घोडा हा प्राणी असा आहे तुम्ही त्याच्या सहवासात आलात की कधी प्रेमात पडता हे कळतच
नाही. कोळथरेला रहात असताना माझ्या घोडसावारीच्या प्रेमाने पुन्हा एकदा उचल
खाल्ली. दापोलीत १-२ 'घोडाप्रेमी' आहेत हे मला माहिती होते. मी लगेच विनय दादाला
(माझा सर्वात मोठा भाऊ) फोन लावला. तालुक्यातील अस्सल मंडळी त्याच्या संपर्कात
असतात. त्याने मला लगेचच दापोली-जालगाव मधील
घोडामालक श्री. कोळथरकर यांचा नंबर दिला. ते एक 'खानदानी' घोडा शौकीन आहेत.
माझे वडील(मामा महाजन) रोज नित्यनेमाने दिड-दोन तास आमच्या जागाजमिनीत फिरत असत.
डोंगरदऱ्यांत, रानात फिरताना त्यांच्या सोबत कायम एक बगलथैली, कोयती आणि एक
आकडी-डेलकी (काठीला एका टोकाला आकडा आणि दुसऱ्या टोकाला इंग्रजी 'V' सारखा आकार) असे.
त्यांचे एक नेहमीचे वाक्य असे "जो कुंपण राखतो तोच जमीनजुमला राखतो"
म्हणून रोज या साजोसामानासह भ्रमंती. हा दिनक्रम माझ्या स्मरणाप्रमाणे वयाच्या
सत्तरी पर्यंत सुरु होता. रानावनातील ही रोजची भटकंती पाहून कोणीतरी मामांना घोडा
घेण्याचे सुचविले, त्यांना देखील ही कल्पना पटली. एकदा मनात आल्यावर ती गोष्ट
करायचीच असा मामांचा खाक्या. परिणामी आमचे कडे आधी 'यशवंत' आणि नंतर 'लक्ष्मी'
नावाची घोडी होती. यशवंत/यश्या हा स्थानिक ओळखीने मिळाला होता. लक्ष्मीला
आणण्यासाठी बाबा (मोठा भाऊ उदय) आणि त्याचा मित्र सुहास असे अलिबाग जवळ गेले
होते. त्यांना यायला ४-५ दिवस लागले होते असे आठवते. उन्हात चालून त्यांच्या
त्वचेचा रंग बदलला होता. यश्या थोडा थकलेला होता लक्ष्मी मात्र तरुण आणि धष्टपुष्ट
होती. 'भाकरी का करपली घोडा का अडला?' या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतला
आहे. दोन-तिन दिवस घोड्याला रपेट केली नाही की लगेच तो फेरफटका मारण्यास विरोध
करतो. इतकेच काय आपण दोन दिवस त्याला एकाच वाटेने नेले तर तिसऱ्या दिवशी नवीन
वाटेने त्याला घेऊन जाणे म्हणजे कर्मकठीण.
माझ्या मोठ्या बहिणीची (गांधाताई) मुले लहान असताना मे महिन्यात महिनाभर आजोळी
कोळथरेला रहायला येत असत. माझ्या स्मरणाप्रमाणे मामांनी लग्नात तशी अटच घातली
होती. मामा रोज शुभुला (भाची) घोडीवर बसवुन गावात फेरफटका मारायला पाठवत त्यावेळी
सोबत एक सांभाळणाराही असे. गावातून फिरत असताना मामांचे चाहते कोणी घरातून कोणी
दारी येऊन कौतुकाने पहात असत. सर्व कार्यक्रम म्हणजे एक सोहोळाच होऊन जाई.
मामांनी सांभाळलेले दोन्ही घोडे स्थानिक होते. मी दापोलीला कोळथरकरांकडे
घोडसावारी शिकायला जायचो तो 'शेरू' रेसच्या घोड्यासारखा उमदा, उंच, तगडा आणि
पांढराशुभ्र होता. मी सकाळी ६ वाजता घरून निघून दापोलीत तासभर सराव करून ९ च्या आत
घरी हजर होत असे. १५ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मी कोळथरकरांना वाकून नमस्कार
केल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच
बसला. शेरू आणि माझी चांगली गट्टी जमली
होती मालकही मला म्हणत डॉ शेरुचे तुमच्यावर खास प्रेम आहे. पहिले ५-६ दिवस
शिकण्यात गेले नंतर मात्र शेरू घामाने भिजे पर्यंत आमची रपेट चालत असे. घोड्यावर
स्वार झाल्यावर आपल्या अंगात एक वेगळीच उर्मी निर्माण होते, जणूकाही 'अश्वशक्ती'
आपल्या शरीरात संक्रमित झाली आहे. एक प्रकारची झिंग, मग त्याची चटक लागते.
एप्रिल-मे मधे कधीतरी शेरूच्या पायाला मोठी जखम झाली. उपचारांत मदतीसाठी मी
आठवड्यातून एखादा दापोलीत जात असे. पुढे कोळथरकर म्हणाले तुम्ही शेरूला पावसाळ्यात
तुमच्याकडे घेऊन जा इथे थोडी अडचण होईल. माझ्यासाठी ती संधीच होती. मी अण्णा (मोठे
बंधू- माधव) जवळ बोलून आमच्या गोशाळे (गोठा) शेजारी शेरुसाठी जागा तयार करून
घेतली. एक दिवस संध्याकाळी ट्रक मधून शेरुची स्वारी आमच्या अंगणात दाखल झाली. शेरूचा
आकार, चाल, उमदेपणा, पांढरा रंग हे पाहून आई आणि पत्नीचे डोळे चमकले, दोघीही खुश
झाल्या. शेरू २-३ महिने आमचे कडे होता. जखमेची सुश्रुषा, खरारा, रपेट ई मी रोजच करत
असे शिवाय शेरू रात्री अपरात्री चक्कर
आल्यासारखे होऊन कोसळत असे त्यामुळे रात्रभर मला सतर्क राहावे लागे. त्याला उठवून
उभे करणे खूप जिकरीचे होई त्यामुळे माझ्या काळजीने बायकोही मदतीस येत असे. या सर्व
उपद्व्यापाचा परिणाम माझ्या तब्बेतीवर होऊन माझे वजन ४-५ किलोने कमी झाले. शेवटी
आई आणि सौ गौरीने 'फतवा' काढून शेरुची रवानगी करण्याचे आदेश दिले. कोळथरकर शेरूला
नेण्यास आले, शेरुची तब्बेत पाहून एकदम खुश झाले. मी माझी अडचण सांगून दिलगिरी
व्यक्त केली तेव्हा म्हणाले " डॉक्टर घोडा ८ दिवस नीट सांभाळणे कठीण आहे
तुमचे कौतुक करायला हवे." शेरू
आमच्या आवारातून बाहेर पडण्यास नाखुश होता कोळथरकरांनाही ते जाणवले.
काही दिवसांनी मी शेरूला भेटण्यास गेलो होतो, शेरू चरायला गेला होता आणि ५-७ फुट
उंच वाढलेल्या गवतात तो दिसतही नव्हता. कोळथरकरांनी दोन-तिन हाका मारूनही शेरू आला
नाही. ते म्हणाले डॉक्टर तुम्ही हाक मारा तो नक्की येईल आणि तसेच झाले, घंटेचा घण-घण आवाज करत शेरू समोर हजर झाला. मी
आनंदून गेलो.
मी घोड्यावर मनापासून प्रेम करतो. जैसलमेरला सायकलिंगसाठी गेलो असताना शेतात घोडा
दिसल्यावर त्यावर स्वार होण्याचा मोह मी टाळू शकलो नव्हतो.
पुण्यात घोडा पाळणे शक्य झाल्यास मी सायकलला राम-राम करेन.


