कोकण किनारपट्टीवरील सायकल सफर
चढ- उतारांचा लपंडाव

दोन हजार चौदा/ पंधरा साली आम्ही मनाली लेह खार्दुंग
ला(मलेखा) ही सायकलसफर(सास) केली. तेव्हाच आमचा WA ग्रूप
बनविला होता, त्यामधे सतत सायकलप्रेमींची भर
पडत असते. आमच्या मलेखाच्या चमुतील एक ज्येष्ठ आणि उत्साही व्यक्तिमत्व म्हणजे
सुरेश पाटील. पाटलांचा माझ्यावर विशेष स्नेह. मलेखा नंतर एखादी लाँग टूर करण्याची
कल्पना त्यांच्या मनात अनेक दिवस होती पण काही ना काही कारणाने ती प्रत्यक्षात
उतरत नव्हती. नाही म्हणायला पुणे-पंढरपूर ही दोन दिवसांची छोटेखानी सायकलसफर आम्ही
एकत्र केली होती. त्यावेळी मी, पाटील, केदार गोगटे आणि ओंकार महाजन असे एकत्र होतो.
यावर्षी काहीही करून लांब पल्ल्याची सास करायचीच असा
चंगच जणु पाटलांनी बांधला होता. नियोजनाच्या सुलभतेसाठी नेमकेच वीर असावेत असा
प्राथमिक विचार होता. आमचे लाडके शिलेदार अविनाश गोसावी, आनंद तुळपुळे, विनय
तिनईकर असे एकत्र येउन एक दोन चाय पे चर्चा रंगल्या आणि अलिबाग गोवा हा मार्ग
निश्चित झाला. सर्वानुमते २१ ते २९
ऑक्टोबर या तारखा ठरल्या. माझ्या स्वभावा प्रमाणे या सास विषयी मित्रांकडे पचकलो !
परिणामी मुंबईचा विवेक पेठे आणि पुण्यातील प्रफुल्ल साठे यांची भर पडली, नंतर
पाटीलांचे मित्र राजेंद्र इनामदारही जोडले गेले. माणुस ठरवितो आणि देव त्यावर बोळा
फिरवितो अशा आशयाची म्हण प्रचलित आहे. तसेच झाले, व्यवसायिक
अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या यांच्या चक्रात जबाबदारीच्या रेट्याने
इतर सर्व शिलेदार गळले, फक्त मी, विवेक आणि प्रफुल्ल असे तिघेच
उरलो.
कोकणकिनारपट्टी तशी परिचित असल्याने आणि काही
मित्रांनी ही सास पूर्वी केलेली असल्याने मार्गाविषयी फार चिकित्सा करण्याची गरज
भासली नाही, साधारण मुक्कामाच्या जागा
ठरविल्या.
जयसलमेर डेझर्ट बायकिंगच्या वेळी माझी आणि विवेक
पेठेची ओळख झाली. काही समान आवडींमुळे मैत्री जमली, तो आमचा ग्रूपलीडर असल्याने मी
त्याला कॅप्टन हे टोपण नाव ठेवले. माझ्या सायकल सफरीच्या कथा ऐकुन त्यालाही सोबत
सास करावी असे वाटे, अनायासे ही संधी मिळाली.
२०१३ साली एकदा मुंबई- पुणे प्रवासा दरम्यान महामंडळाच्या बसमधे प्रफुल्ल माझा सहप्रवासी
होता. प्रवासात गप्पा झाल्या आणि माझे 'कलागुण' त्याला उमगले आणि आवडलेही. प्रफूल्ल पुण्यातच व्यवसाय करत
असल्याने आमच्या वरचेवर भेटी होत असतात. माझे सततचे सायकलवरून फिरणे त्याला स्वस्थ
बसू देत नव्हते. कोकण सासची माहिती दिल्यावर लगेचच त्याने तयारी सुरू केली.
विवेकने स्वनिर्भर ( सेल्फ सपोर्टेड)
सायकल सफर यापूर्वी कधीच केली नव्हती, प्रफुल्ल
पहिल्यांदाच सायकलवर घराबाहेर पडत होता. मिन्स आय वॉज द बॉस, अर्थात वासरात लंगडी गाय ! तयारी संदर्भात सर्व सूचनांची
देवाणघेवाण करून सामानाची जमवाजमव केली.
महाराष्ट्रात
निवडणूक जाहीर झाल्याने आम्ही २३ ला मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून सास सुरू
करण्याचे ठरविले. मी आणि प्रफुल्ल पुण्याहून आणि विवेक मुंबईहून निघून नागावला
भेटण्याचे ठरले.
श्रीगणेशा
मतदान करून घाईघाईने स्वारगेट गाठले कारण कॅरियर
असणारी बस सकाळी साडे आठ वाजता आहे याची चौकशी मी आधीच केली होती. सायकली टपावर टाकल्या आणि प्रवास सुरु
केला, वाटेत थोडाथोडा पाउस लागला त्यावरून पुढे काय वाढून ठेवले
आहे याचा अंदाज आला. अलिबाग बस आगारात हमाल नसल्याने स्वतःच सायकली उतरविल्या, सायकल्स सोबत शेल्फी मारला, सायकलवर
धोपट्या लादल्या आणि भोजनच्या शोधात निघालो. शक्यतो शुद्ध शाकाहारी भोजन व्यवस्था
पहाण्याचा आग्रह असल्याने थोडा वेळ लागला. प्रफुल्लच्या सायकलचे किरकोळ काम करून
नागावचे दिशेने कुच केली. विवेक नागावला आधीच पोहोचला होता. अलिबाग नागाव रस्ता
छान आहे शिवाय नुकताच पाउस पडल्याने हवा देखील अल्हाददायक झाली होती. पंधरा सोळा
किमी अंतर केव्हाच पार करून नागाव गाठले.
पाहिला मुक्काम
आमच्या गावची एक माहेरवाशीण नागावमधे रहाते, त्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावर पर्यटकांसाठी खोल्या
बांधल्या आहेत. छोटेखानी पण स्वच्छ सुंदर सोय आहे. श्री चंदु रिसबुड ( 9689936132, 9850485194) आणि पत्नी दोघे मिळून वैष्णवी कॉटेज चालवितात
आणि आपुलकीने आणि अदबीने रहाणे जेवणेची सोय करतात.
विवेक आणि प्रफुल्ल प्रथमच भेटत असल्याने ओळख परेड
झाली गप्पा झाल्या. सुंदर, रुचकर गरमागरम जेवण झाले आत्मा तृप्त झाला. पावसाची रिपरिप पुन्हा सुरू झाली त्यामुळे
उद्याच्या प्रवासा विषयी विचार करत झोपी गेलो.

नागाव- दिवेआगर
सकाळी लवकर उठलो, भुरभुर
पाउस पडत होताच,
गरमागरम चहा पिवुन सायकलवर टांग मारली. हवा अतिशय अल्हाददायक होती, सायकलिंगचा पहिलाच दिवस होता त्यामुळे तिघेही जोशात होतो.
विशेष करून प्रफुल्ल फारच जोशात, त्याच्या मागे कॅप्टन आणि मी
शेवटी माझ्या लयीत सायकल चालवीत होतो. चेउल, कोरलाई
अशी गावे पार करून पुढे निघालो. सन्मा. श्री दादा धर्माधिकारी यांच्या अनुयायांनी
रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावुन त्यांची देखभालही ते करतात, मला हे खुपच आश्वासक वाटले. वाटेत मला गिअर शिफ्टिंग मधे
थोडा अडथळा जाणवत होता.

मुरूडमधे सायकल मेकॅनिकची शोधाशोध केली, एका मुकबधीर असणाऱ्या कारागीराने सायकल ठिक केली आणि
मोबदलाही घेतला नाही. शहरांपासून दूर
गेल्यावर असे अनुभव नेहमीच येतात. आमचे कडील
मुठभर ड्रायफ्रूट त्यांना देवून
कृतज्ञता व्यक्त केली. उजव्या बाजुस असणाऱ्या अथांग समुद्राच्या साक्षीने सायकल
मारणे एव्हाना आमच्या पचनी पडले होते. पण आता डोळ्यासमोर दिसणारे दृश्य अवर्णनीय !
तिनशे साडेतिनशे वर्ष अजिंक्य राहिलेला जंजिरा किल्ला दृष्टीस पडला. छत्रपती शिवरायांची आठवण होणे स्वाभाविकच
होते, शरीर मोहरले आणि आम्हाला पुन्हा स्फूरण चढले. किल्ल्याचे
फोटो, आमचे फोटो काढून राजपूरी गाठली. तर (लॉंच) सुटण्याची वेळ
दीड तासानंतर होती. गोटी सोडा, शहाळे यांचा आस्वाद घेत वेळ
मजेत गेला.
सायकल लाँचमधे चढविणे म्हणजे कसरतच, त्यात आमच्या सायकलींच्या कॅरियरवर भरभक्कम धोपट्या. म्हणजे
आधीच मर्कट त्यात मद्य प्याला अशी अवस्था. खाडी पार करून दिघीला पोचलो आणि नंतर
दिवेआगर. वाटेत अनेक छोटे मोठे चढउतार लागले, सीमेंट
रस्त्याचे काम सुरू होते त्याचा थोडा त्रास झाला पण एकुणात ७० किमी प्रवास छान
झाला. दिवेआगर गाव तसे मोठे आणि लांबलचक आहे. गावाची मांडणी खास कोकण किनारपट्टी
वरील गावांसारखीच आहे. दिवेआगरची सुपारी-रोठा खूप पसिद्ध आहे, गाव समृद्ध वाटले.
कॅप्टनचे नातेवाईक श्री अमोद वाड (9552974592)
यांचेकडे राहिलो, त्यांनी पर्यटकांसाठी खोल्या
बांधल्या आहेत. खोल्या प्रशस्त, राजेशाही आहेत, उत्तम सोयी मुळे सर्वजण सुखावलो. रात्री उकडीचे मोदकासह
आग्रहयुक्त रसभरीत कोकणी जेवण जेवलो आणि निद्राधीन झालो.
दिवेआगर केळशी
काल
सायकलिंगचा पहिलाच दिवस होता, तिघेही ताजेतवाने होतो
त्यामुळे जोशात अंतर कापले होते. पहाटे उठलो, पावसाची
भुरभुर सुरूच होती, गरमागरम चहा घेतला आणि निघालो.
कॅरियरवर लादलेल्या थैल्या सांभाळून सायकल हाकणे थोडे कसबाचे असते. विशेषकरून चढउतार, वळणंवाकणं, अरूंद आणि खराब रस्ता असेल तर
ते आणखी जिकरीचे होते, तरीही प्रफुल्ल आणि कॅप्टनमधे एक प्रेमळ चुरस सुरु होती मी
सावकाश दमाने सर्वात मागे संथपणे चालवत होतो. थोडं अंतर गेल्यावर कॅप्टनच्या
पेडलची गुंडी सैल झाली, आमच्याकडे हत्यारे अवजारे होती
पण नेमका त्या आकाराचा पाना नव्हता. नशीबाने पुढे उतार आणि मग थोडा सपाट रस्ता
होता. श्रीवर्धनला आम्ही सकाळी लवकरच पोचलो होतो पण एक सायकल दुकान उघडले होते, त्याच्याकडे लगेचच काम झाले. आम्ही पोट पूजा केली आणि
मार्गस्थ झालो. पावसाची रिपरिप सुरूच होती, सोबत
रेन जाकेट होते पण ते घातले नाही, अति शहाणपणा दुसरे काय ? परिणामी चिंब भिजलो, त्यात
माझा अंगरखा सुती असल्याने त्याचा ओलेपणा बराचवेळ टिकून रहात होता. मजल दरमजल करत
बागमांडला जेटी गाठून खाडी पार केली. जेटी पार केल्यावर आमची खरी परीक्षा सुरु
झाली, अतिशय खराब रस्ता, समोर
उंच उभा डोंगर दुपारची वेळ सगळच जमुन आलेलं. नवानगर मार्गे केळशी गाव गाठले,
सायकलिंग फक्त ६२ किमी झाले पण चांगलीच दमछाक झाली.
MYBY
केळशीमधे प्रफुल्लचे एक परिचित श्री परांजपे यांच्या
घरी रहाण्याचे ठरले होते त्याप्रमाणे त्यांच्याकडे गेलो. गेल्या गेल्या गरमागरम
चहाने स्वागत झाले. त्यांचे बंधु परगावी रहात असल्याने बंधुंचे घर रिकामे होते
त्याच घरात आमची सोय करून दिली. आज दिवसभर पाउस आणि अधुनमधुन खराब रस्ता यामुळे
सायकली चिखलाने माखल्या होत्या. स्वतः आंघोळ करण्यापूर्वी सायकलसेवा गरजेची
होती. मी माझ्या MYBY अर्थात मेंटेन युवर बाईक युवरसेल्फ या उपक्रमाचे
प्रात्यक्षिक साठे- पेठें कडून करून घेतले. हल्लीच्या आधुनिक सायकल्स खरंच
मेंटेनंस फ्री आहेत. नियमीत थोडीफार देखभाल केली की सायकल विनाविघ्न सेवा देते.
नियमीत देखभालीमधे चेन आणि चेन ज्या दोन छोट्या चक्रांवरून फिरते ती चक्र, डिझेलने स्वच्छ करणे, रिम
आणि ब्रेक पॅड सुक्या फडक्याने पुसणे ही
मुख्य दोन कामे करावी लागतात.
दोघांनीही उत्साहात सायकलसेवा केली, थोडा
धोबीघाट उरकला आणि छान पैकी आंघोळी केल्या.
हाताशी वेळ होता म्हणुन गप्पा मारत गाव उंडारायला
निघालो. स्थानिक रंगीत मंचुरियन, चा, भजी, मिठाई ई चा आस्वाद घेतला.
काळोख पडताना पुन्हा परांजप्यांचे घर गाठले. घरातील मंडळींबरोबर थोड्या गप्पा
मारल्या आणि मोर्चा भोजनाकडे वळविला. आमच्या सोबत घरातील आजोबाही जेवायला बसले
होते. श्री परांजपेंनी गावातुन आणलेला गरमागरम वडापाव त्यांच्या पानात वाढला
आम्हाला आश्चर्य वाटले. नंतर कळले रात्रीच्या जेवणात त्यांना हा प्रसाद रोजच लागतो, धन्य ते आजोबा !

केळशी ते कोळथरे
सकाळी लवकर निघालो, पावसाची
भुरभुर सुरुच होती, आडे, मुर्डी गाव पार करून
आंजर्ले खाडीपाशी आलो. खाडीवर भलामोठा पुल बांधला आहे, पुल म्हणजे गुरांचा मुक्त गोठाच जणु ! शेकडो गाई गुरं, म्हशी त्यावर पहुडली होती, डांबरीकरण
कुठे दिसतच नव्हते सर्व भाग गोमयाने भरलेला. गुरांच्या गर्दीतुन वाट काढणे म्हणजे पुण्यात
तुळशीबागेतुन सायकल चालविण्या सारखे, असो.
खाडी मधे खारफुटीचे जंगल आहे, एकुण परिसर नयनरम्य आहे. आम्ही
सूर्योदयाच्या आसपास तेथे होतो त्यामुळे निसर्गाचे सौंदर्य आणखी खुलले होते. फोटो
तो बनता है भिडू असे मनात म्हणुन विविध कोनांमधुन फोटू मारले. हल्लीचे मोबाईल मधुन
कॅमेराच्या तोडीचे फोटो काढता येतात शिवाय मोबाईल हाताळायलाही सुलभ. प्रवासात साठे-पेठे
प्रेमळ स्पर्धा सुरुच होती, मी बापडा शेवटी असे, फक्त चढ आला की कॅप्टनला माझी आठवण येई माझी सोबत त्याला
आश्वासक वाटे.
आंजर्लेच्या खाडी नंतर मुख्य रस्ता डोंगरावरून जातो
ज्याला हर्णे बायपास म्हणतात, सायकल वाल्यांना तो योग्य
नाही. पुलावरून थोडं पुढे आल्यावर उजवीकडे एक रस्ता जातो त्या रस्त्याने पाजपंढरी गाव पार करत हर्णैचा सुवर्णदुर्ग
उजवीकडे ठेवुन आपण गावात शिरतो.
मुळ कोळथरेचे असणारे श्री प्रकाश झगडे यांचे हॉटेलमधे
नाश्टा करणेसाठी गेलो. छोटेखानी स्वच्छ सुंदर हॉटेल, चविष्ट
गरमागरम खाणं और क्या चाहिये ? हर्णैमधे शिरल्यावर कॅप्टनला
त्याच्या जुन्या मित्राची आठवण झाली. आम्ही गोरेगावला रहायचो, संघाच्या शाखेत खेळायचो इ माहिती त्याने पुरविल्यावर मी
जोशी कुटुंबाची साद्यंत माहिती सांगीतली त्याला थोडा धक्काच बसला. जोशी आणि आमच्या
कुटुंबाचे फार जुने स्नेहसंबध आहेत. हॉटेल मालकांनी लगेचच निरोप धाडला आणि
मिलिंदशेट त्वरेने हजर झाले. जुन्या स्मृती दोघांनी जागविल्या, पुनः चायबारी करून आम्ही मार्गस्थ झालो.

पाउस सुरुच होता, मला
थोडी कणकण जाणवत होती पण आज कोळथरेला स्वतःच्या घरी जायचे असल्याने मी निश्चिंत
होतो. हर्णैहून कोळथरेला दोनतिन मार्गाने जाता येते, समुद्रमार्गे
म्हटले तरी बरेच लोक सालदूर, आसुद पुल, गिम्हवणे, दापोली, बुरोंडी
असे जाणे पसंत करतात. आम्ही सालदूर
गावानंतर उजवीकडे वळून छोट्या रस्त्याने मुरूड गाठले. दूर्गादेवीचे बाहेरूनच दर्शन
घेवुन अमेय मुद्रणालयाचे श्री जोशी यांच्या आंगण्यात सायकल घुसविल्या. हेल्मेट, गॉगल, रेनजाकेट असा जामानिमा आणि कोणतीही पूर्व सूचना नाही
त्यामुळे कोणीही आम्हाला ओळखु शकले नाही. जोशी यांचे अंगणात प्रवेश केल्यापासुनच
दिवाळीचा माहौल जाणवत होता, घरात चकल्यांची तळणी सुरू
होती. खेडेगावात प्रत्येक सणासुदीचा माहोल तयार होतो अर्थात निसर्गही त्यामधे
हातभार लावतो. या जोशी कुटुंबाचे आणि आमचे व्यवसायिक आणि घरगुती असे दुहेरी संबंध
आहेत. अपारकष्ट आणि सचोटी या दोन तत्वांवर आज तिसरी पिढी व्यवसात उतरली आहे.
गरमगरम चकल्या, चिवडा, लाडू असा फराळ आणि वर घरच्या दुधाचा गरम कडक चहा और क्या
भगवान से मिलोगे ? अशी अवस्था.
मुरुडगावातून कर्दे गावाकडे जाणारा रस्ता स्वप्नवत !
लाल जांभ्या दगडी पेव्हमेंटचा अरूंद रस्ता, दोन्ही
बाजुला झाडांचे कुंपण, त्यामागे रांगेत घरे, घरासमोर आंगण आणि मागे बाग असं वाटत होतं हा रस्ता संपूच
नये. लगेचच पुन्हा डांबरीरोड सुरू झाला आणि आमचे स्वप्न भंगले. कर्दे गावाच्या
किनाऱ्याचे आसपास अनेक लहान मोठी हॉटेल्स झाली आहेत तरीही परिसर स्वच्छ, सुंदर नेत्रसुखद आहे. कर्दे- लाडघर रस्त्यावर काही फसवे
फाटे फुटले आहेत त्याची काळजी घ्यावे लागते. रस्ता अक्षरशः डोंगराच्या कुशीतुन
समुद्राच्या साक्षीने वळणे घेत जाणारा आहे. काही ठिकाणी थोडा उतार आणि समोर एकदम
उभा चढ दत्त म्हणुन पुढे उभा रहातो, योग्यवेळी
गिअर बदलला नाही तर सायकलवरून उतरणे भाग पडते. आम्ही लाडघरमधील मुख्यवस्ती
लागण्यापूर्वी उजवीकडे वळून शेतातील पायवाट, कधी बांधांवरून सायकली दौडल्या आणि
दापोली बुरोंडी रस्त्यावरील वडाचास्टॉप या
ठिकाणी मुख्य रस्त्याला लागलो. बुरोंडी गावानंतर पुन्हा एक डोंगर पार करावा लागतो, डोंगर माथ्यावर पुण्यातील श्री गानु यांनी श्री परशुरामांचा
भव्य देखणा पुतळा उभा करून पर्यटकांसाठी एक आकर्षणच निर्माण केलंय. श्री
परशुरामांचे आशीर्वाद घेतले थोडी मौजमजा केली आणि कोळथरेच्या दिशेने निघालो.

कोळथरेला आमच्या घरी जाणे ऐवजी थेट गावातील हंगामी
पाण्याचा डोह, ज्याला आम्ही मढी म्हणतो तिकडे
सायकली नेल्या. निळशार, स्वच्छ, नितळ पाणी पाहून दोघेही अवाक झाले. सुर, उडी, गोलांटी उडी, उंच कड्यावरुन हनुमान उडी असे विविध बालिश चाळे करत मनसोक्त
डुंबलो. ताप अंगदुखी जाणवत असल्याने घरी जावून मी अंगाला आमचे कफना तेल जिरविले, सर्वांनी छान कोरडे कपडे घालुन बंधुराजांबरोबर गप्पाष्टक
सुरू केले.
मोठे बंधु श्री माधव महाजन हौस म्हणुन विविध फळांची
वाईन बनवितात आणि आल्यागेल्या चोखंदळ सुहृदांना खिलवितात. साठे- पेठेंची चैनच झाली, बारा तेरा प्रकारच्या वाईन थोडी-थोडी करून टाकी भरे पर्यंत
रिचविली, भोजनपूर्व चांगली तयारी झाली होती. आमच्या शेजारील कोझरेकर
वहिनीना खास कोकणी मेनु बनविणेस सांगितला होता, घावन-घाटलं, नारळाची चटणी आणि वरणभात विथ लिंबु आणि साजुक तुंप !
तिघांनी विशेष करून वाईनवीरांनी जेवणावर आडवा हात मारला.
सततचा पाउस, किनारपट्टीवर
घोंगावणाऱ्या वादळाच्या बातम्या, अनिमीत झालेली सार्वजनिक
वहातुक व्यवस्था, माझे
अनारोग्य यामुळे आम्ही द्विधा मनस्थितीमधे अडकलो. शेवटी चर्चेअंती निर्णय केला
उद्या गुहागर गाठूया आणि मग निर्णय घेवू. कोळथरे गुहागर अंतर फार नसल्याने सकाळी
नाष्टा करून निघुया असे ठरवून झोपी गेलो.
अलिबागहून निघाल्या पासुन अनेक ठिकाणी आपल्या उजव्या
बाजुला सतत स्वच्छ सुंदर अथांग समुद्र, अधुनमधुन
डाव्या उजव्या बाजुस सुरुचे वन, गाव
असल्यास डावीकडे टुमदार घरे नाहीतर डोंगर आणि एकुणच शांत रमणीय परिसर असे वातावरण
अनुभवण्यास मिळते. दहा विस किमीचे लांब घाटरस्ते कुठेच लागत नाहीत, मात्र एका मागे एक अकस्मात येणारे चढउतार यांनी जीव
मेटाकुटीस येतो. नंतर नंतर उतार दिसल्यावर होणाऱ्या आनंदा ऐवजी मनात धडकी भरते ती
समोर उभ्या ठाकणाऱ्या टेकाडाची. असा हा चढउतारांचा लपंडाव खेळत कोकण किनारपट्टीवरील
सायकल सफर आव्हानात्मक पण तरीही आनंददायक आहे.

कोळथरे गुहागर
सकाळी उठलो पाउस सुरूच होता, मला ताप आल्याचे जाणवत होते तरीही सायकली सजवल्या आणि
नाष्टा करून आरूढ झालो. दाभोळला जेट्टी
मधुन खाडी पार करुन रानवी गाठली, बहूचर्चित एन्रॉन प्रकल्प याच
गावात आहे. कंपनीच्या मुख्यव्दारासमोरील छोटेखानी हॉटेलमधे गरम लिंबु सरबत पियालो
आणि कुच केले. रानवी गाव डोंगरमाथ्यावर आहे आणि गुहागर समुद्रसपाटीला आहे, शिवाय
रस्ताही सुंदर आहे त्यामुळे शेवटचे काही किमी अंतर आनंदात पार केले.
दुर्गादेवीच्या भक्तनिवासात छान सोय आहे तिथे धोपट्या टाकल्या आणि थेट एसटी स्टँड गाठला. माझे शरीर मला
रात्रीच्या प्रवासासाठी अनुकुल वाटले नाही कारण अंगात ताप होता आणि अंग दुखत होते.
पेठे-साठेंची रात्रीच्या आणि माझे दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीचे आरक्षण केले
पोटपूजा करून परत भक्तनिवास गाठले. तिघांनी निवांत गप्पा मारल्या चार दिवसाच्या
एकत्रित सायकलिंगचा आढावा घेतला, गुहागर पुढील गोव्या पर्यंतचा
टप्पा भविष्यात नक्की करण्याचे ठरविले, अर्थात
प्रत्यक्षात केव्हा घडेल कोण जाणे.
स्वान्त: सुखाय
सफरीवर निघण्या पूर्वी खर्चाचा एकुण अंदाज, दैनंदिन खर्च त्याचे नियोजन या विषयी कॅप्टन जवळ चर्चा झाली
होती. आम्ही अशा उपक्रमामधे सर्व शिलेदारांकडून एक ठराविक रक्कम घेवून एकाकडे जमा
करतो, तो खजिनदार, होणारा प्रत्येक खर्च त्यानेच करायचा. गंगाजळी
संपत आली की पुन्हा रक्कम जमा करायची, हिशोब
ठेवणे सोप्पे. कॅप्टनला कल्पना आवडली, म्हणाला
आपण सुरवातीला पाच-पाच हजार काढू, मी मनात म्हटले बडे लोग बडी बाते ! अगदी तस्सच
झालं. बसल्या-बसल्या आम्ही हिशोब मांडला, जाण्यायेण्याच्या
प्रवासखर्चासह प्रत्येकी चार हजार पेक्षाही कमी खर्च झाला. एव्हढ्या कमी खर्चात ट्रिप होउ शकते यावर
कॅप्टनचा विश्वासच बसेना पण तेच सत्य होते. आपले भटकणे स्वान्तस्सुखाय असेल, लाईक्स, हॅशटॅग आणि कॉमेंट्स साठी नसेल
तर खिशाला फार कात्री न लावता आनंद लुटता येतो.

गाडी क्रमांक सत्ताविस सतरा...
राज्य परिवहन बस थांब्यावर अशी घोषणा ऐकली की
प्रवासाची उर्मी येते. मला ती उद्घोषणा रेकॉर्ड करायची होती मी तशी विनंती त्या
अधिकाऱ्यास केली त्याने माझा मान ठेवुन पुन्हा एकदा आपल्या खास ठसक्यात उद्घोषणा
केली माझे काम झाले. कॅप्टन जवळपास वीस वर्षांनी महामंडळाच्या बसने प्रवास करत
होता. डेपोत हमाल नसल्याने त्याचाही अनुभव कॅप्टनला मिळाला. माझ्या सोबत रिलायंस
कंपनीचा एक उच्च अधिकारी चक्क बसच्या टपावर चढला, मी
चटकन त्याचा फोटो काढून घरी चांगलं स्वागत व्हावे या सद् हेतुने नंतर त्याच्या बायकोला पाठवून दिला. प्रफुल्लची
सायकल पुणे गाडीवर चढवली, दोघांना रवाना करून मी
भक्तनिवास गाठले. अंगात थोडा ताप होता, अंग दुखत होते पुन्हा एकदा कफना तेलाने मालिश केले आणि
झोपलो.
धक्कादायक अनुभव
रात्रभर पाउस कोसळलतच होता, पहाटे उठलो तेव्हाही पाउस पडत होता. मनाचा हिय्या करून
सायकल दामटली आणि स्टँड गाठला, पुरता भिजलो. अनेक भांबावलेले
प्रवासी पाहिले, कारणही तसंच होतं बसेसच्या नियोजित
फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या कारण डेपोतील डिझेल संपलय- वादळ इफेक्ट ! मी
धावत अधिकारी व्यक्तीकडे जावून चौकशी केली, त्यांनी
मला आश्वस्त केलं लांब पल्याची गाडी सोडू फक्त थोडा उशीर होईल, मी निश्चिंत झालो. अता सायकल बसच्या टपावर चढविण्याचे शिवधनुष्य
मला एकट्याला उचलावयाचे होते, जे आज मला शक्यच नव्हते, मी पुन्हा अधिकाऱ्यास भेटलो त्यांनी व वाहकाने भर पावसात
माझी मदत केली. प्रवास सुरू झाला पाउसही थांबला चक्क कडक उन पडले मला तरतरी आली.
मला आता स्वारगेटचे वेध लागले, स्वारगेटला जेमतेम प्रवासी
उतरेपर्यंत बस एका ठिकाणी उभी असते मी त्याचाच विचार करत होतो. बस थांबल्या क्षणी
लगबगीने टपावर चढलो आणि वाहकाच्या मदतीने चपळाईने सायकल उतरविली. खाली येवुन पहातो
तर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. सायकलचे हॅंडल नव्वद अंशात फिरून चाकाला
समांतर झालेले, एका टायरचा घासुन कपचा
उडालेला. माझ्या मनात एकदम प्रकाश पडला, वाटेत
कुठेतरी गाडी वेगात असताना झाडाच्या फांदीवर सायकलचे हँडल जोरात आदळल्याने हा
प्रकार घडला असावा. नशिबाने मी मजबुत दोरीने सायकल घट्ट बांधली होती अन्यथा माझी
सायकल वाटेत कुठेतरी फेकली जावून बेवारस पडली असती. माझी सायकल मला पुन्हा दिसली
नसती या कल्पनेने मला गहिवरून आले. मला मित्र विवेक मराठेची आठवण झाली, त्याचा नेहमी अट्टाहास असतो 'सदा
सुसज्ज आणि सतर्क'. मी
या गोष्टीचा एव्हढा धसका घेतला मनात ठरविले पुन्हा कधीही बसच्या टपावरून सायकल
न्यायची नाही.
स्वारगेटच्या शेजारी एक फक्कड चहाची टपरी आहे तिथे
एकट्यानेच चायबारी केली अणि या छोटेखानी पण संस्मरणीय सायकलसफरीची सांगता केली.