अंबाजोगाई प्रसन्न !
सौ गौरीच्या आग्रहाखातर अंबाजोगाई, परळी, तुळजापूर, अक्कलकोट अशी तीर्थयात्रा घडली. जाता येता पुणे सोलापूर महामार्गावर गाडी चालविण्याचा आनंद लुटत असतानाच या रस्त्यावर सायकल दामटण्याची स्वप्न पहात होतो. तीर्थयात्रे दरम्याने, माळीनगरचे आमचे मित्र विशाल बोरावके यांची भेट झाली नव्हती, त्यांनाही भेटण्याची इच्छा होतीच. शेवटी महिनाभराने अंबाजोगाईच्या कृपेने योग जुळून आलाच, नेहमी प्रमाणे सुयोग्य संधी साधून गृहलक्ष्मीकडून होकार मिळविला आणि भ्रमंतीला मुहूर्त मिळाला.
भुरळ पाडणारे भुलेश्वर मंदीर
विवेक, अजय असे मित्र आणि पाळंदे सरांसारखे गुरू यांचेमुळे फिरस्ती दरम्यान इतिहास, वारसास्थळे धुंडाळण्याचा क्षीण प्रयत्न करत असतो. प्रवास ठरविल्यापासून भुलेश्वर डोक्यात होतेच, येनकेन प्रकारेण मंदीर परिसर गाठला आणि कोरिव काम पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. दगडावरील सूक्ष्म आकाराची सुबक कारागिरी पाहून अचंबित व्हायला होते. मंदीर परिसर डोळे भरून पाहिला आणि आगेकूच सूरू केली. सकाळी वातावरण अल्हाददायक होते परंतू दुपारी उन्हाचा चांगलाच तडाखा बसत होता, त्यामुळे दुपारी थोडावेळ विश्रांती घेतली.
वसति ठिकाण निश्चित केले नव्हते म्हणून संशोधन सुरू केले, कुरकुंभ पुढे एक लॉज पाहिले पण शुल्क आणि दर्जाचा मेळ बसत नसल्याने पुन्हा सायकल हाती धरली. देवाजीच्या मनात मला मोफत सुविधा करून देणेचे होते. काळोख झाला होता त्यामुळे तातडीने सोय करणं गरजेचंच होतं. नशिबाने थोडं पुढे गेल्यावर राजस्थान शुध्द शाकाहारी धाबा दिसला, उत्साहात आत शिरलो. समोरच्या कट्टयावर दोन चुणचुणीत तरुण बसले होते, त्यांना माझा इरादा सांगीतला. "साब हमारे यहा कुछ सुविधा नही है" , असं ते म्हणाले पण त्यांचं मन मला मदत करण्याकडे झुकलंय असं मला जाणवलं. मी नेहमीची ध्वनीफीत वाजवली, "मेरे पास सब है, आप कुछ मत दो, उस कोने बस जगह दो" वगैरे वगैरे .... मुलगा म्हणाला मालिक को पुछके बताते है. विचारून परत येताना लांबूनच मला थम्स अप करून दाखवलं त्याचा चेहराही खुलला होता. क्षणभर मी ही आश्चर्यचकीत झालो, माझी व्यवस्था व्हावी असं त्यांना मनापासून वाटत होतं हे खरंच. बैठक व्यवस्थेमागे एक खोलीवजा जागा होती तिथे पथारी लावायाला मला अनुमती मिळाली. कांदे, बटाटे ई. वाळत घालण्यासाठी कडाप्याचे कप्पे केलेले दिसले त्याचा ताबा मी घेतला.
फक्कड शेवभाजी आणि कुरकुरित रोट्या यांचावर ताव मारत मुलांबरोबर गप्पा मारल्या आणि निद्राधीन झालो, विशेष म्हणजे धाबामालक मराठी होता.
इंडिया दॅट इज भारत
नेहमीच्या सवयीप्रमाणे साडेचारला उठलो, शरीरकर्म आटोपून चहाची फर्माईश केली. मी झोपलो त्यावेळी धाबापरिसर रिकामा होता पण अत्ता मात्र ट्रक्सची गर्दी होती. चहा पिताना मालकांशी गप्पा रंगल्या, त्यांनी माझ्या पायातील CTR बुटांचे कौतुक केले, त्यांना किमतीचीही कल्पना होती हे ऐकून मला आश्चर्यच वाटले. गप्पांच्या ओघात, ट्रक्स उभे करण्याचे वीस रुपये घेतो ही माहिती देखील मिळाली.
मित्रमंडळ
यवत पासून पुढे, या महामार्गाचे कडेने चांगल्या दर्जाचा सर्विस रोड आहे, ज्याचा आनंद इंदापूर पर्यंत घेतला. खडकी नंतर भिगवणजवळ थोडावेळ रेंगाळलो, रस्त्याशेजारील प्रचंड जलाशयामुळे वातावरण आल्हाददायक वाटत होते. अचानक एक सायकलस्वार भेटला, समव्यसनी असल्याने गप्पा झाल्या, फोटो रिमुव्ह केले, भ्रमणध्वनी क्रमांकाची देवाणघेवाण करून औदुंबरची रजा घेतली. आता लक्ष्य माळीनगर होते, वाटेत एका धाब्यावरील पाण्याच्या सोयीचा फायदा उठवत आंघोळ उरकून ओल्या कपड्यानीच इंदापूर जवळ अकलूज बायपासला सायकल वळविली. दुपार झाली होती त्यामुळे उन कडक होतं शिवाय इंदापूर अकलूज रस्त्यावरील छोटे छोटे बरेच चढउतार ! दमछाक झाली. वाटेतून बोरावकेंना फोन करून सुखद धक्का दिला, त्यांनी सूचविल्याप्रमाणे भेटण्याचे ठरविले. दरम्याने मी रस्त्याशेजारील शेतात एका मोठ्या चिंचेच्या झाडाखाली पथारी टाकून ताणून दिली. ताजातवाना होवून अकलूज, मग माळीनगर साखरकारखान्यातील शंकर महाराज मंदीर दर्शन घेतले. तिथे आलेल्या वारकरी अजींच्या हस्ते भला मोठ्ठा हार घालून माझं हृद्य स्वागत केलं गेलं, मी भारावून गेलो. बोरावकेंच्या घरी परिवाराने नेहमीप्रमाणेच प्रेमादराने स्वागत केलं आणि रात्री सुग्रास भोजन झालं. शेवटच्या क्षणी बोरावकेंना कळविल्यामुळे मित्रपरिवाराच्या भेटीगाठी ठराविता आल्या नाहीत म्हणून ते थोडे नाखुश होते. तरीही डॉ भोंगले, युवा उद्योजक पृथ्वीराज यांची भेट झालीच. पृथ्वीराजने शिंदी लागवड आणि नीरा, गुळ प्रक्रिया केंद्र पहाण्याचा आग्रह केला पण वेळेअभावी ते शक्य झालं नाही.
परतीच्या प्रवासात, पंढरपूरसायकल फेरी दरम्यान भेटलेल्या शहाजी खंडागळेंना भेटायची इच्छा होती. सकाळी माळशिरसहून फोन केला असता ते वालचंदनगर येथील कॉलेजवर शिकवत असल्याचे त्यांनी सांगीतले. मोर्चा नातेपुते मार्गे वालचंदनगरकडे वळविला, ठरल्याप्रमाणे बाराच्या दरम्याने बसस्टँड जवळ पोचलो. स्टँड म्हणजे नुसतीच मोकळी जागा, धड शेडही नाही एकुणातच वालचंदनगर बाबत माझा भ्रमनिरास झाला. एके काळी उद्योग आणि साखर कारखान्यामुळे गाजलेल्या गावावर अवकळा पसरल्या सारखं भासलं, मला दुःख झालं. खंडागळे सोबत चपाती, बटाटा आणि मेथीच्या भाजीचा, सहभोजन करून आस्वाद घेतला. स्वतःच्या शेतातील सेंद्रिय भाजी आणि चुलीवर शिजविलेलं अन्न म्हणजे दुग्धशर्करा योगच. खंडागळे पिरळे गावात सेंद्रिय शेतीची कास धरून खिलार जातीचे गोधन पाळतात. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, शेतीमधील दहा गुंठे ज्वारी पीक, पक्षांकरिता राखून ठेवतात, निसर्गप्रेम याहून वेगळं नसावं.वालचंदनगर कडून महामार्गाकडे येताना दुतर्फा प्रचंड द्राक्ष लागवड पहावयास मिळाली, एका बागायतदाराने दिलेली द्राक्षं खावून तृप्त झालो.
दुपारच्या उन्हातून सायकल हाकत हायवे गाठला, सर्विस रोड पकडून भिगवण पर्यंत आलो मानस पॉईंट जवळ रेंगाळलो, थोडी तरतरी आल्यावर निघालो. निघताना सवयीप्रमाणे हवा पाहिली, मागील चाकात हवा कमी होती. नशिबाने गाव जवळच होतं, भिगवण मधील शांताई सायकल मार्टच्या महेशने त्वरित आणि उत्तम सेवा देवू केली, गप्पा झाल्या, पुनर्भेटीचे आवतान घेवून निघालो. वाटेत पुन्हा एकदा धाबा झिंदाबाद करून आंघोळ उरकली आणि ओलेत्यानेच स्वार झालो. निघाल्यापासूनच शेवटच्या दिवशी कमीत कमी अंतर सायकलिंग करिता राखायचं असं ठरवलं होतं कारण पुण्याच्या वहातुकीचे चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान समोर होते. मनात आज यवत गाठून मुक्काम करायचा ठरविले होते पण काळोख होण्यापूर्वी पोचणे अशक्य होते, आणि काळोखात हायवेवर सायकल चालविण्सयाचे साहस मला करायचे नव्हते. सर्व गणितं मांडून शेवटी थोडे अंतर गाडीचा आसरा घेवून कापण्याचे ठरविले. सुदैवाने एका सद्गृहस्थांनी टेंपोमधे घेतले आणि पंचविसतीस किलोमीटरवर चौफूल्यावर सोडले. पुन्हा एकदा सायकलवर स्वार होवून आठचे दरम्यान हॉटेल गाठले.
पहाटे उठून थंडगार हवा आणि सुळसुळित रस्ता यांचा आनंद घेत साडेअकरा दरम्याने घर गाठले. सौं ची संमती आणि मित्रपरिवाराचे सहकार्य यामुळे आणखी एक सफर सुफल संपन्न झाली.
धन्यवाद !
आठ ते अकरा फेब्रुवारी विसशे बावीस