Monday, 30 November 2020

Solo Cycling In Karnataka कर्नाटक एकल सायकल सफर


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इथे या ठिकाणी !


सात आठ महिने घरी बसल्याने त्यामधेच आनंद शोधायला शिकलो पण माणसाचा मूळ स्वभाव जात नाही. बरेच दिवस 'कुछ करते है' अशी खुमखुमी येत होती, त्यातच मित्र विवेक मराठे हळूच कोस्टल कर्नाटकची सायकल सफर करून आल्याने बेचैनी आणखी वाढत होती. माझी ही पहिली एकल आत्मनिर्भर सहल होणार अशी लक्षणं दिसत असल्याने मनात थोडी धाकधुक होती. कुठेतरी जायचं हे नक्की होतं पण कुठे? हा प्रश्न होताच. आमचं आवडतं राज्य म्हणजे कर्नाटक ! पण त्यातही नेहमीचे भाग टाळून जाण्यायेण्यास सुकर असा इलाका निवडावा या विचाराने मार्ग ठरविला,
पुणे- कुरुंदवाड -वाडी -चिक्कोडी- मुधोळ- बागलकोट- अलमट्टी- ऐहोळ- पट्टडक्कल- बदामी- गोकाक -बेळगावी


अर्थात स्वारगेटहून पहाटे चारपासून कुरुंदवाडच्या बशी आहेत याची चौकशी प्रत्यक्ष तिथे पहाटे जावून केली आणि मगच हा मार्ग निवडला.


मार्ग ठरविल्यावर माहिती गोळा करणे सुरु केले, पर्सनल गुगल कामी आले. श्री.शशांक मेहेंदळे ( 9823276832) यांचे संदर्भाने श्री.अनिकेत बाळ (98224 33255) यांचेशी ओळख झाली, ते गेली सोळा सतरा वर्ष याच भागात सहली आयोजित करत आहे. श्री. बाळ यांनी कोणताही आडपडदा न ठेवता इत्यंभूत माहिती दिली. प्रत्यक्ष सफरी दरम्यान जवळपास रोजच त्यांचेशी सल्लामसलत होत होती.
श्रीगणेशा

नेहमीची ठरलेली तयारी करण्यासाठी मित्रपरिवाराची मदत घेतली, प्रवासात गरज पडू शकतील असे सुटे भाग जमा केले. स्वारगेटला पहाटे चारचं कुरुंदवाड फ्लाईट पकडलं तत्पूर्वी सायकल लोड करण्याचे काम करून घेतले. मजलदरमजल करत अकराच्या आसपास कुरूंदवाड गाठलं, गाडीच्या टपावर चढून सायकलही लँड केली. गावात आमचा महाविद्यालयीन मित्र डॉ.उमेश लंबे (98508 66588) याची भेट घेतली. त्याच्या आग्रहाखातर त्याच्यासोबत नाष्टा करुन नरसोबावाडीचा रस्ता पकडला. मंदिर आवारात मुखपट्टी वापराच्या आदेशाचे कसोशीने पालन करून घेतले जात होते. गृहलक्ष्मीला खूश करप्यासाठी अशी मंदिरपर्यटनासारखी छोटीशी कृती फार प्रभावी ठरते. दर्शन घेवून दुपारी दोनचे आसपास चिक्कोडीच्या दिशेने मार्गस्थ झालो.
जोडोंका दर्द

कुरुंदवाड कोल्हापूर जिल्ह्यात येत असले तरी सांगली पासून जवळ आणि कर्नाटक हद्दीलगत आहे. चिक्कोडीचे अंतर चाळीस पंचेचाळीस किमीच असल्याने भर दुपारी दोन वाजता सायकलिंगला सुरवात केली. उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता पण सुंदर रस्ता आणि दुतर्फा उसाची लागवड यामुळे थोडं सुसह्य वाटत होते. राज्याच्या वेशीजवळ आल्यावर चित्र एकदम पालटले रस्ता अचानक खडबडीत झाला, दोन राज्यांच्या सीमेवरील जोडोंका दर्द चांगलाच जाणवला त्यात भर भाषेची पडू लागली, हळूहळू सहज सुलभ मराठी संवाद कमी होउ लागला.

आपल्याकडे जशी गव्हर्मेंट गेस्ट हाउसेस असतात तसे कर्नाटकामधे आय. बी. अर्थात इन्स्पेक्शन बंगलो असतात याची माहिती मित्र अमित मोने (070212 14496) कडून मिळाली होती. सायकलसफर म्हणजे पैशाचा धूर ही संकल्पना मनाला कधीच पटली नाही त्यामुळे आय.बी. ला प्रथम प्राधान्य. गावात शिरल्यावर चौकशी करत आयबी गाठले. आवार मोठा आहे, सर्वत्र अनेक मोठ्या गाड्या लागलेल्या होत्या आणि जोरदार धामधुम सुरू होती.

माझ्याकडे लक्ष देण्यात कोणालाच गम्य नव्हते मी थेट आत घुसून एका अधिकाऱ्याला दिमाखात 'मी सायकलवर आहे रहाण्याची सोय होईल का ?' असे विचारण्याचा प्रयत्न केला, तो ढिम्म. शेजारी उभा असलेला कर्मचारी त्याच्याशी काहीतरी कानडीत पुटपुटला, अधिकारी झिडकारण्याच्या स्वरात 'नो रूम' असे बोंबलला. मी पिच्छा सोडलाच नाही, शेवटी माझी दया येउन त्याने मला एका खोलीत नेले त्यात दोन कॉट होते त्यातील एक मला देवू केली, संडास बाथरूमचा पत्ताच नव्हता.

मी थोडा स्थिरस्थावर झालो तो पर्यंत बाहेरील लगबगही कमी झाली होती. मी पुन्हा त्याला गाठून भाषेचे अडसर पार करत शंभर रूपयाची ऑफर दिली, पुन्हा दुर्लक्षच, क्षणभराने म्हणाला रूम रिपेरिंग - मी समजलो त्याने सायकलवाल्यांचे पाणी जोखले होते, हे फुकटे काही कामाचे नाहीत अशीच त्याची देहबोली होती. अर्थात मला काहीच फरक पडणार नव्हता, हम है राजा राज करे..... त्या खोलीत माझा संसार मांडला. आवाराच्या समोरच एक शाकाहारी हॉटेल आहे तिथे कर्नाटकी खाद्याचा सिलसिला सुरु केला. पहाटे चार वाजता उठून होल वावर इज अवर हा नियम विधींकरिता अंमलात आणला, थोडा फार व्यायाम केला. माझ्या शेजारच्या कॉटवर झोपलेल्या मुलाला उठवून निघण्याची सूचना दिली, कृतज्ञता म्हणून त्याच्या खिशात पन्नास रुपये कोंबले; मी याचे एंपथी एक्सपेंन्स असे नामकरण केले आहे. ठीक साडे पाचला टपरीवर चहा पिऊन मार्गस्थ झालो..









                                                                                                                                                     
                                                             
नॉस्टलजिक  

शिरविजेरी (हेड टॉर्च) लावून सुंदर सुळसुळीत रस्त्यावरून आल्हाददायक वातावरणात सायकलिंग सुरु केले. चिक्कोडीतून बाहेर पडल्या पडल्या एक छोटासा घाट वजा चढाव लागतो तो चढत असताना विजेरीच्या प्रकाशाने उंचावर असलेला दिशादर्शक फलक चमकू लागला मला मज्जा वाटली, मी काळोखातच लगेच फोटो काढला. पुढे पुणे सारख्या शहरात जसे पहाटे व्यायामासाठी फिरणारी मंडळी दिसतात तसे तिकडेही पाहून आनंद झाला.
जवळपासच्या भागात साखर कारखाने आहेत आणि सध्या उस तोडणी हंगाम सुरु आहे त्याचा प्रभाव रस्त्यावर जाणवत होतो. दोन तीन ट्रॉल्या जोडलेले ट्रॅक्टर पुण्यातील डीजे ला तोंडात मारतील एव्हढ्या मोठया आवाजात गाणी लावून आसमंत दणाणून सोडतात, गाणी साधारण अर्धा किमी अंतरावरूनही सहज कानी पडतात. गाणी एकतर कुमार सानु फेम- नव्वदच्या दशकातील किंवा कन्नड ठसकेबाज आणि दोन्हीत झंकार बीट्स अनिवार्य,

मी ही कॉलेज जीवन आठवून काही क्षण त्या तालावर डोलत सायकल हाणायचो. पण या बेधुंद ट्रॅक्टर चालकांचा रस्त्यावर जणू हैदोसच, एक प्रकारची दहशत. माझ्या हेल्मेटला देखील एकदा ट्रॉलीतून डोकावणाऱ्या उसाचा फटकारा बसला. पुढे मुधोळला लॉज मालकाने मला सांगितलेच- संध्याकाळ झाल्यावर सायकलने बाहेर पडू नका, हे ट्रॅक्टरवाले फूल्ल टू असतात. त्यामुळे मुधोळ मधील मुधोळ हाउंड या प्रसिद्ध कुत्रा प्रजातीचा ठावठिकाणा लावण्याचा माझा मनसुबा विरला.

मुधोळपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उसाची प्रचंड शेती आहे, तुरळक कुठेतरी मका, आलं, हळद यांची लागवड दिसली. एकेकाळचा दुष्काळी प्रदेश कालव्याच्या पाण्यामुळे शेतीमधे समृध्द झाला आहे.
सहन होत नाही आणि सांगता येत नाही

पहिल्या दिवशी दुपारनंतरच्या सत्रात चाळीस पंचेचाळीस किमी, मग मुधोळपर्यंत आणखी ऐंशी पंच्याऐंशी किमी सायकलिंग झाले होते. मुधोळनंतर पीक पध्दत थोडी बदलेली जाणवत होती, रस्त्याच्या कडेला कुठे कुठे ओसाड जमीन दिसु लागली होती. उसाव्यतिरिक्त डाळिंब, चिकु, पोपया या झाडांची लागवडही पहाणेस मिळाली. असे असले तरी रस्ता तसाच, अनंत अमर्याद सरळ, चढ आहे की उतार आहे हेच कळत नाही त्यामुळे पेडलिंगला उसंतच नाही. ना चढाईच्या कष्टातला आनंद न उतराईच्या घसरगुंडीचे सुख. एकुणात सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी अवस्था.

याच रस्त्यावर मुद्दापूर क्रॉसवर हायवे पासुन पाच सहा किमी आत जे. के. सिमेंटचा कारखाना आहे. निघाल्यापासून हा पहिलाच मोठा प्रकल्प पहाण्यात आला. बहुदा याचमुळे या भागात चकाचक लांबसडक महामार्गांच्या दुतर्फा महाराष्ट्रासारखे व्यापारीकरण झालेले दिसत नाही आणि म्हणुनच आमच्यासारख्या हौशी सायकलवीरांना इकडे जास्त आनंद मिळतो.

लोकापूर नाक्यावर मस्त नाष्टा करून निघालो आणि लगेचच मागील चाक वेडंवाकडं फिरत असल्याचे जाणवले, थांबून पाहिले तर हवा कमी झाल्याचे जाणवले. नशीबाने तिथेच शेजारी पंक्चरवाला होता त्याचे कडून काम करून घेतले. पाच सहा किमी जातो न जातो तो पुन्हा तेच ! आता मात्र आत्मनिर्भर. शेतात सावलीत सायकल उलटी करून ट्यूब बदलली, संधीचा फायदा घेवून सायकल साफ करून तेलपाणी केले आणि मार्गस्थ झालो. थोड्या अंतरानंतर पंक्चर काढून घेतले, या प्रकरणात दोन तास गेले. बागलकोट गाव खूप गजबजलेले आणि मोठ्ठी बाजारपेठ असलेले आहे. गावाचे बाहेर खूप मोठा जलाशय दिसतो त्यामधे गळ्यापर्यंत बुडलेले माड -नारळाची झाडं पहायला मिळाली. वाटेत पुढे दगडात कोरीव काम करत बसलेले कारागीर दिसले अतिशय निगुतीने मन लावून त्यांचे काम सुरू होते.
सदा सुसज्ज
सायकल सफर सुरु केल्यापासून अलमट्टी धरण पहाण्याची इच्छा मनात होती. बागलकोटनंतर मुख्य रस्त्यावरून अलमट्टीकडे जाणारा रस्ता लागतो. नाक्यावर थोडे उदरभरण करून अलमट्टीची दिशा पकडली. हा रस्ता झाडी असलेला आणि थोडा फार चढउतारांचा आहे तसेच मातीचा रंगही लालसर असल्याचे जाणवू लागले.

आतापर्यंतच्या प्रवासातील भौगोलिक स्थितीपेक्षा हे सर्व वेगळं होतं. पंक्चर प्रकरणात दोन तास गेल्याने मला थोडी चिंता वाटत होती कारण अलमट्टीमधे रहाण्याच्या हॉटेलची नीटशी माहितीही मिळवू शकलो नव्हतो. आज रामलल्लाच्या भरोशावर मार्गक्रमण सुरू होते, वाटेत सतत चौकशी सत्र सुरु होतेच. एका गावात एक तरूण जोडगोळी भेटली त्यांनी अलमट्टीपूर्वी सीतिमणी भागात एक मंदीर आहे तिथे तुमची सोय होईल असे सांगितले. माहिती अचूक ठरली, श्रीमाता कल्याणताई धर्मरमठ अशी पाटी दिसली, आत शिरून स्वामीजींशी संपर्क केला त्यांनी देवळात झोपण्यास अनुमती दिली.
जय्यत तयारी कामी आली, बॅगेतली प्लास्टिक पन्नी काढून आंथरली, कपडे वाळत घालण्यासाठी दोरी बांधली आणि सामान मांडामांड केली. मठाच्या आवारातील आठदहा वर्षांची पाचसात पोरं माझ्या वाटोळी जमली. माझा सर्व अवतार पाहून त्यांचे कुतुहल जागृत झाले, आपापल्या परीने जो तो माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. माझ्यासोबत चिक्कू होते ते सर्वांना एकेक दिल्यावर मुलं खुश झाली, आणि पसार झाली. मंदिर आवारातील टाकीच्या नळावर आंघोळ केली. धोबी घाट घातला आणि निश्चिंत झालो. स्वामीजींनी त्यांच्या घरी चहापानासाठी बोलावले तिथे थोड्या गप्पा झाल्या, त्यांनी मंदिराची माहिती दिली. मी देवळात परत येवून झोपी गेलो.

हागणदारी युक्त

स्वामीजींच्या सूचनेनुसार पहाटे प्रथम सीताराम मंदिराला भेट दिली, मंदिर डोंगरमाथ्यावर आहे तिथून अलमट्टी धरणाचे विहंगम दृश्य दिसते. धरणाची छबी मोबाईल मधे टिपली आणि प्रवास सुरू केला. गावातील रस्त्याने पुढे आल्यावर एक तिठा लागतो तिथून उजवीकडे गेल्यावर महामार्ग लागतो. रस्ता नेहमीप्रमाणे सुंदर होता, जोशात सायकलिंग सुरु होते. मी रात्रीचे जेवण संध्याकाळीच करत असल्याने सकाळी लवकर भूक लागते. पोटात कावळे ओरडू लागले होते आणि महामार्गावर हॉटेलचे नामोनिशाण दिसत नव्हते, माझी चिडचिड होवू लागली होती. एका गावाकडून महामार्गाकडे येणारा छोटा रस्ता दिसत होता, तिकडून एक आज्जी बकऱ्या हाकत येत होती, मला आशेचा किरण दिसला मी हॉटेल, काना, इडली असे म्हणत, सोबत विविध हावभाव करून माझ्या भावना पोचविण्याचा कसोशीने प्रयत्न केला. आजीने गावाच्या दिशेने बोट दाखविले.

मी आनंदाच्या भरात सायकल देवलापूर गावाच्या दिशेने वळवली. मी वेशीच्या जवळ गेल्यावर प्रातःसमयी रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या पोराटोरांची एकच धावपळ उडाली, विधी पूर्ण करण्यासाठी चड्डया सावरत सर्व शेजारील शेतात पळाली. खरं तर गेले दोन-तीन दिवस मी रोजच महामार्गाच्या दुतर्फा हे पहात आलो होतो, फक्त पळापळी आजच पाहिली. गाव जागवतच मी प्रवेश करत होतो, रस्त्याच्या कडेला कोणी चुळा भरतंय, कोणी दात घासतंय, कोणी तोंड धुतंय, कोणी भांडी खंगाळतंय अशी सकाळची आवराआवरी सुरू दिसली.

हॉटेल काही दिसेना, एक दोन फूट बाय पाच फूटाचे झापड असलेली साधारण सात बाय सात फूट मापाची बंद झोपडी दिसली अंदाज करुन आत डोकावून खाण्याची खूण केली त्याने खुणेनेच पुढे जा सांगितले. पन्नास फूटावर पुन्हा तेच दृश्य, माझा तसाच प्रश्न त्याने हातानेच दहा पंधरा मिनिटं लागतील असे खुणावले. मी आणखी पुढे गेलो पुन्हा एक तशीच झोपडी दिसली मी थांबून चौकशी करणार तोच माझ्या वाटोळं पाच पन्नास गावकऱ्यांनी कोंडाळं केलं. एखादा परग्रहावरून आलेला प्राणी असावा अशा आविर्भावात त्यांच्या भाषेत ते कुजबूज करत होते, क्षणभर मी गोंधळूनच गेलो.
झोपडीच्या छोट्या दारातून मालक बाहेर आला आणि मला चहा ऑफर केला, मला हुश्श वाटलं, कोई तो है... मी खाण्याविषयी विचारणा केली, पुन्हा खुणेनेच त्याने दहा मिनिटं असं उत्तर दिलं. माझ्याकडे थांबणे हा एकच पर्याय शिल्लक होता, मी तेच केलं. दरम्यान जमलेल्या जनसमुदायाशी संवाद साधण्याचा क्षीण प्रयत्न करत होतो. दहा मिनिटांना दोन वाट्या भरतील एव्हढा गरमागरम उपमा माझ्या समोर आला, त्याचा आस्वाद घेतला. झोपड्यात वाकून पाहिलें तर एका मोठ्या घंगाळ्यात पोहे-भेळ सदृश काहीतरी खाद्य दिसले. ते एक प्लेट पार्सल करून घेतले, तो गिरमीट नावाचा भाजक्या पोह्यांची भेळ कालवून त्याला फोडणी देवून बनविलेला फक्कड असा लोकल पदार्थ होता. दोन प्रकारचा अल्पोपहार, तीन चहा आणि बिलाची रक्कम नक्त एकोणतीस रुपये, अविश्वसनीय !


First Maker of Kardant

देवलापूर मधील रम्य आठवणी साठवून मार्गक्रमण सुरू केले. श्री.बाळ यांनी कुडाल संगम पहाच अशी सूचना केली होती त्यामुळे तो पाहिला. कुडाल संगम म्हणजे जणु सागरच- कृष्णा आणि मलप्रभा नदीचा एवढा महाकाय विशाल संगम असेल अशी कल्पनाही मी केली नव्हती. तिथुनच ऐहोळे येथील मयूर यात्री निवासच्या मंजुनाथ (9591164103) यांचेशी संपर्क करून ऐहोळे गाठण्याचे ठरविले. आमिनगड तिठा येण्यापूर्वी एका फलकाने माझे लक्ष वेधले.

फलकावर वरील भागात विजया लिहिलेले त्याखाली एका खानदानी दाक्षिणी आजोबांचा फोटो आणि त्याखाली First Maker Of Kardant अशी ठळक ओळ. बराच वेळ त्याचा अर्थ लावण्यात गेला कारण आपल्या मनात करदंट म्हणजे गोकाक/ बदामी हेच कोरलेले असते. या आमिनगडात त्याचा उद्गाता हा धक्काच ! गावात अस्सल करदंट मनसोक्त खाल्ला आणि गुडूर फाट्यावर डावीकडे वळलो. पुढे याच रस्त्यावर उजवीकडे ऐहोळे फाटा आहे. निघाल्यापासून खराब रस्त्याचा सामना करावा लागला नव्हता त्याची कमतरता आज भरून निघाली.
मयुरा यात्री निवासचा परिसर खूप मोठा, बाग बगिचा असलेला आणि हवेशीर आहे. खोल्याही प्रशस्त आहेत, इतक्या की मी माझी सायकल खोलीतील ड्रेसिंग एरियामधे उभी करू शकलो !                                                                विलोभनीय वारसा !
कर्नाटकमधे पुरातन वास्तु, मंदिरं, वारसास्थळे पहाण्यासाठी जाणारी मंडळी नेहमी हंपी-बदामी असा जोडीने उल्लेख करतात. हे म्हणजे मुंबई-पुणे या दुकलीचा एकत्र उल्लेख करण्यासारखे आहे. हंपी आणि बदामी यातील जवळात जवळच्या मार्गाने अंतर एकशे चाळीस किमी आहे. असो,
भारतात पर्यटनासाठी फिरणाऱ्या व्यक्तीने ऐहोळे, पट्टडक्कल, बदामी या ठिकाणी आयुष्यात एकदातरी गेलेच पाहिजे आणि हे पाहिल्याशिवाय निव्वळ सामाजिक प्रतिष्ठेकरिता परदेशवारीचा विचारही करू नये असे माझे स्पष्ट मत आहे. येथील वारसा स्थळांचे वर्णन शब्दात करण्याची कुवत माझ्यात नाही. मी एव्हढेच म्हणेन ते पहाताना माझ्या डोळ्यात पाणी आले.

मित्र विवेक मराठे याने बदामी विषयी अनेक सूचना केल्या होत्या, त्यांचे पालन करत तेथील गुहा, किल्ला, त्यावरील मंदिरं, वास्तु, पुरातन संग्रहालय सर्व मनसोक्त अनुभवले. गुहांमधील दगडातील कोरिव काम पाहून दिग्मूढ झालो, त्यांची छबी मोबाईलमधे टिपण्याची माझी हिम्मत होत नव्हती, केवळ उपचार म्हणून चार पाच फोटो काढले. या सर्व परिसरात फिरताना प्रत्येक पावलागणित ते अनामिक कारागीर आणि तेव्हाची राजघराणी यांचे विषयी आत्यंतिक आदराची भावना उफाळून येत होती.

बदामीमधे पोलिस स्टेशन शेजारी महाकुटेश्वर नावाचे एक छोट उपाहारगृह आहे तेथील अन्नाची चव, परिमाण, तेथील स्वच्छता आणि आकारली जाणारी किंमत यांचे अतिशय व्यस्त प्रमाण होते. वीस रुपयामधे पोटभर नाष्टा. दुपारच्या वेळी एक लिंगायत खानावळी गाठली, तेथील जेवण इतकं तिखट होतं, मी भाजी आमटीत पाणी ओतून थकलो, थाळयात तळच तयार झालं. थाळ्यात जर फिशकरी असती तर माशांनी पोहण्याचा आनंद लुटला असता. एकुणात बदामीमधील खाण्याचा अनुभव संमिश्र असाच होता.
सिल्क साडी साठी प्रसिद्ध इल्कल गाव ऐहोळेपासून जवळच आहे. गृहलक्ष्मीला खुश करण्याची नामी संधी साधून सरोदे सिल्क मिल ( 9448924761) यांचे दुकानात खरेदी केली.

सोलोमुळे संधी

बदामी स्टँड समोर न्यु सन्मान डिलक्स ( 09448729741 )हे अतिशय स्वच्छ, सुंदर, छोटेखानी खोल्या असलेले किफायतशीर लॉज आहे. तिथे दोन दिवस राहून नेहमीप्रमाणे पहाटे साडेपाचला टी पॉईंटवर चहा ढोसून मार्गस्थ झालो.

हवा छान अल्हाददायक होती त्यामुळे सायकल चालवताना मज्जा येत होती. भुकेची जाणीव झाल्यावर संशोधन सुरू केले, पुढे कुलगिरी क्रॉसवर नमुनेदार कर्नाटकी खाउगाडी दिसली. वाफाळणाऱ्या इडल्या आणि तळणीत तरंगणारे मेदुवडे माझी वाटच पहात होते त्यांचा अवमान करणं मला पटणारे नव्हते त्यामुळे त्यांचा आस्वाद घेतला.
गाडीपाशी उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीने आग्रहाने मला चहा प्यायला दिला, प्रवासादरम्यान लोकांच्या प्रेमाने मी भारावून गेलो.

रामदुर्ग रस्त्यावर मुदकवी या गावात एक मोठा बुरुज आणि त्यावर फडकणारा भगवा झेंडा दिसला. मला आमचे गुरु श्री आनंदराव पाळंदे (094235 68776 ) आणि मित्र विवेक मराठे (09822016415) यांची आठवण झाली आणि सायकलची चाकं आपोआप त्या दिशेला वळली. मोठ्ठाले बुरूज आणि खूप पसरलेली तटबंदी पहावयास मिळाली- पण एकुणात सर्व अनास्थाच, स्थानिकांनी त्याचे नाव ब्रिटिशर कोटी असे सांगितले, प्रत्यक्षात बांधकाम खूप पुरातन असल्याचे जाणवत होते.

माघारी फिरल्यावर मला विणकामाच्या यंत्रांचा आवाज ऐकु आला, चौकशी करत एका घरगुती लूमपर्यंत पोचलो. प्रत्यक्ष विणकरांकडून ( गिरीअप्पा 6362940566 )साडी घेताना मला गंमत वाटली पण त्या विणकराच्या चेहऱ्यावरील आनंद मला जास्त सुखावून गेला. रामदुर्गच्या आसपास असेच आणखी एक दुर्लक्षित ठिकाण पहाण्यास मिळाले, तिथे म्हणे शिवाजी महाराजांच्या काळी तुरुंग होता. तसेच शेजारील भूतनाथ आणि अन्य सुंदर अशी पुरातन मंदिरही बघता आली. एकटाच असल्याने वाट वाकडी करून वेळेचा विचार न करता हे पहाता आले.


रामदुर्ग ते यरागट्टी क्रॉस रस्त्याने माझा जीव काढला, खराब रस्ता- त्यात रस्त्याची कामं म्हणजे संपलच. उन खूप तापले होते, दुपारचे तीन वाजल्यावर माझी सहनशक्ती संपत आली आणि बेळगावीचे वेधही लागले म्हणून सायकलिंग न करता काही जुगाड जमवून बेळगावी गाठण्याचे ठरविले. पाच पन्नास वहानांना विनंत्या केल्यावर एका टेंपोवाल्याला माझी दया आली.

बेळगावी पोचल्यावर मित्र विनय तिनईकरच्या ( 098 90 175666 ) घरी जावून त्याच्या आईच्या हातच्या उपवासाच्या सुग्रास पदार्थांचा आस्वाद घेतला आणि मन तृप्त झाले. नंतर दोन व्यवसायिक भेटी घेतल्या आणि हॉटेल अनुपम येथे बेळगावीमधील अट्टल सायकलवीर राजु नायक (099025 21116 ) आणि संतोष शानभाग यांचेशी चर्चासत्र झडले.

रात्री सव्वाअकराची स्लीपरकोच गाडी पकडून सही सलामत घर गाठले.


असंही असतं!

संपूर्ण प्रवासात मा. मुख्यमंत्री अथवा अन्य राजकारणी यांची फ्लेक्सबाजी कुठेच दिसली नाही. आपल्याकडे विविध आस्थापनांमधे मालकांचे फोटो दादा, भाऊ, आण्णा, काका, काकासाहेब यांचे सोबत लावण्याचा प्रघात आहे, तिकडे मात्र मालकांचे फोटो धर्मगुरू, शास्त्री, गुरुजी यांचे सोबत झळकलेले दिसले.

सुळसुळीत महामार्ग, वहातूक कमी तसेच रस्त्याच्या दुतर्फा बाजारीकरणही अत्यल्प जाणवले. उत्तम दर्जाचे दोन इडली- दोन मेदुवडे आणि मनसोक्त चविष्ट चटणी-सांबार, स्वच्छ टापटीप जागेसह फक्त वीस रूपयामध्ये उपलब्ध.

स्वच्छता आणि चवीकरिता नो एक्स्ट्रा प्रिमिअम.

असं ही असू शकतं ! धन्यवाद.














संपादन- विवेक मराठे

दिनांक १९ ते २६ नोव्हेम्बर २०२०पर्यंत
एकूण सायकलिंग ४५० किमी. अंदाजे
 
खर्च    ६ हजार मात्र.

चला वाचूया .....Let's start reading.

सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom

पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे  लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...