Wednesday, 14 October 2020

Bamboo Fencing बांबू कुंपण

 

                                   स्वप्न साकार !

 


हल्ली अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा विषय वादाचा बनविला गेला आहे, मात्र प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न पहाण्याचे स्वातंत्र्य वादातीत मानले जाते. कोणते स्वप्न पहावे याची काही नियम नियमावली माझ्या तरी ऐकिवात नाही. कोणी घराचे स्वप्न पहातो/पहाते तर कोणी आलिशान गाडीचे तर कोणी सत्ताप्राप्तीचे. माझ्या मते ही सर्व स्वप्न सरधोपट ( कॉमन) अशीच आहेत.

आमचा मित्र विवेक मराठे अशी सामान्य स्वप्न पहात नाही. स्वप्नाची इश्टोरी सुरू होते मेघालयातून !  तीन वर्षापूर्वी आम्ही मेघालयात  स्वनिर्भर आणि स्वैर सायकलिंग केले. तिथे दैनंदिन जीवनात बांबूचा वापर प्रचूर मात्रेत केला जातो. टोप्या, टोपले, टोपल्या, घरासाठी कुंपण, नाल्यावरील सेतू पासुन ते होम स्टे साठीची खोली बांबू पासून बनविली जाते. अशा एका होम स्टे मधे आम्ही राहिलो देखील. तेथील ग्रामजीवन आम्ही अगदी जवळून अनुभवले आणि विवेकला बांबूच्या वापराची स्वप्न पडू लागली. मेघालायातून परतल्या पासून महिना-दोन महिन्यांनी त्याचा बांबूजप सुरू असे. 
पुण्याला आमचे अंगणात बांबूचे बन फोफावले आहे, त्याचा सदुपयोग करण्याचा किडा विवेकच्या डोक्यात वळवळत होता. प्रथम आम्ही एक चौपाई बनविली नंतर एक झोकदार बाकडंही बनविलं पण त्याचे समाधान होत नव्हतं. त्याचे स्वप्न होतं घरासमोर मेघालय पद्धतीचे बांबूचे कुंपण !
 बांबूचे तोडकाम, चिरकाम केले, घरासमोरील मोकळ्या जागेची मोजमापे काढली आणि त्याला योग्य आकाराचे चिरलेले तुकडे आणि उभे पुरण्यासाठी डांब तयार केले. हे सर्व करत असताना  अधुन- मधुन वरुणराजाची कृपा सुरु होतीच तिकडे कानाडोळा केला. तयार झालेली सामग्री  महिनाभर वाळू दिली मग त्याला  किटकरोधकाचे लिंपण करून ठेवले. 
                         

अखेर मुहूर्त निघाला, प्रत्यक्ष काम सुकर व्हावे म्हणून विवेकने आदल्या सांयंकाळी बांबूचे डांब  सिमेंट- वाळूच्या सहाय्याने पत्र्याच्या डब्यात उभे करून  ठेवले. सकाळी साडेसात वाजता कामाला सुरवात केली. पहार, फावडं, थापी, कोयता, कात्री, सुरी  ड्रिल मशिन ई अवजारे आणि बांधण्यासाठी सुतळी असा जामानिमा आधीच सज्ज  करून ठेवल्याने कामाला गती आली. कामगारांना घरमालकिणीने  चहा अल्पोपहार आणि काम संपल्यावर भाकर तुकडाही प्रेमादराने दिला त्यामुळे समाधान वाटले, आता मेहनताना मिळण्याच्या प्रतिक्षेत !

अंगमेहनतीचे काम करणे हे आजकाल कमी  दर्जाचे मानणारे स्वतःला उच्चभ्रू म्हणवून घेतात त्यातच त्यांना मोठेपणा वाटतो. कोणत्याही कामास कसब, बुध्दी आणि चिवटपणाची गरज असते, हे ती कामं हातावेगळी केल्याशिवाय कळणार नाही.

कष्टाच्या कामाने आलेल्या घामाला दुर्गंधी नसते. कष्टाचे मोजमाप अर्थनिर्मितीशी जोडण्यापेक्षा आनंद निर्मितीशी जोडण्यास आपण कधी शिकणार ?

            विवेकची मुलगी सृष्टी म्हणते त्या प्रमाणे,  हे -

                      SWEET SWEATING !

 स्थळ :

 सृष्टी अनघा विवेक मराठे,

 ३५ नारायण पेठ, पुणे.

चला वाचूया .....Let's start reading.

सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom

पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे  लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...