पाऊले चालती पंढरीची वाट....!
गेली दिड-दोन वर्षे आमच्या गावाच्या पंचक्रोषीमध्ये वाघाचा मुक्त वावर सुरु
आहे, त्याचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे तसेच रात्रीचे पशुजीवन
न्याहाळता यावे, या हेतूने रात्री जंगलभ्रमण
करुया असे आम्ही ठरवत होतो (मी, सुनिलसर, सुधीर महाडीक). काहीना काही कारणांमुळे योग येत नव्हता. ६ मे ‘अक्षय्य तृतीये’ च्या दिवशी नेहमी प्रमाणे सुनिल सर आले होते, (श्री.सुनिल वैशंपायन, पंचनदी) गप्पांच्या ओघात ते म्हणाले आपली जंगल सफारी काही जमत नाहीये, पण मला पंढरपूर वारी करणेची इच्छा आहे. मी म्हणालो गेले दोन वर्षे माझ्याही मनात आहे.
मी यावर्षी आमचे गावातील श्री.विना बडे यांचे बरोबर आळंदी-पंढरपुर वारी मध्ये ३-४ दिवस पदभ्रमण
करणार आहे, तुम्हीही या. सुनिल सर म्हणाले पंढरपूर वारी करायची परंतु ती आपल्या गावापासून (अंतर
सुमारे ३०० कि.मी.) मी म्हटले ठिक
आहे मी तयार आहे. बोलता बोलता
सहज विचार आला आषाढ वारीचे वेळी निघाल्यास पावसाचा त्रास संभवतो त्यापेक्षा आपण १ जूनला निघू आणि तुमची शाळा सुरु होण्यापूर्वी परत येऊ. सरांनाही हे पटलं म्हणाले ठिक आहे मी यावर विचार करतो. मी त्यांना म्हटले जी
काही तयारी लागेल ती सर्व तुम्ही करा मी फक्त सोबत येणार त्यांनी होकार दिला आणि त्यांचे विचारचक्र सुरु झाले. आमचे
माळीनगर (अकलूजचे) स्नेही श्री.विशाल बोरावके गेले जवळ जवळ वर्षभर विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येण्याविषयी माझ्याकडे आग्रह धरत होते आणि मी
टाळत होतो. त्यांचा फोन नेमका त्याच
दिवशी रात्री ८.३० ला आला हा मोठा योगायोगच किंवा शुभशकून. मी त्यांना विचार बोलून
दाखवला ते खूप खूष झाले. माझ्याकडून सुनिल सरांचा फोन नंबर घेऊन त्यांच्याशी
त्यांनी संपर्क केला. आता खर्या अर्थाने चक्र फिरु लागली. मी सरांना
होकार दिला असला तरी गृहलक्ष्मी सौ. गौरी जवळ बोलणे झाले नव्हते ती माहेरी होती.
मी योग्य संधीची वाट पहात होतो,
कारण मला होकारच
हवा होता. मी संधी साधली आणि तिने आनंदात होकार दिला. इकडे सरांची तयारी जोरात
सुरु होती. नकाशा काढुन श्री.बोरावकेंजवळ चर्चा करुन जाण्याचा मार्गही त्यांनी
निश्चित केला होता. श्री.बोरावकेंना आमची काळजी वाटत असल्याने त्यांनी उंब्रज
पुढील मार्गावर त्यांच्या अंदाजाने ठराविक अंतरावर आमची रहाणेची सोय ठरविली होती. मी त्यांना विनम्रपणे नकार दिला तरीही त्यांचा आग्रह होताच. इकडे काही भाग दुष्काळी
आहे तुम्हाला कल्पना नाही खूप त्रास होईल असे ते सतत सांगत होते. दरम्यानच्या
काळात कधीतरी माझी ‘सौ’ हा विषय तिच्या वडिलांजवळ बोलली. परिणामी मला निघण्याच्या पूर्वी ३-४ दिवस फोनवरुन ८-१० मिनिटाचे बौद्धिक एकावे लागले. विषय ‘‘आत्ताचे उन्हाळ्याचे दिवस वारी करिता कसे अयोग्य आहेत’’ त्यांचे म्हणणे चूक नव्हते. माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही (पालथ्या घड्यावर पाणी)
परंतु तो व्हायचा तेथे झाला. शेवटचे ३-४- दिवस सौ नी
नकारघंटा वाजविण्यास सुरुवात केली. अर्थात मी सरांना शब्द दिला होता माघार शक्य
नव्हती.
पूर्वी ठरविलेल्या दिवसाच्या आधीच म्हणजे ३० मे रोजी सायं. ५ वाजता निघायचे ठरले. मी कोळथेरेहून पंचनदीपर्यंत
दुचाकीने गेलो. मी पोहचण्यापुर्वी सरांनी श्री सप्तेश्वराचे आशीर्वाद घेतले होते. आम्ही
ठिक ५.०० वाजता चालण्यास सुरुवात
केली. मला चालण्याचा सराव नव्हता आणि बुटांचा तर अजिबातच नाही. कोठेही न थांबता ६.४० ला दाभोळ गाठले. वाटेत श्री. आण्णा शिरगावकरांनी
थांबण्याचा आग्रह केला तो मोह टाळून आम्ही फेरीबोटीवर पोचलो बोट बहुधा आमचीच वाट पाहत असावी लगेचच खाडी पार केली.
पहिली परिक्षा
खाडी पार केल्यावर घाट रस्ता आहे म्हणून पाण्याच्या बाटल्या भरुन देण्यास एका घरात
विचारणा केली. घरातुन नकार मिळाला तेथे पाणीटंचाई खूपच आहे म्हणून असेल कदाचित म्हटले पांडूरंगाने परिक्षा पहाणे सुरु केले असावे. पण
अर्धा किलोमीटर चालून गेल्यावर
आम्ही वारीला चाललो आहोत हे कळल्यावर खास गोडे पाणी आमच्यासाठी दिले. रात्री ८.२० च्या दरम्यान रानवी फाट्यावर सुनिल सरांच्या सौ
ने दिलेला डब्बा खाल्ला आणि पवारसाखरी गाठण्याचे ठरविले. बुटांमुळे मला चालणे
अशक्य होत होते थोडा अनवाणी चाललो आणि ठेच लागली पुन्हा पायात बुट चढविले आणि ९.३० वाजता पवारसाखरी गाठली. तेथील कांडळकर कुटुंबाने आमची अंगणात
झोपण्याची व्यवस्था केली सर्व कुटुंब प्रेमादराने वागले. पहिल्याच दिवशी साडेचार पाच तासात २१ कि.मी. चाललो. पायांना बुट लागून फोड आले होते परंतु चालणे
अपरिहार्य होते. पहाटे पावणे पाचला ला चालणे सुरु
केले. श्रृंगारतळी गाठली नाश्ता करुन लगेच निघालो. वाटेत खूप जांभळाची झाडे होती पडलेल्या जांभळाचा आस्वाद घेतला. कडेला आंब्याची झाडेही होती, समोर पडलेल्या आंब्याचा
अवमान करणे मला जमत नसल्याने प्रत्येक आंब्याची चव घेत होतो. सर मला सूचना करत
होते आंबे जपून खा! आपल्याला बरीच मजल गाठायची आहे. परंतु हा कार्यक्रम मी
अव्याहतपणे पाटणपर्यंत चालू ठेवला होता. ११ च्या दरम्यान
मार्गताम्हाणेत पोहचल्यावर प्रथम स्लिपर विकत घेतले. मा.डॉ.विनय नातू यांचे घरी
पोचलो तिथे स्वागत आणि जेवण राजेशाही झाले. सौ.
वहिनींनी रात्रीसाठी साग्रसंगित डबा दिला. दुपारी साडेचारला निरोप घेऊन निघालो. ६.०० वाजता रामपूर येथे माझे स्नेही डॉ. रावराणे भेटले. त्यांना आमचा इरादा ऐकून आश्चर्याचा धक्का बसला.
पुढे निर्व्हाळफाटा, मालघर, गणेशखिंड पार करुन पाचाडला छोटे दुकान दिसले त्याच्या समोर
बसून डब्बा खाल्ला. पुन्हा चालणे सुरु केले थोडा वेळ स्लिपरचा वापर
केला कारण बुट घालणे असह्य हेत
होते. ९.४५ ला कोंडये गावी आलो गावचे पोलिस पाटीलांनी त्यांच्या अंगणात झोपणेस परवानगी
दिली. पायांना तेल मालिश करुन झोपलो. मध्यरात्री एक मदयपी येऊन आमचे परिक्षण करत
होता. पो. पाटलांनी त्वरेने त्याला घरात घेतले आणि आमची सुटका झाली. आज ३८-३९ कि.मी. चाल झाली.
घातवार बुधवार ( हेडिंग) दुसरे दिवशी पहाटे साडेचारला ला प्रस्थान केले. चिपळूणला हॉटेल परांजपे इंटरनॅशनल मध्ये दमदार नाश्ता करुन निघालो. वाटेत पिंपळीला छोटेसे देऊळ दिसले म्हणून आरामासाठी गेलो. ते देऊळ संतोष सुतार आणि स्नेही असे मिळून बांधले आहे. दिवसा नोकरी करुन रात्रीच्या वेळी बांधकाम ! त्यांनी आम्हाला चहा, नाश्ता, थंड पाणी दिले. पुढील रस्त्याचे मार्गदर्शन केले. पुढे पिंपळी बुद्रुकला नदीमध्ये मनसोक्त डुंबलो आणि गावातील विठ्ठल-रखुमाईच्या देवळात आसरा घेतला. वाटेत जेवणाविषयी चौकशी केली असता आजचा वार (बुधवार) चुकीचा आहे, आम्ही शाकाहारी असल्याने तुमची जेवणाची सोय होणे कठीण आहे असा संदेश मिळाला. म्हटले ईश्वरेच्छा! देवळाचे शेजारील घरात सहज चौकशी केली तर गृहलक्ष्मीने होकार दिला आणि रुचकर जेवण करुन वाढले हे गृहस्थ म्हणजे श्री.बबन शिरळकर त्या मंदिराचे हंगामी पुजारी. दुपारी ४.३० ला पुन्हा चालणे सुरु केले आणि ७.३० ला पोफळी गाठली. पोकळीला सरांची चुलत बहिण रहाते बेबीताई गद्रे. सौ. गद्रे आणि शेजारील सौ.शिर्के वहिनींनी आमची पादपूजा, औक्षण करुन आमचे स्वागत केले. आपल्या बहिणीबद्दल सरांनी मला आधी कल्पना दिली होती. त्याचे प्रत्यक्ष दर्शन मला घडले. घरात मस्तपैकी गादीवर झोपणेस मिळाल्याने मला छान झोप लागली. गेले दोन दिवस मला शांत झोप लागली नव्हती आणि दुपारच्या आरामाच्या वेळीही मला झोप लागत नसे. रात्री झोपण्यापूर्वी पादसेवा केली होती. आता माझ्या बोटांवरील फोडांची संख्या ९ पर्यंत पोचली होती. आज अंदाजे २८ कि.मी.चालझाली.

मौनव्रतीसाधू
पहाटे सोबत पोळी, लोणचे, शिरा असा छान डबा देऊन आणि सोबत टिश्यु पेपर, कैलास जीवनची बाटली देऊन आमची पाठवणी केली. थोडासा पाऊस झाला होता, त्यामुळे हवामान अल्हाददायक होते. आम्ही जोशामध्ये १२ कि.मी. चा घाट २.३० तासात चढुन आलो. घाटमाथ्यावर टपरीमध्ये उत्तम चहा आणि चटकदार कांदा भजी खाण्यात पाऊणतास गेला. तेथून निघून ढाणकलला श्री. गगणगिरी महाराजांच्या आश्रमात शिरलो. चहा आमची वाटच पाहत होता त्याचा आस्वाद घेतला. तेथील श्री. मयेकर महाराजांनी आराम करण्यास अनुकुलता दाखविली म्हणाले नदीवर ताजेतवाने व्हा पलिकडे दत्तमंदिर आहे दर्शन घ्या, प्रसाद घ्या आणि मग मार्गस्थ व्हा. पुन्हा नदीचा मनमुराद आनंद घेतला. महाराज म्हणाले आज गुरुवार आहे आज यज्ञ असतो तुम्ही यजमान म्हणून बसा. मी सरांना विनंती केली तुम्ही बसा ते बसले. यज्ञ सुरु होता महाराज म्हणाले आज तुम्ही येथेच रहा पाऊस येण्याची शक्यता आहे. (तेव्हा आकाशात कोणतीही लक्षणे नव्हती) यज्ञ आटोपला प्रसाद झाला आम्ही आराम करीत होतो आणि साडेतीनच्या दरम्यान पाऊस सुरु झाला. विज गेली, मोबाईल नेटवर्क बंद पडले सगळीकडे काळोख दाटून आला. सायंकाळी महाराज पावसला निघून गेले जाण्यापूर्वी महाराजांनी आमच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली होती. दुपारी आम्ही दत्ताच्या देवळात जाऊन दर्शन घेतले. दत्तमंदिर परिसर नयनरम्य असा आहे देवळामागे श्री गगनगिरी महाराजांची कुटी आहे तेथे महाराज रहात. सायंकाळी पाऊस थोडा थोडा सुरुच होता.
घातवार बुधवार ( हेडिंग) दुसरे दिवशी पहाटे साडेचारला ला प्रस्थान केले. चिपळूणला हॉटेल परांजपे इंटरनॅशनल मध्ये दमदार नाश्ता करुन निघालो. वाटेत पिंपळीला छोटेसे देऊळ दिसले म्हणून आरामासाठी गेलो. ते देऊळ संतोष सुतार आणि स्नेही असे मिळून बांधले आहे. दिवसा नोकरी करुन रात्रीच्या वेळी बांधकाम ! त्यांनी आम्हाला चहा, नाश्ता, थंड पाणी दिले. पुढील रस्त्याचे मार्गदर्शन केले. पुढे पिंपळी बुद्रुकला नदीमध्ये मनसोक्त डुंबलो आणि गावातील विठ्ठल-रखुमाईच्या देवळात आसरा घेतला. वाटेत जेवणाविषयी चौकशी केली असता आजचा वार (बुधवार) चुकीचा आहे, आम्ही शाकाहारी असल्याने तुमची जेवणाची सोय होणे कठीण आहे असा संदेश मिळाला. म्हटले ईश्वरेच्छा! देवळाचे शेजारील घरात सहज चौकशी केली तर गृहलक्ष्मीने होकार दिला आणि रुचकर जेवण करुन वाढले हे गृहस्थ म्हणजे श्री.बबन शिरळकर त्या मंदिराचे हंगामी पुजारी. दुपारी ४.३० ला पुन्हा चालणे सुरु केले आणि ७.३० ला पोफळी गाठली. पोकळीला सरांची चुलत बहिण रहाते बेबीताई गद्रे. सौ. गद्रे आणि शेजारील सौ.शिर्के वहिनींनी आमची पादपूजा, औक्षण करुन आमचे स्वागत केले. आपल्या बहिणीबद्दल सरांनी मला आधी कल्पना दिली होती. त्याचे प्रत्यक्ष दर्शन मला घडले. घरात मस्तपैकी गादीवर झोपणेस मिळाल्याने मला छान झोप लागली. गेले दोन दिवस मला शांत झोप लागली नव्हती आणि दुपारच्या आरामाच्या वेळीही मला झोप लागत नसे. रात्री झोपण्यापूर्वी पादसेवा केली होती. आता माझ्या बोटांवरील फोडांची संख्या ९ पर्यंत पोचली होती. आज अंदाजे २८ कि.मी.चालझाली.

मौनव्रतीसाधू
पहाटे सोबत पोळी, लोणचे, शिरा असा छान डबा देऊन आणि सोबत टिश्यु पेपर, कैलास जीवनची बाटली देऊन आमची पाठवणी केली. थोडासा पाऊस झाला होता, त्यामुळे हवामान अल्हाददायक होते. आम्ही जोशामध्ये १२ कि.मी. चा घाट २.३० तासात चढुन आलो. घाटमाथ्यावर टपरीमध्ये उत्तम चहा आणि चटकदार कांदा भजी खाण्यात पाऊणतास गेला. तेथून निघून ढाणकलला श्री. गगणगिरी महाराजांच्या आश्रमात शिरलो. चहा आमची वाटच पाहत होता त्याचा आस्वाद घेतला. तेथील श्री. मयेकर महाराजांनी आराम करण्यास अनुकुलता दाखविली म्हणाले नदीवर ताजेतवाने व्हा पलिकडे दत्तमंदिर आहे दर्शन घ्या, प्रसाद घ्या आणि मग मार्गस्थ व्हा. पुन्हा नदीचा मनमुराद आनंद घेतला. महाराज म्हणाले आज गुरुवार आहे आज यज्ञ असतो तुम्ही यजमान म्हणून बसा. मी सरांना विनंती केली तुम्ही बसा ते बसले. यज्ञ सुरु होता महाराज म्हणाले आज तुम्ही येथेच रहा पाऊस येण्याची शक्यता आहे. (तेव्हा आकाशात कोणतीही लक्षणे नव्हती) यज्ञ आटोपला प्रसाद झाला आम्ही आराम करीत होतो आणि साडेतीनच्या दरम्यान पाऊस सुरु झाला. विज गेली, मोबाईल नेटवर्क बंद पडले सगळीकडे काळोख दाटून आला. सायंकाळी महाराज पावसला निघून गेले जाण्यापूर्वी महाराजांनी आमच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली होती. दुपारी आम्ही दत्ताच्या देवळात जाऊन दर्शन घेतले. दत्तमंदिर परिसर नयनरम्य असा आहे देवळामागे श्री गगनगिरी महाराजांची कुटी आहे तेथे महाराज रहात. सायंकाळी पाऊस थोडा थोडा सुरुच होता.
आम्हाला दिलेल्या खोलित आम्ही आराम करत होतो. विज नव्हती, पाऊस पडत होता. सगळीकडे
काळोखाचे राज्य आणि निरव शांतता. रस्त्यावर वहानेही विरळच होती. आश्रमामध्ये आम्ही
दोघे आणि साधु (ज्ञानेश्वर) जो गेली दिड वर्ष मौन
धारण करुन आहे. महाराज म्हणाले होते की रात्री ८.३० ला आरती आणि मग प्रसाद होईल. ठिक ८.३० वाजता जोराने-
शंख ध्वनी झाला. आम्ही त्वरेने ध्यानमंदिरात गेलो. प्रशस्त
मंदिरामध्ये संपूर्ण काळोख फक्त दोन तेल दिप आणि साधुच्या हातातील ताम्हनामधील निरांजनाचाच काय तो
प्रकाश. साधुने उच्चस्वरामध्ये
आरती सुरु केली. संपुर्ण ध्यानमंदिर त्याच्या आर्त, भावपूर्ण स्वराने भारुन गेले. आमच्या शरीरावर कंप निर्माण
झाला. क्षणभर कानावर विश्वास बसेना. दिवसभर यंत्रवत काम करताना संपूर्ण मौन पाळणाराच साधु आहे की अन्य कोणी! मी नकळत खिशातून मोबाईल
काढून ते रेकॉर्ड केले मात्र ते प्रत्यक्ष अनुभवलेले क्षण मी जन्मभर विसरणार
नाही. आरती संपल्यावर मौन पुन्हा सुरु. आहाला पोटभर जेवण वाढून नंतरच साधु जेवला.
पहाटे लवकर उठून साधूचा निरोप घेऊन निघालो. वाटेत माझा आंबा खाण्याचा कार्यक्रम
आव्याहत सुरुच होता. कांडोली, मारळ, येराडगांव, गावातील ‘येडोबा मंदिर’ असे टप्पे पार केले आणि पाटण जवळ पाऊस सुरु झाला होता. पाटणला सरकारी विश्राम गृहाच्या
रक्षकाला पटवून तेथेच राहून आराम केला.
माझ्या कडून देवाला माळ बुक्का
( हेडिंग) पहाटे ३.३० ला उठून लवकर प्रवास सुरु करणार होतो. परंतु पाऊस सुरु
होता म्हणून पाऊस थांबल्यावर ५.३० ला चालणे सुरु
केले. जेमतेम दिड कि.मी. चाललो आणि पाऊस पुन: सुरु झाला. आकाश काळ्या ढगांनी
व्यापले होते, पावसामुळे चालणे शक्य नव्हते. संपूर्ण एक दिवस आराम करणे
दोघांनाही पटत नव्हते. शेवटी दोघांनी ठरवून बसचा आधार घेणेचे ठरविले आणि जेथे पाऊस थांबेल तेथे उतरु
असा विचार करुन बस पकडली आणि उंब्रजला उतरलो. रस्त्यावर चिखल झाला होता. माती चिकट असल्याने
चालणे अवघड जात होते. श्री. बोरावकेंच्या सूचने वरुन पढील भाग कमी पावसाचा
दुष्काळी असावा आणि दोघांनी रात्री अपरात्री प्रवास करण्यास अयोग्य असावा याची जाणीव होती.
त्यामुळे जास्तीत जास्त अंतर दिवसा कापणेचे ठरविले होते. कोणी चौकशी केल्यास
पाटणहून आलो आहो १०-१२ जण आहोत. अशी उत्तरे देऊया असे आम्ही ठरवले होते. ९.३०ला मसूर गाठले नाश्ता करुन पुढे निघालो. ३-४ कि.मी. चालल्यावर समोरुन एक ट्रक/डंपर आला. ड्रायव्हर ने
मला थांबण्याचा इशारा केला मनात नानाविध विचार ! ६०-७० फूट पुढे जाऊन ट्रक थांबला
ड्रायव्हर माझ्या दिशेने आला इतक्यात एक
मोटार सायकल स्वारही माझ्या दिशेने आला. मी थोडा गोंधळलो. मोटारसायकल स्वाराने
प्रश्न विचारला कोठून आलात ? ठरविल्याप्रमाणे उत्तर दिले, पाटणहून. पुढील स्वाभाविक प्रश्न
किती जण आहात ? मी उत्तर देणार तेवढ्यात ट्रक ड्रायव्हर म्हणाला या दोघांना
मी दोन-तीन दिवस पाहतो आहे. चिपळूण पासून चालतच आहेत.
मला आणखी खोटे बोलण्याची संधीच नाहीशी
झाली. ड्रायव्हरचा प्रश्न, सायंटिस्ट आहात काय ? कोठे चाललात ? सत्य सांगितल्यावर ड्रायव्हरने (श्री.प्रताप माने) माझे पाय
धरुन मला नमस्कार केला. हातात ३०/- रुपये दिले आणि देवाला
माळ, बुक्क्याला दया असे
सांगून तो निघून गेला. मनात म्हटले दगडाला शेंदूर फासण्याचे काम पूर्ण झाले.
मोटारसायकल स्वाराने आमची आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि तोही निघून गेला. दिवसभरात २५-२६ कि.मी. चालून ३.३० च्या सुमारास
पुसे सावळी गाठली.
‘डिस्कव्हरी’वाले आले
श्री.बंडोपंत आयाचित यांचा वाडा शोधत तेथे पोचलो. वाड्यात शिरत
असताना आजुबाजूची मुले कुजबुजत होती. ‘डिस्कव्हरी’वाले आहेत. कोणतीही पूर्व सूचना नसतानाही श्री.बंडोपंतांनी आमचे
प्रेमाने स्वागत केले. आम्ही आमचा परिचय करुन दिला. इतक्यात श्री.प्रकाशशेठ
वैशंपायन यांचा सरांना फोन आला. सरांनी फोन बंडोपंतांजवळ दिला, ओळख पटली त्या दोघांचा
पूर्व परिचय होता. दुर्मिळ अशा ‘‘अजान वृक्षाचे’’ ही दर्शन झाले. वाड्यातच श्री.ज्ञानेश्वर माऊलींचे देऊळ
असल्याने त्यांचेही दर्शन झाले. बंडोपंत आणि सौभाग्यवतींनी अत्यंत प्रेमाने
आदरातिथ्य केले. रात्री आमचे करिता भरगच्च भोजन तयार करुन अमरसाचा आग्रह करुन भोजन
वाढले. आम्ही लवकरच झोपलो. चर्चेच्या ओघात बंडोपंत म्हणाले एवढे
लांब आला आहात तर थोडी वाट वाकडी करुन ‘‘मायणी’’ मध्ये संत सरुताईंचे दर्शन घेऊन मग पुढे जा, म्हटले ठिक आहे माऊलींची इच्छा !
ताय आत्ताच बाहेर गेली हाय
पुसेसावळीहून सकाळी ५.२० ला निघालो, मायणी २५ कि.मी. आहे माहिती असल्याने चालण्याचा जोर धरला. वडगाव, चोराडे, म्हासुर्णे, गुंडेवाडी, चितळी अशी गावे पार करत १२.२५ ला मायणी गाठली. मेडिकल कॉलेज आणि इतर शैक्षणिक
संस्थांमुळे मायणीचे थोडे शहरीकरण झाले आहे. सुरवातीलाच एका हॉटेलमध्ये लस्सी
पिता-पिता सरुताईंची चौकशी केली. हॉटेल मालक म्हणाल्या ‘ताय’ आत्ताच बाहेर गेली आहे, परंतु तुम्ही जा फोटो आणि आसनाला नमस्कार करा. तिथे गेलो तर एक आजी
बसल्या होत्या म्हणाल्या ‘ताय’ ४ वाजेपर्यंत
येईल. तुम्ही बोरिंगवर आंघोळ करुन आराम करुन या. आम्ही हात-पाय धुवून परत तेथेच
आलो आणि आडवे झालो. आमच्या नशिबाने सरुताई लवकर आल्या, त्यांचे दर्शन झाले. पाऊस
सुरुच होता म्हणून टेंपोचा आधार घेऊन दहिवडी नाका गाठला. तेथून
चालत गोंदवले गाठले. कार्यालयाबाहेर श्री.बोरावकेंचे स्नेही श्री.तिवाटणे वाटच बघत
होते. ओळख पटल्यावर भक्तनिवास व्यवस्थापकांशी त्यांनी कानगोष्टी केल्या (आमची
योग्य सोय होणेबाबत असाव्या) पुढील सर्व व्यवस्था उत्तम झाली. रात्री
महाप्रसादामध्ये उत्तम जेवण झाले. रात्री छान झोप झाली. पहाटे ४.४५ ला महाराजांच्या समाधिमंदिराला नमस्कार करुन निघालो. आज
पहिला टप्पा २३ कि.मी. ‘म्हसवड’ होता. जवळजवळ अखंडीत
चालून १०.४५ ला पोचलो. गावात आमची जेवणाची सोय केली होती,(सौजन्य : श्री.विशालजी बोरावके). मी त्यांना आधीच सूचना दिल्या होत्या की आम्हाला फक्त डाळ-भातच वाढा अन्य
काही नको. सकाळपासून सुनिल सरांना
मात्र भाकरी खाणेची इच्छा होत होती. मी त्यांना आश्वस्थ केले पांडुरंग तुमची
इच्छा पुरी करेल. तसेच झाले. सौ.पिसे वहिनींनी भाकरी, रस्सा भाजी,
वाडगाभर दुध असा
छान बेत केला होता तरीही मला त्या बेचैन दिसत होत्या. शेवटी त्याच म्हणाल्या
तुम्ही ब्राह्मण आहात आमच्या हातून काही त्रृटी तर नाही ना राहिली? मला गहिवरुन आले. मी
त्याना समजवण्याचा प्रयत्न केला की कोणीही जन्माने मोठा अथवा श्रेष्ठ होत नाही तर तो
कर्माने होतो (घरी अशीच शिकवण असल्याने मी बोललो). त्या बाई स्वयंसहाय्यता
गट आणि पतपेढीच्या माध्यमातून विविध व्यवसाय चालवितात. त्यांना माननीय
पंतप्रधानांचे हस्ते ‘‘उत्तम महिला उद्योजिका’’ म्हणून प्रशस्तीपत्रक मिळाले आहे. त्या भारतभर विविध ठिकाणी
स्वयंसहाय्यता गटातून रोजगार निर्मिती या विषयावर माहिती देण्यासाठी जातात. असे
असताना देखील ब्राह्मण घरात जेवण्यास आल्यावर त्यांना मानसिक दबाव जाणवावा हे
प्रगत महाराष्ट्रास भूषणावह नक्कीच नाही. त्यांचे १८ जणांचे एकत्रित कुटुंब गुण्यागोविंदाने नांदताना पाहून
अत्यानंद झाला.


पिळणारा पिलीव घाट
त्या सर्वांचा आराम
करण्याचा आग्रह मोडून आम्ही लगेचच प्रस्थान केले कारण अजून २० कि.मी. चा पल्ला
गाठायचा होता. म्हसवड ते पिलीव भर दुपारी ओसाड माळरानावर चालणे सुरु केल्यावर
श्री.बोरावकेंचे वाक्य कानात घुमु लागले ‘‘डॉ. हा दुष्काळी भाग आहे
तुम्हाला कल्पना नाही खूप त्रास होईल’’ अक्षरश: मैलोनमैल
सरळ रस्ता, रस्त्याशेजारी ना वस्ती ना झाडे,
रस्त्यावरुन
चालणारे फक्त आम्ही दोघेच वेडे. सावली मिळेल असे एकही
झाड नाही, त्यात तो पिलीव घाट जेमतेम ५-६ कि.मी. च असेल परंतु अत्यंत फसवा. संपला असे वाटले की आणखी एक छोटे टेकाड शब्दश: रडत कुथत आम्ही तो पार केला. एका कडुनिंबाच्या
झाडाखाली चादर हांतरुन लुडकलो. त्या छोट्याश्या झाडाची सावली आम्हाला तेव्हा ‘राजछत्र’
भासत होती. पुढे सुळेवाडी गाव आहे, गावापासून हिरवळ दिसू लागली. ७.१५ चे दरम्यान वकील मानसिंग जहागिरदार
यांच्या वाड्यावर पोचलो. ६ एकराच्या परिसरात
जुना किल्ला आहे, त्यामध्ये वकील
साहेबांचा (जहागिरदार) स्वत:चा बंगला
होता. त्यांचेकडे
फर्मास जेवण झाल्यावर
ठरल्याप्रमाणे डॉक्टरांच्या गाडीने श्री.बोरावकेंच्या घरी आरामाकरिता गेलो.
त्यांची थोडी निराशाच झाली. कारण पूर्व नियोजित कार्यक्रमाप्रमाणे आम्ही
त्यांचेकडे सकाळी जाणार होतो. दिवस भराच्या भेटीगाठींचे कार्यक्रम त्यांनी ठरवून
ठेवले होते, पण आम्हाला ते शक्य झाले
नाही.
बोरावकेंचे नेट वर्किंग
सकाळी ६ वाजता ठरल्याप्रमाणे
श्री.बोरावकेंचे स्नेही श्री. भागवत गाडी घेऊन हजरच होते. त्यांनी आम्हाला पुन्हा
पिलीवला सोडले. जेथुन आम्ही रात्री गाडीतून गेलो होतो तेथेच नाष्टा करुन ७.१५ ला निघालो आज रोजच्या पेक्षा दोन तास उशिर झाला होता.
त्यामुळे दिवसभरात ४०-४२ कि.मी. अंतर कापणे अशक्य
वाटत होते, म्हणून चालण्याचा धडाका
लावला होता, सोबत एस्कॉर्ट म्हणून
श्री.बोरावकें होतेच. बोरावकेंचे स्नेही वाटेत आमच्या करिता गरमागरम शिरा घेऊन अर्धा हजर होते, यथेच्छ शिरा खाल्ला आणि
मार्गस्थ झालो. दुपारची भोजनाची व्यवस्था भाळवणीचे प्रो. देशपांडे यांचेकडे केली
होती. ऊन तापले होते, चालून थकायला
होत होते म्हणून भाळवणी आधी ४-५ कि.मी. अंतरावर एका झुडूपाखाली
आम्ही आराम करत होतो. तेवढ्यात श्री.बोरावके प्रो.साहेबांना घेऊन हजर झाले.
त्यांचेशी गप्पागोष्टी झाल्यामुळे आम्हाला आराम करता आला नाही. लगेचच निघून १२.४५ ला भाळवणी गाठले. श्री.देशपांडेंच्या घरी पत्नी, आई, वडील, आणि दोन मुले असा
परिवार हजर होता. सर्वांनी खूप प्रेमाने आदरातिथ्य केले. जेवणात तर इतके पदार्थ
बनविले होते की सर्वांची चव घेवूनच पोट भरले आणि शेवटी ताक पिण्यास मिळण्यामुळे मन
तृप्त झाले. जेवून लगेचच देशपांडे कुटुंबाचा निरोप घेऊन निघालो. २-३ कि. चालून विश्रांती करिता एका फार्म हाऊस मधे आसरा घेतला. आंघोळ केली, कपडे धुतले थोडा वेळ आराम
करुन पुन्हा चालणे सुरु. सरांच्या मनात आजच
पंढरपूर गाठायचे होते पण माझे पाय साथ देत नव्हते, दोन्ही पायांनी बंड
पुकारले. गेले ५-७ दिवस ८-९ फोड असतानाही
पायांनी माझा अत्याचार सहन केला होता. चालणे असह्य होत होते, मनात आले सरांना पुढे चालत जाऊदे मी श्री.बोरावकेंच्या
मोटार सायकलने पंढरपूर गाठतो. नंतर लक्षात आले सर ही थकले होते. आम्ही बोरावकेंना
सांगितले आम्हाला आता चालणे शक्य नाही. खरेतर पंढरपूर फक्त ६-७ कि.मी. राहिले होते. बोरावकेंनी आपला जनसंपर्क कामाला लावला
होता. दरम्यान आम्ही चालत असतांना वाटेत दोन मुलांची गाठ पडली. त्यातील एक वाकरी
येथील आश्रम शाळेच्या रेक्टर महोदयांचा मुलगा होता त्यांनी आम्हाला धीर दिला.
शाळेत तुमची सोय करतो असे म्हणाला. तिकडे बोरावकेंनी फोन करुन मित्रा मार्फत शाळेच्या वॉचमनला संदेश
पाठविल्याने तो आमची वाटच पहात होता, फक्त तो तिसर्या विश्वात
विहार करत होता. आम्ही त्याला परोपरीने सांगत होतो, आमची फक्त झोपण्याची व्यवस्था करा, पठ्ठा ऐकायला तयारच नाही. मुळयेंचा (सकाळी ज्यांनी शिरा खाऊ घातला होता ते) फोन आला आहे, मी तुम्हाला जेवायला
घालणारच. कशीतरी त्यांची समजुत काढली आणि आम्ही शेजारच्या हॉटेलमध्ये जेऊन आलो आणि अंगणात झोपलो.
दुसर्या दिवशी सकाळी ६.०० वाजता निघून ८.३० ला पंढरपूर मध्ये गजानन महाराज मठ गाठला. तेथे रहाण्याची, जेवणाची चांगली सोय झाली.
विलक्षण अनुभव
ठरल्याप्रमाणे सावरकर भक्त मा. वा.ना. उत्पात यांची भेट
घेऊन विठोबाच्या दर्शनाला देवळात गेलो. कोणत्याही देवळात गेलो तरी देवाच्या
मुर्तीकडे किंवा चेहर्याकडे मी निरखून पहात नाही परंतु इथे मी चेहर्याकडे पाहिले
आणि मला विठोबाला कवटाळावे असे वाटले. अर्थात तेथे डोके टेकण्याइतकी फुरसत सुद्धा मिळत नाही. पण
एक विलक्षण अनुभव मी घेतला.
मी फार श्रद्धाळू, सतत देव-देव करणारा, नियमित देवळात जाणारा व्यक्ती नाही.
असे असतानाही विठूरायाच्या काही क्षणांचे दर्शनाने मी माझे अस्तित्वच विसरून गेलो
होतो. याचा एकच अर्थ निघतो, सर्व जग नियंत्रित करणारी एक अद्भुत शक्ती आहे, तुम्ही
मना अगर मानु नका...
वारीला निघाल्या दिवसापासून, आधी घारी प्रमाणे आणि पिलिव पासून आमची सावली बनून श्री.विशाल बोरावकेंनी
आमची खूपच काळजी घेतली. बहुदा विठोबांशी त्यांचे डायरेक्ट कनेक्शन असावे आणि त्यांच्या
आदेशानुसार ते वागले असावेत कारण प्रसंगी आपल्या कौटुंबिक जबाबदारीकडे दुर्लक्ष
करुन ते आमची काळजी वहात होते.
पंढरपूर वारी निर्विघ्न पूर्ण होण्यामधे अनेक गोष्टींचा अनन्यसाधारण
सहभाग दृश्य-अदृश्य स्वरुपात राहिला. मी प्रांजळपणे या वारीचे
श्रेय सर्वप्रथम श्री सुनील सरांना देतो.
कल्पना, नियोजन आणि रोज ३०/३५ किमी चालून ३००-३२५ किमी अंतर पार करण्याचा विश्वास
सर्वच केवळ सरांमुळे. त्यांचा सारखा सोबती नसता तर ३-४ दिवसात मी परत आलो असतो. रोज साधारण ९-१० तास चालणे होईल परंतु उर्वरीत वेळ कसा सत्कारणी लावावा असा
विचार करत असता मोबाईलवर आरत्या,
स्तोत्र,
भजने, विष्णुसहस्त्रनाम रेकॉर्ड
करुन घेतले. तसेच माझे गुरुंचे (मुद्दाम नामोल्लेख टाळतो) आवाजात
शिव-माहिम्न स्तोत्र ही रेकॉर्ड करुन घेतले होते. पण या सर्वांमध्ये
आम्हाला प्रेरणा मिळाली ती ‘विष्णुसहस्त्रनाम’ पासून. रोज
सकाळी तर आम्ही ऐकत असूच परंतु नेहमी ७-८ कि.मी. चा टप्पा
ठरवलेला असला की शेवटचे दोन अडीच कि.मी. अंतर कापणे जीवावर येत असे. अशा वेळी एकच
जालिम औषध ‘विष्णुसहस्त्र नाम’! ते एकदा सुरु झाले की मन त्यातच गुंतायचे आणि अंतर कसे
कापले जायचे ते कळतच नसे ‘नामाचा’ हा व्यवहारिक उपयोग म्हणावा लागेल.
आमचा मित्र आनंद दिवाडकर (उर्फ डी) सामान्यपणे रोज फोन करुन आमचे नैतिक बळ
वाढवित असे, त्याच बरोबर उपयुक्त
सूचनाही करत असे त्याचाही आम्हाला फायदा झाला.
मी हरलो पण त्यातच आनंद आहे
विशेष म्हणजे वारी पूर्ण झाल्याचे कळल्यावर श्री.जोगांनी (ज्यांनी माझे
बौद्धिक घेतले होते) स्वत: फोन करुन माझे अभिनंदन केले (ते तेव्हा चारधाम यात्रा करत
होते) आणि मी हरलो पण मला हरण्यातच अधिक आनंद झाला अशा भावना व्यक्त केल्या.
दापोली स्टँडवर उतरल्यावर श्री.प्रकाशशेट वैशंपायन यांच्या सहाय्यकाने आमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच थोड्या
वेळाने प्रकाशशेट आले आणि आमचा पदस्पर्श केला तेव्हा खरंच मन भरुन आले. नुसते पायी
जाऊन विठोबाचे दर्शन घेतल्याने एवढे मोठे स्थान मिळते. रात्री घरी पोचलो तेव्हा
मुली, पत्नी, आई सर्व आतुरतेने वाट बघत होती. मुलींना मी घरी आल्याचा आणि
सौ. गौरी आणि आईला मी वारी पूर्ण करुन आल्याचा आनंद झाला.
एकूण चाल - अंदाजे ३०० किमी
कालावधी - ९ दिवस
रोजची चाल - साधारण १० तास
सर्वाधिक अंतर
- ४३ किमी ( माण तालुक्यात)
मार्ग कोळथरे - दाभोळ - मार्गताम्हाणे - चिपळूण -
पोफळी - कोयना - पाटण - उंब्रज - मसूर - पुसेसावळी - मायणी - म्हसवड - पिलीव -
पंढरपूर

