Saturday, 21 January 2023

प्रचंड बुंदेल खंड Cycling In Bundelkhand

 


प्रचंड बुंदेल खंड

कलाकारांच्या कोंडाळ्यात असल्याने कला , स्थापत्य , पुरातन वास्तु , मंदीरं यांविषयी माहिती सतत कानावर पडत असते. प्रत्येक वेळी तो प्रदेश फिरण्याची आणि विशेष करून सायकलवरून भटकण्याची खुमखुमी येते . मेहेंदळे कुटुंब, विशेष करून शर्वरी झांशी , ओर्छा, दतिया, धुबेला, छत्तरपूर या टापूचे खूप भरभरून कौतुक करत असते , त्यामुळे हा भाग रडारवर होता . 'मौके पे चौका' मारून सौ गौरीकडून होकार मिळविला आणि ऑक्टोबर मधेच रेल्वे बुकिंग केले अर्थात सफरीवर शिक्का मोर्तब झाले .
दिनांक ८ ते १९ जानेवारी २०२३



ऐनवेळचा पाहुणा !

रेल्वे तिकीटं निघाल्यावर नेहमी प्रमाणे मित्रमंडळात बोंगा वाजवायला सुरुवात केली. यावेळी नेहमीचा साथीदार विवेक मराठे येणार नव्हता त्यामुळे बहूदा एकला चलो रे होणार अशीच लक्षणे दिसत होती . मी जो भाग फिरण्याचे ठरविले होते तो बुंदेलखंड प्रदेश म्हणून ओळखला जातो . बुंदेलखंड म्हटले की पहिले नाव मर्दानी लक्ष्मीबाई राणीचे आणि दुसरे नाव अर्थातच राजा छत्रसाल ! छत्रसाल म्हटलं की मस्तानी आणि बाजीराव ओघाने आलेच. बाजीराव म्हटलं की आमचे अजयराव येणारच , नेमक तसंच झालं , अजयचे कुतुहल जागृत झाले , होय नाही करता करता नोव्हेंबर शेवटाला अजय राव देशपांडेंची तिकीटे काढली अर्थात नाव वेटिंगलिस्ट मधे होते. अजयचा इतिहासाचा, विशेष करून बाजीराव आणि पेशवाईचा अभ्यास खासच आहे . त्यामुळे आयत्या वेळच्या पाहुण्याने सफारीचा पैस आपल्या मर्जीने वाढविण्यास सुरवात केली , आलमपूर , महोबा , जैएतपूर आणि हळूच खजुराहो ही भरती केलं . त्याचे मनसुबे मी निमुटपणे ऐकुन घेत होतो , मनात खात्री होती हे सर्व सायकल वरून पहाणे वेळे अभावी शक्य होणार नाही. अजयची तयारी जोरात सुरू होती , बरंच सव्यापसव्य करून अजयची पक्की तिकीटं मिळविली आणि सायकली लगेजमधे बुक करून प्रवास सुरू केला .


आले देवाजीच्या मना तेथे काहीच चालेना

पुणे ते झाशी; स्टेशनचे नाव विरांगना राणी लक्ष्मीबाई अशी एक साप्ताहिक विशेष रेल्वे फेरी आहे तिने प्रवास केल्यास प्रत्यक्ष पाचच दिवस मोकळे मिळू शकले असते . म्हणून जाताना झेलमची तिकीटे काढली होती ती गाडी जम्मू पर्यंत जाते . सायकल डोळ्यासमोरच वाघिणीत भरल्याने निश्चिंत होउन प्रवास सुरु केला. झाशीला उतरल्यावर एक नवीनच समस्या उभी राहिली . गाडी फलाटावर आठ मिनीटे थांबते तसा तो वेळ पुरेसा आहे पण ...... पुणे झाशी दरम्यानच्या स्थानकांत एव्हढं सामान भरलं गेलं की आमच्या सायकली बाहेर काढणे शक्यच झालं नाही . ऐन कडाक्याच्या थंडीत घामाघूम होण्याची वेळ आली, आमची तारांबळ उडाली . स्टेशनवरील अधिकारी शिवकुमार शर्मांनी आमची अडचण जाणून मार्गदर्शन केले आम्ही थोडे निश्चिंत झालो . आता सायकलींचा प्रवास ग्वाल्हेर , आग्रा , दिल्ली किंवा जम्मू पर्यंत होणार हे निश्चित झाले . स्टेशनवरील अधिकारी संजय यांचा मोबाईल नंबर घेवून निवासव्यवस्था शोधकार्य सुरवात केली , इलायट ( एलिट) चौक रहाण्यासाठी चांगला असल्याचे कळल्याने मोर्चा तिकडे वळवून आसरा मिळविला.


रणझुंजार झाशीची राणी लक्ष्मीबाई

आता आम्हाला कार्यक्रमाची पुनर्आखणी करणे भाग होते आणि सायकलचा मागोवाही घ्यायचा होता . रेल्वे अधिकारी आणि रेल्वे नियंत्रणकक्ष यांचेशी सतत संपर्क साधत होतो, सायकल्स आग्राच्या पुढे गेल्याचे कळले , आता आमच्या हाती दोन दिवस होते .
प्रवासातील उलट सुलट खाणं, प्रवासाचा शीण यामुळे अजयला डोकं दुखीचा त्रास जाणवत होता म्हणून अधिक वणवण न करता झांशी किल्या वरील लेझर शो ( किरणखेळ ) पहाण्यास गेलो . किल्ल्यावरील भिंती, तट यांचा अफलातून वापर करत शो ची आखणी केली आहे . शो ची मांडणी फारच प्रभावी आणि दिमाखदार केली आहे आपण थेट इतिहासात पोहोचतो . झांशी अर्थात रणझुंगार राणी लक्ष्मीबाई यांचा प्रतापी इतिहास अनुभवताना अंगावर रोमांच उभे रहातात. नकळत आपण नतमस्तक होतो.. झाशीचा किल्ला देखणा आणि विस्तीर्ण आहे निरखून पहाण्यासाठी तीन चार तास तरी हवेतच . किल्ल्यावर प्रसिद्ध महाकाय अशी कडक बिजली तोफ पहायला मिळते , नारो शंकर यांनी स्थापन केलेली गणपती आणि शंकराची सुंदर मंदीरं ही पाहिली . काही काळासाठी राणी किल्ला सोडून ज्या महालात रहात होती तो महाल आणि त्यातील अश्म शिल्पांचे संग्रहालयही पाहिले . महालात त्या काळातील चित्रं आणि दस्तावेजही पाहिले .



दातखिळी बसविणारे दतिया

आमच्या सायकल्स जम्मूला गेल्याचे आणि तिथून आज सकाळी निघणार याची पक्की खबर आम्हाला मिळाली होती . आजचा दिवस सत्कारणी लावण्यासाठी आम्ही सकाळी लवकर दतियाकडे कूच केले . झांशीत थंडीने गारठून गेलो होतो पण सुसह्य होते . बसने दतियाला उतरलो आणि थंडीच्या कडाक्याने आमची इमारत हलु लागली मेंदू बधीर झाला. हात इतके थरथरत होते की कपातला चहा आणि द्रोणातील उसळ आमच्या पोटात कमी आणि भूमातेच्या पोटात अधिक गेली असावी .
वीरसिंग जुदेव यांनी बांधलेला भव्य असा दगडी महाल लांबूनच डोळ्यात भरतो . पाच सहा मजल्यां एवढा उंच आणि भरपूर कोरीव काम केलेला महाल पहाताच क्षणी आवडला . राज परिवारातील कुदुंब रहात असलेली पिली कोठी देखील पाहिली . गावात एका सुंदर पुरानन हनुमान मंदीरातील रंगीत चित्रकला पाहून थक्क व्हायला होते. अजयच्या डोक्यात आलमपूर घुमत होते म्हणून खास गाडी ठरवली, निघण्यापूर्वी गाडीत हात पंपाच्या सहाय्याने गैस भरला आणि आलमपूर गाठले . अहिल्याबाई होळकरांनी आपल्या सासऱ्यांच्या स्मरणार्थ तेथे एक प्रचंड मोठी छत्री अर्थात स्मृतीस्थळ बांधले आहे . वास्तु दिमाखदार भव्य आहेच शिवाय सर्वत्र नक्षीकामही केलेले आहे, घुमट फारच सुंदर , परिसर स्वच्छ आणि प्रसन्न वाटला.



फरिदा हो गयी फिदा !

सकाळी सात वाजता स्टेशन गाठले , खिडकीच्या आतमधे एक निरुत्साही ललना बसली होती . सरकारी आस्थापनांमधे कामं टाळण्याचा मोबदला मिळतो असाच सर्वसामान्य समज असावा . त्याच धर्तीवर नकारात्मक प्रश्नावली सुरु झाली, रेल्वेकडून आलेला मेसेज मी दाखविला तेव्हा त्या बाईनी आम्हाला गांभीर्याने घेतले आणि सायकल आल्यात पण त्या नउ नंतर मिळतील कारण कर्मचारी नाहीत असा हुकुमाचा एक्का टाकला, मी उपर एक एक्का म्हणत फलाटावरुन आम्हीच सायकली आणतो असा पवित्रा घेतला . दरम्यान त्यांना मी लगेज सेवा २४ तास असते हा नियमही ऐकविला थोडाफार वादही घातला , परिणामी फलाटावर जाण्याची अनुमती आम्हाला मिळाली, मी लगेचच फलाटावरील संबंधित कर्मचाऱ्यांला फोन करून तसे कळविण्यास सोगितले . आम्ही उत्साहात सव्वा किमीची पायपीट करत फलाटावर पोचलो सायकल्स डोळे भरून पाहिल्या . थोड्याच वेळात एक रंगतदार वामनमूर्ती हजर झाली. डोक्यात लोकरीची टोपी , डोक्यावर टोपीत एका बाजूला एक पेन आणि दुसऱ्या बाजुला कानावर घुसवलेला मोबाईल , अघळपघळ स्वेटर, काखेत मांडीपर्यंत लोंबणारी लटक पिशवी आणि जर्दाने भरलेला तोबरा ! ऐट अशी की संपूर्ण स्टेशन याच्याच मालकीचे .
थोडक्यात आमचा संवाद

क्या है ?
सायकल लेनी है
नही ले जा सकते !
क्यू ?
ये रेल्वे की मालमत्ता है
हमारे पास रसीद है
लेबर के बिना फीर भी नही
हमे फरिदा मॅम ने भेजा है
वो पागल है
उनका फोन आया क्या ? नही हो, तो आप फोन करो
मै क्यू करू ?
ई .....

फिलिंग द ब्लॅक्स म्हणून प्रत्येक वाक्याला एक पिचकारी !

म्हणजे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या शिफारसीवर सही करायला जेव्हढे आढेवेढे राज्यपालांनी घेतले नसतील तेव्हढी अकड त्या माणसाने दाखविली .

जब तक लेबर नही आता तबतक सायकल को आप हाथ भी लगा सकते !
हा फायनल असॉल्ट .

स्टेशन मधील पार्सल अधिकारी भारती यांचा नंबर माझ्याकडे होता पण सकाळी त्यांना त्रास देवू नये असे मला मनोमन वाटंत होते . नाईलाज म्हणून मी फोन लावण्याच्या पवित्रयात होतो एकीकडे बटुमूर्तीकडे लक्ष ठेवून होतो . बहुदा तो लेबरच्या शोधात फिरत असावा , फलाटाच्या टोकातून त्याने आम्हाला सायकली लवकर घेवून येण्याची सूचना केली मी मोबाईल खिशात टाकला आणि सायकल्स घेवून आम्ही धावलो , एक लेबर काही सामान घेवून पार्सल ऑफीसकडे निघाला होता त्याच्याशी त्याने आमची सांगड घालून दिली आणि आमची वरात फरिदाच्या दारात !

फरिदा : आयडी ?
मी : आधारची कॉपी सोबत ठेवलीच होती ती दिली .
फरिदा : तिकीट किधर है ?
मी : तिकीट कशाला ? माझ्याकडे नाही . नही लगता है ?
फरिदा : निक्षून , लगता है
मी : लगेज रिसीट आहे PNR नंबरची नोंद आहे याची काय गरज ?
फरिदा : नही , कॉपी चाहिएच !

पुन्हा किरकोळ वादविवाद,
शेवटी शेजारीच उभा असलेल्या अधिकाऱ्याने, ही सायकल घेऊन जा आणि फोटोस्टेट करून आणा असे सूचविले , मी घेवून आलो सोपस्कार पूर्ण केले.

निघताना फरिदा भाभी म्हणाल्या, इनकी (अजयची) सायकल कित्ति अच्छी है ना !
मी : थोड्याशा गुस्स्यात, हां , बहुत अच्छा लाल रंग है
फरिदा : नही नही वो भी ( अजय ) बहोत अच्छे है !
मी मनात म्हटलं फरिदा पागल है या फिदा !
एक नक्की, अजयचे एक गुपित मला कळले !


मिशन मौरानीपूर

लढाई करिता योद्ध्याचे हात शिवशिवतात तसे सायकलिंग करिता आमच्या अजयरावांचे पाय शिवशिवत होते. साडेनउ दहा दरम्यान सायकल ताब्यात मिळाल्यावर जोशामधे पेडलिंग सुरु झाले. खजुराहोकडे जाणारा हायवे उत्तम दर्जाचा आहे शिवाय सर्विस रोडही तितकाच उत्तम आहे त्यामुळे सायकलने चांगलाच वेग पकडला होता . उन कडक होते परंतु हवेत गारवा होता त्यामुळे जोश वाढतच होता तरीही दुपारी एक दिड दरम्यान एका झाडाखाली वामकुक्षी घेतली. वाटेत एका पुरातन चंदेल मंदीराचा बोर्ड पाहून सायकल तिकडे वळविल्या जवळच दोन मुलं उभी होती , रहाण्याची सोय लावण्याचा असफल प्रयत्न केला, पुन्हा पेडलिंग सुरु. वाटेत एका ढाब्यावर चोच मारून पाहिली हाती निराशाच ! मौरानीपूर पुढे खुशबु रेस्टॉरंट असलेल्या बंटी दा धाबेवाल्या बंटीला आमची दया आली आणि आमची विश्रामाची सोय झाली . हौदावर स्नान उरकुन कपडे गच्चीत वाळत घालून तात्पुरती मालकी पक्की केली..धाब्यावरील डालफ्राय आणि शाही पनीर खरंच शाही होतं, असं ताजं लुसलुशीत पनीर खायला मिळणं भाग्याचंच ! खूप उशीरा निघूनही जवळपास ७५ किमी सायकलिंग झाले त्याचा कोणताही शीण जाणवत नव्हता याचे कारण उत्तम रस्ता, आपल्याकडेही असे रस्ते अनुभवण्यास मिळोत हीच प्रार्थना ! बंटी सोबत सायकलिंग विषयी शौर्यगाथांच्या गप्पा मारल्या आणि दूध पिउन निद्राधीन झालो.


सहजतेतून सौंदर्य


आज आम्हाला जैतपूर गाठायचे होते मुख्य रस्त्याने ते साधारण ६५ किमी अंतरावर होते, गुगल काकुनी एक गावागावातून जाणारा जवळचा रस्ता सुचविला म्हणून छाती पहाडी जवळ हायवे सोडून सायकल्स डावीकडे वळविल्या . सकाळ पासूनच आज सर्वत्र धुक्याचे साम्राज्य पसरले होते अजय जू (राव) ना आपण स्वर्गातच असल्याचा भास होत होता इतक्यात सूर्यदेवांनी डुकली काढली, छबी टिपण्यासाठी आम्ही आमची हत्यारे परजणार तेव्हढयात सूर्यदेव लाजले आणि गायब झाले ते पूर्ण दिवसभर ! चौका गावातील पुरातन भैसासूर मंदीर पाहून मार्गक्रमण सुरु ठेवले . हरदासपूर गावापूर्वी आम्हाला पुन्हा रस्तासोडून उजवीकडे वळायचे होते . वळणाची खात्री करून घेण्यासाठी एका शेकोटीयज्ञापाशी ज्याला स्थानिक भाषेत अलाव किंवा कोणा म्हणतात तेथे थांबून शेककर्म आणि चौकशी दोन्ही केले . हे आलाव किंवा कोणा आम्हाला पुढे दिवसभर रस्तोरस्ती पहायला मिळत होते आज थंडीचा कहर होता दुपारच्या बारा वाजता शेकणारी माणसं पहाताना मजा वाटत होती . आजचा आमचा प्रवास गावागावातून सुरु होता , गावातील घरांसमोरील आंगण खास बुंदेलखंडी शैलीत रंगविलेले , कुठे दारात छोटी फुलझाडं , निटनेटका आवार, सौंदर्यपूर्णतेने रचलेल्या शेणगोवऱ्या आणि मधे सुबक छोटेखानी घर, सहजतेतून सौंदर्याचे याहून छान दर्शन होणे दुर्मिळच !



परेथा गावाचा खास उल्लेख करणं गरजेचेच , गाव साधारण दिड किमी लांबीचे , वेडावाकडा जाणारा अरुंद रस्ता त्याच्या दुतर्फा विशेष अशा निळ्या आणि तपकिरी रंगाने रंगविलेली दाटीवाटीने उभी असलेली छोटी छोटी घरें , हापशावर जमा झालेली कुडकुडत आंघोळीच्या तयारित असलेली अर्धनग्न उघडी नागडी उझनभर पोरं ! हे सर्व पाहून मला डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या चाणाक्य मालिकेची आठवण झाली . सकाळ पासून आम्ही चहाचे अर्घ्य एकदाच टाकले होते म्हणून गावात चहाच्या टपरीविषयी विचारले तर आमच्या गावात चायटपरी नाही असे आत्मविश्वासपूर्ण उत्तर मिळाले . गाव तसं खाऊन पिउन सुखी समृद्ध दिसत होते तरीही चहा , नाष्टा विकणारी दुकानं नाहीत ही कल्पनाच माझ्या मनाला भुरळ घालून गेली . पुढे घुटई गावात एका टपरीवर गरमागरम कुरकुरित भजी, पेरू टोमॅटो मिरची यांपासून बनविलेल्या पातळसर पण चटकदार चटणी सोबत खाल्ली चायबारी केली आणि मार्गस्थ झालो . रगौली तिराहा वर डावीकडे वळून जैतपूर दिशेने वाटचाल सुरू ठेवली . झांशीहून निघाल्या पासूनचा सर्व भाग हिरवागार आणि शेतीप्रधान असल्याचे जाणवंत होते तसेच गावोगावी प्रचूर मात्रेत गोधनही पहायला मिळाले . गुरं ढोरं मेल्यावर गावाबाहेर टाकतात ती कुजु लागली की एक विशिष्ट दुर्गंधी आसमंतात पसरते ती अनेक वर्षांनी अनुभवली. माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. गावात अशी गुरं टाकण्याची ठराविक जागा असे , तिथे मेलेल्या गुरांवर गिधाडं , उनाड कुत्री , कोल्हे , कावळे, डुकरं आपापल्या वकुब आणि कौशल्याप्रमाणे ताव मारत आणि किडे मुंग्या उर्वरित काम आटोपून एक सृष्टीचक्र पूर्ण करित..


जैएतपूर मधे छत्रसाल राजांचा एक विस्तीर्ण किल्ला आहे तो पूर्णपणे दुर्लक्षित आहे किल्ला एका मोठ्या तळ्याच्या काठावर बांधला आहे . गावात छत्रसाल यांची भग्न गढी रानीमहल, जिथे मस्तानी राहिली होती तो पाहिला आणि महोबाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. लाडपूर गावात अजयने एका आश्रमाचा फलक पाहिला आम्ही लगेचच आत दाखल झालो . जय गुरुदेव आश्रमचे बाबाजी दिलदार होते संपूर्ण आश्रम परिसर स्वच्छ ठेवला होता . कांदा , टोमॅटो , मिरची , फ्लॉवर इ भाज्यांचा निटनेटका मळा , झेंडू इ फुलझाडं लावून सुशोभित केला होता खबरदारी म्हणून बुजगावणीही लावली होती आणि एका मडक्यावर ' बुरी नजर वाले तेरा मुँह काला ' लिहायला देखील विसरले नव्हते ! एकुणात वातावरण प्रसन्न होते . बाबाजींनी डाल, चावल ताज्या मिरच्या , टोमॅटो कोथिंबीर दिली ; अजय मधील महाराज जागा झाला . चुल शिलगावून अजयने घरुन आणलेल्या तुपाची फोडणी करून फक्कडशी खिचडी बनवून पोट फुटेस्तो खाल्ली आणि आठ पूर्वीच शुभ रात्री म्हटले.



बुंदेलखंडचे काश्मीर !

लाडपूरहून सकाळी निघालो , अजयला सुपा गाव पहायचे होते त्या गावातही जुन्या गढी वजा वास्तू पहायला मिळतात काही स्थानिक लोकांसोबत संवाद साधून आम्ही पुढे निघालो . आजही खूप थंडी होतीच त्यामुळे चहाची आवर्तनं सुरु होती . पुढे जुदेव राजवंशाचे एके काळचे चरखारी स्टेट मधे प्रवेश करताना चहुकडे मोठाली तळी दिसली . संपूर्ण गाव या तळ्यांवाटोळे वसलेले असावे . म्हणूनच बहुदा या नगरीला काश्मीर म्हणत असावेत . गावात एक मोठा किल्ला आणि राजवंशाचा महाल आहे त्यांचे लांबूनच अवलोकन केले . रस्त्यात महोबाच्या नाक्यावर एका चहाटपरी वर गप्पा रंगल्या, स्थानिकांनी आलाउदल की नगरी महोबाची महति सांगीतली गावातील पूरातन कीरथ सागर तलाव कीर्ती बर्मन राजांने बांधला आहे अशीही माहिती दिली . चहा ढोसून आम्ही आमच्या सायकली नवव्या शतकातील रहिलिया सूर्यमंदीराकडे वळविल्या . उत्साही मंदीर रखवालदार श्री ब्रिजलाल यांनी त्यांच्या परिने मंदीराची माहिती दिली आणि शेजारीच असलेलं पुरातन रामकुंडही दाखविले. एवढ्या जुन्या काळातील स्थापत्यकला पाहून भारावून जायला होतं . आमचा सगळा प्रवास उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर्ती भागात होता त्यामुळे सतत दोन राज्यांत तळ्यात मळ्यात सुरु होते . चार पाच वर्षांपूर्वी दिवसात फक्त सहा ते आठ तास वीज उपलब्ध असणाऱ्या उत्तरप्रदेशात वीजेवर चालणारी तीन चाकी वाहने सर्रास दिसत होती.

छत्तरपूर येथील महाल , धुबेला येथील राणी कमलापती यांचे स्मृतीस्थळ , मस्तानीमहाल , संग्रहालय , श्रीकृष्णप्रणामी मंदीर सर्व प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखे आहे .

खजुराहो मधील वारसास्थळे तीन भागात विभागली आहेत , चौसष्टयोगिनी मंदीर सर्वात पुरातन मंदीर आहे . खजुराहो मधील मंदीरांची भव्यता , सौंदर्य याविषयी लिहिण्या इतकी माझी लेखणी समर्थ नाही . मी एव्हढच म्हणेन ज्या व्यक्तींना भारतीय संस्कृती, कला , परंपरा , वारसा यांबाबत आस्था, श्रद्धा असेल त्यांनी एकदा त्याजागी जावून नतमस्तक व्हावे !



अचंबित करणारे ओर्छा

ही भ्रमंती करण्यास मेहेंदळे कुटुंब निमित ठरले हे मी आधीच लिहिले आहे , शर्वरी खास करून ओर्छाविषयी भरभरून बोलत असे ते गृहीत धरूनही तेथील वारसास्थळे पहाताना मी आणि अजय दोघेही अचंबित झालो . रामराजा मंदीर त्यामागील स्थानिक लोकभावना , चतुर्भूज मंदीर , तेथील राजवंशांची स्मृतीस्थळं -छत्रीसमुह या सर्वांविषयी लिहायला शब्द अपुरे पडतील . राजघराण्यांचे राजवाडे फिके पडतील अशी भव्यदिव्य , कलाकुसरीने नटलेली , स्थापत्यशास्त्राचा कळसाध्याय लिहिणारी स्मृतीस्थळं आणि मंदीरं भारताच्या समृद्ध वारशाची द्योतक आहेत . विशेष उल्लेख करावा वाटतो तो, साधारण गरुडाच्या आकाराशी साधर्म्य असणारे लक्ष्मीमंदीर, स्थापत्य अचाटच पण यामधील चित्रं पाहून दिग्मूढ व्हायला होते.

जाता जाता एक किस्सा
चूझी चोर !

माझ्या सायकलच्या हँडलबारवर लावण्यासाठी दोन कप्पे असणारा एक पौच बनवून घेतला आहे . शक्यतो तो पौच मी काढत नाही कारण .त्यातील एका कप्यात आम्हा भटक्यांना केव्हाही लागणाऱ्या वस्तु असतात . बरी वाईट फडकी , सुतळी , दोऱ्या , रबरबँड , प्लास्टिकपिशव्या या सगळ्यामुळे कप्पा चांगला भरलेला असतो . पुण्यात अुतरल्यावर सामानाच्या बोगीतून आमच्या सायकली ताब्यात घेतल्या, माझे लक्ष सहजच पौच कडे गेले , दोन्ही कप्प्यांच्या चेन्स उघड्या दिसल्या मी आत हात घालून पाहिले तर कप्पा रिकामा . खरंतर मला धक्का बसला कारण हे असे प्रथमच घडले होते , क्षणात मनात वीज चमकली म्हटलं यातील वस्तू सर्वसाधारणपणे निरुपययोगी आणि क्षुल्लक आहेत ज्याने हात मारलाय त्याने तिथेच फेकून दिल्या असाव्यात . माझी शंका रास्त होती , मी धावतच बोगीत शिरलो तर खरंच माझी मालमत्ता खाली फेकलेली होती मी गुमान सर्व गोळा केले आणि पौचात भरून टाकले .
चोर पण चुझी झालेत !



इष्टापत्ती

आमच्या संपूर्ण प्रवासाचा आवाका पहाता आम्हाला सायकल्स वेळेवर मिळाल्या नाहीत ही एक प्रकारे इष्टापत्तीच ठरली . संपूर्ण प्रवास सायकलने पूर्ण करता आलाच नसता आणि सायकल सोडून गाडीचा प्रवास करणे जिगरबाज अजय जु ना पटलेच नसते म्हणजे आमची परिस्थिती सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी झाली असती .

कृतज्ञता

प्रथम कुटुंबाप्रती कृतज्ञता ! बुंदेलखंड परिसरात फिरल्यावर भारताच्या भव्य दिव्य आणि समृद्ध वारशाची प्रचिती पुन्हा एकदा आली. ही सर्व प्रचंड आणि अतुलनीय कलाकुसरीने नटलेली वारसास्थळे निर्माण करणाऱ्या अनामिक कलाकार , कारागिरांना कोटी कोटी प्रणाम !































चला वाचूया .....Let's start reading.

सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom

पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे  लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...