तर मिळाले . गोलमाल है भाई सब गोलमाल ! थोडं पुढे गेल्यावर एक फलक पाहिला ' सृष्टी सेंटर ' टाटा स्पेशली एबल्ड लोकांसाठी एक केंद्र चालवितात , सायकलची चाकं आपसुकच तिकडे वळली . बेकरी , कागद , कापड आणि प्रशिक्षण असे चार विभाग चालविले जातात तेथील सर्व कर्मचारी वर उल्लेखलेल्या श्रेणीतील आहेत . कापडाचे ब्लिचिंग करण्यापासून रंग काम करून सुंदर वस्त्र प्रावरणे बनविण्या पर्यंत सर्व कामे केली जातात . कागद विभागात हत्तीच्या विष्ठा , चहातुस , निलगिरीची पाने या सारख्या विविध टाकावू पदार्थांपासून पल्प करून कागद बनवून त्यापासून उत्कृष्ट दर्जाची विविध प्रावरणे , खोकी , नोंदवह्या ई उपयुक्त वस्तू बनवून प्रथितयश आस्थापनांना विकतात . विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे दोन्ही ठिकाणी स्वतः त्यांनीच बनविलेले नैसर्गिक रंग वापरले जातात . मी स्वतः टाटाभक्त असल्याने परिसरात प्रवेश केल्यापासूनच उल्हसित होतो , तेथील दोन स्त्री अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांचीही 'टाटा ' नावावरील श्रद्धा जाणवली . पुन्हा एकदा टाटा बस नाम ही काफी है , हे जाणवलं आणि उर अभिमानाने भरून आलं . आजचा दिवस किंबहुना ही सफर सार्थकी लागल्याची भावना निर्माण झाली .






वर्षावन

एर्नाकुलमकडे परत येताना दुसरा मार्ग आहे का हे शोधत असताना एक मार्ग दिसला . येताना टेंपोने ज्या सेकंड माईल पॉईंट जवळ मला सोडले होते तिथे डावीकडे वळून कल्लारकुट्टी मार्गे तो रस्ता होता आणि तो पेरियार नदीच्या काठाकाठाने असल्याचे नकाशात दिसत होते मी खुश झालो . डावीकडे वळण्यापूर्वी एका टपरीवर रस्त्या विषयी चौकशी केली त्याने कल्लारकुट्टीपुढे रस्ता खराब असल्याचे सांगीतले . तरीही मनाचा हिय्या करून निघालो , वाटेत एक अय्यप्पा मंदिर लागले . एका बाजुला पेरियार नदी आणि दुसऱ्या बाजुला उंच वृक्ष , महाकाय वेली , झाडे झुडपे असलेले जमिनीपर्यंत प्रकाशही शिरू शकणार नाही असे घनघोर जंगल .रस्त्या शेजारील प्रचंड शिळा पाणी पाझरुन ओल्या झालेल्या दिसत होत्या आणि त्यामुळे दगडावर झाडांच्या मुळांनी जाळं पसरलं होतं . आपण वर्षावन फक्त डिस्कव्हरी चॅनेलवर पहातो मी येथे प्रत्यक्ष अनुभवत होतो , आर्द्र निबीड गूढ जंगल ! हत्ती पाठीशी (.......) येउन उभा राहिला तरी कळणार नाही अशी अवस्था , मी थोडा धास्तावलो होतो . रस्ता उत्तम , निसर्ग सुंदर पण अत्यंत आर्द्र हवा आणि सततचे छोटे छोटे चढ यांमुळे माझा पुरता बाजा वाजला . दुसऱ्या बाजुने हाच घाट चढताना मी जाणीवपूर्वक खूप पाणी पीत होतो त्यामुळे ते सुसह्य झाले . उतरताना पाणी न पिण्याचा हलगर्जीपणा अंगाशी आला . दुपारी २ च्या सुमारास नेरिआमंगलम जवळ रस्त्याशेजारील सपाट जागेवर पथारी आंथरून चांगली १ तास झोप काढली, ताजातवाना झालो . परतीच्या रस्त्यावर, जाताना जिकडे चाया करिता थांबलो होतो त्यांना रामराम करत पुन्हा कुरूपमपड्डीला मुक्काम ठोकला रात्री त्याच उडुपी उपाहारगृहात जेवलो . मालक विशेष करून मुलगा खूपच खुश झाला होता गप्पा मारण्याचा प्रयत्न केला पण भाषेमुळे यश आले नाही ,एकमेकांचे नंबर घेवून मी रजा घेतली .





उत्तम कार्यक्षम सरकारी सेवा

आज पुन्हा एकदा नवीन मार्गाने एर्नाकुलम गाठण्याचे ठरविले शेवटी ते अंगलट आले पण वाटेत बहारदार खाद्यजत्रा घडली .
वाटेत किझाक्कंबलम, हा मी केलेला उच्चार या गावी टेस्टी हट नावाचे सुंदर मांडणी असणारे खाद्यकेंद्र दिसले आत शिरलो आणि जॅकपॉट लागला . अस्सल केरळी पदार्थ पारंपारिक पद्धतीने स्वच्छता टापटीप राखत बनवून प्रेमाने ग्राहकाला खाउ घालणारे ठिकाण असे वर्णन योग्य ठरेल . मी मेदू वडा , इडली , डोसा , अप्पम , नारळ लाडू , राईस पुट्ट वर कॉफी असे सर्व गट्टम केले . माझे भोजनप्रेम पाहून मालक जेकब काकांनी (Phone no 9745806822 )एक खास केरळी पदार्थ मला वाढला. कंची/जी म्हणजे गावठी गोलमटोल भाताची घट्ट पेज तीही लिटर दिड लिटरच्या मातीच्या वाडग्यात , सोबत तळलेला पापड , फणसाची भाजी, घट्ट चटणी , लोणचं , सर्व केळीच्या पानावर आणि जगभर मसाला ताक ! वस्तुतः मी आधीच तुडुंब खाल्लं होतं पण जेकब काकांचा आग्रह मोडता आला नाही . असा आग्रह आणि अस्सल स्थानिक व्यंजनं खायला मिळणं खरंच भाग्याचं . हे सर्व चेपल्यावर झोपायची इच्छा होत होती पण एर्नाकुलम गाठणं गरजेचे होते .




एर्नाकुलमहून फोर्ट कोची आणि वेलिंग्डन व्दिपावर जाण्यासाठी सरकारी बोट सेवा फक्त ६ रुपयात उपलब्ध आहे . पहाटे साडेचार पासून रात्री साडे नउ पर्यंत अतिशय कार्यक्षमतेने सेवा पुरविली जाते . शेकडो स्थानिक सायकल वापरकर्ते सेवेचा लाभ घेताना दिसले . लाल बावट्याच्या सरकारचा कारभार एकुणात वाखाणण्याजोगा वाटला . स्थानिक नागरिक शिस्त आणि स्वच्छता प्रिय वाटले त्यामुळे एकुण जनजीवन निटनेटकं जाणवलं .




परतीचा प्रवास पहाटे सव्वा पाच वाजता सुरु होणार होता म्हणून पहाटेची धावपळ टाळण्याकरिता सायकल आदल्या दिवशी रात्रीच बुक केली . पहाटे सव्वा ४ ला स्टेशन गाठले तेथील अधिकारी सजग होते त्यांनी मला आश्वस्त केले चिंता करू नका इंजिनच्या बाजूच्या बोगीत तुमची सायकल चढवू . मी तिकडे जाउन थांबलो , थोड्याच वेळात सायकलचा आधार घेत डोलत डोलत भारवाहक आला . सायकल मीच बोगीत उचलून ठेवली कारण साहेब 'फुल्ल ' होते . मांडणीत ठेवण्याचे बरेचसे काम मीच केले , सायकलचा फोटो काढतोय हे कळल्यावर साहेब पोज देउन मॉडेलिंग करिता उभे ! नवाच अनुभव .

हा प्रांत पुन्हा भेट द्यावा असा नक्कीच आहे !

विशेष उल्लेखनीय :
काकासाहेब , अप्पा , भाई , दादा लोकांचे फ्लेक्सं लावून शहर विद्रूप करण्याचं कौशल्य या भागाने अजूनतरी आत्मसात केलेलं दिसलं नाही.
रामराम , धन्यवाद










     

                                                     









चला वाचूया .....Let's start reading.

सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom

पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे  लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...