Tuesday, 25 June 2019

नॅनो महासफारी - कोंकण ते काश्मीर


नॅनो महासफारी
कोंकण ते काश्मीर


माझी आई वय वर्षे
७८ हिने ज्यावेळी हट्टाने नॅनो गाडी खरेदी केली आणि ती घरी आणण्याची जबाबदारी माझेवर आली, त्या वेळेपासुनच खरेतर मी नॅनो च्या प्रेमात पडलो. सन्माननीय रतनजी टाटा यांना पत्र लिहुन मी धन्यवाद दिले. गेल्या वीस वर्षामध्ये भारतातील वेगवेगळ्या कंपन्यांच्या (लेफ्टहँड ड्राइव्ह विलिज सह) १५-१६ प्रकारच्या गाड्या मी वापरल्या आहेत. त्यामुळे गाडीया विषयामधे मी अज्ञानी नक्कीच नाही. नॅनो मधील ड्रायव्हिंग पोझिशन, लेगस्पेस, पिक-अप, ए.सी. या सर्वांनी मी अक्षरश: अचंबित झालो. घाटामधे तर भारतातील तथाकथित पॉवरफूल SUV ना देखील नॅनो ने ओव्हरटेक करुन अनेक वेळेला पुढे गेलो आहे.
२०१२ जानेवारी महिन्यामध्ये माझा दापोलीतील अवलिया मित्र श्री.आशय जोशी कोळथरला आला होता त्याने लेह-लडाख ला सायकलिंग करण्यासाठी जाऊया असा प्रस्ताव मांडला. चर्चेच्या ओघात मी त्याला आपण नॅनो ने लेह गाठु’ अशी माझी इच्छा प्रकट केली कारण नॅनोची चाललेली बदनामी मला सलत होती, तो तयार झाला. मी अन्य सभासदांचे शोधकार्य सुरु केले. दरम्यान आशय ने शैक्षणिक बंधनामुळे येण्यास असमर्थता दाखविली. ओंकार गोडबोले, विनय मोडक (दोघेही मुंबई), विशाल बोरावके (माळी नगर, अकलुज) आणि मी स्वत: अशी टिम फायनल झाली. फोन वरुन सर्वांशी सतत चर्चा, विचारांची देवाण घेवाण सुरुच होती. जवळ जवळ १५-१६ दिवसांचा प्रवास होता त्यामुळे प्रवासा दरम्यान एक आचारसंहितातयार करण्याचे काम मी सुरु केले होते.
माझे पुण्याचे स्नेही श्री.केदार गोगटे (के.के.) यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या महासफारीचे नियोजन करत होतो. दिनांक १५ जुन ते १८ जुन श्री केदारला लेह मध्ये सवड होती म्हणुन आम्ही १५ जुनला लेह ला पोहचणेच्या दृष्टीने आयोजन केले.
आचार संहितेचा भाग म्हणुन आम्ही चौघांनी जबाबदार्‍या वाटुन घेतल्या होत्या. मी आणि श्री.मोडक ड्रायव्हींग करणार होतो, हिशेबनिस म्हणुन श्री.बोरावके आणि ओंकारने फोटोग्राफी आणि प्रवासाचे रेकॉर्ड ठेवायचे असे श्रम विभाजन नक्की केले होते. प्रत्यक्ष महासफारी पूर्वी अनेक जणांजवळ हा विषय बोलत होतो बहुतेक जण नेहमी प्रमाणे ‘‘रामदास वेडा आहे तो काहीही करेल’’ असा प्रतिसाद देत होते. काही जणांनी उपयुक्त सूचनाही केल्या.




टाटांचे आशीर्वाद !

आमच्या महासफारी संदर्भात मला सन्माननीय श्री.रतनजी टाटा यांना माहिती द्यायची होती परंतु माझ्या समोर एक मोठाच प्रश्‍न होता. माझ्या भावना त्यांच्यापर्यंत इग्लीश मधुन पोहचविण्याचा. मी आमचे कौटुंबिक स्नेही मा. श्री. किशोरकाका जावळे (मुंबई) यांचे जवळ सहजच हा विषय बोललो. त्यांनी मला प्रोत्साहन तर दिलेच शिवाय इग्लिश मधुन पत्र तयार करुन देतो असेही सांगितले. मुंबईला गेल्यावर त्यांनी अतिशय सुंदर असे पत्र तयार करुन पाठविले मी त्यावर मोठ्या दिमाखात सही केली आणि पत्र रतनजीं कडे रवाना केले. बरेच दिवस गेले काही प्रतिसाद आला नाही मी थोडा निराश झालो, वाटले पत्र बहुदा पोष्टात गहाळ झाले असावे आपण पुन: एक प्रत कुरिअर ने पाठवु, इतक्यात मेल बॉक्स मधे बॉंबेहाऊसमधुन आलेला मेल दिसला मेल वाचून अक्षरश: आनंदाने मोहरलो. सन्माननीय रतनजींनी स्वत: स्वाक्षरी केलेले पत्र मेल मध्ये होते पत्रात त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले होते. मी लगेचच जावळे काकांना आनंदाची बातमी कळविली त्यांनाही आनंद झाला. केवळ त्यांच्या लेखन कौशल्या मुळेच मला सन्माननीय रतनजींचे आशीर्वाद मिळाले. टाटा मोटर्स च्या नॅनो प्रोजेक्ट मधील अधिकारी श्री.प्रियदर्शन क्षीरसागर माझे परिचयाचे होते त्यांनी नंतर संपर्क करुन कस्टमर सर्व्हिस डिव्हिजनल हेड श्री.अमित सिदाना मार्फत संपूर्ण प्रवासा दरम्यान सर्व प्रकारची सेवा देऊ केली त्यामुळे मी निश्‍चिंत झालो होतो.
नॅनो गाडीला जाणिवपूर्वक बदनाम करण्याचे जे षडयंत्र रचले जात होते ते मला सहन होत नव्हते म्हणुन आमच्या सफारीची माहिती किमान स्थानिक वृत्तपत्रांमधून छापुन यावी अशी माझी मनोमन इच्छा होती.
मी मा.श्री.नाना जोशी (दै.सागर) यांना पत्र लिहून हे कळविले. नानांनी माझ्या भावना आणि विषयाचे गांभीर्य दोघांना योग्य न्याय देत दै. सागर मध्ये अतिशय सुंदर लेख छापला, नंतर दैनिक तरुण भारत, दै.प्रहार मधेही यथोचित बातमी छापुन आली.
प्रवासा दरम्यान लागणारे कपडे, सामान, औषधे (हाय अल्टिट्यूड मध्ये उपयुक्त) या सर्वांची जमवा-जमव पूर्ण झाली होती. एकुण सामानावर आम्ही बंधन घालून घेतले होते, प्रत्येकाची क्त एकच सॅक तयार करायची होती. प्रत्यक्ष प्रवासापूर्वी श्री.केदारजीं बरोबर एक बैठक घेऊन प्रवासात घ्यावयाची काळजी, लेह (लडाख) मधे घ्यावयाची विशेष काळजी विविध हॉटेल्स इ. बाबत एकदा चर्चा केली, आणि महासफारीची तारीख ठरविली जून ते २४ जून २०१२ (स्थानिक स्थलदर्शनासह). एकूण अंतर ५८०० कि.मी. होईल असा अंदाज काढला आणि रोज साधारण ६०० कि.मी. अंतर कापण्याची मानसिक तयारी केली. प्रवासाची वेळ पहाटे ५.३० ते सायं. ७.३०  अशी आधीच नक्की केली होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये रात्री ड्रायव्हिंग करायचे नाही हे आम्ही पक्के केले होते.


महास
फारी

दिनांक जून ला पहाटे ४.३० वाजता कोळथरेहून निघुन १०.४५ ला सायनला श्री. मोडक यांचे घरी पोहचलो, तिघेही सामान घेवून तयारच होते, लगेचच ११ वाजता आम्ही निघालो कारण आज बडोदा गाठायचे होते म्हणजे किमान तासांचा प्रवास होता. माझे सासरे श्री. जोग आम्हाला निरोप देण्यासाठी पार्ल्याला हायवेवर थांबले होते. श्री.जोगांनी एक भला मोठा आणि सुंदर बुके आमच्यासाठी आणला होता तो आम्हास दिला, सोबत एक सूचनांचा कागदही दिला त्यामध्ये काश्मीरचे  सेनानी श्री.झोरावर सिंहांची आठवण ठेवा अशी एक मौलिक सूचनाही होती त्यांचा निरोप घेवून आम्ही निघालो. ड्रायव्हिंग बाबत निर्णय केला होता की प्रत्येक तीन तासाने थांबायचे नाश्ता/जेवण करायचे ड्रायव्हर बदलायचा म्हणजे गाडी आणि प्रवासी दोहोंना थोडा वेळ विश्रांती.
नियोजित वेळेला सायं ७.१५ मिनिटांनी बडोदे शहराचे बाहेर  श्री.मोडक यांचे नातेवाईक श्री.कानिटकर याचे  फार्महाऊस वर पोहोचलो वाटेतील रस्ता सुंदर असल्याने काहीच त्रास झाला नाही. आज गाडीचे रनिंग ६८९ कि.मी. झाले. दुसर्‍या दिवशी पहाटे ३.४५ ला उठून ४.३० ला प्रवास सुरु केला, सोबत श्री.कानिटकर यांनी दिलेल्या ठेपल्यांची पाकीटे होतीच, त्याचा आस्वाद घेत होतो, हे ठेपले आम्हाला आणखी आठ दिवस साथ देत होते. अहमदाबाद एक्सप्रेस वे म्हणजे ड्रायव्हिंगला पर्वणीच आहे. अहमदाबाद कधी आले हे कळलेच नाही. ठरल्या प्रमाणे ३-३ तासांनी विश्रांती घेत धाब्यावर खाण्याचा आनंद लूटत जयपूर जवळ सायं. ६.४५ ला पोचलो. गाडीचे रनिंग ७५२ कि.मी. झाले. आज लवकर झोपलो. दुसर्‍या दिवशी पहाटे पुन: ४.३० ला प्रवास सुरु केला. आज दिल्ली पार करुन पुढे जायचे होते बर्‍याच स्नेही संबंधीतांशी चर्चा करुन दिल्ली मधे न शिरता जयपूर नंतर रेवाडी, रोहतक, झझ्झर, पानीपत मार्गे अंबाला गाठून पुढे जायचे ठरविले त्याप्रमाणे मार्गक्रमण सुरु केले. रस्ता आणि हवामान (उष्णता अंदाजे ४७ डी.सें.) आमची परीक्षा पहात होते. राजस्थान पेक्षा हरीयाणा मधील उन्हाने आम्हाला जास्त हैराण केले, तरीही नेटाने आम्ही सायं. ७.३० वाजता लुधियाना गाठले. लुधियाना गावातील फ्लायओव्हरचे काम सुरु असल्याने ट्राफिकची पार वाताहत झाली होती. ट्राफिकचा मी धसकाच घेतला, ठरविले येताना सकाळी लवकर लुधियाना पार करायचे. हायवेवरील हॉटेलचा वॉचमन म्हणजे आडदांड टिपिकल पंजाबी होता आमच्या समोर उभा राहून निर्विकार चेहर्‍याने आमची चौकशी करायला सुरुवात केल्यावर आम्हाला थोडी भितीच वाटली. गाडीवर आम्ही मुंबई लेह-मुंबई (कोळथरे) असा स्टिकर लावला होता तरीही त्याने 'बंबई लेह बंबई' असाच उच्चार केला आणि नॅनो ने एव्हढे लांब आल्या बद्दल आश्‍चर्य व्यक केले. महाराष्ट्र दे साई कित्थे ? असा प्रश्न तो एक सारखा विचारात होता.  आम्ही त्याला शेवट पर्यंत काहीही समजावू शकला नाही. अंबाला पासुन पुन्हा टोल रोड असल्याने ६४१ कि.मी. अंतर आम्ही पार करु शकलो होतो.
चलान कटेगा फिल्म फटेगी' 
 
आज चौथा दिवस होता आज आम्ही जम्मु काश्मीर सीमेत प्रवेश करणार असा अंदाज आम्ही बांधला होता. आजपर्यंत गाडी आणि प्रवासी कोणालाही काहीही त्रास झाला नव्हता. पहाटे ५.४५ ला प्रवास सुरु केला. सध्या सूर्याचे उत्तरायण सुरु असल्याने उत्तर भारतात पहाटे पावणे पाच पासून दिसायला लागते आणि सायं. ७.४५ पर्यंत चांगलाच उजेड असतो याचा अनुभव आम्ही घेतला. परंतु याचा एक तोटा म्हणजे सकाळी नऊ वाजल्या पासून संध्याकाळी वाजेपर्यंत प्रखर उन्हाचा सामना करावा लागतो पूर्ण आठ तास सूर्य फूल  ड्यूटी वर असतो.
 सकाळी ६.४५ च्या दरम्यान आम्ही जालंदर च्या मुख्य सिग्नल जवळ आलो तेथुन पठाणकोट साठी आम्हाला उजवीकडे वळायचे होते. सिग्नल जवळ गाडी स्लो केली तेव्हढ्यात  ट्राफिक पोलीसने शिटी मारुन गाडी बाजूला घेण्यास सांगितले. गाडी मीच चालवत होतो. बाकिच्यांना सांगीतले काही बोलू नका मी पाहतो. पोलीस एकदम  गरजला  चलान कटेगा फिल्म टेगीसुप्रिम कोर्टाची ऑर्डर आहे, गाडीच्या काचांना डार्क फिल्म चालत नाही. कशी बशी समजूत काढून पुढे निघालो वाटेत थोडा एकदा रस्ता चुकलो.  अमरनाथ यात्रेकरुंना आहाराची सेवा देण्यासाठी निघालेले ट्रक्स विशाल भंडाराअसे बॅनर्स लावलेले सतत भेटत होते २५ तारखेपासून अमरनाथ यात्रा सुरु होणार होती.
सायं. ६.१५ मिनिटांनी आम्ही जम्मु काश्मीर मधे रामबनगावी पोचलो तेथेच राहिलो आज क्त ४६० कि.मी. अंतर कापले. एक गोष्ट लिहिण्याचे राहून गेले, हरयाणा भागात गाडीचा हॉर्न वाजविणेची एक विशिष्ट पद्धत आहे. आम्ही त्याला नाव दिले होते मरे पर्यंत फाशी. आपण सामान्यपणे एकदाच पीअसा हॉर्न दाबून समोरच्या गाडीच्या प्रतिसादाची वाट पाहतो तेथे मात्र एकदा हॉर्न दाबला की आपले इप्सित साध्य होईपर्यंत पीऽऽऽऽऽ सुरूच, हरयाणवी पॅटर्न!
टाटा मोटर्सचे श्री.अमित सिदाना सतत आमच्या संपर्कात होते त्यांचे सूचनेवरुन श्रीनगरमधील टाटा मोटर्सच्या डिलर कडून गाडी तपासून घेण्याचे निश्‍चित केले होते. माझ्या मनात ब्रेक, क्लच तपासणी आणि एअर फिल्टर सा करुन घ्यावा असे होते. पहाटे ४.४५ ला रामबन सोडले बारमुल्ला बायपासवर शोध घेत घेत श्रीनगरमधील टाटा मोटर्सच्या डिलर कडे १०.३० ला पोहचलो. तेथील मॅनेजर दोन दिवसांपूर्वीच टाटा आर्या घेवून लेह ला जावून आले होते. त्यांनी मला लॅपटॉप वर फोटोग्राफ्स दाखविले, आमच्या धाडसाचे कौतूक केले. पण सोनमार्ग पुढील रस्ता व मार्गाची नीट चौकशी करुनच पुढे जा अशी धोक्याची सूचनाही दिली. वर्कशॉप मधुन क्त एअर फिल्टर सा करुन घेतला आणि निघालो. श्रीनगरमधील प्रसिद्ध दललेक’, ‘मुघल गार्डनपाहून ५.४५ ला सोनमर्गला पोचलो. वाटेमध्ये दुतर्फा चिनार वृक्षांची उंचच्या उंच झाडे लागतात, क्रिकेटच्या बॅट बनविणारे छोटे मोठे शेकडो कारखाने दिसतात. वाटेत प्रसिद्ध असा २.७ कि.मी. लांबीचा जवाहर टनेल पार करावा लागतो. विशेषत: श्रीनगरपासूनच सैनिकी अस्तित्वाची जाणिव होऊ लाते. सोनमर्गला आम्हाला जवळून (पहिल्यांदाच) बर्फाळ डोंगर पहायला मिळाले. आमच्या दुर्देवाने गेल्या ३०-३२ वर्षात कधी पडला नव्हता एव्हढा बर्फ त्या सुमारास पडला होता त्यामुळे प्रचंड थंडी आम्ही अनुभवली. सोनमर्गमधील हॉटेल मालक, गाडीचे ड्रायव्हर्स इ. जवळ चौकशी केली आणि आम्ही सर्वानुमते निर्णय घेतला, नॅनो घेवून पुढे जायचे नाही. त्यामुळे नॅनो पार्क करुन ठेवण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. सोनमर्गमधील बहुतेक हॉटेल्सना स्वत:चे स्वतंत्र पार्किंग नाही. आमचा हॉटेलवाला पार्किंगची सोय करतो (रस्त्यावरच) आणि लेहला जाण्याच्या गाडीचीही व्यवस्था करतो असे म्हणाला. सोनमार्ग लेह अंतर ३३० कि.मी. आहे. त्याने सांगितलेले गाडी भाडे खुपच होते. आमचा विचार विनिमय चालू होता. आमचा नविन प्लान कळविणेसाठी मी केदारला  लेह ला फोन केला त्यांनी मला आग्रह केला तुम्ही नॅनोच घेवून या हवेतर मी येथील लोकल ड्रायव्हर पाठवतो किंवा मी स्वत: येतो. मी त्यांना विनम्रपणे नकार दिला आणि गाडी भाड्याबद्दल बोललो ते म्हणाले भाड्याच्या गाडीची आणि नॅनो पार्क करुन ठेवण्याची चिंता करु नका उद्या सकाळी ९.०० वाजता तुम्हाला घेण्यास गाडी येईल आणि नॅनोहॉटेल सोनमर्ग ग्लेशियरच्या प्रांगणात पार्क करुन ठेवा. आम्ही पुन: चर्चा करुन त्यांना होकार कळविला.
सकाळी ९.३० ला निघालो, जोझीला पास पुढे द्रास नंतर कारगिल मध्ये वॉर मेमोरियल पाहिले तेथे सैनिकांच्या स्मारकावर नतमस्तक झालो. तेथील संग्रहीत वस्तू पाहुन डोळे भरुन आले. स्मारकाच्या मागेच युद्धातील प्रसिद्ध टायगर हिल तोलोलिंग ही शिखरे पहावयास मिळतात ते पाहून पुढे मुलबेक ला पाहोचलो. तेथे १२०० वर्षे जूना बुद्धाचा एका दगडात कोरलेला मोठा पुतळा आहे त्याच्या समोरच एका छोटेखानी हॉटेल मध्ये राहिलो तेथिल जेवण अतिशय रुचकर होते.
मुलबेक पर्यंत मुस्लीम बहूल भाग आहे तेथुन पुढे बुद्ध बहुल भाग सुरु होतो. सकाळी निघालो नामिकिला पास, फोटूला पास, लामायुरु, मुनलँड, निमुसंगम, मॅग्नेटीक हील गुरुद्वारा इ. पाहून दुपारी लेहला पोचलो. तेथे केदारने  लोक साईट सिईंग ची व्यवस्था केली होती. ठिकसे  मोनॅस्ट्री आणि हॉल ऑ फेम (वॉर मेमोरियल) पाहिले. रात्री तिबेट हॉटेल मध्ये मोमुआणि थुकपाचा आस्वाद घेतला, स्थानिक हॉटेल मध्ये गुरगुर’ (लोकल खारट चहा) प्यालो.
१६ तारखेला पेंगॉग लेक पहाणेस जायचे होते त्यासाठी पास काढून घेतले. आदल्या दिवशी केदारजींनी ४-५ तास बर्फात चढाई केल्यामुळे त्याच्या डोळ्यांना खुप त्रास होत होता (स्नोग्लेअरमुळे) त्यामुळे ते आमचे बरोबर लेक पाहण्यास आले नाहीत. लेह मधील हॉटेल लडाख मध्ये आमची राजेशाही सरबराई सुरु होती (केदारची कृपा). रात्री आमच्यासाठी खास मेनू तयार केला होता आणि त्यामध्ये स्पेशल नॉनव्हेज पदार्थ बनविला होता. आमच्या आचार संहिते प्रमाणे नॉनव्हेजला बंदी होती परंतु संहीताभंग करुन श्री. मोडक आणि श्री.बोरावके यांनी यथेच्छ आस्वाद घेतला. जेवणानंतर आमच्या साठी खास बनविलेला अक्रोड आणि जर्दाळूचा हलवा आम्हास देण्यात आला, मन तृप्त झाले.
कोळथरे हून निघताना हापूस आंब्याची एक पेटी मी सोबत घेतली होती. त्यातील चार आंबे लेह मधील हॉटेल मालकांना भेट दिले. आग्रह करुन केदारलाही दिले. उर्वरित आंबे आपण कृतज्ञतापुर्वक सैनिकांना भेट देऊया असा प्रस्ताव श्री.बोरावके यांनी मांडला आम्ही सर्वांनी तो उचलून धरला.      


परमोच्च आनंद
 परतीच्या प्रवासात जवाहर टनेल पार केल्यावर आपण आंबे भेट देऊ असे ठरविले त्याप्रमाणे वाटेत ५-६ आंबे काही सैनिकांना दिले उर्वरीत डझन दिड डझन आंबे पूढे कुठेतरी देऊ असा विचार करत असता आश्‍चर्याचा धक्का बसला संपूर्ण डिगडॉलयुनिटच मराठी होते. सुभेदार दीपक जेवणाचा आग्रह करत होते, आम्ही नम्रपणे नकार दिला शेवटी चहा घ्यावाच लागला. आम्ही त्यांच्यासाठी खास रत्नागिरी हापुस आंबे आणले हे कळल्यावर त्यांना खूपच आनंद झाला. सैनिकांच्या  चेहर्‍यावरील हासू पाहून आम्ही सूखावलो, संपूर्ण प्रवासातील परमोच्च आनंदाचा क्षण आम्ही अनुभवला. आमच्या सोबत फोटो काढण्याची विनंती केल्यावर नॅनो शेजारी हातात आंबा घेऊन सैनिक उभे राहिले. त्यांचा निरोप घेवून आणि भेटीच्या स्मृती मनात साठवून परतीचा प्रवास सुरु ठेवला.
येताना आम्ही दिल्लीमार्गे आलो, दिल्ली मधे  वाहनांची संख्या प्रचंड आहे परंतू वाहतुक सतत सरकत असते त्यामुळे काही अडचण आली नाही. रिंगरोडने  आम्ही दिड तासामध्ये दिल्लीच्या बाहेर पडलो. दिल्ली-जयपूर रस्त्याला खुप ट्राफिक  असते तो रस्ता ८-१०  पदरी करण्याचे काम सुरु आहे. जयपुरचे पुढे आल्यावर अजमेरचे आसपास आम्ही चुकुन जुन्या  हायवेला लागलो. रस्ता सुंदर नयनरम्य असा आहे. वाटेत आम्हाला नाथद्वारा लागले तेथे श्री.श्रीनाथजींचे दर्शन घेतले आणि पुढे उदयपुर ला पुन: फोर लेन नॅशनल हायवेला लागलो. पुढे अहमदाबाद, बडोदा, भरुच, तलासरी असे पार केले. १४ व्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पार्ला हायवेवर स्वागत करण्यासाठी श्री.जोग (माझे सासरे) श्रीखंड घेऊन उभे होते त्यांना श्रीनाथजींचा प्रसाद देऊन आम्ही सायन गाठले सायनला तिघांना उतरवून मी कोळथरचे प्रवासाला निघालो घरी सर्व आतूरतेने वाट पाहत होते.
घरी आल्यावर सौभाग्यवतीने रीतसर ओवाळले, सगळ्यांनी नॅनोला धन्यवाद दिले. आम्ही ५५६९ कि.मी. अंतर विनाविघ्न पार करुन आलो होतो आणि तेही इवल्याशा नॅनोने!    
आम्ही प्रवास सुरु करण्यापूर्वी इतर नियोजनाबरोबर खर्चाचा अंदाज देखील केला होता. सर्वसाधारण रु २३००० /- दरडोई खर्च येईल असा अंदाज करून तयारी केली होती  प्रत्यक्षात रु २१५०० /- खर्च आला.  
ज्यावेळी नॅनोने लेहला जाण्याची कल्पना मला सुचली तेव्हा लगेच मी आईजवळ बोललो कारण आई नॅनोची मालकीण  असल्याने तिची संमती आवश्यकच होती. आईने त्वरीत होकार दिला मग माझी पत्नी सौ.गौरी जवळ विचारणा केली तिनेही होकार दिला. या दोघींच्या सहकार्यामुळेच तथाकथितधाडस मी करु शकलो. संपूर्ण महासर निर्विघ्न पार पाडण्या मधे माझे स्नेही (फ्रेंड  अँड फिलॉसॉर) श्री.केदा गोगटेंचा सिंहाचा वाटा आहे, त्यांच्या मार्गदर्शना खेरिज हे शक्यच झाले नसते. केदारने  आपण दोघे नर्मदा परिक्रमाकरुया असा मनोदय व्यक्त केला आहे पाहुया कधी योग येतो. मय्याची कृपा कधी होईल काही सांगता येत नाही.
गेल्या वर्षी दिवसात पायी पंढरपुर झाले, यावर्षी ९.५ दिवसात नॅनोने ५५६९ कि.मी. प्रवास झाला. आता पुढे कोणता वेडेपणा..? देव जाणो.
सहप्रवासी
ओंकार - ९८२०१११९६९, ,
विशाल- ०९९२२९९३७९५  
मोडक
मार्गदर्शक - श्री.केदार गोगटे – ९८५०८९६१४५


 












चला वाचूया .....Let's start reading.

सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom

पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे  लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...