मास्कबाबत बोलू काही !
पुणे... स्वत:ची अस्मिता, स्वत:चा विचार करण्याची क्षमता असण्याचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांचं शहर... सहाजिकच कोणीतरी सांगितलं म्हणून सहजपणे ऐकणाऱ्यांपैकी आम्ही नाही...मग तो मास्क असो की हेल्मेट !
सध्या मास्कबाबत हा लेखनप्रपंच
मुळात मास्क का वापरायचा? याचं सर्वात कॉमन उत्तर म्हणजे पोलिसाला ५०० रुपये दंड ऊगाच द्यावा लागू नये म्हणून... असं येईल... खरी गल्लत येथेच होत आहे...
आपणा सर्वांना माहीत आहे की मास्क वापरायचं खरं काम शल्यविशारदांचं... ते का बरं मास्क वापरतात ? तर १९०२ साली फिलाडेल्फिया येथे एक शस्त्रकर्म चालू असताना काही वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की सर्जन लोक बोलत असताना त्यांच्या थुंकीचे सूक्ष्म कण ऑपरेशनच्या जखमेत पडत आहेत... यावर आणखी संशोधन होऊन तथ्य आढळल्यावर मास्क वापरण्याची पद्धत पडली...
आपल्याही बोलण्या, खोकण्या, शिंकण्यामधून उडणाऱ्या थुंकीच्या कणांमधून व्हायरसचा संसर्ग पसरण्याची शक्यता असते.... ते कण पसरू नयेत, तिथेच शोषले जावेत म्हणून मास्क. म्हणजे मास्कचं मुख्य काम आपल्यामुळे इतरांना संसर्ग होऊ नये हे असून दुसऱ्यामुळे आपल्याला संसर्ग होऊ नये हे उपकथानक आहे (ते ही महत्त्वाचं आहेच)... हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे
आता प्रश्न येईल की, मला तर काहीच होत नाहीये, मग मी का मास्क वापरू ?
मला त्रास होत नाही म्हणजे मला इन्फेक्शनच नाही असं काही जरूरी नाही... इन्फेक्शन असूनही लक्षणमुक्त असणाऱ्या रुग्णांचंच प्रमाण प्रचंड आहे, हे वेळोवेळी होणाऱ्या सीरोसर्व्हेमधून समोर येत आहे... खरं तर हा नवीन आजार असल्याने त्याबद्दल निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही, संशोधनातून मिळणाऱ्या निरीक्षणांमधून गाईडलाईन्स बनत आहेत.. त्या कधीकधी बदलत असलेल्या दिसल्या तरी, सध्या त्या काटेकोरपणे पाळणं हेच आपलं कर्तव्य आहे... लक्षणमुक्त रुग्णांकडून व्हायरसचा प्रसार होतो की नाही याबद्दल अजूनही नक्की माहीत नसलं तरी, होत असावा असं मानण्यासही जागा आहे... त्यामुळे खबरदारी म्हणून मास्क वापरणं श्रेयस्कर...
आपल्याला जर समजलं की उद्या नळाला कदाचित् पाणी न येण्याची शक्यता आहे... मग अशा वेळी आपण काय करतो ? खबरदारी म्हणून पाणी भरून ठेवतोच ना? तसंच इथेही करायचं आहे... मास्क वापरायचा आहे...
आणखी एक प्रश्न असतो की, खुल्या हवेत, विशेषतः व्यायाम करताना मास्क वापरायचा की नाही ? तर अशावेळी सुद्धा मास्क आपल्या तोंडावर तरी असायलाच हवा... आजूबाजूला ६ फूट अंतरापर्यंत कोणी नसेल तर नाकावर नाही ठेवला तर चालेल... समोरून कोण येत असेल तर नाकावर चढवावा नंतर पुन्हा खाली करून तोंडावर ठेवावा...
दोन माणसांपैकी एकाने मास्क वापरला तर इन्फेक्शनचा धोका ५० टक्क्यांनी कमी होईल... दोघांनीही वापरला तर ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात धोका कमी होईल...
आपले पोलिस बांधव केले ५-६ महिने प्रचंड तणावात काम करत आहेत... हजारो बांधव केवळ आपल्यासाठी कर्तव्य बजावत असताना आजारी पडले आहेत, काही शहीदही झाले आहेत. आपण मास्क घातला आहे की नाही हे बघत बसणं हे खरं तर त्यांचं काम नाही, पण आपल्या बालिशपणामुळे आपण त्यांचा भार विनाकारण वाढवत आहोत, त्यांचा संसर्गाचा धोकाही वाढवत आहोत आणि वर दंड घेतला म्हणून त्या़ना नावेही ठेवत आहोत... हे दुर्दैवी आहे...
सध्या कोरोनाची परिस्थिती भीषण होत चालली आहे, बेड मिळणं अवघड झालंय, मिळाला तर ऑक्सिजन मिळणं अवघड... व्हेंटिलेटर तर त्याहून दुष्प्राप्य. त्यात कहर म्हणजे हा आजार घरात एकट्यालाच होत नाही, अनेका़ना होतो... एकदा रुग्ण रुग्णालयात गेला की त्याची प्रत्यक्ष भेटून विचारपूस करणं शक्य नाही, त्याला घरचं जेवण बिवण पण नाही... रुग्णालयात जे देतील ते खायचं असा सगळा मामला आहे. एकाच घरातले ४ जण वेगवेगळ्या रुग्णालयात आणि उरलेले १-२ लोक घरात... अशी परिस्थिती अनेक ठिकाणी उद्भवलेली आहे.
त्यामुळे आतातरी आपल्या हौशीमौजीला जरा मुरड घालू या, अत्यावश्यक तेवढ्याच गोष्टी करू या... बाहेर जबाबदारीने वागू या... मास्क व सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन करू या.
कोरोनाचं संकट कधीतरी संपेलच... पण कोरोनानंतरचं जग सहकुटुंब बघायची इच्छा असेल तर सध्या थोडे परिपक्वतेने वागूया.
कोणता मास्क वापरावा याबद्दल पुन्हा कधीतरी !
डॉ. रणजीत निंबाळकर, ०८०८७८७३११५
डॉ निंबाळकर पुणेस्थित एक प्रथितयश आयुर्वेद चिकित्सक आहेत.
