नर्मदे हर !
दिनांक २६ डिसेंबर २००९ रोजी ठरल्याप्रमाणे दादर स्टेशनवर भेटून (मी, श्री. जोग, पराग) कलकत्ता मेल ने प्रवास सुरु केला. नर्मदा परिक्रमेविषयी उत्सुकता ताणली गेली होती. रेल्वेचे तिकीट जबलपूर पर्यंत होते, परंतू चालणं कोठून सुरु करावे ते ठरले नव्हते, कारण मी आणि पराग फक्त चार दिवसांची पदयात्रा करुन जबलपूरहून परत फिरणार होतो. श्री. जोग पूर्ण एक महिना पदभ्रमण करुन ‘अमरकंटक’’ च्या पुढे जाऊन विश्रांती घेणार होते. प्रवासात चर्चेअंती असे ठरले की, करेली स्टेशनला उतरुन बरमान मधून ब्रम्हांडघाटापासून पदभ्रमणाची सुरुवात करुया, कारण ब्रम्हांडघाट हा विशेष पवित्र घाट समजला जातो.
श्री. जोग (माझे सासरे) यांचे सहवासात सतत चोवीस तास राहणेस मी कसा तयार झालो
याचे आश्चर्य माझे पत्नीला सतत वाटत होते, पण नर्मदा कृपा !
एक ते दिड वर्षापूर्वी श्री. जनार्दन कुंटे यांचे नर्मदा परिक्रमेवरील पुस्तक माझे वाचनात आले होते. (आमचे शेजारील पंचनदी गावातील सुहास वैद्य यांनी हे पुस्तक मला दिले होते ) श्री. कुंटे यांना आलेले विविध दिव्य अनुभव, त्यांची लिखाणाची शैली, यामुळे माझे कुतुहल जागृत
झाले होते आणि मी मनात ठरवले होते आयुष्यात एकदा तरी आपण परिक्रमेचा अनुभव घ्यायचाच. तेथील वातावरण, सामाजिक जीवन आणि
लिखाणातील वास्तवता यांची अनुभूती घेता येईल हाही हेतू होताच. मुंबईत गेलो असता श्री. जोगांकडील श्री.
लिमये यांचे पुस्तक वाचनात आले आणि मनाची तयारी पक्की झाली. योगायोगाने श्री.
जोगांनी त्यांची परिक्रमा करणेची इच्छा बोलून
दाखविली. मी त्यांना सहजच म्हणालो, तुम्ही जाणार असाल तेव्हा मला सांगा, मी चार पाच दिवस तुमचे बरोबर येईन.
काही दिवसांनी श्री. जोगांचा फोन आला, आपले बुकींग झाले आहे. मला एकदम धक्काच बसला मनात म्हटले आता सुटका नाही. त्यांनी योजलेले दिवस मला
असुलभ होते परंतु मी परतीचे बुकींग करणेचे अटीवर होकार दिला आणि प्रवास सुरु झाला.
भ्रमंतीची मला आवड असलेने मी खुष होतो. माझी एक सॅक
(शाळेचे दप्तर) परागची सॅक, जोगांची भलीमोठी सॅक आणि पिशवी. माझे सोबत गावाहून आणलेली काठी होती, जिचे मुळे ( मी काळा गॉगल
लावलेला असल्याने) एस.टी.बस कंडक्टरने तिकिटातील सवलती करीता माझ्याकडे आंधळा/अपंग
असल्याचा दाखला मागितला होता.
बॅगांमधील सामानांचे वर्णन ही आवश्यक आहे. माझ्या पत्नीने आपल्या प्रिय पिताजिंकरीता दोन प्रकारचे पौष्टिक लाडू एवढे बनवून
दिले होते की, मी तिला म्हणालो आम्हाला जबलपूरला ‘भारत केसरी’ मध्ये भाग घेणेस पाठवित
आहेस का? जोगांच्या सामानात स्लिपर(पायात बूट होतेच),रात्री घालावयाचा सेट,आंघोळी नंतरचा सेट,थर्मलवेअर, स्वेटर,चादर,सतरंजी जसे काही ज्येष्ठ
नागरीक युरोप फिरायला निघालेले आहेत. घरुन निघताना हे सर्व अनावश्यक आहे याची मला
कल्पना होतीच. शिवाय यातील काही सामान माझ्याच खांद्यावर येणार याची भिती देखील
होती. तरीही मी काहीही न बोलता दादर गाठून प्रवास सुरु केला.
मेरा नंबर कब आएगा ?
नियतवेळेत करेलीला उतरुन बरमान ला जाण्याच्या सोयीविषयी चौकशी केली. एका सद्गृहस्थाने पुढील ‘चौराहा’चा निर्देश करुन वाट दाखविली. थोडी फार भूक लागली होती म्हणून पोहयांचा (एम.पी. स्पेशल) आस्वाद घेवून पुढे इप्सित चौकात पोहोचलो. थोडाफार पाऊस सुरु झाला होता. शेजारीच एक सज्जन (घारे डोळे आणि गोरे गोमटे) उभे होते. जोगांनी अंदाज बांधून नाव विचारले उत्तर ‘दामले’. पुढील सागर जिल्हयातील शेतकरी कुटूंब होते, त्यांचे जवळ आमचा इरादा बोलून दाखविला. जोगांकडे पाहून त्यांच्या चेहर्यावर आश्चर्य(जोगांचे वय, वजन लक्षात घेता) दिसले. बराच वेळाने एक बस आली परंतु तिची परिस्थीती फेविकॉलच्या जाहिरातीमधील बससारखी होती. मनात म्हटले- मेरा नंबर कब आयेगा? पा़ऊस सुरुच होता त्यामुळे पायाखालची माती हळूहळू गोंदाचे रुप धारण करु लागली होती. इतक्यात थोडया अंतरावर एक सुमो दिसली. गाडीचे आजुबाजूची लगबग पाहून मला शंका आली म्हणून मी धावतच गेलो. अंदाज बरोबर ठरला. ते फ्लाईट बरमानचे होते. मी मनात म्हटले मागे आम्ही दोघे बसून सामान ठेवू जोग पुढे आरामात बसतील, इतक्यात पुढे ६-७ जण घुसले. त्यामुळे मागे आम्ही तिघे पायाशी भली मोठी स्टेपनी, आमचे सामान (यादीची पुनरुक्ती नको) कसे मावलो मलाच कळले नाही. तेवढयात आणखी एक गृहस्थ, पुढे बसलेल्यांचा जोडिदार दार उघडून स्वतःला आत कोंबण्याचा प्रयत्न करु लागला आणि आमचा क्षीण विरोध डावलून जोगांचा चेंदा करुन दार लावता झाला. गाडी सुरु झाली जोगांची आरेाळी ‘गेला पाय गेला’ आम्ही तिघे सोडून इतर कोणालाही त्याचा अर्थ कळणेची शक्यता नव्हती. मी घाबरलो कारण जोगांच्या एका पायाचे ऑपरेशन झालेले होते. मनात म्हटले बहुधा बॅक टू पॅवेलियन परंतू रस्त्याच्या कृपेने धक्के बसून बसून आम्ही सगळे सामावले गेलो आणि जोगांचा पायही स्थिरावला. थोडयाच वेळात बरमान गावाबाहेरील तिठयावर आमचे विमान थांबले. आम्ही उतरलो पाऊस मात्र सुरुच होता. माती चिकटून पादत्राणांचे वजन दहा पट झाले होते.
भटा भरता
बरमानला एक डाक बंगला (गेस्ट हाऊस) असल्याचे समजले. तसेच एक लॉजही असल्याचे कळले म्हणून आधी तिकडे गेलो. खाजगी लॉजची परिस्थिती गंभीर होती म्हणून मोर्चा गेस्ट हाऊस कडे वळविला. गेस्ट हाऊसच्या खोल्या राजेशाही परंतू नळाला पाणी नव्हते, आणि टॉयलेट मधे मोठी ‘छकुली’ हा स्थानिक शब्द बोली भाषेत पाल होती. संध्याकाळी गावात फेरफटका मारण्यास गेलो. ब्रम्हांड घाटावर आंघोळ केली. दुकानात शुध्द खव्याची मिठाई खाल्ली (८० रु. किलो). दुकानातील व्यक्तीकडून तेथील सरपंच श्री. मनमोहन साहू यांचा फोन नं. मिळाला. त्यांचेकडून परिक्रमा करत असल्याचा दाखल घ्यावयाचा होता. ते परगावी असल्याने उद्या सकाळी भेटण्याचे ठरले. गेस्ट हाऊसकडे जाताना हॉटेल शुभम शुध्द शाकाहारी भोजनालय बोर्ड पाहिला होता. राईट प्लेट रु. २५/-, पाच रोटया (एक रोटी = दोन-तीन चपात्या) मोठ वाडगं भरुन सब्जी, डाळ, पापड, राईस हॉटेलचे रुपडे अस्वच्छ होते परंतू जेवण अतिशय रुचकर. संध्याकाळी लॉजवर परत येताना एका टपरीवर चहासाठी थांबलो, तेथे काही माणसे शेकोटी पेटवून पत्ते खेळत होती. त्यांच्या बरोबर चहा घेतला, गप्पांच्या ओघात बरमानच्या ‘भटा भरता’ ची महती कळली. भटा म्हणजे वांगे. वांगे एक दोन नव्हे चक्क पाच किलोचे एक वांगं ! लगेच जमलेल्या मंडळींनी भटा भरताचा बेत दुसर्या दिवशी आमचेसाठी ठरविला, नर्मदा तटावरील सक्तीच्या आदरातिथ्याचा पहिला अनुभव. रात्री लवकर झोपी गेलो आणि उद्या पदभ्रमण सुरु करण्याचे ठरविले. सकाळी ८.३०वा. सरपंच महोदयांकडून परिक्रमेचा दाखला घेतला. परत गेस्ट हाऊसवर येताना टपरीवर लगबग दिसली, त्यांना आम्ही निघतोय असे सांगितल्यावर ते गडबडले, कारण त्यांनी भटा भरता पार्टीची जय्यत तयारी सुरु केली होती. त्यांची कशीबशी समजूत काढून मैय्याच्या किनार्यावर चालायला सुरुवात केली.
कितने मूर्ती हो ? थोडे अंतर चालल्यावर किनार्यापासून थोडे दुरुन धरमपुरी, बिकुंवर अशी गांवे पार करुन कुडी गावात दुपारी पोहोचलो, तेथून थोडे पुढे जावून पुन्हा किनार्यावर आलो. आमच्या दृष्टीने बरेच चालणे झाले होते, भूक लागली होती. किनार्यावर एक साधुबाबा स्वतःच्या जेवणाची तयारी करत होते. आम्हालाही त्यांनी आमंत्रित केले. अनोळखी व्यक्तीकडून आतिथ्यांची सवय नसल्याने आम्ही नाकार दिला. इतक्यात एक गरीब (आर्थिक दृष्टया) शेतकर्याजवळ सहजच जेवणाची चौकशी केली. त्याचे गांव कुडी होते. आम्ही ते पार करून पुढे आलो होतो, त्यामुळे परिकम्मावासींची सेवा करण्यात असमर्थ असल्याने तो एकदम शरमला. तरीपण किती ‘मूर्ती’ आहात? असे आदराने विचाराले, म्हणाला जंगलात मुलीचे झोपडे आहे. तिथे काही व्यवस्था होईल का ते पहातो. काय खाणार? विचारल्यावर त्यांना त्रास नको म्हणून मी पटकन डाळ भात म्हणालो. शेतकरी गेला आणि पंधरा वीस मिनिटांनी धापा टाकीत परत आला. ‘‘साब डाल भात नही है’’ रोटी चलेगा क्या? हरभर्याची भाजी करण्यास सांगतो असे म्हणाला. मी खुष झालो, ताजी हरभर्याची उसळ मिळणार. आम्हाला विचारून तो दिसेनासा झाला. मनात विचार आला, घरी आलेला पाहुणा कमीत कमी त्रास देऊन घरातून लवकरात लवकर कसा जाईल हे पाहणारे आम्ही कोठे आणि परिस्थिती नसताना अनोळखी माणसांची सेवा करण्याची ही वृत्ती कोठे. जवळजवळ पाऊण तास होऊन गेला, आम्ही बैचेन, मनात नाना विचार, बहुधा नुसत्या गोष्टी सांगून निघून गेला असावा असेही मनात येऊन गेले. आमची बैचेनी पाहून साधुबाबांची पून्हा ऑफर ‘‘माझ्यातील शेअर करा’’. एक तासाने मुलीला सोबत घेवून शेतकरी हजर. दहा बारा रोटया, सब्जी; (हरभर्याची म्हणजे हरभर्याच्या छोटया रोपांची होती.) आम्ही यथेच्छ खाल्ली. शेतकर्याला धन्यवाद द्यायला लागल्यावर तोच आमच्या पाया पडला. पैसे घेईना, सोबत दोन लहान मुले आली होती. त्यांच्या खिशात जबरदस्तीने खाऊकरिता पैसे कोंबले. शेतकर्याचे म्हणणे सर्व मैय्या देतेय म्हणून सेवा केलीच पाहिजे. पराकोटीचे आतिथ्य, नर्मदे हर! बाबाजींकडून भाजलेली एक बाटी घेतली आणि नमस्कार करून पुढे निघालो. मग धुवॉधार (छोटी) नंतर मुक्कामाचे ठिकाण गुरसी.
केसराम विश्वकर्मा
गुरसी धर्मशाळेची माहिती मिळाल्यानंतर तिकडे जायचे ठरविले. धर्मशाळा म्हणजे तीन बाजूंनी भिंती वर पत्रे एक बाजू पूर्ण उघडी. आम्ही पोहचण्यापूर्वीच तेथे पंचवीस-तीस परिक्रमावासी तळ ठोकून होते. आम्हाला प्रश्न पडला जागा कशी मिळणार ? धर्मशाळे ची व्यवस्था पाहणारे बाबा शेजारीच झोपडयात राहत होते. त्यांच्याकडे वशीला मारला तिथेच सामान ठेवून जेवणाची सोय पाहण्यास सुरूवात केली. प्रथेनुसार परिक्रमावासींना ‘सदाव्रत’ दिले जाते त्यांनी ते शिजवून खायचे असते. आम्ही तिघेही ‘संजीव कपूर’ असल्याने आम्हाला ते शक्यच नव्हते. काळोख झाला होता म्हणून धावत धावत गावातील एकमेव किराणा दुकानापाशी गेलो. त्यांचेकडे जेवणाची चौकशी केली त्यांनी तयारीही दाखविली परंतू जोग काहीतरी हालचाल करतील याची खात्री असल्याने मी त्यांना पाच मिनिटात येवून सोगतो असे महटले. जोगांनी पटवापटवी केलीच होती. दुकानदारास मी नकार कळवून आलो. आम्हाला जेवण करुन द्यायला तयार झालेले गृहस्थ म्हणजे केसराम विश्वकर्मा (सुतार). काळोख असल्याने त्यांचा चेहराही नीटसा पाहता आला नाही. रात्री त्यांचे घरी घेवून गेले डाळ रोटी, भाजी, भात, पापड सर्व गरमागरम आणि अतिशय रूचकर जेवण आदराने आग्रह करून आम्हाला वाढले आणि सकाळी नाश्त्याचे आमंत्रणही देवून टाकले. परत झोपडीत आलो, थंडी बरीच होती. झोप शांत लागली नाही. धर्मशाळेतून तान्ह्या मुलाचा रडण्याचा आवाजही रात्री येत होता. उजाडण्यापूर्वी प्रातःविधी आटोपून बसलो होतो. तेवढयात हातात तीन वाफाळणारे ग्लास घेवून एक गृहस्थ समोर उभे राहिले, ‘आपके लिए’ पाहिले तर गरमागरम कोरा चहा. हे कालचेच अन्नदाता होते. मी चहा सोडून दहा वर्षे झाली होती. परंतू त्यांनी पुढे केलेला कोरा चहा मी नाकारू शकलो नाही आणि मैय्याचा प्रसाद समजून प्राशन केला. मन तृप्त झाले. थोडयावेळाने फक्कड नाश्ता केला आणि मोबदल्याची चौकशी केली असता आम्हीच तुम्हाला दक्षिणा द्यायला पाहिजे असे उत्तर मिळाले. धर्मशाळेत जो ताफा होता त्यामध्ये खरेच एक तान्हे मुल आणि दोन तीन लहान मुले होती सर्व परिक्रमेला निघालेली.
सकाळी चालायला सुरूवात केली सोबत सामान होतेच शिवाय दत्तक घेतलेली जोगांची पिशवीही. आज केरपाणी गाठायचे होते. तेथे आश्रम आहे, अशी माहिती मिळालेली होती. संपूर्ण वाटभर चहूबाजूने नजर जाईल तोपर्यंत शेती, विशेष करून तूर. वाटेत गोखला गांव लागले. मजल दरमजल करीत रामपूरा गांव पार करून गावाच्या सिमेवरील एका आसर्यात विश्रांतीसाठी थांबलो. दुपार झाली होती जोग खूप थकले होते. इतक्यात एक गृहस्थ आले नेहमीप्रमाणे जेवणाची चौकशी केली. आम्ही परिक्रमा करीत आहोत हे समजल्यावर आदरातिथ्य सुरू. घर गावाच्या सुरूवातीला होते म्हणून ते म्हणाले घरी चला. जोग चालायला तयार नव्हते. ते गृहस्थ (वय अंदाजे ७५) जोगांची सॅक घेण्याचा प्रयत्न करीत होते जोगांना ते मान्य नव्हते. शेवटी ते म्हणाले तुम्ही इथेच थांबा मी जेवण बनवून इकडे घेवून येतो. गृहस्थ दहा पंधरा मिनिटांनी कांबळ घेऊन पुन्हा हजर. तुम्हाला आराम करण्यासाठी आणली आहे. कांबळ दिल्यावर जोग त्यावर पहुडले. शेजारीच जेवण करून गेलेल्या परिक्रमावासिंच्या चुल्यात निखारे दिसले पलीकडे तुरीचे शेत होते शेतातील तुरीच्या शेंगा काढून आणल्या आणि भाजल्या. मी आणि पराग ने गरमागरम खालल्या. हा आनंद अवर्णनीय असा असतो फक्त तो घेण्याची आपली मानसिक तयारी हवी. जोगांना डोळा लागला होता उठल्यावर त्यांनाही शेंगा दिल्या ते खूष झाले. त्या गृहस्थांचा आमची सेवा करण्याचा उत्साह बघून आम्ही खजिल झालो होतो. जोगांनाही थोडी तरतरी आली होती. म्हणून सामान उचलून त्यांचे घर गाठले. खूप गप्पा झाल्या. गप्पांच्या ओघात लक्षात आले श्री. तेलवरेंच्या पुस्तकामध्ये ज्या सदगृहस्थांचे वर्णन आलेले आहे ते हेच आहेत. जेवणात पूरी, रस्सा, डाळ, लोणचे, भात असा अतिशय सुंदर बेत होता. आग्रह करुन जेवण वाढले आणि वर आम्हाला नमस्कार केला. श्री.तेलवरे यांचे पुस्तकातील त्यांचा उल्लेख असलेला भाग त्यांना दाखविला आणि पुस्तक तुम्हाला पाठवितो, असे सांगितले. (नंतर ते पाठवले.) परिक्रमेमधील अविभाज्य सामग्री म्हणजे छडी ! अर्थात काठी. त्या काकांनी स्वत:कडील एक छानशी काठी मला दिली. मी कोळथरेहून आणलेली काठी त्यांना दिली. (त्यांनी दिलेली छडी मी घरात भिंतीवर लटकविली आहे.) त्यांचा निरोप घेवून कोरपाणीच्या दिशेने निघालो.
आपके पीछे दौडके आऊंगा केरपाणीचा मार्कंडेय संन्यासाश्रम परिसर खूप मोठा, गावापासून थोडा लांब आहे. सकाळ-संध्याकाळ गावकर्यांची वरदळ तेथे असते. आम्ही गेलो तेव्हा आश्रमाचे मुख्य स्वामी तेथेच मुक्कामाला होते, त्यांचे इतरही मठ आहेत. सायंकाळी त्यांचे प्रवचन सुरु होते थोडावेळ सत्संगाचा लाभ आम्हीही घेतला. आम्ही जरा आधुनिक भासत असल्याने आमच्या करीता एक वेगळी खोली(अडगळीची) स्वच्छ करुन झोपण्याची सोय करुन दिली. आम्ही तेथे स्थिरावतोय एवढ्यात आम्हाला कुडीला भेटलेले बाबाजी हजर झाले आणि कोणतीही विचारपूस न करता आम्हाला दिलेल्या खोलीत त्यांनी संसार मांडला आणि आम्हाला आग्रह करु लागले, येथे प्रवचन सप्ताह सुरु आहे तुम्हीही थांबा. जसे काही त्या मठाचे तेच मालक असावेत. संकोच, भिड यांचा लवलेशही नाही. अनोळखी माणसाच्या घरात तिसर्याच व्यक्तिला आपण आग्रहाने थांबवित आहोत असा कोणताही भाव त्या बाबांच्या चेहर्यावर आम्हाला दिसला नाही, केवढी निरागसता ! रात्री उत्तम गरमागरम जेवण करुन झोपी गेलो पहाटे लवकर जाग आली. आश्रमातील विद्यार्थ्यांचे आधीच नित्यकर्म सुरु झाले होते. थोडा वेळ स्वामींचे विचार ऐकले आणि निघालो. आश्रम उंच डोंगरावर असल्याने गावात खाली उतरुन आलो. गावातील एकमेव टपरीवजा हॉटेल बंद होते, म्हणून दुकानात काही शेवचिवडा मिळतो का पाहून मी घेवून येतो असे म्हटले. जोग तिथेच थांबतो(भरवस्तीत) असे म्हणाले, मी म्हटले असे दुस्साहस करु नका, लोक खायला घालण्यासाठी मागे लागतील तुम्ही मैय्याचे बाजूने चालत रहा. मी खरेदी करुन तुम्हाला गाठतो. जोगांना रहावले नाही आणि मैय्याच्या किनार्यावर त्यांनी सॅक खाली ठेवल्या. मी धावत धावत त्यांना गाठले तेव्हा त्यांची एका व्यक्ति बरोबर बातचीत चालली होती. माणूस नुकताच आंघोळ करुन टॉवेलवरच तेथील मंदिरात दर्शनासाठी आलेला होता आणि तो जोगांना नाश्ता करण्याचा आग्रह करीत होता. त्याचा तो आग्रह मोडण्याच्या युद्धात मीही उतरलो. मी आणलेला खाऊ त्यांना दाखविला, अनेक सबबी सांगितल्या पण ते ऐकण्याच्या मन:स्थितीतच नव्हते. शेवटी आम्ही बॅगा खांद्यावर मारल्या आणि विनंती करुन म्हणालो, आम्ही निघतो आमच्यासाठी काहीही आणू नका. हे ऐकल्यावर समोरुन उत्तर ‘आप जाईये मैं आपके पिछे दौडकर आऊंगा’ काय म्हणावे या अतिथ्याला? बोलल्याप्रमाणे घरी धावत धावत जाऊन लगेचच पोहे आणि शिरा घेवून आले आम्हाला खायला लावले आणि आमची रवानगी केली. ही व्यक्ति म्हणजे हरिओम अग्रवाल.
सद्शील साहूबाबा
केरपाणी पासून पिठोरा पर्यंतचा संपूर्ण रस्ता मैय्याच्या किनार्यावरुन. जवळ जवळ चार पाच तास किनार्यावरुन चालणे झाले. बारुरेवा, मुर्गाखेडा, जोंधखेडा अशी गांवे वाटेत लागली. मग तूरीचे शेतातून दोन तीन किमी चालल्यावर डोंगरवाडी गाव लागले. मेन हायवे पासून गाव जवळच असल्याने थोडे सुधारलेले दिसले. एक स्लॅबचे घर दिसले अंगणात एक गृहिणी होती. जोग राहण्याच्या सोयीची चौकशी करण्यासाठी निघाले. मी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला कारण घर समृद्ध दिसत होते आणि समृद्धी, सौजन्य, सद्भाव हे एकत्र नांदत नाहीत असा अनुभव होता. झाले तसेच माताजींनी जोगांना मार्गी लावले. पुढे एक छोटे दुकान दिसले, तेथे चौकशी केल्यावर साहूबाबांची माहिती कळली. साहू बाबांचे घर (झोपडी) शोधून काढले. अंगणात खाटल्यावर एक स्त्री (हिंदी सिनेमातील ठकुरायन सारखी) पहुडली होती. सामान्यपणे अनोळखी पुरुष समोर आल्यावर त्या भागातील स्त्रिया बावरतात, गोंधळतात पण त्यांनी झोपूनच आमची उलट तपासणी केली आणि मग आम्हाला आसरा मिळाला. अर्थात त्या शेजारीण बाई होत्या. साहूंच्या घरात एक वृद्धा वय अंदाजे ७५-८० रहात होत्या. बहुधा साहूंची बहिण असावी. साहू तिर्थयात्रेला गेले होते आणि जाताना बजावले होते परिक्रमावासियांची सेवा करा. थोड्याच वेळात तेथे मंडळी जमली. प्रतापसिंग पटेल, राहूल अग्रवाल इ. मी दोन/तीन दिवसांत घरी फोनवरुन बोलू शकलो नव्हतो हे कळाल्यावर माझा ताबा राहूल अग्रवालने घेतला आणि शेजारील कोणा एका धनिकाच्या गच्चीवर घेवून गेला (घरमालकाला विचारण्याची पद्धत नाही) तिथे माझा आणि त्याचा मोबाईल यातील सिमची अदलाबदल करुन बरेच प्रयत्न करुन पण यश आले नाही. शेवटी एका पि.सी.ओ. वर घेवून गेला, तेथूनही फोन लागला नाही. मग आणखी एक ठिकाणी घेवून गेला जेथून त्याच्या सेलवरुन मी घरी बोललो आणि आनंदित झालो. महाराज फोनचे पैसे घेण्यास तयार नव्हते. अनोळखी माणसाकरीता वेळ आणि पैसा खर्चकरणारी मंडळी - मैय्याची कृपा ! प्रतापसिंग पटेल यांनी जे पायांनी अधू होते आमच्या गादीची व्यवस्था केली. बळेबळे गादीवाल्याला २०/- रु. दिले. परिक्रमावासियांसाठी साहूजींनी ठेवलेल्या घोंगड्या आम्हाला आजींनी दिल्या. झोपायची उत्तम व्यवस्था झाली. आजींनी अर्ध्या पाऊण तासात आमच्या साठी डाळ, रोटी, चावल इ. सर्व जेवण तयार केले. आमचा इतकुसा आहार पाहून त्यांना आश्चर्य वाटले. जेवायला आमच्याबरोबर शेजारचा एक कुत्राही होता तो नेहमीचाच पाहुणा, रोटी मिळाल्यावर तो नाहीसाही झाला. जेवण झाल्यावर गप्पा झाल्या छान झोप लागली. सकाळी उठल्यावर आजींनी आग्रहाने चहा पाजला तो घेवून आजींचा निरोप घेतला. निघताना मी सोबत आणलेली चादर तिथेच ठेवून आलो, अन्य परिक्रमावासींना उपयोगी पडावी हा हेतू.
आता मैयाला सोडून नेहमीच्या जगात प्रवेश करावयाचा होता. प्रेम, जिव्हाळा, श्रद्धा, आपुलकी, आदर, सन्मान या सर्वांची
परिसिमा गेले चार दिवस आम्ही अनुभवली होती. मन तिथेच होते, शरीर बसमध्ये. बेलखेडा, नटवारा, शहपूरा, चौराहा, धुवॉंधार करुन जबलपूर
गाठले. रेल्वेच्या अतिथीगृहाचे बुकींग करुन बाजारपेठेत गेलो. सदर बाजारात इंडियन
कॉफी हाऊसमध्ये जेवलो बरेच दिवसांनी बाजारु जेवण घेतले. खाणं आणि वातावरण दोन्ही
उत्तम होते. गुजरात स्वीट्स मध्ये खाद्यपदार्थ घेतले.
गरीब रथाचे तिकीट काढलेले होते. गरीब रथ नावानेच गरीब होता, व्यवस्था उत्तम होती. सहप्रवाशी श्री.सुरेंद्र राव जे
स्वत: एक उत्तम चित्रकार आहेत त्यांनी आमचा विषय ऐकल्यावर त्यांचे गुरु
श्री.अमृतलालजी वेगड (ज्यांचे हिंदीतून परिक्रमेवर पुस्तक आहे.) यांचा फोन नंबर दिला आणि
जबलपूरला जोगांना त्यांना भेटणेस सांगा, असा सल्ला दिला. मी तो आमलात आणला, पुढील अनुभव श्री.जोगांनी घेतला. आम्ही (मी आणि पराग)
मुंबईत दुसर्या दिवशी सकाळी ११.३० चे दरम्यान पोहोचलो. मी लगेचच मुंबई सेंट्रलला
येवून दापोली गाडी पकडली आणि नंतर त्वरीत कोळथरे गाठले.
नर्मदा मैय्याच्या सानिध्यात ४-५ दिवस राहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, कोणतीही ऐहिकसुखं पदरी नसतानाही माणूस आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो.
स्थानिक बोलीभाषेतील काही शब्द मी टिपून ठेवले होते.
नर्मदा मैय्याच्या सानिध्यात ४-५ दिवस राहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, कोणतीही ऐहिकसुखं पदरी नसतानाही माणूस आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो.
स्थानिक बोलीभाषेतील काही शब्द मी टिपून ठेवले होते.
लडी = पायर्या, भटा किंवा भटई = वांगं अरहर,राहर,तुअर = तूर, कंडा = गोवरी, इतई = येथे,
उतई = तेथे, तनिक = जवळ, धुवॉंधार = धबधबा
उतई = तेथे, तनिक = जवळ, धुवॉंधार = धबधबा








