Saturday, 3 April 2021

पुणे वाई पांचगणी भिलार वाई Solo Cycling



लैस विथ कॅश ते लेस कॅश

पुण्याहून मध्यकोकणात उतरण्यासाठी मुळशी मधून जाणारा रस्ता गेले तीन वर्ष गाडी चालविण्याच्या परिस्थीतीत नाही. गेल्या काही महिन्यांत त्यात खूपच सुधारणा झाली आहे हे खरं आहे.  मुद्दा हा की आम्हाला नेहमीच वाई महाबळेश्वर या काहीशा लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागे. मुळात महाबळेश्वर किंबहूना थंड हवेच्या ठिकाणांवर असणारे माझे प्रेम, या सततच्या प्रवासामुळे आणखी दृढ होत गेलं. त्यातही पसरणी घाट, आणि पांचगणी ते महाबळेश्वर हा परिसर कायमच मोहीत करतो. या भागातून जाताना शरीर गाडीत असलं तरी मन मात्र कायम सायकलच्या सीटवर बसूनच प्रवास करत असे.

एकला चलो रे

पुण्यात माझे समविचारी मित्रमंडळ असल्याने सायकल प्रवासात नेहमी सोबतीला कोणीतरी असावे असे वाटत असते, गंतव्य ठिकाणापेक्षा प्रवासातील आनंद अधिक महत्वाचा. याही वेळी अनेक जणांशी प्रवासाबाबत विचारविनिमय केला पण शेवटी एकट्यानेच बाहेर पडावे लागले. 

दोन तीन दिवसांचाच प्रवास आणि तोही सुपरिचीत भागात त्यामुळे फार मोठी तयारी करणेची  गरज भासली नाही. असे असले तरी सफर विनाविघ्न पार पाडण्यासाठी किमान आवश्यक तयारी केली. उन्हाळ्याचा फोफाटा लक्षात घेवून सोबत भरपूर पाणी घेतलं शिवाय पाण्यात बरेच खजूर आणि मीठही घातले प्रवासात त्याचा फायदा झालाच.

कॉमन सेन्स इज नॉट कॉमन

शनिवार वीस मार्चला सकाळी सहा वाजता घर सोडलं, हवा अल्हाददायक होती. नवीन कात्रज बोगद्याचा घाट रस्ता नेहमीचा चाकाखालचा असल्याने विनातक्रार बोगदा पार केला. चहाचा मोह टाळून सायकलिंग सुरू ठेवलं. वसुंधरा गुळ प्रक्रिया उद्योगाचा फलक पाहिल्यावर सायकलची चाकं तिकडे वळलीच. गरमागरम ताजा गुळ दिसल्यावर त्याचा आस्वाद न घेणं म्हणजे गुळाचा घोर अपमानच ! घरच्यासाठी एक लिटर काकवी घेवून मार्गस्थ झालो.  पारंपारिक कलाकौशल्य आधुनिकीकरणाच्या रेट्यात चिरडली जाताना पाहून आत्यंतिक दुःख होते पण हायवे शेजारी शेतकरी बाई शेण गोवऱ्या थापतांना पाहून मन प्रसन्न झाले.शिरवळ गावा आधी राजस्थानी पुरोहित धाब्यावर आलुपराठ्यावर ताव मारून पुढे निघालो.



आश्चर्य म्हणजे शिरवळच्या आसपास हायवेला चक्क सर्विस रोड आहे. मी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्विस रोडने जाणं पसंत केलं, मात्र कुठे कुठे या रस्त्याविषयी शंका निर्माण होते. अशाच संभ्रमावस्थेत असताना मी एका मोटारसायकलवीराला हा रस्ता मुख्य हायवेला जावून मिळेल ना असे विचारले. तरूण सहजतेने म्हणाला 'सर्वच सर्विस रोड हायवेला जावून मिळतात'  दुनियेला कॉमन सेन्सच्या गोष्टी शिकविणाऱ्यालाच गुरू भेटला,
'कॉमन सेन्स इज खरंच नॉट कॉमन'  म्हणायची वेळ माझ्यावरच आली. सायकल चालवतानाच आमचं अच्छा टाटा बायबाय झालं !  तो एमायडिसी मधे शिरला. मी एखाद दोन  किमी पुढे गेलो असता तोच तरुण माझा माग काढत आला. माझ्या सायकल प्रवासामुळे त्याचे औत्सुक्य जागृत झाले होते, तरूण इस्लामपूरचा सिव्हिल इंजीनियर होता. माझी फेसबूक, इन्स्टा वरील माहिती त्याला हवी होती म्हणून त्याने मला परत गाठले. एकल सायकलसफरीचा प्रभाव किती आहे हे पुन्हा एकदा जाणवलं 

वाई मुक्काम

भर उन्हातून खंडाळा घाट पार करताना थोडी दमछाक जाणवली. विशेष करून माल वाहतूक करणाऱ्या एखाद्या  महाकाय वाहनामुळे जेव्हा  वहातूककोंडी होते त्यावेळी धूर, इंजिन्सची उष्णता, रस्त्याच्या बाजुचे तापलेले कडे आणि भरीला आपल्या सायकलची मुंगीची गती या सर्वांमुळे घुसमटल्या सारखे वाटते. एकदा घाटमाथा गाठल्यावर सुरुर फाटा, वाई रस्ता केव्हा येतो हे कळत देखील नाही.

वाईच्या दिशेने वळल्यावर लगेचच श्री घाटगे यांचे सदगुरू हँडिक्राफ्ट ( 9881592777)नावाचे दुकान आहे  येथे मातीपासून बनविलेली विविध प्रकारची भांडी आणि इतर कलात्मक वस्तू वाजवी दरात मिळतात.  या  ठिकाणाची माहिती मला शर्वरी मेहेंदळेने  दिली होती, अर्थात पर्सनल गुगल कामी आलं. सायकलवर वाहून नेता येईल एव्हढीच माफक खरेदी करून पुढे निघालो. वाई पर्यंतचा रस्ता सायकलिंगसाठी पर्वणी आहे अर्थात सुट्टीच्या दिवशी भरमसाठ रहदारीमुळे तो तितकासा आनंददायी वाटत नाही.

वाई मधे करंदीकर कुटुंबीय आपल्या  वडिलोपार्जित पुरातन वाड्यामधे घरगुती पद्धतीने रहाणेची सोय करतात हे माहिती होतं एकदा मी जावूनही आलो होतो परंतू रहाण्याचा योग आज जुळून आला. साधी, स्वच्छ रहाण्याची सोय आणि चविष्ट घरगुती जेवण तेही दोन अडिचशे वर्ष जुन्या वास्तूमधे, आणखी काय हवं ?  सायंकाळी नरोत्तम नाना फडणवीस यांच्या मेणवली येथील वाड्यात नतमस्तक होण्याची संधी सोडणं शक्यच नव्हतं. वाडा आणि परिसर दोन्ही छानच आहे, वाडयाची देखभालही केली जाते हे पाहून आनंद झाला. रात्री घाटावर कृष्णाईची आरती अनुभवली, घरगुती सुग्रास भोजनाचा आस्वाद घेवून झोपी गेलो.

पुस्तकांचे गाव भिलार

या मोहिमेतील माझ्या मनातील मुख्य आकर्षण पाचगणी-महाबळेश्वर या रस्त्यावरील सायकलिंग हे होतं, नियोजन देखील त्याच अनुषंगाने केलं होतं. 

पहाटे साडेपाचलाच वाड्यातून बाहेर पडलो हवा खूपच अल्हाददायक आणि थंड होती त्यामुळे उत्साह द्विगुणीत झाला होता. नाक्यावर वाई स्पेशल चहा ढोसला आणि घाट चढण्यास सुरवात केली. थंड हवामान, स्वच्छ सुंदर हवा, मर्यादित वहातुक यांमुळे बारा किमीची चढाई सहजच पार केली. घाट रस्त्याच्या चढाईची तीव्रता देखील कमी असल्याने त्याचाही फायदा झाला. वाटेत वेगवेगळी  झाडं, धायटी, रानजाई सारखी रानफुलं, झाडांमधून डोकावणारा उगवता भास्कर यांची विलोभनीय छबी मोबाईलमधे टिपली. घाटमाथ्यावर  'यारों की याद में'  दोन कप गरमागरम कॉफीचा आस्वाद घेतला आणि मार्गक्रमण सुरू ठेवले.

आमची सौ पुण्यामधे नियमीतपणाने सेंद्रीय फळं, भाज्या खरेदी करत असते. तिच्याच संपर्कातील भिलार येथील एक शेतकरी उमेश भिलारे ( 7385666021) यांचेशी संपर्क करुन त्यांचे शेत गाठले. निर्विष शेती करणे ही खरोखरीच एक कसरत असते, अनेक दृश्य अदृश्य आव्हानांना सामोरे जात हे व्रत पाळावे लागते. माझ्या दृष्टीने असे शेतकरीच खरे सेलिब्रिटी आहेत, त्याच भावनेने उमेशसह स्ट्रॉबेरी पिकासोबत सेल्फी काढला,  त्यांच्या दृढनिश्चयाचे कौतुक करून  निरोप घेतला. परत फिरल्यावर मुख्य भिलार गावातून येताना पुस्तकाचे गाव प्रकल्याच्या मुख्य कार्यालयाला भेट देण्याचा मोह टाळणे शक्यच नव्हते. दालनाला भेट दिल्यावर, शासनाने मनात आणले तर प्रशासन  एखादा चांगला प्रकल्प कार्यान्वयीत करू शकते, याची खात्री पटली.



मी प्रवासाचा आनंद लुटत असताना घड्याळ आपले काम चोख बजावत होते त्यामुळे मला आटपतं घ्यावं लागलं आणि महाबळेश्वर रस्त्याचा मोह टाळून वाईचा रस्ता निवडावा लागला. अर्थात पांचगणी वाई सायकल प्रवास म्हणजे घसरगुंडीवरून घरंगळत खाली येण्यासारखेच आहे. दोन वाजता वाई मुक्कामी आल्यावर आंघोळ करून मी नेहमी ज्याचा आळस करतो ते स्ट्रेचिंगचे धडे गिरवले आणि थोडावेळ विश्रांती घेतली.

मित्र असावा ऐसा

पुण्यात आल्यापासुन  मित्रमंडळ वाढतंच आहे, त्यातही सायकलप्रेमी दोस्त जरा अधिकच. असाच एक सदाउत्साही मित्र म्हणजे विनय तिनईकर !  आमच्या मंडळात तो वयाने लहान आणि लाघवी स्वभावाचा असल्याने आम्ही त्याला गुडबॉय म्हणतो. शनिवारी सुरुर फाट्यावर वळल्यावर  मी विनयला फोन करुन माहिती दिली आणि रवीवारच्या प्रवासाची कल्पना दिली. क्षणाचाही विलंब न करता 'सर मी उद्या तुम्हाला घ्यायला वाईला येतो तुम्ही एसटी बसने येवू नका' असे फर्मान काढले. त्याच्या निःसंदिग्ध आग्रहामुळे माझे बोलणेच खुंटले. लगेचच आखणी झाली आणि रवीवारी चार वाजता वाई स्टँडसमोर भेटण्याचे ठरले.

रवीवारी नियोजित वेळेत विनय हजर झाला पण आमचा अतिउत्साह नडला, होंडा सिटीची डिकी मोठ्ठी असुनही चाकं काढलेली माझी सायकल त्यात मावली नाही.  सायकलचे हँडल सोडवून नाईलाजाने सायकल पुढच्या आणि मागच्या सीट्स च्या मधे उभी केली, चाकं, पिशव्या, खरेदी सामान डिकीत ढकलले. विनयचे दोन मुलगे आणि मी,  मागच्या सीटवर घुसलो आणि परतीचा प्रवास सुरु केला. सायबाच्या थाटात वातानुकुलीत गाडीतून डुलक्या काढत घर कधी गाठले ते कळले देखील नाही.

संपूर्ण प्रवासात एकूण सतरा वेळा पैसे अदा करणेची गरज भासली, त्यातील फक्त दोन व्यवहार नकदीने केले उर्वरीत पंधरा व्यवहार डिजिटल अर्थात कॅशलेस पध्दतीने केले. भीम ऑप कार्यान्वयीत झाल्या दिवसापासून मी प्रयत्नपूर्वक डिजिटल पेमेंटचा आग्रह धरतो, आणि इतरांनाही प्रोत्साहित करतो.

लैस विथ कॅश ते लेस कॅश !

आणखी एक एकल आनंदयात्रा सुफल संपूर्ण झाली.

रामराम

मार्च २०२१














चला वाचूया .....Let's start reading.

सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom

पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे  लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...