पैसा हे सर्वस्व नाही पण हे वाक्य बोलण्यापूर्वी तुम्ही पुरेसं धन जमा केले आहे याची खात्री करून घ्या ! वॉरेन बफे
लग्न झाल्यावर पहिली ३ वर्ष आम्ही पुण्यात रहात होतो नंतर १९९९ साली कोळथरे या मुळ गावी रहाण्यास गेलो . तिथे १४ वर्ष 'वन' वासाचा आनंद घेतला त्यामुळे मोठी मुलीचे बालपण आणि १० वी पर्यंतचे शिक्षण गावातच झाले . ज्या मुलांचे बालपण खेडेगावात जाते ती खरी भाग्यवान आणि पालक होतात धनवान ! कारण पालकांसाठी त्याचा एक वाढीव फायदा आर्थिक स्वरूपातील देखील आहे त्याकडे बरेच वेळा दुर्लक्ष होते . शहरातील बालवाडीतील मुलाचा एक वर्षाचा खर्च आणि खेडेगावातील पहिली ते दहावीचा खर्च जवळपास सारखाच येत असावा . खेडेगावात पॉकेट मनी ही संकल्पनाच अस्तित्वात नसते त्यामुळे तो किती हा प्रश्नच गैरलागू .
मुलांमधे अर्थभान कसं आणि कधी रुजवावं याचं नेमकं उत्तर देणं तसं कठिणच आहे . या बाबत माझं मत थोडं वेगळं वाटू शकते , फार लहान वयात मुलांसोबत आर्थिक व्यवहारांबाबत बोलणे किंवा चर्चा करणे टाळावेच . ज्या प्रमाणे शहरातील मुलांना विविध कारणांमुळे अकाली प्रौढत्व येते तसेच लहान वयात उगाचच अर्थभानाचा डोस देऊन मुलं अर्थसाक्षर न होता त्यांच्यामधे भयगंड ( फोबिआ ) निर्माण होण्याची शक्यताच अधिक .
किस्सा १ - आमची धाकटी मुलगी पुण्यात शाळेत असतानाचा किस्सा आहे . आम्हाला घरात पाच पन्नास हजार रुपये किमतीची काहीतरी गृहोपयोगी वस्तू घ्यायची होती , मुलीला किमतीची कल्पना नव्हतीच. माझ्या सवयी प्रमाणे मी गमतीनेच बोलत होतो आता एवढे पैसे कुठून आणायचे ? मुलगी चटकन म्हणाली बाबा माझ्या पाकीटातले पैसे घ्या . तिला बक्षिस अथवा भेटीच्या स्वरूपात मिळालेले ५००-६०० रुपये एका पाकीटात साठवले होते , तिच्यासाठी ते खूप होते आणि आपण आई बाबांना मदत करू हा भाव तिच्या मनात होता जो अधिक महत्वाचा होता . त्या वयात मुलं अर्थविषयात अशीच 'बालबुद्धी' असावीत असे माझे स्पष्ट मत आहे . मुलांचे बालपण जपणं ही पालकांची जबाबदारी आहे .
मी वैद्यक शिक्षण पूर्ण केले असले तरी त्या विषयात रुची नाही मला आकडे आकर्षित करतात त्यामुळे अर्थ विषयक माहिती मिळविण्याचा छंद आहे . आम्ही कोळथरे सारख्या १०००-१२०० वस्तीच्या गावात राहत असलो तरी, मी विविध नियतकालिकांच्या माध्यमातून अर्थविषयक माहिती मिळवत असे . उद्योजक , उद्योगविश्व ,यशस्वी व्यक्ती यांविषयी आदरयुक्त कुतुहल असल्याने त्याविषयीचे वाचन सतत सुरू असते . अर्थात मुली लहान पणापासून ते बघत आल्या असाव्यात . आमचे गाव समुद्र किनारी असल्याने अनेक पुणेरी पर्यटक नेहमी येत असत असेच एक, केदार पटवर्धन . त्यांच्यामुळे पुण्यातील एका गुंतवणूक विषयक तज्ज्ञांशी संपर्क झाला. आम्ही दापोली मधे समविचारी मंडळींची एक बैठक बोलावून त्यांचं मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित केले . अन्य कोणी गुंतवणूक सुरु केली अथवा नाही याची मला कल्पना नाही पण मी कोळथरे येथे राहून २०१० चे दरम्यान म्युच्युअल फंड मधील पहिले SIP सुरु केले त्यावेळी हा शब्ददेखील बहुश्रृत झाला नव्हता . आमच्या कडील युनियन बँकेच्या शाखेत MICR , CBS इ सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने आम्हाला त्याकरिता पुण्यातील शाखे मधे खाते उघडावे लागले .
आपण कोणतीही गुंतवणूक करतो त्याचा मुख्य उद्देश असतो धनराशी वाढवून भविष्य सुरक्षित करणे . गुंतवणुकीचा निर्णय घेताना बरेच वेळा आपण 'महागाईदर' या राक्षसाकडे दुर्लक्ष करतो . महागाई दरामुळे पैशाची क्रयशक्ति कमी कमी होत जाते . जीवनावश्यक वस्तुंचा महागाईचा दर आपण ५ टक्के गृहीत धरला तर एक वर्षांनतर मला १०० च्या जागी १०५ रुपये खर्च करावे लागणार आहेत . अशाच पद्धतीने शिक्षण आरोग्यसेवा ई गोष्टींवर यापेक्षा कितीतरी अधिक दराने माझा खर्च वाढणार आहे . त्यामुळे याहून अधिक परतावा मिळविल्या शिवाय मी माझे गुंतवणूक ध्येय गाठू शकणार नाही . पारंपारिक बँकेतील ठेवी जेमतम याला समांतर इतका परतावा देतात जो पुरेसा पडणार नाही . मग पर्याय म्हणून मला इतर साधने शोधावीच लागतात . माझ्या दृष्टीने म्युच्युअल फंड मधील SIP हा सर्वात साधा , सरळ , सोपा मार्ग आहे . तुम्ही एकदा निर्णय घेतला की दरमहा ठराविक रक्कम आपोआप गुंतवली जाते आपल्याला एकच काम उरतं तिकडे दुर्लक्ष करणे . याच विचाराने आलेल्या संधीचा लाभ उठविला .
यामधून मुलींना बाळकडू मिळत होते आपण कुठे राहतो हे महत्वाचे नसून कोणाच्या संपर्कात आहोत हे अधिक महत्त्वाचे . आणि हो ते SIP अजून पर्यंत सुरु होते याच महिन्यात आम्ही गुंतवणूक योजना बदलली .
किस्सा २ आम्ही पुण्यात आल्यावर घरची रद्दी विकून आलेले पैसे साठवून त्या पैशातून रद्दीच्याच दुकानातून जुनी पुस्तके विकत घ्यायची असा अलिखीत नियमच होता . असे केल्याने रद्दीच्या दरात आपल्याला झाकली माणकं मिळतात त्यातील एक, श्री अतुल सुळे यांचे 'चक्रव्यूह शेअर बाजाराचा मार्गदर्शन गुंतवणूक गुरुंचे ' ज्या पुस्तकाने माझ्या विचारांना दिशा दिली .
यातुन अनायासे मुलींना दोन तत्व लक्षात आली . एक रक्कम कितीही छोटी असली तरी ती साठवावी आणि दोन त्यातून मोठं काम घडू शकते .
किस्सा ३ मोठ्या मुलीचे लग्न झाल्यावर तीने नवीन घरात स्वतंत्र रहावे असा माझा अट्टाहास होता . घर शोधण्या पासून ते घर लावून पूर्ण होई पर्यंत मी तिकडे फिरकलोही नाही . मी आश्वस्त होतो मुलगी हे सर्व समर्थपणे सांभाळेल तीने ते केलेही. पण शेवटी शेवटी तिला ते खूप आंगावर आले आणि शेवटी माझ्यावर भडास काढली त्या क्षणाला मला अपराधी वाटलं . पण स्वतंत्र व्यक्तिमत्व घडण्यासाठी ते आवश्यक आहेच . या सर्व प्रक्रियेत अनेक छोटे मोठे आर्थिक निर्णयही तिला घ्यावे लागले ते तीने तारतम्याने घेतले.
किस्सा ४ मोठ्या मुलीचे लग्न सर्वानुमते रजिस्टर केले त्यावेळी एक छोटेखानी कार्यक्रम केला त्यावेळी मी माझ्या लग्नातील सूट वापरला . स्वागत समारंभा वेळी धोतर , जाकेट , चामड्याची पादत्राणे ई सर्व मित्राचे वापरून दिमाखात मिरविले .
एखाद्या वस्तुवर आपण किती रक्कम खर्च करतोय यावर आपला आनंद अथवा समाधान अवलंबून नसते . लग्नासारख्या समारंभामधे वापरल्या जाणाऱ्या वस्तू बराच वेळा परत कधीच वापरल्या जात नाहीत . अशा वेळी निव्वळ देखावा अथवा प्रतिष्ठेचे प्रतिक म्हणून वस्तुंवर किती खर्च करावा याचा तारतम्याने विचार करायला हरकत नाही, असा विचार त्या वयात मुलांना पटणार नाही पण जो संदेश पोचणं अपेक्षित आहे तो पोचतोच
समझने वाले को इशारा काफी असतो . गेल्या २० एक वर्षात माझ्या कपडयांची एकुण संख्या कधी वाढलीच नाही . एक पोशाख खराब होऊन वापरण्यास अयोग्य झाल्याशिवाय नवीन घ्यायचाच नाही हा नियम मी काटेकोरपणे पाळतो मुलींना त्यातून योग्य तो संदेश जातच असतो .
किस्सा ५ मी स्वतः ठिकठाक आर्थिक शिस्त पाळतो पण मुली ती कशी आत्मसात करतील असा प्रश्न पडतोच . छोटीला रोज २ वेळा कॉफी प्यायची सवय होती ते मला थोडं खटकायचं तेव्हा ती सेकंड ईयरला होती . मी तिला एक ऑफर दिली, तू रोजची एक कॉफी बंद कर मी तेवढे पैसे म्हणजे रोजचे ३० रु महिन्याचे १००० रु म्युचुअल फंड मधे तुझ्या नावाने गुंतवेन . तीने थोडा विचार केला आणि होकार दिला. त्या दिवसा पासून आम्ही तिच्या नावाने दरमहा १००० रु चे SIP सुरु केले त्यामधे दरवर्षी ठराविक वाढही आम्ही करणार आहोत . पहिला फायदा म्हणजे व्यसन कमी झालं आणि दुसरा आपसुक आर्थिक शिस्त लागली , एका दगडात दोन पक्षी .
मी वैद्यकीय शिक्षण घेत असताना आमचा मासिक खर्च साधारण ४०० रु असायचा आणि बहुतेक मुलांचा महिन्याचा शेवटचा आठवडा उधारीवरच चालत असे . माझ्या वडिलांनी आमच्या एका डिलरला त्याची येणे रक्कम माझ्या खात्यात भरायला सांगीतले होते त्यामुळे माझ्या बँक खात्यात काही हजार रुपये नेहमीच असत . तरी देखील माझा मासिक खर्च कधीच ४०० रु हून अधिक झाला नाही . उलट होणारा प्रत्येक खर्च मी वहीत लिहून ठेवत असे संपूर्ण ६ वर्षांची हिशोबाची वही मी अजून जपून ठेवली आहे . माझाही ठराविकच पॉकेट मनी मिळेल या संकल्पनेवर विश्वास नाही आम्ही आमच्या मुलींना कधीच ठराविक पॉकेटमनी दिला नाही . ठराविक किमान रक्कम खिशात कायम हवीच, ती कमी झाली की त्यात भर घाला हिच शिकवण होती . आता तर डिजिटल युगात महिन्याभरात मुलाचा जेवढा खर्च झाला असेल तेवढे पैसे त्याच्या / तिच्या खात्यात डिजिटली ट्रान्स्फर करायचे किस्सा खतम . नियम अटी लादून आर्थिक भान येईल का नाही हे माहिती नाही पण विश्वासाने पूर्ण जबाबदारी टाकली तर ते नक्कीच येते असा आमचा अनुभव सांगतो .
जाता जाता ,
पैसा भी और पर्यावरण भी
गेली १० वर्षे मी पुण्यामधे कामानिमित्त फिरण्यासाठी आणि अन्यथा देखील वाहन म्हणून सायकलचाच वापर करत आलो आहे . महिन्याचे ५००/- रुपयांचे इंधन वाचत असेल असे गृहीत धरल्यास बऱ्यापैकी आकडा होईल , गृहपाठ म्हणून आकडेमोड करायला हरकत नाही .
मी एक उल्लेख आवर्जून करेन सगळे विषय सगळ्यांना कळतीलच असे नाही त्यामुळे विशिष्ट विषयातील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला जरूर घ्यावा .
मला स्वतःला आर्थिक विषयात रस असल्याने, मुंबईचे विनायक कुलकर्णी, द रा पेंडसे (JRD टाटांचे सल्लागार ) वसंतराव पटवर्धन ( बँक ऑफ महाराष्ट्र ) , अतुल सुळे अशा अनेक तज्ज्ञांना मी भेटलो आहे ज्याचा मला खूप फायदा झाला , विचारांना निश्चित दिशा मिळाली .
या ठिकाणी एका विचारवंतांचे म्हणणे आठवते ,
Best things in life are free and second best are too costly !
तेव्हा उगाच उधळपट्टी करू नका मजेत जगा .
सजगपणे संयत जीवनशैली अंगिकारून आपण आनंदी जीवन जगू शकतो हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो .
धन्यवाद










































































