Wednesday, 9 December 2020
Monday, 30 November 2020
Solo Cycling In Karnataka कर्नाटक एकल सायकल सफर
सात आठ महिने घरी बसल्याने त्यामधेच आनंद शोधायला शिकलो पण माणसाचा मूळ स्वभाव जात नाही. बरेच दिवस 'कुछ करते है' अशी खुमखुमी येत होती, त्यातच मित्र विवेक मराठे हळूच कोस्टल कर्नाटकची सायकल सफर करून आल्याने बेचैनी आणखी वाढत होती. माझी ही पहिली एकल आत्मनिर्भर सहल होणार अशी लक्षणं दिसत असल्याने मनात थोडी धाकधुक होती. कुठेतरी जायचं हे नक्की होतं पण कुठे? हा प्रश्न होताच. आमचं आवडतं राज्य म्हणजे कर्नाटक ! पण त्यातही नेहमीचे भाग टाळून जाण्यायेण्यास सुकर असा इलाका निवडावा या विचाराने मार्ग ठरविला,
पुणे- कुरुंदवाड -वाडी -चिक्कोडी- मुधोळ- बागलकोट- अलमट्टी- ऐहोळ- पट्टडक्कल- बदामी- गोकाक -बेळगावी
अर्थात स्वारगेटहून पहाटे चारपासून कुरुंदवाडच्या बशी आहेत याची चौकशी प्रत्यक्ष तिथे पहाटे जावून केली आणि मगच हा मार्ग निवडला.
मार्ग ठरविल्यावर माहिती गोळा करणे सुरु केले, पर्सनल गुगल कामी आले. श्री.शशांक मेहेंदळे ( 9823276832) यांचे संदर्भाने श्री.अनिकेत बाळ (98224 33255) यांचेशी ओळख झाली, ते गेली सोळा सतरा वर्ष याच भागात सहली आयोजित करत आहे. श्री. बाळ यांनी कोणताही आडपडदा न ठेवता इत्यंभूत माहिती दिली. प्रत्यक्ष सफरी दरम्यान जवळपास रोजच त्यांचेशी सल्लामसलत होत होती.

श्रीगणेशा
नेहमीची ठरलेली तयारी करण्यासाठी मित्रपरिवाराची मदत घेतली, प्रवासात गरज पडू शकतील असे सुटे भाग जमा केले. स्वारगेटला पहाटे चारचं कुरुंदवाड फ्लाईट पकडलं तत्पूर्वी सायकल लोड करण्याचे काम करून घेतले. मजलदरमजल करत अकराच्या आसपास कुरूंदवाड गाठलं, गाडीच्या टपावर चढून सायकलही लँड केली. गावात आमचा महाविद्यालयीन मित्र डॉ.उमेश लंबे (98508 66588) याची भेट घेतली. त्याच्या आग्रहाखातर त्याच्यासोबत नाष्टा करुन नरसोबावाडीचा रस्ता पकडला. मंदिर आवारात मुखपट्टी वापराच्या आदेशाचे कसोशीने पालन करून घेतले जात होते. गृहलक्ष्मीला खूश करप्यासाठी अशी मंदिरपर्यटनासारखी छोटीशी कृती फार प्रभावी ठरते. दर्शन घेवून दुपारी दोनचे आसपास चिक्कोडीच्या दिशेने मार्गस्थ झालो.

जोडोंका दर्द
कुरुंदवाड कोल्हापूर जिल्ह्यात येत असले तरी सांगली पासून जवळ आणि कर्नाटक हद्दीलगत आहे. चिक्कोडीचे अंतर चाळीस पंचेचाळीस किमीच असल्याने भर दुपारी दोन वाजता सायकलिंगला सुरवात केली. उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता पण सुंदर रस्ता आणि दुतर्फा उसाची लागवड यामुळे थोडं सुसह्य वाटत होते. राज्याच्या वेशीजवळ आल्यावर चित्र एकदम पालटले रस्ता अचानक खडबडीत झाला, दोन राज्यांच्या सीमेवरील जोडोंका दर्द चांगलाच जाणवला त्यात भर भाषेची पडू लागली, हळूहळू सहज सुलभ मराठी संवाद कमी होउ लागला.
आपल्याकडे जशी गव्हर्मेंट गेस्ट हाउसेस असतात तसे कर्नाटकामधे आय. बी. अर्थात इन्स्पेक्शन बंगलो असतात याची माहिती मित्र अमित मोने (070212 14496) कडून मिळाली होती. सायकलसफर म्हणजे पैशाचा धूर ही संकल्पना मनाला कधीच पटली नाही त्यामुळे आय.बी. ला प्रथम प्राधान्य. गावात शिरल्यावर चौकशी करत आयबी गाठले. आवार मोठा आहे, सर्वत्र अनेक मोठ्या गाड्या लागलेल्या होत्या आणि जोरदार धामधुम सुरू होती.
माझ्याकडे लक्ष देण्यात कोणालाच गम्य नव्हते मी थेट आत घुसून एका अधिकाऱ्याला दिमाखात 'मी सायकलवर आहे रहाण्याची सोय होईल का ?' असे विचारण्याचा प्रयत्न केला, तो ढिम्म. शेजारी उभा असलेला कर्मचारी त्याच्याशी काहीतरी कानडीत पुटपुटला, अधिकारी झिडकारण्याच्या स्वरात 'नो रूम' असे बोंबलला. मी पिच्छा सोडलाच नाही, शेवटी माझी दया येउन त्याने मला एका खोलीत नेले त्यात दोन कॉट होते त्यातील एक मला देवू केली, संडास बाथरूमचा पत्ताच नव्हता.
मी थोडा स्थिरस्थावर झालो तो पर्यंत बाहेरील लगबगही कमी झाली होती. मी पुन्हा त्याला गाठून भाषेचे अडसर पार करत शंभर रूपयाची ऑफर दिली, पुन्हा दुर्लक्षच, क्षणभराने म्हणाला रूम रिपेरिंग - मी समजलो त्याने सायकलवाल्यांचे पाणी जोखले होते, हे फुकटे काही कामाचे नाहीत अशीच त्याची देहबोली होती. अर्थात मला काहीच फरक पडणार नव्हता, हम है राजा राज करे..... त्या खोलीत माझा संसार मांडला. आवाराच्या समोरच एक शाकाहारी हॉटेल आहे तिथे कर्नाटकी खाद्याचा सिलसिला सुरु केला. पहाटे चार वाजता उठून होल वावर इज अवर हा नियम विधींकरिता अंमलात आणला, थोडा फार व्यायाम केला. माझ्या शेजारच्या कॉटवर झोपलेल्या मुलाला उठवून निघण्याची सूचना दिली, कृतज्ञता म्हणून त्याच्या खिशात पन्नास रुपये कोंबले; मी याचे एंपथी एक्सपेंन्स असे नामकरण केले आहे. ठीक साडे पाचला टपरीवर चहा पिऊन मार्गस्थ झालो..
मुधोळपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उसाची प्रचंड शेती आहे, तुरळक कुठेतरी मका, आलं, हळद यांची लागवड दिसली. एकेकाळचा दुष्काळी प्रदेश कालव्याच्या पाण्यामुळे शेतीमधे समृध्द झाला आहे.

सहन होत नाही आणि सांगता येत नाही
पहिल्या दिवशी दुपारनंतरच्या सत्रात चाळीस पंचेचाळीस किमी, मग मुधोळपर्यंत आणखी ऐंशी पंच्याऐंशी किमी सायकलिंग झाले होते. मुधोळनंतर पीक पध्दत थोडी बदलेली जाणवत होती, रस्त्याच्या कडेला कुठे कुठे ओसाड जमीन दिसु लागली होती. उसाव्यतिरिक्त डाळिंब, चिकु, पोपया या झाडांची लागवडही पहाणेस मिळाली. असे असले तरी रस्ता तसाच, अनंत अमर्याद सरळ, चढ आहे की उतार आहे हेच कळत नाही त्यामुळे पेडलिंगला उसंतच नाही. ना चढाईच्या कष्टातला आनंद न उतराईच्या घसरगुंडीचे सुख. एकुणात सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी अवस्था.
याच रस्त्यावर मुद्दापूर क्रॉसवर हायवे पासुन पाच सहा किमी आत जे. के. सिमेंटचा कारखाना आहे. निघाल्यापासून हा पहिलाच मोठा प्रकल्प पहाण्यात आला. बहुदा याचमुळे या भागात चकाचक लांबसडक महामार्गांच्या दुतर्फा महाराष्ट्रासारखे व्यापारीकरण झालेले दिसत नाही आणि म्हणुनच आमच्यासारख्या हौशी सायकलवीरांना इकडे जास्त आनंद मिळतो.
लोकापूर नाक्यावर मस्त नाष्टा करून निघालो आणि लगेचच मागील चाक वेडंवाकडं फिरत असल्याचे जाणवले, थांबून पाहिले तर हवा कमी झाल्याचे जाणवले. नशीबाने तिथेच शेजारी पंक्चरवाला होता त्याचे कडून काम करून घेतले. पाच सहा किमी जातो न जातो तो पुन्हा तेच ! आता मात्र आत्मनिर्भर. शेतात सावलीत सायकल उलटी करून ट्यूब बदलली, संधीचा फायदा घेवून सायकल साफ करून तेलपाणी केले आणि मार्गस्थ झालो. थोड्या अंतरानंतर पंक्चर काढून घेतले, या प्रकरणात दोन तास गेले. बागलकोट गाव खूप गजबजलेले आणि मोठ्ठी बाजारपेठ असलेले आहे. गावाचे बाहेर खूप मोठा जलाशय दिसतो त्यामधे गळ्यापर्यंत बुडलेले माड -नारळाची झाडं पहायला मिळाली. वाटेत पुढे दगडात कोरीव काम करत बसलेले कारागीर दिसले अतिशय निगुतीने मन लावून त्यांचे काम सुरू होते.

सदा सुसज्ज
सायकल सफर सुरु केल्यापासून अलमट्टी धरण पहाण्याची इच्छा मनात होती. बागलकोटनंतर मुख्य रस्त्यावरून अलमट्टीकडे जाणारा रस्ता लागतो. नाक्यावर थोडे उदरभरण करून अलमट्टीची दिशा पकडली. हा रस्ता झाडी असलेला आणि थोडा फार चढउतारांचा आहे तसेच मातीचा रंगही लालसर असल्याचे जाणवू लागले.

जय्यत तयारी कामी आली, बॅगेतली प्लास्टिक पन्नी काढून आंथरली, कपडे वाळत घालण्यासाठी दोरी बांधली आणि सामान मांडामांड केली. मठाच्या आवारातील आठदहा वर्षांची पाचसात पोरं माझ्या वाटोळी जमली. माझा सर्व अवतार पाहून त्यांचे कुतुहल जागृत झाले, आपापल्या परीने जो तो माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. माझ्यासोबत चिक्कू होते ते सर्वांना एकेक दिल्यावर मुलं खुश झाली, आणि पसार झाली. मंदिर आवारातील टाकीच्या नळावर आंघोळ केली. धोबी घाट घातला आणि निश्चिंत झालो. स्वामीजींनी त्यांच्या घरी चहापानासाठी बोलावले तिथे थोड्या गप्पा झाल्या, त्यांनी मंदिराची माहिती दिली. मी देवळात परत येवून झोपी गेलो.
हागणदारी युक्त
स्वामीजींच्या सूचनेनुसार पहाटे प्रथम सीताराम मंदिराला भेट दिली, मंदिर डोंगरमाथ्यावर आहे तिथून अलमट्टी धरणाचे विहंगम दृश्य दिसते. धरणाची छबी मोबाईल मधे टिपली आणि प्रवास सुरू केला. गावातील रस्त्याने पुढे आल्यावर एक तिठा लागतो तिथून उजवीकडे गेल्यावर महामार्ग लागतो. रस्ता नेहमीप्रमाणे सुंदर होता, जोशात सायकलिंग सुरु होते. मी रात्रीचे जेवण संध्याकाळीच करत असल्याने सकाळी लवकर भूक लागते. पोटात कावळे ओरडू लागले होते आणि महामार्गावर हॉटेलचे नामोनिशाण दिसत नव्हते, माझी चिडचिड होवू लागली होती. एका गावाकडून महामार्गाकडे येणारा छोटा रस्ता दिसत होता, तिकडून एक आज्जी बकऱ्या हाकत येत होती, मला आशेचा किरण दिसला मी हॉटेल, काना, इडली असे म्हणत, सोबत विविध हावभाव करून माझ्या भावना पोचविण्याचा कसोशीने प्रयत्न केला. आजीने गावाच्या दिशेने बोट दाखविले.
First Maker of Kardant
देवलापूर मधील रम्य आठवणी साठवून मार्गक्रमण सुरू केले. श्री.बाळ यांनी कुडाल संगम पहाच अशी सूचना केली होती त्यामुळे तो पाहिला. कुडाल संगम म्हणजे जणु सागरच- कृष्णा आणि मलप्रभा नदीचा एवढा महाकाय विशाल संगम असेल अशी कल्पनाही मी केली नव्हती. तिथुनच ऐहोळे येथील मयूर यात्री निवासच्या मंजुनाथ (9591164103) यांचेशी संपर्क करून ऐहोळे गाठण्याचे ठरविले. आमिनगड तिठा येण्यापूर्वी एका फलकाने माझे लक्ष वेधले.
मयुरा यात्री निवासचा परिसर खूप मोठा, बाग बगिचा असलेला आणि हवेशीर आहे. खोल्याही प्रशस्त आहेत, इतक्या की मी माझी सायकल खोलीतील ड्रेसिंग एरियामधे उभी करू शकलो !
विलोभनीय वारसा !कर्नाटकमधे पुरातन वास्तु, मंदिरं, वारसास्थळे पहाण्यासाठी जाणारी मंडळी नेहमी हंपी-बदामी असा जोडीने उल्लेख करतात. हे म्हणजे मुंबई-पुणे या दुकलीचा एकत्र उल्लेख करण्यासारखे आहे. हंपी आणि बदामी यातील जवळात जवळच्या मार्गाने अंतर एकशे चाळीस किमी आहे. असो,
भारतात पर्यटनासाठी फिरणाऱ्या व्यक्तीने ऐहोळे, पट्टडक्कल, बदामी या ठिकाणी आयुष्यात एकदातरी गेलेच पाहिजे आणि हे पाहिल्याशिवाय निव्वळ सामाजिक प्रतिष्ठेकरिता परदेशवारीचा विचारही करू नये असे माझे स्पष्ट मत आहे. येथील वारसा स्थळांचे वर्णन शब्दात करण्याची कुवत माझ्यात नाही. मी एव्हढेच म्हणेन ते पहाताना माझ्या डोळ्यात पाणी आले.
बदामीमधे पोलिस स्टेशन शेजारी महाकुटेश्वर नावाचे एक छोट उपाहारगृह आहे तेथील अन्नाची चव, परिमाण, तेथील स्वच्छता आणि आकारली जाणारी किंमत यांचे अतिशय व्यस्त प्रमाण होते. वीस रुपयामधे पोटभर नाष्टा. दुपारच्या वेळी एक लिंगायत खानावळी गाठली, तेथील जेवण इतकं तिखट होतं, मी भाजी आमटीत पाणी ओतून थकलो, थाळयात तळच तयार झालं. थाळ्यात जर फिशकरी असती तर माशांनी पोहण्याचा आनंद लुटला असता. एकुणात बदामीमधील खाण्याचा अनुभव संमिश्र असाच होता.

सिल्क साडी साठी प्रसिद्ध इल्कल गाव ऐहोळेपासून जवळच आहे. गृहलक्ष्मीला खुश करण्याची नामी संधी साधून सरोदे सिल्क मिल ( 9448924761) यांचे दुकानात खरेदी केली.
सोलोमुळे संधी
बदामी स्टँड समोर न्यु सन्मान डिलक्स ( 09448729741 )हे अतिशय स्वच्छ, सुंदर, छोटेखानी खोल्या असलेले किफायतशीर लॉज आहे. तिथे दोन दिवस राहून नेहमीप्रमाणे पहाटे साडेपाचला टी पॉईंटवर चहा ढोसून मार्गस्थ झालो.
बेळगावी पोचल्यावर मित्र विनय तिनईकरच्या ( 098 90 175666 ) घरी जावून त्याच्या आईच्या हातच्या उपवासाच्या सुग्रास पदार्थांचा आस्वाद घेतला आणि मन तृप्त झाले. नंतर दोन व्यवसायिक भेटी घेतल्या आणि हॉटेल अनुपम येथे बेळगावीमधील अट्टल सायकलवीर राजु नायक (099025 21116 ) आणि संतोष शानभाग यांचेशी चर्चासत्र झडले.
रात्री सव्वाअकराची स्लीपरकोच गाडी पकडून सही सलामत घर गाठले.
संपूर्ण प्रवासात मा. मुख्यमंत्री अथवा अन्य राजकारणी यांची फ्लेक्सबाजी कुठेच दिसली नाही. आपल्याकडे विविध आस्थापनांमधे मालकांचे फोटो दादा, भाऊ, आण्णा, काका, काकासाहेब यांचे सोबत लावण्याचा प्रघात आहे, तिकडे मात्र मालकांचे फोटो धर्मगुरू, शास्त्री, गुरुजी यांचे सोबत झळकलेले दिसले.
असं ही असू शकतं ! धन्यवाद.
Wednesday, 14 October 2020
Bamboo Fencing बांबू कुंपण
स्वप्न
साकार !

आमचा मित्र विवेक मराठे अशी सामान्य स्वप्न पहात नाही. स्वप्नाची इश्टोरी सुरू होते मेघालयातून ! तीन वर्षापूर्वी आम्ही मेघालयात स्वनिर्भर आणि स्वैर सायकलिंग केले. तिथे दैनंदिन जीवनात बांबूचा वापर प्रचूर मात्रेत केला जातो. टोप्या, टोपले, टोपल्या, घरासाठी कुंपण, नाल्यावरील सेतू पासुन ते होम स्टे साठीची खोली बांबू पासून बनविली जाते. अशा एका होम स्टे मधे आम्ही राहिलो देखील. तेथील ग्रामजीवन आम्ही अगदी जवळून अनुभवले आणि विवेकला बांबूच्या वापराची स्वप्न पडू लागली. मेघालायातून परतल्या पासून महिना-दोन महिन्यांनी त्याचा बांबूजप सुरू असे.

पुण्याला आमचे अंगणात बांबूचे बन फोफावले आहे, त्याचा सदुपयोग करण्याचा किडा विवेकच्या डोक्यात वळवळत होता. प्रथम आम्ही एक चौपाई बनविली नंतर एक झोकदार बाकडंही बनविलं पण त्याचे समाधान होत नव्हतं. त्याचे स्वप्न होतं घरासमोर मेघालय पद्धतीचे बांबूचे कुंपण !

बांबूचे तोडकाम, चिरकाम केले, घरासमोरील मोकळ्या जागेची मोजमापे काढली आणि त्याला योग्य आकाराचे चिरलेले तुकडे आणि उभे पुरण्यासाठी डांब तयार केले. हे सर्व करत असताना अधुन- मधुन वरुणराजाची कृपा सुरु होतीच तिकडे कानाडोळा केला. तयार झालेली सामग्री महिनाभर वाळू दिली मग त्याला किटकरोधकाचे लिंपण करून ठेवले.

अंगमेहनतीचे काम करणे हे आजकाल कमी दर्जाचे मानणारे स्वतःला उच्चभ्रू म्हणवून घेतात त्यातच त्यांना मोठेपणा वाटतो. कोणत्याही कामास कसब, बुध्दी आणि चिवटपणाची गरज असते, हे ती कामं हातावेगळी केल्याशिवाय कळणार नाही.
कष्टाच्या कामाने आलेल्या घामाला दुर्गंधी नसते. कष्टाचे मोजमाप अर्थनिर्मितीशी जोडण्यापेक्षा आनंद निर्मितीशी जोडण्यास आपण कधी शिकणार ?
विवेकची
मुलगी सृष्टी म्हणते त्या प्रमाणे, हे -
SWEET SWEATING !
स्थळ :
सृष्टी अनघा विवेक मराठे,
३५ नारायण पेठ, पुणे.
Sunday, 13 September 2020
मास्कचे महात्म्य
मास्कबाबत बोलू काही !
पुणे... स्वत:ची अस्मिता, स्वत:चा विचार करण्याची क्षमता असण्याचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांचं शहर... सहाजिकच कोणीतरी सांगितलं म्हणून सहजपणे ऐकणाऱ्यांपैकी आम्ही नाही...मग तो मास्क असो की हेल्मेट !
सध्या मास्कबाबत हा लेखनप्रपंच
मुळात मास्क का वापरायचा? याचं सर्वात कॉमन उत्तर म्हणजे पोलिसाला ५०० रुपये दंड ऊगाच द्यावा लागू नये म्हणून... असं येईल... खरी गल्लत येथेच होत आहे...
आपणा सर्वांना माहीत आहे की मास्क वापरायचं खरं काम शल्यविशारदांचं... ते का बरं मास्क वापरतात ? तर १९०२ साली फिलाडेल्फिया येथे एक शस्त्रकर्म चालू असताना काही वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की सर्जन लोक बोलत असताना त्यांच्या थुंकीचे सूक्ष्म कण ऑपरेशनच्या जखमेत पडत आहेत... यावर आणखी संशोधन होऊन तथ्य आढळल्यावर मास्क वापरण्याची पद्धत पडली...
आपल्याही बोलण्या, खोकण्या, शिंकण्यामधून उडणाऱ्या थुंकीच्या कणांमधून व्हायरसचा संसर्ग पसरण्याची शक्यता असते.... ते कण पसरू नयेत, तिथेच शोषले जावेत म्हणून मास्क. म्हणजे मास्कचं मुख्य काम आपल्यामुळे इतरांना संसर्ग होऊ नये हे असून दुसऱ्यामुळे आपल्याला संसर्ग होऊ नये हे उपकथानक आहे (ते ही महत्त्वाचं आहेच)... हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे
आता प्रश्न येईल की, मला तर काहीच होत नाहीये, मग मी का मास्क वापरू ?
मला त्रास होत नाही म्हणजे मला इन्फेक्शनच नाही असं काही जरूरी नाही... इन्फेक्शन असूनही लक्षणमुक्त असणाऱ्या रुग्णांचंच प्रमाण प्रचंड आहे, हे वेळोवेळी होणाऱ्या सीरोसर्व्हेमधून समोर येत आहे... खरं तर हा नवीन आजार असल्याने त्याबद्दल निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही, संशोधनातून मिळणाऱ्या निरीक्षणांमधून गाईडलाईन्स बनत आहेत.. त्या कधीकधी बदलत असलेल्या दिसल्या तरी, सध्या त्या काटेकोरपणे पाळणं हेच आपलं कर्तव्य आहे... लक्षणमुक्त रुग्णांकडून व्हायरसचा प्रसार होतो की नाही याबद्दल अजूनही नक्की माहीत नसलं तरी, होत असावा असं मानण्यासही जागा आहे... त्यामुळे खबरदारी म्हणून मास्क वापरणं श्रेयस्कर...
आपल्याला जर समजलं की उद्या नळाला कदाचित् पाणी न येण्याची शक्यता आहे... मग अशा वेळी आपण काय करतो ? खबरदारी म्हणून पाणी भरून ठेवतोच ना? तसंच इथेही करायचं आहे... मास्क वापरायचा आहे...
आणखी एक प्रश्न असतो की, खुल्या हवेत, विशेषतः व्यायाम करताना मास्क वापरायचा की नाही ? तर अशावेळी सुद्धा मास्क आपल्या तोंडावर तरी असायलाच हवा... आजूबाजूला ६ फूट अंतरापर्यंत कोणी नसेल तर नाकावर नाही ठेवला तर चालेल... समोरून कोण येत असेल तर नाकावर चढवावा नंतर पुन्हा खाली करून तोंडावर ठेवावा...
दोन माणसांपैकी एकाने मास्क वापरला तर इन्फेक्शनचा धोका ५० टक्क्यांनी कमी होईल... दोघांनीही वापरला तर ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात धोका कमी होईल...
आपले पोलिस बांधव केले ५-६ महिने प्रचंड तणावात काम करत आहेत... हजारो बांधव केवळ आपल्यासाठी कर्तव्य बजावत असताना आजारी पडले आहेत, काही शहीदही झाले आहेत. आपण मास्क घातला आहे की नाही हे बघत बसणं हे खरं तर त्यांचं काम नाही, पण आपल्या बालिशपणामुळे आपण त्यांचा भार विनाकारण वाढवत आहोत, त्यांचा संसर्गाचा धोकाही वाढवत आहोत आणि वर दंड घेतला म्हणून त्या़ना नावेही ठेवत आहोत... हे दुर्दैवी आहे...
सध्या कोरोनाची परिस्थिती भीषण होत चालली आहे, बेड मिळणं अवघड झालंय, मिळाला तर ऑक्सिजन मिळणं अवघड... व्हेंटिलेटर तर त्याहून दुष्प्राप्य. त्यात कहर म्हणजे हा आजार घरात एकट्यालाच होत नाही, अनेका़ना होतो... एकदा रुग्ण रुग्णालयात गेला की त्याची प्रत्यक्ष भेटून विचारपूस करणं शक्य नाही, त्याला घरचं जेवण बिवण पण नाही... रुग्णालयात जे देतील ते खायचं असा सगळा मामला आहे. एकाच घरातले ४ जण वेगवेगळ्या रुग्णालयात आणि उरलेले १-२ लोक घरात... अशी परिस्थिती अनेक ठिकाणी उद्भवलेली आहे.
त्यामुळे आतातरी आपल्या हौशीमौजीला जरा मुरड घालू या, अत्यावश्यक तेवढ्याच गोष्टी करू या... बाहेर जबाबदारीने वागू या... मास्क व सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन करू या.
कोरोनाचं संकट कधीतरी संपेलच... पण कोरोनानंतरचं जग सहकुटुंब बघायची इच्छा असेल तर सध्या थोडे परिपक्वतेने वागूया.
कोणता मास्क वापरावा याबद्दल पुन्हा कधीतरी !
डॉ. रणजीत निंबाळकर, ०८०८७८७३११५
डॉ निंबाळकर पुणेस्थित एक प्रथितयश आयुर्वेद चिकित्सक आहेत.
Thursday, 13 August 2020
Corona Ki Kamaal
कोरोना कोरोना, कुछ करोना !
विचार, लेखन मित्र विवेक मराठे याचे,
आवडले म्हणून आपल्या समोर मांडतोय.
करोंना
दिवसात कलाकुसर, हस्तकला, चित्रकला, काम करायला अचानक बक्कळ फुरसत सापडली. नुसता विचार आला की अंमलात
आणायला आणि धडाधड,
सूचना करायला सर्वच 'रिकाम्या
डोक्याचे' !
रामदास महाजनकडे त्याच्या बगीच्यातले उंचच-उंच बांबू तोडणे, त्याच्या फांद्या साफ करणे, मापात कापून ते वाळवायला ठेवणे असे उद्योग केले आणि मग नवनिर्मिती देखील. ही कामे करायला, दिवा घासला की दिवाराक्षस (मी) हजर व्हायचोच !
.. रामदास ने हळूहळू काही हत्यारे जमवली, पण सारा भर आहेत त्या साधनात काम करायचे यावरच होता.
उक्तं काम देण्याच्या आजच्या जमान्यात, आपण शहरी लोक हाताचा आणि डोक्याचा वापर करून काही आनंददायी निर्मिती करायचे विसरलो आहोत..
आणि मुख्य मुद्दा - ते हौसेने, आनंदासाठी केलेले काम; कला, उच्च दर्जाची सफाई नसलेली असेल तर इतरेजन काय म्हणतील ? आपल्या चालू पेशाला, दर्जाला, वयाला, जी निर्मिती होईल ती शोभेल का ? हाच विचार सारखा मनात असतो.. आणि कृतीला ब्रेक लागतो.
किती लोक हौसेने माती काम, चित्रकला, विणकाम, कागदाचे क्विल्लींग, शिवणकाम, पाक कला करताना आनंद घेत आहेत ? या आधी आपण अशा आनंद देणाऱ्या गोष्टी इच्छा असून करू शकलो नव्हतो. सौंदर्य दृष्टया निर्मिती उन्निस बीस असेल तर असू दे, करोना आहे तोपर्यंत सुधारणेला वाव आहे, तो पर्यंत आनंदशोध घेत राहू...
ताजा
कलम:
आज हे लिखाण करतांना माझ्याजवळचे, अनघा मराठे, निशा पासलकर, शर्वरी मेहेंदळे, रामदास महाजन,
परिणीता मराठे, चिन्मयी डोळे, प्रफुल्ल साठे, अमृता
महाजन, इत्यादींची हटकून आठवण आली.
करोना अनुभव - ऑगस्ट २०२०
विवेक मराठे, पुणे
#आनंदशोध #कला #स्वान्तसुखाय #selfsatisfaction #art #creativity
#corona #stayhome
Lamp Shade : Amruta Mahajan

चला वाचूया .....Let's start reading.
सजग संयत जीवन आणि अर्थभान Mindful Vigilant Life And Financial Wisdom
पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...
-
गुंतवणूक गुरु वॉरेन बफे ३० ऑगस्ट रोजी ९५ वर्ष पूर्ण करत आहेत . जगातील एक अग्रगण्य श्रीमंत व्यक्ती म्हणून आपण सर्व जण त्यांना ओळख...
-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इथे या ठिकाणी ! सात आठ महिने घरी बसल्याने त्यामधेच आनंद शोधायला शिकलो पण माणसाचा मूळ स्वभाव जात नाही. बरेच दिवस ...
-
पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आ...













