Saturday, 2 October 2021

इंदूर इलाख्यात इच्छापूर्ती ! Cycling Around Incredible Indore !

 

 

इंदूर इलाख्यात इच्छापूर्ती

नकटीच्या लग्नाला सतरा विघ्नं !

तीन वर्षांपूर्वी मेघालयातील अविस्मरणीय सायकलसफरी नंतर आमचं त्रिकुट एकत्र आलं नव्हतं. मी आणि विवेक एकमेकांना सततच भेटतो पण सचिन नायडूचा योग सहसा येत नाही. सचिनच्या मनात पुन्हा एकत्र सायकलिंग करण्याचे घोळत होते,  माझ्या मनात उत्तराखंड होते. एक दिवस सकाळी विवेक आणि सचिन आंगण्यातील कॅफेवर- कॅफेविषयी कधीतरी लिहेन, हजर झाले. सचिन साधारण अभ्यास करून आला होताच त्यामुळे जुजबी चर्चा करून रेल्वे टिकीट्स बुक केली, बारा ऑगस्टला जायचं आणि सत्ताविसला परतायचं. आमच्या गृहलक्ष्मी घरी नव्हत्या आणि त्यांना पूर्वकल्पनाही दिलेली नव्हती त्यामुळे मनात थोडी धाकधुक होतीच. झालं तसंच, काही घरगुती अडचणींमुळे मला बारा तारखेला जाता येणार नाही हे पक्कं झाल्यावर आणि ट्रेन साप्ताहिक असल्याने मी गुपचुप एकोणिस तारखेचं माझं तिकीट काढून ठेवलं आणि संधी साधून होकार मिळविला. पण देवाजीच्या मनात काहीतरी औरच होतं, बारा तारखेला विवेक आणि सचिनला रेल्वे स्टेशनवर अलविदा करून घरी आलो आणि सर्दी, ताप सोबत असह्य अंगदुखीने पुरता गळून गेलो. तीन चार दिवस असेच गेले तरीही मी आशा सोडली नव्हती पण बायकोने नकाराधिकार वापरल्याने माझी स्वप्नं धुळीस मिळाली. शिंक येता येता थांबल्यावर जशी अवस्था होते तशी माझी अवस्था झाली. घुसमट काही संपेना, मग ठरवलं चलो इंदूर ! घुमेंगे, फिरेंगे, खाएंगे ऐश करेंगे और क्या...तारखा ठरल्या १८ ते २७ सप्टेंबर !


सायकल वहातूक

परप्रांतात अथवा आपल्या ठिकाण्यापासून दूर जावून सायकलिंग करण्यात एक वेगळी मजा असते. अनोळखी प्रांत, माणसं, वेगळं राहणीमान, विशिष्ट खाणंपिणं हे सर्व अनुभवणं खूप मजेशीर असतं. हे सर्व तिथे पोहोचल्यावरच अनुभवू शकतो आणि याकरिता आपली सायकल अत्यावश्यक !

दक्षता आणि काळजी

रेल्वेमधून सायकल न्यायची असल्यास काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.

१) गंतव्य स्थान शक्यतो असे निवडावे जे ट्रेनचे शेवटचे स्थानक असेल, यामुळे सायकल उतरविण्यास   पुरेसा वेळ मिळतो
२ ) रेल्वेमधून आपली सायकल सामान्यपणे दोन प्रकारांनी नेता येते.

अ ) पार्सल सेवा
)  लगेज सेवा

मुद्दा
पार्सल म्हणून नोंदविल्यास त्याचे शुल्क कमी असते पण सायकल तुमच्या सोबत तुमच्याच ट्रेनमधून येईल याची खात्री नाही.
मुद्दा
सायकलचे पार्सल ताब्यात घेण्यासाठी स्टेशनवरील पार्सल ऑफीस सुरु असणे अत्यावश्यक आहे, या उलट तुमचे लगेज तुम्हाला चोविस तास केव्हाही ताब्यात मिळू शकते.

या दोन्ही गैरसोयी टाळण्यासाठी सायकल नोंदविताना ती लगेज (लगेज तिकीट) म्हणूनच नोंदविली जात आहे ना याची खात्री करावी.


मुद्दा

कागदपत्रं

आधार आणि तिकीट यांच्या प्रत्येकी दोन छायाप्रती. एक संच सायकल नोंदविताना लागतो, दुसरा संच सायकल ताब्यात घेताना लागतो.
सायकल नोंदविण्याचा फॉर्म पार्सल ऑफीस मधे मिळतो, यावर प्रामुख्याने :
पत्ता (परत येताना लॉजचा पत्ता लिहावा )
आधार क्रमांक
मोबाईल क्रमांक
सायकलचे वजन अंदाजे ( शुल्क चाळीस किलोचेच आकारतात )
स्टेशन : कुठून - कुठे
PNR
क्र
इ माहिती लिहावी लागते.
मुद्दा
रेल्वे सुटण्याच्या वेळेपूर्वी दोन तास जावून सर्व औपचारिकता पूर्ण कराव्या. सायकलच्या सीटला पांढरं किनतान बांधावं ज्यावर लगेज रिसीट नंबर इ माहिती तेथील कर्मचारी नोंदवतात. आपण आपल्या सोबत मोठा पर्मनंट मार्कर बाळगल्यास उत्तमच ! आपल्या रेल्वे मधे सामान कोण लादणार आहे याचा शोध घेवून त्या व्यक्तीशी चांगलं 'नातं' विणावं.

मुद्दा
रेल्वे सुटण्या पूर्वी सतर्क राहून आपली सायकल सामान बोगीत लादली जात आहे ना याची प्रत्यक्ष खात्री करुन मगच प्रवास सुरू करावा.
या सर्व सजगपणा नंतरही अडचण येवू शकते कारण दोन्ही ठिकाणी अकुशल, अप्रशिक्षीत मनुष्यबळाशी आपल्याला देवाणघेवाण करावी लागते याची सतत जाणीव ठेवावी.


वचने किं दरिद्रता !
.
इंदूर इलाख्यात फिरणं हे कमजोर हृदय असणाऱ्याचे कामच नाही, लोकं इतक्या फुशारक्या मारत असतात कि आपल्यामधे सतत न्यूनगंडाची भावना निर्माण होत रहाते. एक दोन उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल. कोणाही व्यक्तीशी आपला संवाद रंगला की त्याच्या वल्गना सुरु,  अपने शर्माजी अरे विधायक, हफ्ते में दो तीन बार लाला की पान की दुकानपर मिलते है I मामाजी ( मुख्यमंत्री शिवराजसिंग ) अपने भाई के जीप में ही घुमते है | मोदीजी जब भी यहाँ आते है तो हमारे चचा उनके साथ ही होते है | अशी वाक्य सर्रास कानावर पडतात. एखादा हिरो भजांच्या गाडीवर भजी खायला आल्यावरचा रुबाब - अबे थंडी भजीयाँ बेचता है असं म्हणत दोन भजी तोंडात टाकणार तो बिचारा ठेलावाला विनवतो नही साब अभी अभी तो निकाली है, मग साहेब पुन्हा गरजणार बांध दो दस की !
रुबाब असा की अख्खी हातगाडी खरेदी करायला आलाय आणि भजी घेणार दहाची.
माझ्यासारख्या तोलून मापून खाणं पिणं, बोलणं, रहाणीमान असणाऱ्या कोकण्याला हे झेपवणं जरा कठीणच पडतं.


वाखाणण्याजोगं इंदूर !

एकेकाळी 'बिमारू' राज्यात गणलं जाणारं मध्यप्रदेश राज्य झपाट्याने प्रगति करत आहे. राज्य असो वा देश, शहरे ही प्रगतीचा आरसाच. स्वनिर्भर एकल सायकलसफरी निमित्त पुन्हा एकदा इंदूरदर्शन झाले.
पंधरा वीस वर्षांपूर्वीची इंदूरची प्रतिमा ज्यांच्या डोळ्यासमोर असेल त्यांनी एकदा या शहराचा फेरफटका मारावाच. स्थानिक नागरी संस्था आणि राज्य सरकार यांनी ठरविले तर शहराचा कायापालट कसा होवू शकतो याचं उत्तम उदाहरण इंदूर ! अन्य काही शहरे असतीलही पण.....
स्वच्छ सुंदर रस्ते, स्वच्छ सराफा आणि पदपथ, रस्त्याच्या दुतर्फा छान सुशोभीकरण आणि सुसंचालित BRTS बसव्यवस्था.  आयसिंग ऑन केक : BRTS मार्ग सकाळी आठ पर्यंत फक्त आणि फक्त सायकलस्वार आणि पादचाऱ्यांकरिताच मोकळा. काही बेशिस्त वाहनचालक डोकेदुखी ठरतात पण एकुणात सुखद अनुभव !


सायकलिंग सुरु

गेल्या काही वर्षात भारतात स्वच्छता ही गरज असल्याची जाणीव बऱ्यापैकी रुजत आहे. भारतीय रेल्वे देखील त्याला अपवाद नाही, याचा प्रत्यय रेल्वे स्टेशनवर प्रवेश केल्यापासूनच येतो असो,
इंदूर स्टेशनवर सव्य अपसव्य करून सायकल ताब्यात घेतली आणि भंवरकुआ भागातील इंद्रपुरी सोसायटी गाठली. सौं च्या आत्याबाईंकडे न्याहरी चायपान करून धारच्या दीशेने मार्गक्रमण सुरू करण्यास जवळपास साडेअकरा वाजले. नशीबाने आज वरुणराज अवतरले नव्हते, गेले काही दिवस सतत खूप पाउस झाल्याचे कानी पडले होते. हवेत खूप आर्द्रता जाणवत होती, भर दुपारचे उन आणि सतत समोरून येणारा जोरकस वारा यामुळे सायकलिंग कष्टप्रद वाटत होते. इंदूर सोडल्यापासून अव्याहत पेडलिंग सुरू होते, डोळ्यांना चढ दिसत नव्हता पण दमछाक होत होती. वाटेत एका तलावाच्या काठावर छोटाबेटमा गावात शासकीय पक्षी निरिक्षण केंद्राचा फलक दिसला पण रवीवार असल्याने ते बंद होते. तलावावर गणेश विसर्जनाची लगबग पाहून आनंद मिश्रित आश्चर्य वाटले, आपण महाराष्ट्रीयन बाप्पावर आपली एकाधिकारशाही असल्यासारखेच मानतो.


सर्व धाब्यावर

प्रतिकूल परिस्थितीत सायकलिंग करून दमायला झाले होते. धारमधे आश्रम, धर्मशाळा या विषयी जुजबी माहिती नेटवरून मिळविली होती पण धार तसं अजून दूर होते. दुपारचे तीन साडेतीन वाजले होते मी काही आसरा मिळेल का अशा शोधातच होतो, भूकही सडकून लागली होती. कलसाडा खूर्द गावात राजकमल धाबा दिसला आणि मी चाकं तिकडे वळविली. मला तिखट खाणं झेपत नाही म्हणून बिनतिखट शेवभाजी मागविली, त्याने दुधातील शेवभाजी हा पर्याय सांगीतला मी तो मान्य केला. हायवेवरील टिपीकल धाबा होता, इतस्ततः टाकलेल्या खाटा, काहीसं अस्वच्छ वातावरण, समोर ट्रक्स उभे करण्यासाठी ऐसपैस मोकळी जागा जी पाउस पडल्यामुळे चिखलवट झालेली, मोकळ्या जागेच्या एका कोपऱ्यात पाण्याचा हौद आणि त्या शेजारी दोन तीन अस्वच्छतागृह. एकुणात कणखर मनाच्या माणसाकरिता आसऱ्याची सोय मी मागविलेले खाद्य खात असताना शेजारीच बसलेल्या मुलचंद शेटचे औत्सुक्य जागृत झाल्याने त्यानी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली, मी यथाशक्ती उत्तरेही दिली. माझ्या मनात मात्र आसऱ्याचं जुगाड जमवण्याचा विचार घोळत होता मी मधूनच तसे फीलर्स देत होतो. मुलचंदशेट त्या जमिनीचे मालक होते त्यांनी ती जागा धाबावाल्याला भाड्याने दिली होती. शेट स्वतःहूनच म्हणाले तुम्ही थकला असाल तर इथेच रहा, रात्रभर येथे ट्रक्स येत जात असतात तुम्हाला कोणताही धोका नाही, माझं काम झालं. मी उपलब्ध सोयींचा वापर करून आंघोळ, कपडे धुणे इ क्रियाकर्म आटोपली आणि एका खाटेचा ताबा घेतला. धाब्यावर ट्रकवाल्यांचा राबता सततच सुरु होता, धाबा चालक आणि येणारे ग्राहक अगम्य हिंदी भाषेत एकमेकांशी समरसतेने गप्पा मारत होते जणू रोजच्या बैठकीतील दोस्तच असावेत. धाबा मालकाला माझ्याकडून पैशांची अपेक्षा नव्हतीच उलट त्यांनीच मला दोनवेळा चहा पाजला. मी सौजन्य म्हणून त्यांना शंभर रूपये देवू केले त्यांनीही ते तितक्याच सहजतेने स्वीकारले आणि मला थोडं ऋणमुक्त होण्याची संधी दिली. झोपण्यापूर्वी मला मच्छरचे मल्हम विचारण्यास मालक विसरले नाहीत याचं मला विशेष कौतुक वाटलं.



फडके आर्ट स्टुडिओ
, धार

सकाळी लवकर उठून साडेपाच-सहाच्या दरम्याने धारच्या दिशेने प्रवास सुरु केला. पावसाळी हवा, वहाणारे थंडवारे आणि झाडांवरील पक्षांचा किलबिलाट अशा धुंद वातावरणात सायकलिंग सुरू होते. खास लक्ष वेधून घेतले ते माझ्या चाहूलिने बेचैन झालेल्या टिटव्या, त्यांची टिवटिव मोबाईलवर रेकॉर्ड करण्याचा मोह मी टाळूच शकलो नाही. धारमधील रस्तेही सुशोभीकरण केलेले सुस्थितीत दिसले, बरेच नागरिक चालण्याचा व्यायाम करत होते मुलं सायकली दामटवीत होती एकुण वातावरण प्रसन्न वाटलं. एक दुकान विशेष लक्षात राहिलं, भोलेनाथ भांग भंडार ! धारमधे उदाजी पवार आणि त्यांच्या वंशजांच्या छत्र्यांचा एक परिसर आहे, बांधकामं देखणी आहेत पण आसमंत अस्वच्छ आणि दुर्लक्षित वाटला. भोजशाळापण आवर्जून पहावी अशी आहे, गढ कालिकामाता मंदीर स्थानिकांचं श्रध्दास्थान आहे त्याचेही दर्शन घेतले. मोर्चा राजवाड्याच्या दिशेने वळविला पण अपेक्षेप्रमाणे काही पहाण्यास मिळाले नाही. महावीर रोडवरील जिलबीवाले शर्माजींकडे खव्याचे गुलाबजाम, पोहा आणि गरमागरम जिलबीवर ताव मारून फडके आर्ट स्टुडिओकडे मोर्चा वळविला. गावाच्या एका टोकाला खंडेराव टेकडीवर हा स्टुडिओ वजा संग्रहालय काहीशा दुर्लक्षित अवस्थेत अस्तित्व टिकवून आहे. मुळचे वसई येथील रहिवासी कलामहर्षी अण्णासाहेब फडके, राजाश्रयामुळे धार येथे स्थायिक झाले. आपल्या आयुष्यात त्यांनी विविध महनीय व्यक्तींच्या अप्रतिम मूर्ती साकारल्या. मूर्तींच्या मूळ छोट्या प्रतिमा कुशलतेने जतन करून दोन दालनांमधे मांडल्या आहेत. अण्णांच्या शिष्य गणांतील दुसरी पिढी   ( Mangesh Deo 7999315176 ) याचे व्यवस्थापन पहातात आणि उत्साहाने सर्व माहितीही देतात. अद्भूत काम पाहून आपण भारावून जातो, धार मधे या ठिकाणाला भेट दिल्याशिवाय धारदर्शन पूर्ण होणारच नाही.



नर्मदे हर !

आज मांडव गाठण्याचे मनात होते पण धारदर्शन पूर्ण करून निघायला तसा उशीरच झाला होता. मी नेटाने सायकलिंग करत होतो, मधेच टपरीवर अमृतप्राशन करून ताजातवाना होत होतो.रस्ता छान आहे      फारसे चढ उतारही नाहीत.एक मोटारसायकलवीर मला ओव्हरटेक करुन पुढे एका झाडाच्या सावलीत थांबला. त्यांचे चलनवलन, देहबोली यावरून माणूस सज्जन असावा असे समजून मीही त्यांचे जवळ जावून उभा राहिलो. त्यांनी आपुलकीने चौकशी केली मीही तितक्याच जवळकीने उत्तरे दिली आणि गप्पागाडी शेवटी नर्मदा मैय्यावर येवून थांबली, विषय माझ्याही प्रेमाचाच त्यामुळे कुंडली जुळली. माझ्या एकुण प्रवासाचा आवाका त्यांना- राधेश्याम पाटीदारना (९६६९८५५७१४ ) आला, त्यांनी आमचा दोघांचा सेल्फी काढला आणि म्हणाले पुढे नालछा गाव लागेल तिथे रामपालकी धाम आश्रम आहे तिथे तुमची सर्व व्यवस्था होईल मी स्वामीजींना फोटो पाठवितो, आज तिथेच रहा आराम करा उद्या सकाळी लवकर निघून मांडू गाठा. मी एकदम खुश झालो त्यांचा संपर्क क्रमांक घेवून त्यांना नमस्कार केला, नर्मदे हर ! नालछा गावाच्या बाहेर दिड दोन किलोमीटर दूर मोठ्या दरीच्या जवळ हा आश्रम वसला आहे. आश्रमाकडे जाणारा मातीचा रस्ता, दुतर्फा पसरलेली शेतं, शांत परिसर, वाऱ्याची मंद झुळुक मन एकदम अल्हादून गेले. समोर दिसणारे निसर्गाचे विलोभनीय दृश्य पाहून ती छबी मोबाईलमधे टिपण्याचा मोह मी टाळूच शकलो नाही. आश्रम परिसरही स्वच्छ होता, एका छोट्या घळीत वहात्या झऱ्यामधे स्नानकर्म आटोपले आणि स्वामींच्या वास्तुत स्थिरावलो. रात्री नेहमीच्या वेळी पूजा आरती झाली मग प्रसाद झाला आणि आम्ही झोपी गेलो. मी उद्या पहाटे लवकर निघणार असल्याची कल्पना स्वामीजींना देवून ठेवली.


मनमोहक मांडू / मांडव

अभ्यंकरकाका, विवेक, अजय यांचे कडून मांडवचं खूप कौतूक ऐकलं होतं. ते तिघेही इतिहास अभ्यासक, कलाप्रेमी आणि निष्णात सायकलपटू, मी सर्वच बाबतीत ढिसाळ पण लुडबुड करायची हौस ! सकाळी निघाल्यावर ज्ञानपुरा गावात पहिली गढी / बुरुज यासारखं जुनं मोठ्ठ बांधकाम दिसलं माझं कुतुहल जागं झालं. पुढे रस्त्यात अधुनमधुन अशी बांधकामं दुतर्फा दिसत होती मला एकदम एखाद्या संस्थानाची वेस असून त्यावरील ही बांधकामं असावित असं भासलं. मांडव मधे शिरताना भव्य प्रवेशद्वारं पार करावी लागतात, या दिशेने खूप नाही पण बऱ्यापैकी घाटही चढावा लागतो. मी सकाळी आठच्या दरम्यानेच मांडूत प्रवेश केला रहाण्यासाठी शोधाशोध सुरु करुन एका हॉटेलवाल्याशी घासाघीस करून खोलीचा अंदाज घेतला पण पैसे खर्च करायला मन तयार होईना. थोडी जीभ चालविल्यावर राममंदीराची माहिती मिळाली, लगेच तिकडे धाव घेतली. तेथील कर्मचाऱ्याला गाठल्यावर एक खोली चकटफू ताब्यात मिळाली. सायकलवरील धोपट्या उतरविल्या आणि मांडू उंडारायला मोकाट सुटलो. लहानमुलांना शाळेतून आल्यावर पाठीवरचं दप्तर फेकून धावत खेळायला जाताना जसं हलकं हलकं वाटतं तसं वाटत होतं.


मांडव तसं उंचावर आहे त्यामुळे थंड हवा , त्यात भुरभुर पाउस आणि सोबत बिना ओझ्याची सायकल म्हणजे आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. दिवसभर उंडारून मांडवमधील एक सो एक भव्य, सुंदर अशी ऐतिहासिक वारसास्थळं पहात आनंदात दिवस घालविला. वाटेत मांडव स्पेशल मांडू इमलीचा (गोरख चिंच = बाओबाब) स्वाद चाखला, त्याची प्रचंड मोठी झाडंही पाहिली. सर्व स्थळांमधे संध्याकाळच्या वेळेस जहाजमहलचं सौदर्य वादातीत. मांडूमधे स्थानिक प्रसिद्ध खाद्यपदार्थ दाल पानियेचा आस्वाद आवर्जून घेतला, मंदीरात येवून स्नान, देवदर्शन करून निद्राधीन झालो.


महाकाय माहेश्वर

सकाळी लवकर चहा ढोसून मांडव सोडलं, आज प्रथमच मनसोक्त उतार अनुभवला, पाच-सात किलोमीटर घरंगळत येताना मज्जा आली. दोन तीन दिवस सलग फक्त सोयाबीनची शेतं दिसत होती आज कापूस आणि ज्वारी पहायला मिळाली. कोकणात रस्त्याच्या दुतर्फा जशी करवंदाची झुडपं दिसतात तशी या भागात सिताफळाची झाडं दिसली, म्हणजे सिताफळ बागायती नसून रानझाडच आहे हे पटलं. प्रवासा दरम्याने पाटीदारांचा फोन आला त्यांनी माहेश्वरमधे मौनी बाबा अथवा शुक्ला यांच्या आश्रमात तुमची सोय होईल अशी उपयुक्त माहिती दिली त्यामुळे मी निश्चिंत झालो. चंदावड चौक, धामणोद इ पार करून माहेश्वरमधील मौनीबाबा आश्रम गाठला. एकूण व्याप पाहून शेकडो परिक्रमावासियांची येथे सोय केली जात असावी असं जाणवलं. आत्ता मात्र तिथे कोणीच नव्हतं ऑल वावर इज अवर अशी अवस्था. एका खोलीत बस्तान मांडून आंघोळी करता नर्मदामैय्या गाठली. किनाऱ्यावरील दगडी, सुबक आणि विस्तीर्ण असे घाटाचे बांधकाम पाहून आश्चर्यचकीत झालो. होळकरांनी भारतभर अनेक तीर्थस्थळांवर पाणपोई, धर्मशाळा बांधल्या आहेत आणि त्या अजुनही कार्यरत आहेत हे ऐकून होतो पण येथील काम अचंबित करणारे आहे. मैय्याच्या पाण्यात मनसोक्त डुंबलो, कपडे खंगाळून तिथेच घाटावर वाळत टाकून सावलीत निवांत मैय्याचे सौंदर्य न्याहाळत बसलो. तास दिड तासात सर्व कपड्यांचे कुरकुरित पापड झाले ते गुंडाळून आश्रम गाठला.


या आश्रमात गेली काही वर्ष अव्याहत रामनाम जप चालतो,
 मीही तासभर मंगलवाद्य वाजवून त्यामधे सहभागी झालो. संध्याकाळी परत घाटावर जावून सुंदर कोरीव काम केलेली मंदीरं, अतिभव्य आणि देखणं बांधकाम असलेला किल्ला, त्या किल्ल्याच्या भिंतींवरील कलाकुसर, किल्ल्यामधील सुबक मंदीरं सर्व वास्तुंचा मनसोक्त आनंद लुटला, छायाचित्रण केले आणि आश्रम गाठला. सायंकाळच्या आरतीमधे भाग घेवून प्रसाद घेवून झोपी गेलो. सायंकाळी घाटावर खूप गर्दी असल्याने मनाप्रमाणे छायाचित्रण जमलं नव्हतं म्हणून सकाळी उठून पुन्हा घाटावर जावून हौस भागवली आणि मार्गस्थ झालो.


नॅट्रॅक्स (National Automotive Test Tracks) : नॅशनल प्राईड 

माहेश्वर सोडून धामणोद मार्गे मुंबई आग्रा रस्ता गाठला. हायवे असल्याने जड वहानांची सतत वहातुक सुरु असते, त्यांचा आवाज, कर्णकर्कश्य हॉर्न, धूर यांचा सामना करत मार्गक्रमण सुरू होते. रस्त्याला सतत थोडा चढ असल्याचे जाणवत होते त्यामुळे थकवाही जाणवत होता, वाटेत दमवणारे दोन घाटही लागतात त्यामुळे मधेमधे थांबत रस्ता कापत होतो. वाटेत गुजरी गावात एका अपंग व्यक्तीच्या टपरीवर चहा पिउन त्याने प्रेमाने दिलेल्या गोळ्यांचा आस्वाद घेत जानापाव कडे जाणाऱ्या रस्त्याच्या नाक्यावर आलो. अल्पोपहार करुन मोर्चा परशुराम जन्मस्थळ-जानापावकडे वळविला. रस्ता छान आणि जंगलातून आहे पण चढ मात्र अमानवी असा खूपच तीव्र आहे. मी सायकलिंग करून थोडा थकलो होतो शिवाय सायकलवरील धोपट्यांचे ओझे यामुळे मला हार मानावी लागली मी माघार घेवून परत फिरलो. मजल दरमजल करत पिथमपूर जवळील पांजरिया गावात शाही धाब्यावर मुक्कामाची वार्णी लावली. धाब्याचे काम सुरू होते चार दिवसांनी त्याचे उद्घाटन होणार होते त्यामुळे ट्रक्सचा तसा राबता नव्हता, माझ्यासाठी उत्तम आसरा होता. स्नानादि कर्म आटोपुन एका खाटेचा ताबा घेतला. जवळच एका शाकाहारी धाब्यावर उदरभरण करून, धाब्यावरील बच्चूं सोबत गप्पागोष्टी करून निद्राख्यान सुरु केले.
जवळच असलेल्या नॅट्रॅक्सला भेट देण्याची आस पहिल्या दिवसापासूनच लागली होती. मित्रमंडळींच्या सहयोगाने तीही इच्छा पूर्ण झाली. नंतर अपूर्ण राहीलेली परशुरामजन्मभूमीची भेट तीन चार मोटारसायकल वीरांसोबतच्या सौजन्य सफरीच्या आधारे पूर्ण केली आणि रात्री पुनः शाही धाब्याचा आसरा घेतला.




EM नाही EBC

आर्थिक जगतात EM ही एक संकल्पना असते Emerging Market म्हणजे उभरता बाजार / देश. इंदूरकडे पाहून मला EBC ही संकल्पना सुचली Emerging Bicycle City . शहरातील जलदबसमार्ग सकाळी आठ पर्यंत बसेससाठी बंद असल्याने सायकल स्वारांची चंगळ ! रवीवार असल्याने वीस पंचविस सायकल स्वारांचे जत्थे लिलया पहायला मिळाले. त्यांचा उत्साह पाहून मन आनंदून गेले. 'आकाशात् पतीतं तोयं यथा गच्छति सागरं |' या उक्ती प्रमाणे सर्व सायकलवीर शेवटी सराफा, राजवाडा या भागात पोहाजिलेबी / कचोरीच्या ठेल्याकडेच वहात येताना दिसले.

इंदूर सायकल सफरीमुळे बरेच दिवसांची इच्छा पूर्ण झाली.














 

 

 

चला वाचूया .....Let's start reading.

सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom

पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे  लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...